वसंत बंग आणि जस्टिन पॉल
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ने नुकतेच २०२३ साठीचे रँकिंग प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे ज्या शिक्षण संस्थांचे राष्ट्रीय पातळीवरील रँकिंग उच्च दर्जाचे असते त्या शिक्षण संस्था रँकिंगबाबतीत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समकक्ष का नसतात असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय आणि जागतिक क्रमवारीच्या निकषांमध्ये फरक आहे आणि भारतीय संस्था आकलनात मागे आहेत असे कुणी म्हणू शकते. पण भारतीय विद्यापीठांमधून क्वचितच कुणी नोबेल पारितोषिक विजेता निर्माण झाला आहे, त्याचबरोबर भारतीय उद्योगात नावीन्यपूर्णतेचा अभाव आहे, या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.
संशोधन हे रँकिंगच्या प्रमुख मापदंडांपैकी एक असल्याने, अनेक विद्यापीठांनी संशोधनावर लक्ष केंद्रित केले आहे. तथापि, काही तज्ज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, अनेक संस्था म्हणजे भरपूर संख्येने सुमार दर्जाचे संशोधन पेपर प्रसिद्ध करणारे कारखाने झाले आहेत. फार थोडे शोधनिबंध असतात, जे उच्च दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध होतात.
संशोधने प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनांची सामान्यतः पीएचडी संशोधनांवर मोठी मदार असते. म्हणून, कोणत्याही विद्यापीठांमधून होणाऱ्या संशोधनांची गुणवत्ता सुधारायची असेल, तर त्यासाठीची सुरुवात पीएचडीविषयक संशोधनांपासून झाली पाहिजे. संबंधित विषयाच्या ज्ञानाचे क्षेत्र वाढवणे हे पीएचडी संशोधनाचे उद्दिष्ट असते. ज्ञानाच्या तीन विस्तृत श्रेणी आहेत: त्या म्हणजे ‘कसे’, ‘काय’ आणि ‘का’ या तीन गोष्टी जाणून घेणे. हे एका काल्पनिक उदाहरणाने स्पष्ट करूया.
शेतकरी फळांच्या झाडांभोवती जाळी लावतो. त्यामुळे खाली पडणारी फळे त्या जाळीत गोळा होतात, अन्यथा ती जमिनीवर पडून खराब होतात. चरायला सोडलेली जनावरे विहिरीत पडू नयेत म्हणून विहिरीभोवती भिंत बांधली जाते. या उदाहरणामध्ये, शेतकरी आणि स्थापत्य अभियंता यांना ‘काय’ करावे लागेल आणि ‘कसे करावे’ या ज्ञानाचा फायदा होतो. या दोन्ही प्रकरणांमध्ये ‘का ते जाणून घ्या’ हे सामान्य आहे आणि तो ‘गुरुत्वाकर्षणाचा नियम’ आहे. सार्वत्रिक किंवा सामान्यीकरण करण्यायोग्य असे ज्ञान निर्माण करण्यावर विद्यापीठांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. युनिव्हर्सिटी हा शब्द ‘युनिव्हर्स’ आणि ‘इति’चे संयोजन आहे. त्यात इति हा शब्द संपूर्णपणा दाखवतो आणि युनिव्हर्स हा शब्द दर्जा दाखवतो. विद्यापीठे ही अशी ठिकाणे आहेत ज्यात पूर्णत्व हा गुण असणे आवश्यक आहे. तिथे निर्माण झालेल्या ज्ञानाचा व्यापक वापर व्हायला हवा. झाडांभोवती जाळी कशी लावायची किंवा विहिरीभोवती भिंत कशी बांधायची हा शिक्षणाचा नाही तर कौशल्य प्रशिक्षणाचा भाग आहे. विद्यापीठे ही असे शिक्षण देण्यासाठी असतात, जे कोणतेही स्थळ, काळ आणि परिस्थितीला अनुरूप ठरेल.
कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना व्यक्ती ‘का’ हा प्रश्न घेऊन सातत्याने शोध घेत राहू शकते, तर एखादी व्यक्ती तिला हव्या असलेल्या विषयातील ज्ञानाचा शोध घेत अशा स्थानी पोहोचू शकते, की त्यापलीकडे त्या विषयातील कोणतेही ज्ञान मिळवणे तिच्यासाठी शिल्लक उरलेले नाही. त्या विषयाच्या संदर्भातील पुढील दुवे ओळखून ज्ञान विस्तारत जाते. या संदर्भातील प्रत्येक नवीन दुवा ओळखून, ‘काय’ आणि ‘कसे’शी संबंधित पर्याय वाढत जातात. म्हणूनच, अभिजन वर्गाला ‘का’ जाणून घेण्यामध्ये अधिक स्वारस्य असणे अपेक्षित आहे, तर अभ्यासक ‘का आणि कसे’वर लक्ष केंद्रित करतात.
‘का’च्या मालिकेनंतर, एखादा संशोधक अशा टप्प्यावर पोहोचतो जिथे अधिक गोष्टी समजून घेण्यासाठी डेटाच्या पलीकडे केवळ तर्कशक्ती महत्त्वाची ठरू शकते. मानवी तर्कशक्तीने तिला महत्त्वाच्या वाटलेल्या गोष्टींमागच्या कारणांचा शोध घेत जाऊन निर्माण केलेले विज्ञान म्हणजेच तत्त्वज्ञान. म्हणूनच संशोधनाशी संबंधित सर्व शाखेतील पदव्यांना डॉक्टरेट फिलॉसॉफी असे म्हणतात. क्षुल्लक संशोधन विषय तसेच सदोष संशोधन पद्धतींची निवड यामागे तत्त्वज्ञान तसेच संशोधनपद्धतीतील अपुरी माहिती हे प्रमुख कारण आहे.
उच्च दर्जाची जर्नल्स विद्यमान ज्ञानाच्या पलीकडे जाणाऱ्या आणि ज्ञानाचा विस्तार करणाऱ्या, ते वाढवणाऱ्या संशोधनांचा शोध घेतात. याशिवाय, अशी संशोधने वेगवेगळ्या गरजा पूर्ण करता येतील यासाठीचे वेगवेगळे उपाय शोधून त्यांचा अधिकाधिक व्यावसायिक आणि सामाजिक उपयोग होईल अशा संधी देतात. त्यामुळे विद्यापीठांनी ज्ञानातील पोकळी भरून काढतील अशा पीएचडी विषयांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संशोधन विषयांना मान्यता देणाऱ्या वैयक्तिक विद्यापीठांच्या संशोधन मान्यता समित्यांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात, लोक विद्वत्ता, पांडित्य यापेक्षा नातेसंबंधांना अधिक महत्त्व देतात, हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे.
भारतासह जगभरातील विद्वानांचा समावेश असलेला, पीएचडीचे विषय आणि कार्यपद्धती यासाठीचा राष्ट्रीय पातळीवरील थिंक टँक तयार करणे आवश्यक आहे. केवळ व्हायवा पूर्ण होण्यापुरतेच नव्हे तर पीएचडी सुरू होण्याच्या टप्प्यावरदेखील विद्यार्थ्याचे नाव गोपनीय ठेवून त्याची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा तयार केली जावी. मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया खरोखरच चांगल्या असतील तर त्या क्षुल्लक विषयांवरील पीएचडी प्रबंधांना अर्थपूर्ण संशोधनात रूपांतरीत करू शकत नाही. जागतिक पातळीवर मान्यता मिळवण्यासाठी पीएचडीच्या अभ्यास प्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. इच्छुक विद्यार्थ्यांपैकी जेमतेम एक टक्के विद्यार्थ्यांना काही संस्थांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो, ही वस्तुस्थिती, जागतिक पातळीवर बौद्धिक दबदबा निर्माण करण्यासाठी पुरेशी नाही. त्यासाठी जागतिक पातळीवरील विद्वज्जन, शिक्षक, विद्यार्थी यांना आकर्षून घेणाऱ्या एकेकाळच्या नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठांची पुन्हा नव्याने उभी करण्याची गरज आहे.
लेखक पुणे स्थित असून व्यवस्थापन या क्षेत्रात अध्यापन करतात तसेच विविध विद्यापीठांच्या संशोधन कार्यक्रमांशी संबंधित आहेत.