सौमित्र
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सार्त् नेहमी सगळे पैसे त्याच्या खिशात घेऊन फिरायचा, असं कुठेतरी वाचलं होतं. तसंच एखादा कवी आयुष्यभर लिहिलेल्या आपल्या सगळय़ा कविता सोबत घेऊन फिरत असेल असं तुम्हाला वाटतं का ?
होय ! मला माहीत आहे असा एक कवी माणूस. वयाच्या एका टप्प्यावर त्यानं आता स्वत:ला ऑर्गनाइज केलंय. त्याची कवितांची पुस्तकंही आलीत, पण आधी तो त्याच्या सगळय़ाच कविता एकाच झोळीत कोंबून प्रत्येक कवी संमेलनाला यायचा. ही गोष्ट आहे त्या दिवसाची, जेव्हा त्याचं ते सगळंच बाड तो कुठंतरी विसरला होता आणि तेव्हा त्याच्यासोबत असणारा मी, ते लक्षात आल्यावर एकदम हवालदिल झालो होतो.
किती वर्षे झाली त्याला कुणास ठाऊक ! पण तो दिवस, ती संध्याकाळ, ती रात्र आठवली की अजूनही अंगावर काटा येतो.
प्रत्येक कवी संमेलन गाजवणारा, स्टेजवरल्या सगळय़ा कवींना आणि प्रेक्षकांना आपल्या सूत्रसंचालनानं एका लयीत बांधून ठेवणारा आणि महाराष्ट्रातल्या कितीतरी नवीन कवींना प्लॅटफॉर्म देणारा माझा तो कवी मित्र. आयुष्यातली खूप सारी वर्ष त्याच्यासोबत घालवल्यानंतर तो मित्र कमी आणि माझा मोठा भाऊच मला वाटायचा. त्याच्या सगळय़ा कविता, सूत्रसंचालनाचं सगळं मटिरियल, कितीतरी कात्रणं, चिठ्ठय़ा-चपाटय़ा स्वत:च्या आणि इतरांच्या सगळय़ाच कवितांसोबत एकाच झोळीत कोंबून तो प्रत्येक कवी संमेलनाला यायचा. जणू स्वत:चं सगळं संचितच एका झोळीत घेऊन तो फिरायचा.
संध्याकाळी उशिरा सुरू झालेलं कवी संमेलन रात्री १० च्या आसपास संपलं. मी माझ्या कवितेच्या डायऱ्या आणि त्यानं त्याच्या कवितांची कोंबून भरलेली झोळी आम्ही आठवणीनं घेतली होती. संमेलनानंतर नेहमीप्रमाणे आम्ही एका बारमध्ये शिरलो. मानधन मिळालं असलं तरी सर्वच कवींना आवडणारा ‘जाडगेलासा बुटका म्हाताराच’ सोबत घेऊन आम्ही दोघं बसलो.
दोन कवी मित्र वर्षांनुवर्ष एकमेकांसोबत कितीही वेळ बसले असले तरी त्यांची प्रत्येक मैफल एखाद्या क्लासिकल मैफलीप्रमाणे जसजशी रात्र चढत जाते तसतशी रंगत जाते. इतकी वर्ष, इतक्या वेळा, इतक्या मैफलींनंतरही त्यांच्याकडे बोलण्यासारखं कितीतरी उरलेलं असतं. दोन, तीन, चार, पाच. कितीही तास शब्दांचे थवे त्यांच्या गप्पांमधून उडतच राहतात.
