नेटफ्लिक्सवर हमखास बिंजवॉचिंग करणारे मराठीजन ‘केएफसी’ वा ‘मॅक्डी’त जात असतील, पण या अमेरिकानुगामी वागण्यात वाचन कुठे असतं? वेळ मिळत नाही, जे बिंजवाचन हिंदी वा दाक्षिणात्य भाषांना जमतं, ते आपल्याला जमत नाही? कादंबऱ्या नाहीच, कथांचंही..?

पंकज भोसले

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

वाईट गोष्टी अनुकरण्यात आपला मराठी समुदाय किती पुढे आहे, याची उदाहरणे गेल्या दोन-तीन दशकांत आत्मसुखाबाबत अमेरिकानुनयी बनलेल्या जीवनधारेवरून सांगता येईल. म्हणजे १ मे १९९४ या दिवशीच्या महाराष्ट्रदिनी भारतीय टीव्हीवर ‘स्टार मूव्हीज’चे प्रसारण सुरू झाले. त्यानंतर अर्धा डझन ब्रिटिश अन् अमेरिकी आंग्लसिनेवाहिन्या रुजल्या,  त्यांना मोठा प्रेक्षकवर्ग लाभला. शिकागोत मुख्यालय असलेले ‘मॅक्डोनाल्ड’ ही वायुवेगी खाद्यविक्री साखळी १९९६ साली मुंबईत (वांद्रे) आली आणि दहा वर्षांत शहरात शेकडो शाखा बनवत विस्तारत गेली. टेक्सासमधील ‘केएफसी’ ही दुसरी खाद्यविक्री साखळी भारतात १९९५ साली बेंगळूरुमध्ये उभारली गेली. तिनेही दहा वर्षांत देशात पाय रोवण्यास सुरुवात केली. कॅलिफोर्नियात घरोघरी भाडय़ाने सिनेमा पुरवणाऱ्या ‘नेटफ्लिक्स’ने भारतात २०१६ मध्ये पाय रोवले आणि गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगच नेटफ्लिक्समय झाले. चीन, रशिया, उत्तर कोरिया वा सीरिया वगळता सर्व देशांवर त्यांची दृश्यिक सत्ता आहे . ‘डीव्हीडी बूम’ भारतात आला  तेव्हापासून म्हणजे २००४ पासून अमेरिकी सिनेमा ‘बिंजाळत’ – म्हणजे इंग्रजीत ज्याला ‘बिंजवॉचिंग’ म्हणतात ते करत- आबालवृद्धांच्या एका पिढीची सिनेसाक्षरता वाढत गेली. नेटफ्लिक्स आल्यानंतर ‘बिंजाळणे’ या शब्दाचा अर्थ मराठीत आणखी वृद्धिंगत झाला. या सगळय़ा वर्षांत आपण अमेरिकनांच्या बिंजाळण्याच्या वृत्तीपलीकडेही थोडे-अधिक आत्मसात केले. कार्यालयीन संस्कृतीत पाच दिवसांचा आठवडा रुजायला लागला, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सचा कपडालत्ता आणि गॅजेट परिवार घरात दाखल झाला. घरांच्या रचनेला खिसेबल इंटरनॅशनल दर्जा आला. पण वाचनाच्या बाबतीत आपण अमेरिकनांची पुस्तकअसोशी वृत्ती उचलण्याकडे कायम काणाडोळा केला. गंमत म्हणजे भारतातील इतर भाषिक संस्कृतीत एक तर ही वाचन-‘बिंजाळ’ण्याची परंपरा स्वीकारली तरी गेली किंवा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या आधीच्या असलेल्या वाचननिष्ठांप्रति एकनिष्ठ राहण्याकडे कल वाढला. याचा प्रत्यक्षात परिणाम दोन हजारोत्तर कालावधीनंतर दिसू लागला. साहित्याला वाहिलेली मासिके बंद पडणे, कथा-कादंबरीसारख्या प्रमुख साहित्य प्रकारांना उणे ठरवून त्यांच्या वाचनाकडे दुर्लक्ष करणे आणि मुळात समकालीन साहित्याशी एकरूप न होता फटकून वागणे या घटना मराठी भाषक समुदायातच घडत आहेत. भाषक अस्मिता-अभिमान हा दहा-दोन सुमार इतिहासकेंद्रित चित्रपटांमुळे टिकत नसतो, तर त्या भाषेत लिहिल्या जाणाऱ्या साहित्याला समुदायाकडून किती स्वीकारले जाते आणि त्यानंतर त्याची देशी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किती दखल घेतली जाते, त्यावरून ठरत असते. अमेरिकी वाचनवृत्तीचा अनुभव दरवर्षी जूून-जुलै आणि ऑगस्ट या ‘समर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन महिन्यांतून येतो. या उन्हाळसुट्टीमध्ये स्थानिक आणि जागतिक पातळीवर पोहोचली जाणारी बहुतांश साप्ताहिके अन् मासिके ‘समर फिक्शन’ विशेषांक काढतात.

