डॉ. शंतनू अभ्यंकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ एप्रिल हा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस. एके काळी बाळंतपणात मोठय़ा प्रमाणावर होणारे मातामृत्यू रोखण्यात आता बऱ्यापैकी यश आलं आहे. पण वैद्यकशास्त्राचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता.

ताजमहाल.. शुभ्र संगमरवरातले ते भव्य शिल्प डोळय़ांचे पारणे फेडत असते. ‘इक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है’, हे स्वर मनात रुंजी घालत असतात. अत्यंत प्रमाणबद्ध, अत्यंत रेखीव, अत्यंत साधे पण तरीही स्वर्गीय असे सौंदर्य समोर असते. कितीही वेळा अनुभवले तरी मन समाधान पावत नाही अशा कलाकृतींपैकी ही एक अव्वल कलाकृती.पण अचानक ही समाधी भंग पावते. सारी शांतता भेदून मनातून काही तरी वर येतं. शांततेवर एक करकरीत ओरखडा उमटतो. मुमताज महल तर आठवतेच, पण मग आठवतात मुमताज महलसारख्याच बाळंतपणात मृत्यू पावलेल्या अनेकानेक बायका. मग लक्षात येतं हे मुमताज महलचे स्मारक नाही. ही ‘मोहब्बत की निशानी’ नाही. हे तर बाळंतपणात मृत्यू पावलेल्या, माझ्या आजीच्या आजीच्या काकूसारख्या, ज्ञातअज्ञात बायकांचे वृंदावन. माझ्यासारख्या हाडाच्या स्त्रीआरोग्यतज्ज्ञ माणसाला ताजमहाल जास्त वेळ सोसत नाही.

मुमताज महल गेली १४ व्या बाळंतपणात, बुऱ्हाणपूरला, ३८ व्या वर्षी, लग्न झालं होतं १९ व्या वर्षी. म्हणजे २० वर्षांत चौदा मुलं! १४ व्या वेळच्या कळा दीड दिवस सुरू होत्या म्हणे. शेवटी ती सुटली. मुलगी झाली. ही गौहर आरा बेगम. पण मुमताज महलचा रक्तस्राव थांबलाच नाही आणि त्यातच ती गेली (१६३१). पुढे २२ वर्षांनी ताजमहाल वगैरे.

बाळंतपणात होणारा रक्तस्राव हे आजही अनेक स्त्रियांच्या मृत्यूचं सर्वात सामान्य कारण आहे. जंतुबाधा (इन्फेक्शन), बाळंतवात (बीपी वाढणे/झटके येणे) आणि असुरक्षित गर्भपात ही इतर कारणे. पैकी जंतुबाधेची एक कथा माझ्या आजीच्या मनात रुतून बसली होती. मी स्त्रीरोगतज्ज्ञ होण्यासाठीच्या अभ्यासक्रमाला (एमटी गायनॅक) ला प्रवेश घेतला त्याचा आजीला कोण आनंद. त्या आनंदाच्या भरात, तिला तिच्या आजीच्या काकूची म्हणजे माझ्या खापरपणजीच्या काकूची गोष्ट आठवली. ही काकू घरीच ‘झाली’. खूप वेळ लागला. खूप ओरडत; रडत-विव्हळत, कण्हत-कुंथत होती. बाळाचं डोकं तोंडाशी येऊन थांबलं होतं. चार सुईणी आणवल्या. बाया जमल्या. काही हुईना. बापे जमले तरीही हुईना. दवाखाना ५० मैलांवर. गावात छकडा एक. त्याचा बैल नेमका बसलेला. लोकांनी पोट चोळलं. बुक्क्या मारल्या. लाथा मारल्या. पोटावरती स्वार होऊन ढकललं. पण तरीही आज्जीच्या आजीच्या काकूची काही सुटका होईना. अखेरीस एका सुईणीने स्वत:चा चुडा फोडला आणि बांगडीच्या काचेच्या धारेने काकूचे अंग कापले. काकू सुटली. पण बाळ मृत निपजलं. कोरडय़ा डोळय़ांनी आणि कोरडय़ा मनाने ते मूल, मागच्या अंगणात, वारेसकट पुरून टाकण्यात आलं. गाव पांगला. पुरुष मंडळी कामधंद्याला लागली आणि बायांची पावलं स्वयंपाकघराकडे वळली.

