डॉ. भाऊसाहेब नन्नवरे
युवक हीच देशाची खरी संपत्ती असून देशाचे भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरते. स्वामी विवेकानंदांनी दिलेला ‘उठा, जागे व्हा…आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हा संदेश प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायक आहे. विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार आणि प्रसार केला. मानवतेचा विचार अनेक माध्यमांतून मांडला. स्वामी विवेकानंदांनी १८९७ मध्ये पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या प्रक्रियेत आणि त्यातून समृद्ध व संपन्न देश घडवण्यात युवकच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याच उद्देशाने १९८५ पासून १२ जानेवारी हा ‘राष्ट्रीय युवक दिन’ साजरा केला जाऊ लागला.
जानेवारी २०२४ मध्ये २७ वा राष्ट्रीय युवा दिन महाराष्ट्रात नाशिक मध्ये १२ ते १६ जानेवारी या कालावधीत आयोजित केला गेला. १६ वर्षानंतर राष्ट्रीय युवा दिन महाराष्ट्रात साजरा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश यांतील विविध शिक्षणक्रमांचे आठ हजार युवक- युवती या राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
हेही वाचा… हा आवाज फार काळ दाबता येणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे उद्घाटन झाले. ‘विकसित भारत- २०४७’ या संकल्पनेतून ‘सर्व काही तुमच्या मनात’ ही यावर्षीच्या राष्ट्रीय युवा दिनाची संकल्पना आहे. ‘सक्षम युवक… समर्थ भारत’ हे घोषवाक्य आहे. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध स्पर्धा झाल्या. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
१. स्व-विकासातून राष्ट्र उभारणी
व्यक्ती, समाज, राष्ट्र घडवण्यामध्ये व्यक्तिच्या मानसिक व भावनिक विकासाला महत्त्व दिले आहे. नव्या युवा पिढीला योग्य वेळी योग्य त्या गोष्टींची जाणीव करून देणे ही वडीलधाऱ्यांची भूमिका आहे आणि स्व- विकासाबरोबरच राष्ट्र विकासात योगदान देताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, याचा विचार युवा वर्गाने करायला हवा. ‘स्व’ची ओळख- मी कोण आहे? हे जोपर्यंत नीट पारखले जात नाही, तोपर्यंत माझ्यातील गुण-दोषांचा परिचय मला होणार नाही. आत्मनिर्भरता येण्यासाठी त्याची आधी जाणीव व्हावी लागेल.
२. यशाची जिद्दआत्मविश्वासासारखा दुसरा जवळचा मित्र नाही, याची ठाम जाणीव आपल्याला झाली की कुठलीही गोष्ट सहज करता येते. आपला स्वत:वर विश्वास नसेल तर मग साऱ्या जगाचा आपल्यावर विश्वास असून काय उपयोग? मनाशी पक्की खूणगाठ बांधली पाहिजे की कितीही संकटे आली, अडथळे आले तरी आता माघार नाही. युद्ध आधी मनात जिंकले जाते आणि नंतर मैदानात. क्षेत्र कोणतेही असले तरी कष्ट करावे लागतातच. ‘दे रे हरि पलंगा वरी’ असे म्हणून चालणार नाही. जे करायचे, जे मिळवायचे त्यासाठी काबाडकष्ट करावे लागतील.
३. मध्यमे वापरण्यासाठीचा योग्य विचार
‘अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे’ हे सूत्र कायम डोक्यात ठेवले पाहिजे. आज आपल्यासमोर अनेक माध्यमे सहज उपलब्ध आहेत. या सर्व माध्यमांचा सकारात्मक वापर केला पाहिजे. त्यातून स्वतःचा विकास साधला पाहिजे. आयुष्याच्या या रणसंग्रमात विजयी योद्धा होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कितीही संकटे आली तरी आत्मविश्वासाची ढाल तुटता कामा नये तर आणि तरच आपण आकाशात उंच भरारी घेऊ शकू.
४. वाचा व ऐका
जगभरात जी जी माणसे घडत गेली, मोठी झाली त्यांनी भरपूर वाचले आणि ऐकले. या दोन्ही गोष्टींपासून आता आपण थोडेसे दूर चाललो आहोत. आपल्या हातात माध्यमे आहेत, पण त्यांचा योग्य वापर कसा करावा याची समज मात्र नाही. त्यामुळे वेळ वाया जात राहतो. अनावश्यक गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. संभ्रमावस्था वाढते. आदर्श श्रोता जोपर्यंत होता येणार नाही, तोपर्यंत व्यक्तही होता येणार नाही. आपण ग्रंथांच्या सहवासात जाऊन ज्ञान, माहितीचे धडे गिरवत नाही तोपर्यंत आपल्याला लिहिता तरी कसे येईल? ग्रंथ, मासिके, वर्तमानपत्रे आपल्या हाताशी असतानाही आपले त्याकडे दुर्लक्ष होते. पुस्तक वाचता वाचता आपल्याला माणसंही वाचता येतील आणि त्यातून मनाचं भरण पोषण होईल.
५. दृष्टिकोन बदला, जग बदलेल
सकारात्मक दृष्टिकोन आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली साथ देतो. आपण आपला दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत आपले लक्ष्य गाठू शकणार नाही. ‘ध्येय प्राप्त करेपर्यंत थांबायचे नाही’ हा स्वामी विवेकानंदांचा विचार सकारात्मक दृष्टीने घेऊन रोजच आपल्याला ‘जागे’ राहावे लागेल. आयुष्याचे योग्य नियोजन आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एकाग्रता हवीच म्हणूनच यावर्षीच्या युवा दिनाची संकल्पना आहे, ‘सर्व काही तुमच्या मनात’ हे नीट समजून घेतले की मग केवळ दिवास्वप्ने न पाहता मन एकाग्र करत आयुष्याचे नियोजन करता येईल.
६. पंखांत बळ आहेच, आजमावून पाहवे लागेल
स्पर्धेच्या आजच्या युगात टिकून राहायचे असेल तर उपयोजितेला महत्त्व आहे, हे विसरता कामा नये. केवळ पाठ केले आणि परीक्षेत लिहिले एवढेच न करता, प्रत्येक गोष्टीचा जीवनाच्या विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याबद्दलचा व्यापक विचार करावा लागेल. ती क्षमता आपल्यामध्ये आहेच हा ठाम विश्वासही हवा. आव्हाने आणि संघर्ष हा तर आजचा परवलीचा शब्द आहे. या प्रत्येक ठिकाणी ताणतणाव येणार आहेत. महान शास्त्रज्ञ, उद्योगपती, साहित्यिक लेखक, राजकारणी सर्वांनीच ते अनुभवले आणि अडचणींतून मार्ग काढला व जीवनाची यशस्वी वाटचाल केली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करून समस्यांशी दोन हात करण्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे ठरते.
अंतरीचा ज्ञानदीप मालवू न देता विवेकाची ओल कायम जपत जीवनात वाटचाल करत राहणे गरजेचे आहे. तसे केले, तरच ‘राष्ट्रीय युवा महोत्सव’ साजरा करण्याचा हेतू साध्य होईल.
(लेखक के. एम. सी. महाविद्यालय, खोपोली येथे मराठीचे प्राध्यापक आहेत.)