सय्यद नसीरुद्दीन चिश्ती

सूफी संतांनी आध्यात्मिकता, सामाजिक कल्याण आणि सांस्कृतिक वारशाची केंद्रे म्हणून दर्गाहची उभारणी केली, ते चालवण्यासाठी दानावर भर दिला. सूफींचा हा सेवा-वारसा चालवण्यासाठी आज वक्फ मंडळांच्या कागदपत्रांचे डिजिटलीकरण, त्यांचे सुसूत्र नियमन यांची गरज आहे…

सूफी पंथ हा इस्लाममधील आध्यात्मिकतेचाच एक अनोखा आयाम असून तो प्रेम, करुणा, मानवतेची सेवा आणि अंत:करणाच्या शुद्धीकरणाला प्राधान्य देणारा एक मार्ग आहे. हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती, हजरत निजामुद्दीन औलिया आदी अनेक भारतीय महान सुफी संतांनी सर्व समुदायांमध्ये शांतता, सहिष्णुता आणि एकतेच्या वैश्विक संदेशाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांनी आपल्याला जात, पंथ आणि धर्माच्या पलीकडे पाहायला शिकवले, त्यातूनच मानवता व आध्यात्मिक ज्ञानाची संस्कृतीही विस्तारत गेली.

या ‘औलिया-ए-किराम’ अर्थात इस्लामच्या थोर संतांनी अनेक खानकाह आणि दर्ग्यांची स्थापना केली. हे खानकाह आणि दर्गेच पुढे आध्यात्मिक मार्गदर्शन, दानशूरता, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाची केंद्रे बनली. येथे भुकेल्यांना अन्न दिले जाई, आजारी लोकांवर उपचार करून त्यांना बरे केले जाई आणि ईश्वराच्या शोधात असलेल्यांचे मन अध्यात्माच्या प्रकाशाने प्रज्वलित केले जाई. सूफी पंथ ही इस्लामची एक परिवर्तनकारी शाखाच आहे. याच सूफी पंथाने भारताच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशाच्या जडणघडणीतही महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक शतकांपासून, सूफी संत आणि त्यांच्या आध्यात्मिक शिकवणीने धर्म/जातीच्या सीमा ओलांडून मोठ्या प्रमाणात अनुयायांना स्वत:कडे आकर्षित केले. या महान सूफी संतांनी अनेकांवर आपला आध्यात्मिक प्रभाव तर सोडलाच पण त्यासोबत त्यांनी वक्फसारख्या संस्थांच्या विकासातही मोठे योगदान दिले आहे. वक्फसाठी त्यांनी दिलेले योगदान म्हणजे धर्मादाय देणगीच्या व्यवस्थेचाच एक प्रकार. इस्लामच्या या महान सूफी संतांनी आध्यात्मिकता, सामाजिक कल्याण आणि सांस्कृतिक वारशाची केंद्रे म्हणून उभारलेल्या दर्गाहसारख्या पायाभूत सुविधा टिकवून ठेवण्यात वक्फने अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे.