 होय, साधारणत: आपल्याकडच्या दिवाळी अंकांसारखेच याचे स्वरूप. गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून मात्र इथल्या दिग्गज दिवाळी अंकांनाही लाजवेल असा मजकूर घेऊन आणि लेखकांना खास कथात्म-अकथात्म साहित्य लिहायला लावून, हे सादर होतात. न्यू यॉर्कर, व्हर्जिनिया क्वार्टरली रिवू, पॅरिस रिवू, व्हॉइस, प्लोशेअर, झोईट्रोप- ऑलस्टोरी, नॅरेटिव्ह आणि कितीतरी नावे घेता येतील. यातील काही मासिके आपला कथामजकूर पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देतात, तर काही मासिके मजकूर ऑनलाइन खरेदीनंतरच वाचकांना सुपूर्द करतात. मे महिन्याच्या अखेरीपासून प्रत्येक वृत्तपत्र-साप्ताहिक-मासिकांची आपापली ‘समर फिक्शन’ शिफारशींची यादी तयार होते. त्यात ‘बीच रीड’ ही आणखी एक शिफारस. म्हणजे समुद्रकिनारी मनोहारी वातावरणात बीअर आणि शब्दांच्या घुटक्यांचा समसमान आनंद देणारी ताजी- नवीकोरी पुस्तके कोणती, याची ही खास यादी.

 आता ही यादी सालाबादप्रमाणे दरवर्षी येते. लाखालाखांत पुस्तकांच्या आवृत्त्या संपतात. समुद्रकिनाऱ्यावर वाचनानंदी टाळी लागलेली बुक-किडय़ांची एकेकटी मैफल रमते. नेटफ्लिक्स, थिएटरातील सिनेमा आणि आयुष्यातील इतर व्यवधाने सांभाळून अमेरिकी माणूस ही वाचनवृत्ती बाळगू शकतो; तर आपण नेमके वाचायला असणारा वेळ सिनेमा-सीरिज बिंजाळण्यात जाण्याची तक्रार करीत ‘आजकालच्या लेखकांचे वाचनच होत नाही,’ ही तक्रार कशी करतो, हेच उमजत नाही. करोनोत्तर काळात जुन्या-नव्या ग्रंथांच्या ऑनलाइन विक्री व्यवहाराला पालवी फुटली असली, तरी वाचकांची संख्या ज्या प्रमाणात वाढायला हवी, तेवढी न वाढता नव्या साहित्याच्या वाचनाबाबत आळसकेंद्री बनत चालली आहे. तीत बदल करायला अन् वाचनकेंद्री अमेरिकीवृत्तीला आपल्या आत्मवाचनवृद्धीसाठी अंगीकारायचे असेल तर खूपच सोप्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. वर्षभर पुरेल इतका वाचनसाठा अमेरिकी मासिकांची संकेतस्थळे उपलब्ध करून देतात. ‘इलेक्ट्रिक लिटरेचर’, ‘लिट हब’ ताजे-ताजे म्हणजे दर आठवडय़ात प्रकाशित होणाऱ्या कथा-कादंबऱ्यांचे अंश देतात. अन् समर फिक्शन विशेषांक जगात गाजलेले-गाजत असणारे खासमखास लेखक त्यांच्या ताज्या कथांसह सादर होतात.

