सुहास सरदेशमुख

हैदराबाद संस्थानात मातृभाषेच्या होणाऱ्या गळचेपीतून मराठी भाषेवर जडलेले प्रेम आयुष्यभर जपणाऱ्या नरेंद्र चपळगावकर यांच्या २७ वैचारिक पुस्तकांमुळे नव्या पिढीला आधुनिक इतिहासातील व्यक्ती कळत गेल्या. हैदराबाद मुक्ती लढ्यातील नेते, माणसे आणि तो कालखंड उभा करून देणारे चिंतनशील साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर त्यांनी मराठी भाषा आणि त्याच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त करत काही तातडीने तर काही दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे प्रतिपादन ‘लोकसत्ता’स दिलेल्या खास मुलाखतीमध्ये केले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आपली लेखन प्रेरणा आणि वैचारिक लेखनाविषयाचे बीज नक्की कोठे सापडले?

हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यलढ्याचे आणि तेव्हा होत असणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीतून मराठी भाषेविषयीचे प्रेम आपोआपच रुजत गेले. पाचवीपासून उर्दू माध्यमातून शिकावे लागले. शिक्षण मराठीत उपलब्धच नव्हते. कॉलेज इंटरपर्यंत उपलब्ध होते. तेही मराठवाड्यात एकच होते. त्यामुळे मराठीत बोलणे, गाणे म्हणणे हे सुद्धा शौर्याचे वाटेल अशी स्थिती होती. कारण सारा शासन कारभार उर्दूतून होता. संस्थात्मक जीवन जणू शून्यावर आले होते. काहीही करायचे म्हटले तरी तेव्हा हैदराबादला जाऊन परवानगी आणावी लागत असे. त्यामुळे पुस्तके वाचणे, साहित्याचा अभ्यास हे सारे खूप उशिरा सुरू होत. गृहिणी तेव्हा मराठी बोलत आणि त्यांनीच या भागातील मराठी टिकवून ठेवली. या काळात स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुरू केलेली अंबाजोगाई आणि उमरगा तालुक्यातील हिप्परग्याच्या शाळेत जरासे जास्त वेळ मराठी शिकवले जायचे. या शाळांमध्येही मराठी नव्हतेच. पण त्यातून मराठी भाषेविषयीचे प्रेम जसे माझ्या मनात रुजले तसेच ते अनेकांच्या मनात रुजत केले. त्या गळचेपीतून मराठी भाषा, साहित्य, पुस्तके असा प्रवास घडला. संस्थात्मक प्रवास तर खूप पुढचा. मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापनाच १९४४ ची. तेव्हा झालेल्या पहिल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष बळवंत गणेश खापर्डे हे मुलकी सेवेतील होते. ब्रिटिश अंमल असणाऱ्या जिल्ह्यात सरकारी कार्यालयात मराठीत अर्ज दिला तरी चालत असे. पण हैदराबाद संस्थानात ही मुभा नव्हती. तरीही भाषा टिकली. त्यामुळे लिखाणाची प्रेरणा ही अशी लहानपणात दडलेली आहे.

संत परंपरेतील मराठी संत वाङ्मय तेव्हा अभ्यासक्रमात नव्हते का?

ते खूप उशिरा आले. संत तुकाराम, ज्ञानेश्वर हे संत वाङ्मय हे पोथ्यांच्या रूपाने सुरू होते. पांडव प्रताप, हरिविजय वाचनाने सार्वत्रिक कार्यक्रम होत. तोच मराठीचा संस्कार. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही मराठवाड्याची मागणी असे की आम्हाला पंढरपूरशी जोडले गेले पाहिजे. आमचा सांस्कृतिक संबंध पुण्याशी यायला हवा, यासाठी झगडा सुरू असे. त्यामुळे मराठवाड्यात कधी स्वतंत्र मराठवाडा ही बीजे रुजली नाहीत. पण या संस्कारातून हैदराबाद संस्थानातील माणसे लिहायला हवीत असे वाटले. वडील पुरुषोत्तम चपळगावकर यांचा हैदराबाद मुक्ती लढ्याशी संबंध असल्याने ही माणसे जवळून पाहता आली. त्यांच्याविषयीची आत्मीयता होती.

हैदराबाद मुक्ती लढ्यावर तुम्ही खूप लिखाण केले. त्यामागे ही आत्मीयता कारणीभूत होती का?

राज्यातील इतर भागांत हैदराबाद मुक्ती लढ्याविषयीचा इतिहास मराठवाड्याबाहेर फारसा कोणाला माहीत नव्हता. त्यामुळे तो काळ व्यक्तिचित्रणांच्या माध्यमातून लिहिला नसता तर एक तर खोटा इतिहास तयार झाला असता किंवा घटनाच विस्मृतीत गेल्या असत्या. त्यामुळे व्यक्तिचित्रातून तो काळ उभा केला. हैदराबाद मुक्ती लढ्याचा सलग इतिहास अनंत भालेराव यांनी लिहिला. पण व्यक्तिचरित्रातून तो काळ दाखविणे हे काम करता आले. यात बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबर बिंदू, गंग्राप्रसाद अग्रवाल या माणसांवर लिहिण्यामागच्या अशा प्रेरणा आहेत. लिखाणाचे व्यक्तिचरित्राचे प्रारूप नंतर आवडू लागले. कारण त्यातून तो काळ उभा राहतो. येत्या काळात अशाच व्यक्तींवरचे एक पुस्तक येणार आहे. त्यातही सत्तेचा मोह न पडणारी एस. एम जोशी, नानासाहेब गोरे, मधू लिमये, केशवराव जेथे, काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव या नि:स्पृह माणसांचे व्यक्तिचरित्र लिहिले आहे.