एका अर्थाने, सूफी पंथ आणि वक्फ या खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या नाण्याची एक बाजू म्हणजे अल्लाहच्या सेवेसाठी स्वत:चे आयुष्य समर्पित करणारे महान सूफी संत, आणि या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे धर्म, जात आणि पंथ यांचा विचार न करता लोकांच्या हिताच्या आणि सामाजिक कल्याणासाठी त्यांनी आपली दान केलेली संपूर्ण संपत्ती आणि मालमत्ता. आपल्याला लाभलेल्या या वक्फसारख्या व्यवस्थेच्या उल्लेखनीय वारशाची काहीएका प्रमाणात ओळख करून देण्याचा प्रयत्नच मी या लेखातून करत आहे. या वक्फसारख्या व्यवस्थेनेच तर आपले पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या काळापासून समाजाच्या उन्नतीच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अगदी प्रारंभाच्या काळात स्थापन झालेल्या वक्फचे उदाहरण म्हणजे, मदीना मुनव्वरा इथे हजरत उस्मान ए गनी (रजि अल्लाहु ताला अन्हु) यांनी वक्फची स्थापना केली होती. त्या वेळी पाण्याची प्रचंड टंचाई होती, अशा काळात, त्यांनी बीर-ए-रुमा ही विहीर विकत घेतली आणि ती वक्फ म्हणून दान केली. त्यांच्या या कृतीमुळेच तर त्या वेळी मदिनातील लोकांना पिण्यासाठी मोफत पाण्याची सोय उपलब्ध होऊ शकली होती. त्यांच्या या नि:स्वार्थी दानशूर कृतीने इस्लाममधील वक्फच्या पहिल्या योगदानांपैकी महत्त्वाच्या योगदानाची नोंद केली गेली. या उदाहरणाचा सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे हजरत उस्मान ए गनी यांनी स्थापन केलेला हा वक्फ आजही, तब्बल चौदा शतकांपेक्षा जास्त कालखंडापासून सक्रिय आहे. त्या वेळी बीर-ए-रुमा या विहिरीच्या आजूबाजूला असलेली जमीन वक्फ म्हणून घोषित केली गेली आहे, आणि आता या जमिनीवर आधुनिक पद्धतींचा वापर करून खजुराचे उत्पादन घेतले जाते. या वक्फमधून मिळणारे उत्पन्न मदिनेतल्या अनाथ, विधवा आणि यात्रेकरूंना कामी यावे यासाठी दान केले जाते. खरे तर हा वक्फ म्हणजे सदाकाह जारिया अर्थात सातत्याने सुरूच असलेल्या दानकार्याचे एक मूर्त उदाहरण आहे.

आपल्या भारतातील सूफी संतांनीदेखील या महान उदाहरणाचे अनुकरण केले आणि त्याला अनुसरून मानवतेच्या सेवेसाठी तसेच आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात आपली जमीन, संपत्ती आणि मालमत्ता वक्फ म्हणून दान केली. यातून उभी राहिलेली वक्फची संपत्ती खानकाह आणि दर्ग्यांच्या स्थापनेसाठी खूपच महत्त्वाची आणि उपयोगाची ठरली. या देणगीतूनच उभ्या राहिलेल्या खानकाह आणि दर्ग्यांमधून आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आदरातिथ्य, गरिबांकरता अन्नदानासाठी लंगर (समुदायिक स्वयंपाकघरे) चालवणे, धर्म तसेच इतर कोणत्याही पार्श्वभूमीचा विचार न करता वंचितांना मोफत शिक्षण घेता यावे यासाठी शैक्षणिक संस्थाची स्थापना करणे, रुग्णालये आणि औषधालये उभारून गरजूंना वैद्याकीय उपचार देणे, तसेच अनाथ, विधवा आणि विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देणे यासाठी कामी आले. अशा सर्वच कामांमधून सेवा, उदारता आणि करुणा या सूफी पंथाच्या मूलभूत मूल्यांचेच प्रतिबिंब उमटले असल्याचे निश्चितच म्हणावे लागेल. एका अर्थाने या कृतीने भारताच्या इतिहासातला परस्पर सुसंवाद साधणारा आणि समावेशकतेची कास धरणारा समाज निर्माण करण्यात मोठे योगदान दिले असल्याचे आपल्याला समजून घ्यावे लागेल.

मात्र दुर्दैवाने आत्ताच्या काळात, भारतातील वक्फकडील अनेक मालमत्ता या मंशा-ए- वकीफ (मालमत्ता दान करणाऱ्यांचा मूळ हेतू) नुसार वापरल्या जात नाहीत हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. आज भारतातील अनेक राज्यांमधील वक्फ मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात सुव्यवस्थापनाचा अभाव आहे, भ्रष्टाचार वाढला आहे आणि त्याच वेळी जबाबदारीच्या जाणिवेचाच अभाव दिसून येतो आहे. त्यामुळेच वक्फकडील मौल्यवान जमिनी आणि संस्थांकडे दुर्लक्ष झाले, त्यांचा गैरवापर होऊ लागला आणि त्यावर अनेकांनी बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. परिणामी देशभरातील असंख्य लोकांना या वक्फकडील मालमत्ता आणि साधनसंपत्तीच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या सेवा आणि सहकार्यापासून वंचित राहावे लागत असल्याचेही आपल्याला नाकारून चालणार नाही.