यात आघाडीचे साप्ताहिक असते न्यूयॉर्कर. पूर्वी जून महिन्याचा दुसरा आठवडा हे साप्ताहिक ‘फिक्शन इश्यू ’ म्हणून काढीत. करोनोत्तर दोन वर्षांत त्याचा कालावधी जूनऐवजी जुलैच्या पहिल्या आठवडय़ात किंवा पुढे सरकत आहे. पण वर्षांतील छपाईचे सर्व आठवडे सर्वोत्तम इंग्रजी कथा किंवा इंग्रजीत अनुवादित झालेली कथा देण्याचा शिरस्ता न्यूयॉर्कर आजवर पाळत आहे. गेल्या दोन आठवडय़ांसाठीचा न्यूयॉर्करचा जोडअंक हा कथाविशेषांक होता. त्यात शर्ली जॅक्सन या गेल्या शतकातील गाजलेल्या रहस्य-भय कथालेखिका शर्ली जॅक्सनच्या ‘कॉल मी इशमेल’ या एकपानी कथेचे विशेष पान न्यूयॉर्करने दिले आहे. आपल्या नवऱ्यासोबत सुरू केलेल्या कॉलेज मॅगेझीनसाठी लिहिलेल्या या कथेत जॅक्सनच्या कथेची सारी गुणवैशिष्टय़े आहेत. ‘लॉटरी’ या अभिजात भयकथेचा नमुना म्हणून सांगितल्या जाणाऱ्या कथेची लेखिका शर्ली जॅक्सन. तिची अप्रकाशित कथा तिच्या कुटुंबीयांकडून मिळवून न्यूयॉर्करने छापली आहे. त्याविषयीची विस्तृत माहिती ऑनलाइन आवृत्तीत वाचायला मिळते. ‘कॉल मी इशमेल’ हे शीर्षक ‘मोबी डिक’ची सुरुवात माहिती असणाऱ्यांसाठी किती कुतूहलपूर्ण असू शकते. ही कथा वाचणाऱ्यांना मात्र ‘लॉटरी’चीच आठवण येऊ शकते. 

दोन वर्षांपूर्वी कोविडच्या विषाणूची जगाला ओळख झाली.  जगण्याच्या सर्व यंत्रणा अल्पावधीत ठप्प करणाऱ्या या जागतिक विषाणूसारखाच चीनमधून एक विषाणू साऱ्या जगाला गपगार करतो, हे दाखविणारी ‘सेव्हरन्स’ ही कादंबरी लिंग मा या चिनी-अमेरिकी लेखिकेने लिहिली. केव्हा, तर करोना माहिती व्हायच्या एक-दीड वर्ष आधी. करोनाकाळात म्हणूनच या कादंबरीची जोरदार चर्चा झाली. या द्रष्टय़ा लेखिकेच्या कथेला अचानक मोल आले. तिचा पहिला कथासंग्रह ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दाखल होतोय. पण त्याआधी न्यूयॉर्करच्या कथाविशेषांकात ‘पेकिंग डक’ नावाची तिची अद्भुत कथा वाचायला मिळते (व्हीक्यूआर, व्हर्जिनिआ क्वार्टरली रिवूमध्ये ‘टुमॉरो’ ही आणखी एक कथा उपलब्ध आहे.). दीर्घ आकाराच्या एका कथेत ‘पेकिंग डक’ या अमेरिकी लेखकाच्या चिनी वास्तव्यातील लघु-लघु कथेचा संदर्भ आहे. कथेमध्ये कथा लिहिण्याची एक प्रक्रिया आहे. लिडिया डेव्हिस या अमेरिकी लघु-लघु कथालेखिकेच्या कथेचा तपशील आहे. गोष्ट सांगण्याची ही फारच निराळी पद्धत आहे. जिच्या चकव्यात थक्क होण्यावाचून पर्याय उरत नाही. रेचल कुशनेर ही अमेरिकी कादंबरीकार. ‘मार्स रूम’ या बुकरलघुयादीत पोहोचलेल्या कादंबरीनंतर तिच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांनाही मोठा वाचक लाभला. ‘ए किंग अलोन’ ही न्यूयॉर्करच्या या कथाविशेषांकातील सर्वोत्तम म्हणावी अशी कथा. वृद्ध नायकाचा मुलीला भेटण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातानाचा प्रवास या कथेत आहे. हा कण्ट्री संगीतातील थोडा-बहुत प्रसिद्ध गीतकार. त्याची दुसऱ्या शहरात राहणारी मुलगीदेखील गीतकारच. पण त्याच्याहून अधिक लोकप्रिय गाणी देणारी. या प्रवासात अनोळखी लोकांना जवळच्या ठिकाणी जाण्यात मदत करता करता त्या प्रत्येकाची एकेक कहाणी येत राहते. मुलीच्या शहरात तो पोहोचतो. तेव्हा ती ते घर सोडून अज्ञात ठिकाणी गेल्याचा नवा शोध बापाला लागतो. पुढे तिच्या शोधासाठी आणखी नवनवी ठिकाणे धुंडाळणे सुरू होते. वाटेत पुन्हा प्रवासमदत मागणाऱ्या तरुण आणि काहीशा विचित्र भासणाऱ्या मुलीला तो गाडीत घेतो. कथाप्रवास अनपेक्षित वळणांवरून व्हायला लागतो. नायक गाणी लिहिणाऱ्या पेशाचा असल्यामुळे अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा कथेत मोकळा-ढाकळा वावर होतो. कथेच्या प्रकृतीला शोभणारे ‘ए किंग अलोन’ हे शीर्षकही त्यातूनच उमललेले.