पण दुसऱ्या दिवशी काकूला किंचित ताप भरला आणि तो थंडीताप रोज वाढत गेला. कसल्या कसल्या पाल्याची धुरी, कसले कसले लेप, कसलं वाटण, कसलं चाटण असे उपचार सुरू राहिले. उंबऱ्यावरच्या करवंटीतले गोमूत्र, कडुलिंबाच्या पाल्याने पायावर शिंपडून, मगच खोलीत प्रवेश सक्त केला गेला. शांतीपाठ, अंगारे-धुपारे सुरूच होते.शेवटी ती तापात बरळायला लागली. मग चुनाभट्टी लावली गेली. जखमेला त्याच्या वाफा दिल्या गेल्या. थंडीताप वाढत गेला. अंगची जखम आता टरारून फुगली होती. दिवसेंदिवस ती चिघळतच गेली. तीतून बुडबुडे येऊ लागले. तिचा ओंगळ दर्प घरभर पसरला. कोणी जवळ जाणेही अशक्य झाले. बाळंतीण एकटी पडली. त्यात उलटय़ा आणि हाग-मूत सारे एकाच जागी. एका रात्री पोट हे फुगलं. जखमेतून भळाभळा रक्त व्हायला लागलं. श्वास थांबल्यावरच रक्तस्राव थांबला. काकू गेली. शेतातच तिच्यावर अग्निसंस्कार केले गेले. काकांनी तिचं वृंदावन बांधलं. पंचक्रोशीतल्या बायबापडय़ांनी ते पवित्र ठरवलं. आता तिथे हमरस्ता आहे. ‘काकूचे वृंदावन’ हा आता गजबजलेला बस स्टॉप आहे. समोर मोठा चौक आहे. कोपऱ्यात सरकारी दवाखाना आहे. एक सुसज्ज रुग्णवाहिका तिथे सतत सज्ज उभी असते.

आजीचं आणि तिच्या आजीच्या काकूचं छान मेतकूट असावं. कळत्या-नकळत्या वयात पाहिलेला तो मृत्यू आजीच्या मनात कायमचा घर करून बसला असावा. सगळय़ाचीच वानवा, पराकोटीची अगतिकता आणि वैद्य-विद्येच्या अभावी आलेलं हे मरण आजीच्या मनात आयुष्यभर सलत होतं. जाण्यापूर्वी तो सल प्रसूतितज्ज्ञ व्हायला निघालेल्या नातवाच्या मनात ती जणू रुजवून गेली. एके काळी बाळंतपणात मेलेली बाई म्हणजे तिचे ठायी भय आणि भक्ती अशा दोन्ही शक्ती एकवटलेल्या. तिच्या वाटय़ाला वृंदावन क्वचितच. वड किंवा विहीर नित्याचे. अशी बाई हडळ होते आणि वडा- विहिरीशी राहाते म्हणे. हडळ कधी एकदम समोर येत नाही. आधी बांगडय़ा वाजतात, मग मूल रडल्याचा भास होतो, मग केस जळल्याचा वास येतो; आणि मग ही एखाद्या सुंदरीचे रूप घेऊन येते. पुरुषांना वश करून घेते. देखण्या, भरदार, तरण्याताठय़ा पुरुषाला मोहात पाडते. पुरुषाला मोहात पाडलं तरच त्यांची शक्ती शाबूत राहते आणि वाढते. नपेक्षा शक्ती गायब! भरपूर सुख देऊन देऊन एकदा का पुरुष पूर्णपणे तिच्या कह्यात आला, की अचानक ती आपलं खरं रूप प्रकट करते. पुरुषाची पूर्ण पंचाईत करते. आता हाडं आणि कातडं झालेलं शरीर, डोळय़ात वेडेपणाची झाक, लांब केस, लाल लुगडं, हिरवा चुडा, मोठ्ठं कुंकू; हा त्यांचा स्टेटसचा फोटो!!