कधी ते बोलतात कधी ते भांडतात
कधी ते गप्प राहतात
कधी जगण्याबद्दल कधी मरणाबद्दल
कधी प्रेमाबद्दल
कधी विरहाबद्दल कधी लग्नाबद्दल
कधी निघण्याबद्दल
कधी सिनेमा कधी पुस्तक कधी कविता
कधी आठवणी घटना दिवस माणसं
असं किती किती आणि काय काय असतं त्यांच्या गप्पांमध्ये. त्या रात्री, त्या कुठल्याशा बारमध्ये, कुठल्याशा टेबलवर आम्ही किती वेळ, काय बोलत होतो कोणास ठाऊक! उठलो ते शेवटची ट्रेन धरायची वेळ जवळ येत चालली होती म्हणूनच. किती तासात किती झाले होते कोणास ठाऊक, पण उठताना मी माझ्या डायऱ्या आणि त्याने त्याची कवितांच्या बाडाची झोळी आठवणीने घेतली होती.
रस्ते हळूहळू निर्जन होत होते..
आमच्या आजूबाजूंनी तुरळक वाहनं कुठेतरी जात येत होती.. काही तुरळक माणसंही स्टेशनच्या दिशेनं चाल्ली होती.
एखाद्या लॉन्ग शॉटमधला लांबलचक रस्ता. उजवीकडे दूरवरल्या वळणावर वळलेला रस्ता. डावीकडे दूरवर वळून नाहीसा झालेला रस्ता. रस्त्याच्या बरोबर मध्ये रस्त्याच्या एका बाजूला स्टॅटिक ठेवलेला कॅमेरा.
दूरवरून दोन माणसं काहीशी झुलत, हातवारे करत एकमेकांना काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत कॅमेऱ्याच्या दिशेनं येत आहेत. दूरवरली त्यांची कुजबुज कॅमेऱ्याच्या कानावर पडते आहे, पण ते नेमकं काय बोलताहेत हे कुणालाच कळत नाही. त्यांचे आवाज हळूहळू जवळ येत जातात. जवळ जवळ येत कॅमेरा क्रॉस करत आता ते हळूहळू पाठमोरे दूर जाताना दिसत राहतात. कॅमेरा क्रॉस करतानाही कॅमेऱ्याचा कान तीक्ष्ण होतो, पण ते काय बोलताहेत हे त्याला कळत नाही. हळूहळू त्यांचे आवाजही आता दूर जाताना ते पाठमोरे दिसत राहतात. त्यांचे आवाज हळूहळू विरळ विरळ होत दूरवरल्या वळणावर ते दोघे वळल्यानंतर ऐकू येईनासे होतात.
इतकी वर्ष, इतक्या वेळा, इतक्या बैठका करूनही दोन कवी मित्र एकमेकांशी नक्की काय बोलत असतील ?
हे सगळं आधी बोल्लोय आपण आणि हेच सगळं आधी ऐकलंय समोरच्यानं हे त्यांना कळत असेल की प्रत्येक वेळी ते नवीनच काही शोधत असतील ?
घरी जाण्याआधी अजून काही वेळ सोबत थांबताना त्यांना कदाचित आपण भेटणार नाही परत असं वाटत असेल ?
तर त्या रात्री, त्या कुठल्याशा बारमध्ये, त्या कुठल्याशा टेबलवर आम्ही किती वेळ काय बोलत होतो आठवत नाही.
आठवताहेत त्या प्लॅटफॉर्मवर उतरणाऱ्या पुलाच्या पायऱ्या. रात्री एकच्या आसपासही प्लॅटफॉर्मवर असलेली माणसांची तुरळक गर्दी. प्लॅटफॉर्मवर चादरीसारखा पसरलेला पांढरा शुभ्र टय़ूबचा पांढुरका प्रकाश. स्लो मोशनमध्ये प्लॅटफॉर्मवर आलेली ट्रेन. एकमेकांना सावरत ट्रेनमध्ये चढलेलो आम्ही. बऱ्यापैकी रिकामा असलेला डबा. खिडकीशी मिळालेली जागा. सुरू झालेली ट्रेन, चाललेला कसला तरी वाद आणि नेमका निसटलेला मुद्दा.
इतकी वर्ष, इतक्या वेळा, इतक्यांदा भांडूनही दोन कवी मित्र एकमेकांशी सतत का भांडत असतील ?