ब्रायन वॉशिंग्टन हा आफ्रो-अमेरिकी लेखक. याच्या कथांमध्ये आणि कादंबऱ्यांमध्ये समलैंगिक संबंधांची वर्णने मुक्तहस्ते केलेली असतात. ‘अरायव्हल’ या कथेत हॉलीवूडमधील सेलिब्रेटी नायकाशी संबंध असणाऱ्या ‘गे’ निवेदकाची कहाणी आहे. विविध शहरांतील विमानतळांवरून पंच-अष्टतारांकित हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी विविध गाडी चालक-चालकिणींसह साधलेला संवाद आणि त्यातून उलगडत जाणारे निवेदकाचे व्यक्तिमत्त्व, करोनोत्तर सारे काही सुरळीत होत चालल्याच्या खुणा दर्शविणारे संदर्भ आणि प्रचंड वाचनीयता हे या कथेचे गुणविशेष.

पॅरिस रिवूने एमा क्लाईन, हॅरिएट क्लार्क, लिओनार्ड कोहेन, रेचल बी ग्लेसर आणि नव्या-जुन्या लेखकांच्या कथा दिल्या आहेत. ‘व्हीक्यूआर’मध्ये शीला सुंदर या भारतीय वंशाच्या लेखिकेची ‘डिप्लोमसी’ ही दीर्घ कथा आहे. सोफी विस्कॉफ या नाटककाराला ‘माय फेवरेट प्लेराईट’ ही कथा लिहायला लावली आहे.

 पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या जमील जान कोचाई या तरुण लेखकाच्या अफगाणी संदर्भ असलेल्या काही कथा गेल्या काही वर्षांत न्यूयॉर्करने गाजविल्या आहेत. अफगाणिस्तानमधून आश्रित म्हणून पाकिस्तान आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या पहिल्या पिढीचा हा प्रतिनिधी. अमेरिकेवर झालेल्या ९-११च्या हल्ल्यानंतर बदललेल्या अफगाणी जगण्याचे वास्तव याच्या कथांमधून येत असते. ‘द पॅरेबल ऑफ द गोट्स’ ही कथा ‘व्हीक्यूआर’मध्ये वाचायला मिळते. शिवाय जेस रोव्ह याची ‘लेट ब्लूज’ ही कथादेखील मासिकाने ऑनलाइन वाचनास उपलब्ध करून दिली आहे. इमर्सन विद्यापीठाच्या ‘प्लोशेअर’ मॅगझिनचा प्रत्येक अंक खणखणीत कथांनी भरलेला असतो. पूर्वी तो बऱ्याच कथा ऑनलाइन देत असे. यंदाचा सर्व समर फिक्शन विशेषांक नव्या लेखकांनी सजलाय. फक्त एकच कथा वाचण्यासाठी मुक्त आहे.

‘समर फिक्शन’ विशेषांकांमधील या कथा का वाचायच्या, तर आपल्या भवतालाचा अमेरिकी लेखक-लेखिका कथाअंगाने कसा विचार करतायत आणि कथारूपात त्यांना कसे साकारतायत हे त्यातून समजते. न्यूयॉर्कर या सर्व कथालेखकांच्या स्वतंत्र मुलाखती दर आठवडय़ाला देतात. त्यामुळे प्रत्येक कथेबाबत भावलेल्या अन् न भावलेल्या घटकांचे आतले-बाहेरले संदर्भासहित स्पष्टीकरण मिळायला सुरुवात होते. कोणत्याही विद्यापीठात न जाता कथा लिहिण्याचे आणि आकलनाचे शिक्षण घ्यायचे असेल, तर या अमेरिकी वाचनवृत्तीचे  अनुकरण आवश्यक आहे. हिंदीच्या वाचकपट्टय़ाने या वृत्तीचा अंगीकार केला आहे. दक्षिणेत तमिळ-तेलुगू- कन्नड आणि मल्याळम साहित्यात त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या साहित्यिक अस्मिता जपण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. जगाला भावत असणाऱ्या मल्याळम सिनेमाआधी त्यांचे साहित्य इंग्रजी अनुवादातून सर्वदूर चालले आहे. या पटलावर आपण मराठीजन कुठे आहोत हे उमजले, तरी पुढे जाण्याचा मार्ग तयार होणे शक्य आहे.