खरे तर आजवरचे वक्फचे योगदान आणि त्यांना मिळणारे दान याचे प्रमाण मोठे आहे, तरीदेखील आजच्या घडीला वक्फकडील मालमत्ता आणि दर्ग्यांना आधुनिक भारतात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. वक्फ मंडळांमधील चुकीचे आणि वाईट प्रशासन तसेच या मंडळांमधील वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे आज अनेकांनी वक्फकडील जमिनींवर अनधिकृत ताबा मिळवला आहे, इतकेच नाही तर या जमिनींचा गैरवापर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. वक्फ मंडळांच्या प्रशासनातील आर्थिक गैरव्यवहारांसारख्या प्रकारांमुळे उत्पन्नाचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे. खरे तर एक संस्थात्मक व्यवस्था म्हणून वक्फचे महत्त्व आणि या व्यवस्थेची समाजाच्या कल्याणाच्या प्रक्रियेतील संभाव्य भूमिका याबद्दल आजही अनेक लोकांना फारशी माहिती नाही आणि त्यामुळेच वक्फकडील साधनसंपत्तीचा पुरेपूर वापरच होऊ शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक वक्फ मालमत्ता या मालकीसंबंधातील कायदेशीर विवादातही अडकल्या आहेत, परिणामी या मालमत्तांचा योग्य वेळेत सार्वजनिक हितासाठी प्रभावी वापर करणे शक्य झालेले नाही.

या पार्श्वभूमीवर आज वक्फ संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि या व्यवस्थेचे सामाजिक कल्याणाच्या प्रक्रियेतील योगदान वाढवण्यासाठी काहीएक उपायांवर विचार करण्याची वेळ आली असल्याचे वाटते. याअंतर्गत आपण वक्फ मालमत्तांसाठी डिजिटल नोंद ठेवण्याच्या प्रक्रियेचा अवलंब करू शकतो, यामुळे अतिक्रमण रोखण्यातही मदत होईल आणि त्याच वेळी पारदर्शकताही सुनिश्चित करता येईल. दुसरी गोष्ट अशी की आपण वक्फ मंडळांच्या प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी आणि या मंडळांमधील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी स्वतंत्र नियामक संस्था स्थापन करू शकतो, या मंडळांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सेवांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी वक्फ संस्था आणि खासगी संस्थांमध्ये परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देऊ शकतो. समाजाच्या कल्याणासाठी वक्फ व्यवस्थेच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक समुदायांना वक्फच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करणेही तितकेच महत्त्वाचे असणार आहे. याशिवाय वक्फ मंडळांशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियांनाही गती देणे गरजेचे आहे. आपल्याला जर वक्फसारख्या संस्थात्मक व्यवस्थेचे सक्षमीकरण करून या व्यवस्थेचे अस्तित्व टिकवायचे असेल तर हे सारे झाले पाहिजे. वक्फ व्यवस्थेचा वारसा आणि सूफी पंथाच्या शिकवणींचा आदर सन्मान करणे हीच तर आपली सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण पार पाडू शकलो तर ही पवित्र धर्मादाय व्यवस्था समाजाच्या हितासाठी कार्यरत राहू शकेल तसेच शांतता, प्रेम आणि मानवतेची सेवा या मूल्यांचा वारसाही चालू ठेवू शकेल.

दर्गाह हजरत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती (R.A.) यांचे वंशपरंपरागत सज्जादानशीन वारस आणि ‘ऑल इंडिया सूफी सज्जादानशीन कौन्सिल’चे (AISSC) अध्यक्ष