मी तावातावात त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘‘तुला अजून कसं समजत नाही..?’’ या आविर्भावात तो मला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर दोघं एकमेकांना समजून घेण्याचाच प्रयत्न करताहेत. अधूनमधून येत्याजात्या प्लॅटफॉर्मवर आमची नजर जाते आहे. माझं स्टेशन येतं. आमचा वाद अजूनही संपलेला नसतो. मी ताडकन् उठतो. उतरतो. माझ्यामागे तोही उतरतो. ट्रेन निघून जाते. प्लॅटफॉर्मवर आम्ही काही वेळ वाद घालत उभे असतो आणि अचानक बोलता बोलता माझ्या लक्षात येतं की त्याच्या खांद्याला त्याची झोळीच नाहीय.
‘‘अरे, तुझी झोळी कुठे आहे ?’’ मी विचारतो. तो क्षणार्धात स्तब्ध होतो. आपल्या डाव्या-उजव्या खांद्याकडे पाहतो आणि माझ्याकडे नजर वळवतो. काही क्षण आम्ही दोघे एकमेकांकडे नुसते पाहत राहतो. प्लॅटफॉर्मवरला तुरळकी गलबला कानावर धूसरसा पडत राहतो आणि डिमरने स्टेजवरला स्पॉट सर्रकन् बरणी फिरवल्यासारखा प्रकाशझोत कमी व्हावा तशी आमची नशा झर्रकन् उतरते. ती ट्रेन अंधेरी होती एवढंच आठवतं. मी बांद्राला उतरलेलो असतो. आम्ही उतरल्यावर एक-दोन ट्रेन्स गेलेल्या असतात. शेवटची बोरिवलीच्या दिशेने जाणारी ट्रेन धाडधाड आवाज करत प्लॅटफॉर्ममध्ये शिरते. आम्ही घाईघाईतच त्या ट्रेनमध्ये चढतो. आमच्यातला वाद दोघे विसरलेलो असतो. त्याची ट्रेनमध्ये राहून गेलेली कवितांची झोळी तेवढी आठवत राहते.
ती कोणाच्या हाती लागेल का ?
कुणी भिकारी, गर्दुल्ला वा कुणी अनोळखी माणूस ती उचलेल का, की अख्खा डबा रिकामा होऊन ती झोळी तशीच खिडकीशी असलेल्या सीटवर तशीच पडलेली असेल ? ती झोळी मिळेल का ?
आणि मिळालीच नाही तर?
नाहीच. अशक्य आहे ती परत मिळणं. हरवलेली कवितांची डायरी मलाही नव्हतीच मिळाली. नसतेच मिळत कधी.
काही वर्षांपूर्वी.
स्थळ: नागपूर.
वेळ रात्री नऊनंतर कधी तरी.
मध्ये बऱ्याच गॅपनंतर, माझ्या एका नागपूरच्या कविमित्रासोबत नागपूर जरा बाहेर असलेल्या एका बारमध्ये बसलेलो आहे. आमचे काही पेग्ज झालेले आहेत. मी माझ्या काही कविता त्याला ऐकवतो. तो त्याच्या काही कविता ऐकवतो. गप्पा खूप रंगतात. किती वेळ जातो कळत नाही.