पुरुषप्रधान संस्कृतीने रचलेल्या या लोककथा; स्त्रीला हडळ बनवली, तरी त्याच्या आड सुप्त पुरुषी इच्छांचे विरेचन कसे वावरते आहे पाहा. एकूणच बाईप्रति आदर वगैरे कमीच होता आणि असतो. रुग्णाप्रति आदर, तिच्या भावनांची कदर, तिला काय वाटेल हा विचार, हे जरा कमीच असतं. किंवा नसतंच. कामाचा दबाव असतो हे मान्य, पण अदबीने वागणे हा कामाचाच भाग आहे. ‘रिस्पेक्टफुल मॅटर्नल केअर’, आता आवर्जून शिकवलं जातं. याने फरक पडतो. असं वातावरण असेल तर महिलांना आपलेपणा वाटतो, सुरक्षित वाटतं. असुरक्षित गर्भपात हे मातामृत्यूचं आणखी एक कारण. गर्भपाताबद्दल भारतीय कायद्यांइतके स्त्रीकेंद्री आणि रुग्णस्नेही कायदे कुठे नसावेत. त्यामुळे असुरक्षित गर्भपात कमी झाले आहेत आणि त्यातून उद्भवणारे मृत्यूही कमी झाले आहेत; पण संपलेले नाहीत.

बाळंतवात (प्रेग्नन्सी इंडय़ुस्ड हायपरटेन्शन) हा, मातांना मारणारा आणखी एक महत्त्वाचा आजार. आपल्या पूर्वजांना तो आजार म्हणून वेगळा ओळखतासुद्धा आला नाही. एकाही भारतीय भाषेत अथवा आयुर्वेदात याला नेमका शब्द नाही. असला ठकडा, दगलबाज आजार आहे हा. मी आपला याला ‘बाळंतवात’ म्हणतो. यात सूज येते, रक्तदाब वाढतो, लघवीवाटे प्रथिनपात होतो; मग वार, किडनी, लिव्हर, सारेच बिघडते. कधी पेशंटला झटके येतात तर कधी रक्त साकळण्याची क्रिया पार बिघडते. मूल पोसले जात नाही. ते आधी आतल्या आत हडकते, मग गुदमरते आणि मग मरतेसुद्धा. कधी कधी सगळे एकसाथ बिघडते आणि आईही दगावते. यावर शेवटचा उपाय एकच. दिवस भरले असोत वा नसोत; प्रसूती! ‘झाल्याने होत आहे रे, आधी झालीच पाहिजे’ हा उपचारचा मंत्र. अजूनही आपल्याला या आजाराचे ना कारण माहीत ना त्यावरचे उपाय. म्हणूनच बाई दगावण्यात या ‘बाळंतवाता’चा वाटा मोठा असला तरी सध्या डॉक्टरही काहीसे हतबल आहेत.

जगातील एकपंचमांश मातामृत्यू भारतात घडतात म्हणे. आपली लोकसंख्या अवाढव्य आहे. त्यात इंडिया आणि भारत असे दोन देश इथे एकत्र नांदत आहेत. त्यामुळे निव्वळ अशा संख्यांना अर्थ कमी. प्रमाण महत्त्वाचे. दर एक लाख जिवंत जन्माला आलेल्या अर्भकांमागे किती जन्मदा मृत्यू पावतात हे लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच सांगतो; गुड न्यूज आहे!

