ॲनाने म्हणजे माझ्या मुलीने मला नेटफ्लिक्सवर ‘अ‍ॅडोलेसन्स’ ही वेबमालिका बघायला सांगितली होती. माझ्या साप्ताहिक स्तंभांमध्ये मी कधीकधी मला मनोरंजक वाटतात अशा पुस्तकांबद्दल लिहिले आहे. एखाद्या वेबमालिकेवर मी पहिल्यांदाच लिहितो आहे. आपण खूप दिवसांनी चांगलं काहीतरी बघितलं असं मला ती मालिका बघितल्यावर वाटलं. ‘अ‍ॅडलेसन्स’, ही नावाप्रमाणेच, एका तेरा वर्षांच्या मुलाच्या आयुष्याबद्दल सांगणारी मालिका आहे. या शाळकरी मुलाने त्याच्याच वयाच्या एका मुलीला चाकूने भोसकून ठार मारले आहे. या दोन्ही किशोरवयीन मुलांमध्ये विशेष मैत्री नव्हती की कडवे शत्रुत्व नव्हते. त्यामुळे त्याच्या या गुन्ह्यामागचा हेतू शोधणे पोलिसांना कठीण होते. खून कोणी केला या संदर्भातील निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मानसशास्त्रज्ञांची मदत घ्यावी लागते. ही मालिका एका साध्या ब्रिटिश शहरात घडते.

मालिकेतील तो मुलगा, जेमी अगदी साध्या, कष्टकरी कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील प्लंबर म्हणून काम करत असतात. त्याची आईही थोडेफार काम करायची पण मुख्य कमावते वडीलच होते. पण एकुणात हे जोडपे आनंदाने वैवाहिक जीवन जगत होते. त्यांना एक १३ वर्षांचा मुलगा होता, आणि १७ वर्षांची मुलगी होती. ही मुलगी मात्र स्थिर बुद्धी असलेली होती. तिच्या धाकट्या भावाप्रमाणे तिच्यात भावनिक अस्थिरतेचे कोणतेही लक्षण नव्हते. ही मालिका बघितल्यानंतर मला तिच्यावर लिहायचे होते, कारण मी तरुणांशी सातत्याने बोलत असतो. गेल्या तीन-चार वर्षांपासून माझ्या हालचालींवर बंधने आली आहेत. पण त्याधी मात्र शनिवार रविवार वगळता मी जवळजवळ दररोजच तरुणांशी बोलायचो. आता मात्र घरी भेटायला येणाऱ्या तरुणांशीच माझं बोलणं होतं.

आपल्या किशोरवयीन मुलांना समजुतीच्या चार गोष्टी सांगण्यासाठी मी माझ्याबरोबर आणखीही काही पोलिसांशी त्या मुलांच्या गप्पा व्हाव्यात असं कनिष्ठ मध्यमवर्गीय पालकांना वाटत असतं. मला त्यांना हे समजावून सांगावं लागलं की पोलिसांना भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या मुलांना किंवा अगदी प्रौढांनाही हाताळण्याचं, त्यांच्याशी बोलण्याचं प्रशिक्षण दिलेलं नसतं. त्यामुळे यात जर पोलिसांना आणलं तर केवळ ते असण्यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची होऊ शकते. माझ्या सेवाकाळात एकदा मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रा. मृणालिनी आपटे यांच्याकडे एक मदत मागितली होती. त्यानुसार त्यांनी एक मुलगी आणि एक मुलगा, अशा त्यांच्या दोन विद्यार्थ्यांना माझ्या मदतीसाठी दिले. ही दोन्ही मुले दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत माझ्या कार्यालयात येत आणि काही मुलांशी चर्चा करत. या कामात आम्ही, पोलीस, नक्कीच अपयशी ठरलो असतो. पण या दोघांना मात्र खरंच फार चांगल्या पद्धतीने मुलांशी बोलता आलं.

माझी पत्नी शिक्षिका होती, मी १९६४ ते १९६८ पर्यंत शहर पोलिस अधीक्षक म्हणून पुण्यात कार्यरत होतो,तेव्हा तिने पुण्यात शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये काम केले होते. त्यानंतर १९६८ ते १९७४ पर्यंत मुंबईतील कॅथेड्रल स्कूलमध्ये, त्यानंतर माझी सी.आर.पी. मध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती तेव्हा म्हणजे १९७४ ते १९७६ पर्यंत तिने हैदराबादमधील सेंट्रल स्कूलमध्ये आणि दिल्लीत प्रतिनियुक्तीवर माझी शेवटची पोस्टिंग होती तेव्हा म्हणजे १९७६ ते १९७९ पर्यंत तिने दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमध्ये काम केलं . तिला मुंबईच्या कॅथेड्रल स्कूलमधील मुलांना सांभाळणं जास्त कठीण वाटलं आणि हैदराबादच्या सेंट्रल स्कूलमधील मुलांना सांभाळणं सगळ्यात सोपं वाटलं.