‘‘बंद हो गया, चला साहब.. सब वेटर लोग भी चला गया ..प्लीज..’’ असं एक माणूस येऊन सांगतो. आमचे दोघांचे ग्लासेस अर्धे-अर्धी भरलेले असतात. बिल आधीच पे केलेलं असतं. आम्ही दोघे आपापले ग्लासेस घेऊन बाहेर येतो. बारसमोरच उभ्या असलेल्या त्याच्या गाडीच्या टपावर आम्ही दोन्ही ग्लासेस ठेवतो. पुन्हा गप्पा सुरू होतात. अचानक हवेतला गारठा वाढतो. काही वेळ जातो. तितक्यात ‘‘ये भूल गया साहब..’’ असं म्हणत एक माणूस मी सुबक अक्षरांत माझ्या सगळय़ा नव्या कविता लिहून काढलेली माझी डायरी देतो. मी मनापासून त्याचे आभार मानतो, त्या माणसाला मिठी मारतो, त्याला बक्षिसी देतो आणि पुन्हा गप्पा सुरू होतात. कधी तरी आम्ही दोघे भावुक होतो, एकमेकांना मिठी मारून रडत राहतो, मग एकमेकांना सावरत गाडीत बसतो, मित्र गाडी स्टार्ट करतो. काळोखात आमची गाडीही थोडी इकडेतिकडे हलत राहाते आणि मित्र मला हॉटेलला सोडून निघून जातो. मी माझ्या रूमवर येऊन गादीवर अंग झोकून देतो आणि गाढ झोपी जातो.
गाढ झोप येत असताना अचानक अंगावर साप पडावा आणि अचानक दचकून जाग यावी तसा मी उठतो.. ‘‘डायरी.. कवितांची डायरी.. टपावर ठेवली होती..’’ ती टपावरच विसरून तसेच निघून आलेलो असतो. रात्रीचे दोन-अडीच वाजलेले असतात. मी खूप डिस्टर्ब होतो, मित्राला फोन लावतो. फोन वाजत राहतो.. खूप वेळ. खूप वेळाने त्याची बायको फोन उचलते. मी सांगितल्यावर तो गाढ झोपला असल्याचं सांगते. मी त्याला उठवायला सांगतो. ती प्रयत्न करते; पण तो उठत नसल्याचं ते सांगते. मी माझी कवितांची डायरी हरवल्याचं सांगतो. ती त्याला सकाळी सांगते, असं म्हणते. मी रात्रभर भिंतीवर हात आपटत, तळमळत जागा राहातो. पहाटेची फ्लाइट असते. मुंबईला परततो.
रात्री नागपुरात मुसळधार पाऊस पडलेला असतो. तो मित्र दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने हळूहळू गाडी चालवत अख्खा रस्ता शोधत फिरतो. संध्याकाळी त्या बारवर जाऊन विचारपूस करतो. गाडीच्या हेडलाइट्सच्या प्रकाशझोतात पुन्हा उलटा रस्ता शोधत घरी येतो; पण माझी डायरी त्याला मिळाली नसल्याचे सांगतो. ‘‘ही कवितांची डायरी कोणाला सापडल्यास कृपया खालील पत्त्यावर पोहोचती करावी..’’ असं म्हणत मी त्या डायरीच्या पहिल्याच पानावर मोठ्ठय़ा अक्षरांत माझा पत्ता आणि फोन नंबर लिहिलेला असतो.
ती डायरी कुणा तरी वाचणाऱ्याच्या हातात पडेल.. कुणी तरी तो पत्ता वाचून तो फोन नंबर फिरवेल.. मला कधी तरी कॉल करेल, या आशेवर मी रोज वाट पाहत जगत राहतो; पण या निरक्षर जगात माझी डायरी कोणालाच सापडलेली नसते.. ती कायमची हरवलेली असते. हळूहळू माझ्या आठवणीतूनही विरळ होत ती मनाच्या तळाशी जाऊन बसते.
हरवलेली वस्तू
जिथे हरवली तिथे
शांतपणे पडून असते
निरागसपणे
गालातल्या गालात हसत
सुटलं एकदाचं त्याचं बोट
मोकळे झालो
त्याच्या दृष्टीनं हरवलो
तरी खरं तर
स्वतंत्र झालो
किती सुखद आहे
स्वतंत्र असणं
सगळे दोर तुटून
स्वत:च्या गुरुत्वासह
तरंगू लागणं
इतके दिवस आपली
वेगळी ओळखच नव्हती
जी होती ती याच्यामुळे
याची वस्तू म्हणूनच
ओळखायचे सगळे
आता तसं नाही
भले भर रस्त्यात पडलेली
गवतावर पहुडलेली किंवा
पायदळी तुडवली जाणारी का असेना
पण स्वतंत्र
आता जगरहाटीच अशी आहे की
कुणाची तरी नजर जाईलच
हेरून घेईल दूरवरून
आवडली तर पटकन उचलून
इकडे तिकडे बघत घालेल खिशात
खेकसत म्हणेल
बस्स झालं तुझं स्वातंत्र्य
घातलंय तुला खिशात
आता यापुढे खुशाल मिरव
माझी वस्तू म्हणून.
