– विनायक ताथोड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारत हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची समृद्ध परंपरा असलेला देश आहे. विज्ञानाच्या प्रगतीशिवाय कोणत्याच राष्ट्राचा विकास शक्य नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश प्रगत होतो, शोध लागतात आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो. या वैज्ञानिक योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमन यांच्या अभूतपूर्व कार्याची आठवण करून देतो. त्यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेला ‘रमन इफेक्ट’ (Raman Effect) हा शोध आधुनिक भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. त्यांच्या या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते आणि भारतीय विज्ञानाचा सन्मान जागतिक स्तरावर पोहोचला.
भारत सरकारने १९८६ मध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी देशभरात विज्ञान प्रदर्शने, वैज्ञानिक परिसंवाद, प्रयोगशाळा भेटी, चर्चासत्रे आणि विद्यार्थी-शिक्षकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमन यांनी प्रकाशाच्या प्रकृतीवर संशोधन करून रमन प्रभाव हा शोध लावला. यानुसार, जेव्हा प्रकाश किरण पारदर्शक पदार्थावर पडतात, तेव्हा त्यातील काही किरणांची दिशा बदलते आणि त्यांच्या तरंगलांबीमध्ये थोडा फरक आढळतो. या शोधामुळे पदार्थाच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांबाबत महत्त्वाची माहिती मिळू लागली. सी.व्ही. रमन यांनी जिंकलेले पुरस्कार म्हणजे: नाईट बॅचलर (१९२९), भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९३०), भारतरत्न (१९५४), लेनिन शांतता पुरस्कार (१९५७) आणि फेलो ऑफ द रॉयल सोसायटी (१९२४).
रमन प्रभावाचे आधुनिक उपयोग: (१) रासायनिक आणि औषधनिर्मिती उद्योगात पदार्थांचे विश्लेषण. (२) भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास (३) वैद्यकीय क्षेत्रात विविध जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये उपयोग (४) क्रिमिनोलॉजी आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये विश्लेषण.
भारत हे प्राचीन काळापासूनच वैज्ञानिक दृष्टीने प्रगल्भ राष्ट्र आहे. वेद, उपनिषदे आणि प्राचीन ग्रंथांमध्ये गणित, खगोलशास्त्र, औषधशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचे उल्लेख आढळतात. आर्यभट्ट, वराहमिहीर, नागार्जुन, सुश्रुत आणि चरक यांसारख्या विद्वानांनी जगाला मौलिक योगदान दिले. आधुनिक काळातही जगाला भारताने अनेक महान वैज्ञानिक दिले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. होमी भाभा, डॉ. विक्रम साराभाई, डॉ. जगदीशचंद्र बोस, डॉ. सत्येंद्रनाथ बोस आणि डॉ. वेंकटरामन राधाकृष्णन, ही त्याची काही उदाहरणे.
भारत आज अंतराळ संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, अणुशास्त्र आणि औषधनिर्मिती या क्षेत्रांत अग्रगण्य आहे. इस्रो (ISRO) च्या यशस्वी मोहिमांमुळे भारत जागतिक पातळीवर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन हा केवळ एका वैज्ञानिक शोधाचा गौरव करण्यापुरता मर्यादित नाही, तर याचे महत्त्व अधिक व्यापक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देणे, समाजात विज्ञान साक्षरता वाढवणे, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित विकासावर भर देणे इत्यादी.
भारत सरकार दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी विशेष संकल्पना (थीम) जाहीर करते. २०२४ च्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ ही होती. गेल्या काही वर्षांत विज्ञान व नवोपक्रम, शाश्वत विकास, हरित तंत्रज्ञान, आरोग्यविज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर विज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञान प्रदर्शन आणि प्रयोगशाळा भेटींचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून दाखवणे, विज्ञान प्रश्नमंजुषा आणि चर्चासत्रे, विद्यार्थी, शिक्षक आणि वैज्ञानिक यांच्यात संवाद, सेंद्रिय शेती आणि हरित तंत्रज्ञानावर कार्यशाळा: पर्यावरणपूरक विज्ञानाचे शिक्षण, स्थानिक वैज्ञानिकांशी संवाद: संशोधनाच्या संधींबाबत मार्गदर्शन, डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व: कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि क्वांटम संगणन यासारख्या विषयांवर कार्यशाळा इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजाचा विकास
विज्ञान हा केवळ प्रयोगशाळेत सीमित असलेला विषय नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग असावा. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे, प्रयोग करणे आणि तर्कशुद्ध पद्धतीने उत्तर शोधणे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आवश्यक आहे, जेणेकरून अंधश्रद्धा, गैरसमज आणि अवैज्ञानिक प्रथा नष्ट होतील. स्मार्टफोन, इंटरनेट, औषधे, वाहतूक प्रणाली, स्वच्छ उर्जा – हे सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे परिणाम आहेत. म्हणूनच, विज्ञानाच्या मदतीने देश विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जाऊ शकतो.
शोध, तंत्रज्ञान आणि समाजोन्नती
राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्याला वैज्ञानिक विचार, संशोधन आणि नवसंशोधनाचे महत्त्व पटवून देतो. भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती ही केवळ प्रयोगशाळांपुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण समाजाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणे, संशोधनाला चालना देणे आणि नवीन पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी प्रेरित करणे, हे आपले ध्येय असले पाहिजे. विज्ञान हे समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असले पाहिजे. संशोधनाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, हीच राष्ट्रीय विज्ञान दिनाची खरी प्रेरणा आहे. शोध, तंत्रज्ञान आणि समाजोन्नती यांचा समतोल साधला तरच भारत विज्ञानसशक्त महासत्ता होऊ शकेल.
(लेखक परतवाडा येथील श्री रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.)