सत्तेच्या ऐटीपासून दूर असणाऱ्या माणसांवरती लिहिले आहे. याच काळात १९ व्या शतकाच्या शेवटचे अर्धशतक आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात जी वैचारिक आंदोलने झाली तो काळ रानडे, फुले, लोकमान्य आणि आगरकर यांचा होता. या काळात स्वायत्त नागरी संस्था उभ्या राहिल्या. ग्रंथालये उभी राहिली. व्यापारी संस्था सुरू झाल्या. वर्तमानपत्रे लोकांचे प्रश्न मांडू लागली होती. एका अर्थाने लोकशाही मजबूत होण्याची मुहूर्तमेढ या काळात रोवली होती. त्यामुळे या काळाविषयीचे कुतूहल होते. या काळातच सामाजिक सुधारणा निर्माण झाल्या. ब्राह्मणांचे वर्चस्व नको, या चळवळीही याच काळात उभ्या राहिल्या. शिक्षण सुरू झाले. त्यातून ‘तीन न्यायमूर्ती’ हे पुस्तक आले.

वेगवेगळ्या काळात भाषेच्या अस्मितेचा मुद्दा चर्चेत असतो. दक्षिण भारतातील अस्मिता, बंगालमधील अस्मिता त्यातून निर्माण होणारे संघर्ष होत असतात. त्यात आता मराठी कुठे दिसते?

मराठी ही आपली राजभाषा झाली ती महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर. आता पण राज्य कारभार आणि त्याशिवायचा लोकव्यवहार मोठा आहे. आता शेअर्स देवाण- घेवाण आहे. वैज्ञानिक प्रयोगशाळा, बँका या संस्थांमध्ये आणि लोकजीवनात आपल्याला मराठी रुजवली पाहिजेत. सरकार म्हणून काही प्रयोग होतात. पण लोकजीवनात मराठी रुजविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण तसे होत नाही. त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. इंग्रजी भाषा ही श्रेष्ठ आहे अशी समजूत सुशिक्षित मराठी माणसांच्या मनात घुसवली गेली आहे. प्रत्येक गोष्टीची तुलना इंग्रजांशी करतो आहोत. अमुक नाटककार मराठीचा शेक्सपीअर आहे, असे वाक्य आपण वापरतो, ते कशासाठी? आपल्याकडे मराठीचा अहं खूप आहे. पण आपला अहंपणा आपल्या व्यवहारात उतरत नाही. नुसताच अभिमान काय कामाचा? त्यामुळे वापर व्हायला हवा. पूर्वी महामंडळाने मराठी विद्यापीठाची सूचना केली होती. ते होईल तेव्हा होईल, त्याचा उपयोग होईल का, ही चर्चा होत राहीलच. पण प्रत्येक जिल्ह्यात उत्तम मराठीतून शिकवणारी एक आदर्श शाळा राज्य सरकारने चालवायला काय हरकत आहे? मराठीतील आदर्श शाळा सरकारने चालविली पाहिजे. कारण त्याचे शुल्कही नियंत्रणात असायला हवे. अशा शाळा चालविण्यासाठी उत्तम शिक्षक नेमण्याची व्यवस्थाही निर्माण करावी लागते. बंगालमध्ये २० शास्त्रज्ञ निर्माण झाले तर तसे वातावरण महाराष्ट्रातही निर्माण व्हायला हवे. मातृभाषेतून शिक्षण असावे हे अनेकांनी सांगितले आहे. आपण समाज म्हणून आपला व्यवहार आणि आपला मराठीविषयीचा अहंपणा यात खूप विरोधाभास आहे.

मराठीच्या कक्षा वाढाव्या म्हणून काय करायला हवे?

खरे तर अनुवादाच्या क्षेत्रात राज्य सरकारने मोठी संस्था उभी करायला हवी. सध्याच्या सानेगुरुजी अनुवाद केंद्रात एखादा माणूस काम करतो. खरे तर मराठी विश्व विस्तारायचे असेल तर राज्य सरकारने अनुवादाचे एक मोठे केंद्र सुरू करण्याची गरज आहे. विविध भाषा उत्तम येणाऱ्या माणसांचा मराठी भाषेतील व्यवहार वाढायला हवा. तसेच विविध भाषेतील ज्ञान मराठीत यायला हवे. पण तसे होताना दिसत नाही. आता मराठी शिकवणाऱ्या पुढच्या पिढीने याचा विचार करायला हवा आहे. काही तातडीच्या आणि दीर्घ उपाययोजना केल्या तरच आपण भाषेत चांगले काम करू शकू.

suhas.sardeshmukh@expressindia.com

Story img Loader