– प्रफुल्ल शिलेदार
अंधेरी स्टेशनवरल्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर आमची ट्रेन शिरते. वेग जरासा जास्त असतानाच आम्ही दोघे धाडधाड उडय़ा मारत प्लॅटफॉर्मवर उतरतो. सैरभैर इकडेतिकडे पाहतो.. जवळच असलेल्या स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये शिरतो.
‘‘ये अभी कुछ देर पेहेले जो अंधेरी ट्रेन आई वो कहाँ गई..’’ मी स्टेशनमास्तरला विचारतो.
‘‘मतलब ?’’
‘‘मतलब जो अभी एक-दो ट्रेन से पहले रातको आखरी अंधेरी ट्रेन रोज आती है वो यहाँ से कहाँ जाती है?’’
‘‘रेल्वे यार्ड में.’’
‘‘वो कहाँ है?’’
‘‘वो देखो स्उस तरफ..’’ टेशन मास्टर जोगेश्वरीच्या दिशेने हात करत काळोखात दूरवर उभ्या असलेल्या यार्डकडे हात दाखवतो. काळोखात जवळजवळ अर्धा किलोमीटरवर भला मोठ्ठा रेल्वे यार्ड एक-दोन दिव्यांनी चमचमत असताना दिसतो.
‘‘क्यूँ? क्या हुआ ?’’ मास्टर विचारतो.
‘‘अरे, हम दोनो कवी हैं..’’
‘‘तो..’’
‘‘तो कुछ नहीं .. इनकी कविताओं का झोला छुट गया उस ट्रेन मे..’’
‘‘तो क्या वो ढूँढने जाओगे यार्ड में?’’
‘‘हाँ जाना तो पडेगा..’’
‘‘अरे अलाउड नहीं है ऐसा किसीका वहां जाना.. पुलिस पकड लेगी..’’
आम्ही दोघे एकमेकांकडे काही क्षण पाहात राहातो आणि काही न बोलता प्लॅटफॉर्मवर चालू लागतो. आम्ही यार्डात तर जात नाही आहोत ना हे पाहात तो स्टेशनमास्तर तसाच उभा राहातो. आम्ही प्लॅटफॉमवरच पुढे असलेल्या एका दुकानावर उभे राहून चहा ऑर्डर करतो. आम्ही चहा पितो आहोत हे पाहून स्टेशनमास्तर आत निघून जातो. चहा संपवून आम्ही प्लॅटफॉर्मवरून तरातरा चालत जोगेश्वरीच्या दिशेने असलेल्या यार्डाच्या दिशेने चालू लागतो. अंधेरीचा प्लॅटफॉर्म नंबर एक संपतो.. उतरंड लागते.. पुढे अनेक रेल्वे ट्रॅक्स काळोखात चमचमत वाकडेतिकडे होत विरळ होत नाहीसे झालेले दिसू लागतात. कुणी पाहात तर नाही याची खात्री करून घेत आम्ही ट्रॅकवरल्या काळोखात शिरतो. आता रात्रीचे दीड-पावणे दोन वाजलेले असतात. ट्रेन्स बंद झालेल्या असल्यानं आम्ही बिनधास्त रेल्वे ट्रॅकवरून चालत यार्डाच्या दिशेनं चालू लागतो. दोन समांतर रुळांमध्ये एकेक फुटावर लाकडी फळय़ा जोडलेल्या असतात, त्यांच्यावरून तोल सावरत आम्ही काळोखातून सांभाळत.. ‘‘सांभाळ रे.. हळूहळू ..थांब अरे .. हा चल..चल’’ असं म्हणत यार्डाच्या दिशेनं चालत राहतो.