भारतात मातामृत्यू वेगाने दुर्मीळ होत आहेत. आधीच्या तुलनेत तर भरीव प्रगती आहे. १९९० साली दर लाख प्रसवांपैकी ५५६ बायका मरायच्या! अगदी परवा परवा (२०१४-१६) हा आकडा १३० होता! तेवढी बालके आईविना!! आता (२०२०) हा आकडा ९७ पर्यंत उतरलेला आहे. पुढच्या सात वर्षांत, २०३० सालापर्यंत, सत्तरच्या आत आणायचाच असा संकल्प आहे. परदेशांशी तुलना करायची तर, इटली, नॉर्वे पोलंड वगैरेत हे प्रमाण लाखांत पाच ते १० एवढे अल्प आहे! लाडक्या अमेरिकेत आणि दोडक्या चीनमध्ये १९ आहे. पण नेपाळ (१८६) बांगलादेश (१७३) आणि पाकिस्तान (१४०) पेक्षा आपण बरेच पुढे आहोत. भले शाब्बास!

हे प्रमाण जास्त आहे ज्या राज्यात नेहमीचीच रड आहे. गरिबी, अज्ञान, निरक्षरता, जात्यंध दृष्टिकोन, अंधश्रद्धा; डॉक्टर आहेत तर औषधे नाहीत आणि औषधे आहेत तर डॉक्टर नाहीत अशीही परिस्थिती असते. मग उपचार देणे हा प्रधान हेतू न ठरता केस लवकरात लवकर पुढे पाठवणे, वाटेत किंवा वरच्या दवाखान्यात मृत्यू घडला तर त्याची जबाबदारी झटकणे सोपे, अशी वागणूक बळावते. पण तरीही हा संकल्प तडीस जाईलच. उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये मुळातच परिस्थिती बिकट होती, पण तिथेही हे प्रमाण सातत्याने घसरत आहे. केरळात हे प्रमाण २०२० सालीच ३० वर आले आहे. म्हणजे २०३० सालचे उद्दिष्ट त्यांनी किती तरी आधीच पार केले आहे. गरोदरपणातील मानसिक आजारांवर आता त्यांनी भर दिला आहे!

बाळंतपणात बाई निव्वळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने दगावत नाही. तिच्या मरणाला ५६ प्रकारच्या हलगर्जी कारणीभूत असतात. प्रत्येकच पातळीवरचा हलगर्जीपणा आता कमी झाला आहे. जरा समृद्धी आली, स्त्रियांप्रति जरा सन्मान वाढला, बालविवाह उतरणीला लागले. वैद्यकीय सेवा सर्वदूर पसरल्या, वैद्यकीय देखरेखीखाली बाळंतपणं होऊ लागली. रक्तपेढय़ा वाढल्या, ‘रक्त द्या’ म्हटल्यावर पळून जाणारे नवरे जाऊन आता ‘माझे घ्या’ म्हणणारे दहा हात पुढे येतात. मुळात रक्त वाढावे म्हणून उपचार आले, अॅनिमिया (रक्तक्षय) आटोक्यात आला. संततीनियमन समाजाने मोठय़ा प्रमाणावर स्वीकारले, परिणामी बाळंतपणे लवकर व्हायची थांबली आणि लांबलीदेखील. रक्तस्राव थांबवणारी नवीनवी औषधे निघाली; डॉक्टरांनी बोळे, टाके, फुगे वगैरे कल्पकतेने वापरले. रक्तस्राव थांबवण्यासाठी नव्या नव्या युक्त्या शोधल्या. जंतूंशी सामना करणारी अत्यंत प्रभावी प्रतिजैविके आली. अॅम्ब्युलन्स धावू लागल्या. रस्ते सुधारले. मोबाइलसारखी संपर्कसाधने आली, व्हिडीओ कॉलवरची सल्लामसलत नेहमीची झाली. रक्त आणि औषधे ड्रोनने पोहोचू लागली. प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजनेसारख्या योजना आल्या; उपचार, जाणे-येणे, राहणे-जेवणे सारे विनामूल्य झाले.. आणि सारेच चित्र पालटले.
आता पुन्हा ताजमहाल पाहीन तेव्हा तिथे मला ‘काकूचे वृंदावन’ दिसणार नाही; ‘मोहब्बत की निशानी’च दिसेल.
लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National safe motherhood day medicine amy
Show comments