कारण समजणं फारसं कठीण नाही. आर्थिकदृष्ट्या प्रगत लोकांच्या मुलांइतकं भारतातील गरिबांच्या मुलांचं भावनिक आरोग्य खराब झालेलं नाही. भारतात फेसबुक, व्हॉट्स ॲप इत्यादी समाजमाध्यमे येण्याच्या आधीपासूनच जिथं ‘अ‍ॅडलेसन्स’ वेबमालिकेचं चित्रीकरण करण्यात आलं, त्या इंग्लंडसारख्या देशामध्ये, तिथंली मुलं या माध्यमांचा वापर करत होती. तंत्रज्ञानाच्या संपर्कात येणारी मुलं लैंगिक आकर्षणाच्या तात्कालिक ट्रेंडने या प्रगतीची कमी उपलब्धता असलेल्या मुलांपेक्षा जास्त प्रभावित होण्याची शक्यता असते. ‘अडेलिसन्स’ या वेबमालिकेतील किशोरावस्थेतील १३ वर्षीय नायक त्याच्या वयानुसार नैसर्गिक असलेल्या लैंगिक इच्छांशी झगडताना दिसतो.त्याच्या वर्गातल्या मुलांनी असा निष्कर्षच काढून टाकलेला असतो की ८० टक्के मुली २० टक्के मुलांकडे आकर्षित होतात. या मुलाला असं वाटत असतं की तो दिसायला फारसा चांगला नाही. मुलींनी त्याच्याकडे लक्ष द्यावं इतका आकर्षक नाही. त्याने फुटबॉल खेळावा यासाठी त्याच्या वडिलांनी प्रयत्न केला, पण त्याला ते काही जमलं नाही. तो तसा बऱ्यापैकी हुशार होता. अभ्यासातही चांगला होता, पण तो पौगंडावस्थेत होता. या वयातल्या मुलांचे प्रश्न काय असतात, ती तशी का वागतात हे त्याच्या पालकांच्या लक्षात येत नव्हते, त्यामुळे ते त्यांनी समजून घेणं तर दूरचीच गोष्ट झाली.

भारतातल्या मुंबईसारख्या श्रीमंत शहरांमधले पालक आपल्या रोजच्या जगण्याच्या धावपळीत असतात. पुरुष कामामध्ये अडकलेले असतात. स्त्रियांना इतर अनेक व्यवधानं असतात. पौगंडावस्थेतील मुलांना त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. तारुण्यात प्रवेश करताना ते ज्या अनुभवांना सामोरे जात असतात, त्याबद्दल त्यांना आणखी माहिती हवी असते. पण या मुलांच्या वडिलांकडे उत्तर देण्यासाठी वेळ नसतो, त्यांची आई सहसा मुलींना पुरुषांबाबत सावध करण्याची जबाबदारी वगळता अशा विषयांमध्ये सहभागी होण्यास कचरते. या वेबमालिकेतील नायक जेमी स्वतःला त्याच्या खोलीत कोंडून घेत असे आणि त्याची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती संगणकावर शोधत असे. त्याच्या संगोपनात आपण कुठं कमी पडलो यासंदर्भातील त्याच्या पालकांमधली चर्चा मालिकेच्या शेवटच्या भागात दाखवण्यात आली आहे. आजच्या काळात मुलांना वाढवताना पालकांवर किती ओझं असतं ते या चर्चेतून पुढं येतं. हे सोपं नाही, पण पालकांनी कोणतंही निमित्त पुढे न करता दररोज त्यांच्या मुलांसाठी वेळ दिला तर ते खूप महत्त्वाचं ठरू शकतं. आणि या नायकाप्रमाणे, एखादं मूल आपल्या आपल्यातच जगत असेल, संवाद साधत नसेल, तर मग तर पालकांनी त्याच्याकडे आणखीनच लक्ष दिलं पाहिजे.

शाळांमध्ये लहान मुलांवर होणारा अत्याचार हा आणखी एक मुद्दा आहे. कधीकधी मोठी मुलं दोषी असतात, परंतु अनेकदा शाळांमध्ये लहान लहान कामांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी किंवा कधीकधी शिक्षक देखील जबाबदार असतात. पालक आणि शिक्षकांना या धोक्याची सतत आठवण करून दिली पाहिजे आणि शाळा प्रशासकांनी या धोक्याबद्दल सतर्क राहिले पाहिजे. ते त्यांचं लहान मुलांबाबत असलेलं कर्तव्य आहे.मुंबई शहर पोलिसांनी ‘पोलीस दीदी’ कार्यक्रम सुरू केला होता ज्याअंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक महिला पोलिस अधिकारी महिन्यातून एकदा त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना भेट देत असे आणि परवानगी असल्यास कधीकधी पालक-शिक्षक बैठकीला उपस्थित रहात असे. पोलिसांच्या उपस्थितीने सर्व संबंधितांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली जात असे आणि संभाव्य गुन्हेगारांना त्यांच्यावर नजर आहे याची जाणीव करून दिली जात असे.

मी ज्या बिगर सरकारी संघटनेचा संस्थापक-विश्वस्त आहे, त्या पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट (पी.सी.जी.टी.) ने पोलीस दीदी कार्यक्रमासह शहरातील दुसऱ्याबिगर सरकारी संघटनेबरोबर या महत्त्वाच्या मुद्द्यावर काम केले. दुर्दैवाने, कोविडचा प्रादुर्भाव होताच हे काम थांबले. आता आमची संघटना प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संभाव्य गुन्हेगारांजरब बसवणे हा यामागचा उद्देश आहे. लेखक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.