‘‘आपण उगाच एवढा काळोखातून चाललो आहोत. यार्डात उभ्या दिसणाऱ्या इतक्या ट्रेन्समधून नेमकी आपली ट्रेन कुठली ते कसं ओळखणार? आणि यार्डात बाहेरून काही दिवे चालू असले तरी सगळय़ा ट्रेन्सचे दिवे आतून बंद दिसताहेत.. डब्या- डब्यातल्या मिट्ट काळोखात.. ओझरत्या प्रकाशात कशी काय शोधणार आहोत आपण ती झोळी? आणि ती तिथेच असेल कशावरून? कुणी उचलून घेऊन गेला नसेल कशावरून.. असे अनेक प्रश्न त्या मिट्ट काळोखात यार्डाच्या दिशेनं चालताना, समोर समांतर चमचमत्या रुळावरून जणू आमच्या अंगावर धावून येणाऱ्या ट्रेनसारखे धावून येत असतात.
जवळजवळ वीसेक मिनिटांनी आम्ही त्या यार्डच्या बाहेर पोहोचतो. खेळण्यात मांडून ठेवाव्यात अशा सात-आठ ट्रेन आजूबाजूला उभ्या असतात. उजवीकडून तिसऱ्या आणि चौथ्या ट्रेनचे दिवे चालू दिसतात. दिवे चालू असलेल्या ट्रेन्समध्ये आधी शोधावं म्हणून दोघं चौथ्या ट्रेनकडे पोहोचतो, कारण आम्ही कितवा तिसरा की चौथा डबा पकडला होता ते आम्हाला आठवत नसतं; पण तिसऱ्या डब्यापासून सुरुवात करावी म्हणून आम्ही त्या ट्रेनजवळ पोहोचतो.
प्लॅटफॉर्मवर अगदी सहज पकडता येणाऱ्या ट्रेनमध्ये आणि यार्डात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये चढणं या भयंकर वेगवेगळय़ा गोष्टी आहेत हे तात्काळ आमच्या लक्षात येतं. जमिनीपासून जवळजवळ चार- साडेचार- पाच फूट उंच असलेल्या ट्रेनच्या डब्यात कसं काय चढायचं, असा प्रश्न घेऊन दोन ट्रेनच्या डब्या- डब्यांकडे प्रश्नार्थक पहात आम्ही उभे असतानाच गप्पकन् त्या ट्रेनचे दिवे बंद होतात आणि अख्खी ट्रेन काळोखात बुडून जाते. काय करावं कळत नाही. आता पलीकडले म्हणजे, तिसऱ्या ट्रेनमधलेही दिवे कधीही जाऊ शकतात, या भीतीनं त्या ट्रेनमध्ये आधी बघू म्हणत मी तिसऱ्या ट्रेनजवळ पोहोचतो. दोन ट्रेनच्या मधल्या जागेतून धडपडत आता आम्ही दिवे असलेल्या ट्रेनच्या तिसऱ्या डब्याजवळ येतो. तिथून पुढले तीन-चार डबे तरी शोधावेत; पण छातीपर्यंत उंच असणाऱ्या ट्रेनच्या डब्यांवर चढणार कसं, या प्रश्नाला दोन ट्रेन्समधल्या मोकळय़ा जागेसारखंच उत्तर नसतं. अचानक मी गुडघ्यावर ओणवा होतो.
‘‘चढ माझ्या पाठीवर.. ठेव एक पाय..चल, चढ पटकन.’’ मी म्हणतो. मित्र माझ्याकडे क्षणभर पाहत राहतो आणि माझ्या पाठीवर एक पाय ठेवून ट्रेनच्या दाराचा आधार घेत तोल सावरत कसाबसा वर डब्यात चढतो. सैरभैर झालेल्या श्वापदासारखा धडपडत ट्रेनमधल्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात, दुसऱ्या कोपऱ्यातून पहिल्या कोपऱ्यात सैरभैर फिरत राहतो. अख्खा डबा शोधतो; पण त्या डब्यात झोळी नसते. आता पुढला डबा.
‘‘मार उडी, मार, पुढला डबा बघू..’’ असं मी म्हणतो; पण एवढय़ा उंचावरून उडी मारणं शक्य नसल्याचं लक्षात येऊन मी पुन्हा गुडघ्यावर ओणवा होतो. मित्र हळूच एक पाय पाठीवर ठेवून दाराचा आधार घेत खाली उतरतो. आम्ही धडपडत पुढल्या डब्याशी येतो. आता तो मित्र ओणवा होतो.
‘‘बघ.. या डब्यात बघ,’’ म्हणतो. मी काहीही विचार न करता त्याच्या पाठीवर एक पाय ठेवून दाराच्या आधारानं डब्यात शिरतो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सीट्सवर पाहून मी पुढे जाणार तोच गपकन् दिवे जातात. मी डब्यात आणि तो मित्र खाली जागच्या जागी थिजून उभे राहतो. मित्र खालून.. ‘‘आईचा घो..आता काय करायचं?’’
मलाही काही कळत नाही. मी अंधारात डब्यात उभाच असतो. काळोखातच सीटचा आधार घेत पुढे पुढे जात राहतो. शेवटच्या डाव्या खिडकीशी यार्डातल्या, तिथेच वर असलेल्या दिव्याचा ओझरता प्रकाश पडलेला दिसतो .. मी काळोखातून वाट काढत त्या प्रकाशझोताच्या दिशेनं धडपडतच पोहोचतो आणि मंद प्रकाशात एखादा गुबगुबीत पांढरा बोका ऐसपैस अंग ताणून देऊन पडलेला असावा तशी ती झोळी खिडकीतल्या त्या सीटवर आरामात ऐसपैस पसरलेली दिसते. मी अविश्वासानं त्या झोळीकडे पाहत राहतो.
‘‘आहे का रे? .. काय झालं? सापडली का?’’ खालून मित्र ओरडत असावासा भास होतो. मला काहीच ते ऐकूच येत नसतं. मी दिङ्मूढ होऊन त्या झोळीलाच पाहत राहातो. काही वेळ मी काहीच बोलत नाही.
मित्र ‘‘काय झालं रे? अरे, बोल ना काही तरी? काय झालं?’’ ओरडत असतो. मी काहीच बोलत नाही. मला जणू काही ऐकूच येत नसतं. मग मी पुढे होऊन अलगद ती झोळी उचलतो, शांतपणे दारात येतो.. आश्चर्यकारकरीत्या मला कुठलाच अडथळा जाणवत नाही.
..‘‘ही घे..’’ म्हणत मी ती झोळी खाली उभ्या असलेल्या मित्राच्या दिशेनं टाकतो. तो ती अलगद झेलतो. मी त्याच आनंदात धापकन् खाली उडी मारतो, पडतो, कळवळतो, लगेच उठतो, मित्र मला मिठी मारतो आणि आम्ही दूरवर चमचमत्या अंधेरीच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या दिशेने जाणाऱ्या रुळांमधून अंधेरी स्टेशनकडे चालू लागतो तेव्हा आम्ही दोघं घामानं चिंब भिजलेले असतो. आमच्यावरून उत्तररात्रीचा गार वारा वाहात असतो.
प्रत्येक कवीनं त्याच्या आयुष्यात कधी ना कधी त्याची डायरी, त्याची झोळी, त्याची कविता हरवलेली असते. प्रत्येकाला ती सापडतेच असं नाही. ती कधी तरी सापडेल या आशेवरच तर आपण जगत असतो. ती लवकरात लवकर सापडावी याच या ‘पोएट्री डे’च्या निमित्तानं शुभेच्छा.