माधुरी गुंजाळ
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘लवचीकता’. कधी, कुठे, काय आणि कसे शिकायचे याचे स्वातंत्र्य देणारी विद्यार्थिकेंद्रित लवचीकता!
सध्या प्रचलित असलेल्या शिक्षणप्रणालीत दहावीनंतर विद्यार्थी कला, वाणिज्य अथवा विज्ञान अशा विद्याशाखांच्या प्रवाहात लोटला जातो. या तीनही शाखांतील भाषा विषय वगळता, आवडीचे विषय एकत्रित शिकण्याची मुभा त्यास मिळत नाही. बारावीनंतरही त्यात फारसा बदल न होता एकल विद्याशाखीय असे उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडतो. विद्याशाखांचे, विषयांचे विशेषीकरण आणि त्यातून निर्माण झालेली एकल-विद्याशाखीयता अशा ठरलेल्या चाकोरीतच सर्वसाधारणतः दहावीनंतरचे शिक्षण होते.
जागतिक पातळीवर शिक्षणाच्या क्षेत्रात झालेले आणि होत असलेले बदल, भारतीय शिक्षणाची पूर्वपीठिका आणि भारतातील शिक्षणाची सद्यःस्थिती या सर्वांचा विचार करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक संरचनात्मक बदल सुचवले आहेत. त्यातील शाश्वत विकासाशी संबंधित उद्दिष्टे अत्यंत महत्त्वाची आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर जगासाठी शाश्वत विकासाची काही उद्दिष्टे, ती साध्य करण्याच्या कालमर्यादेसह निश्चित केली गेली आहेत. या शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आणि त्याअंतर्गत येणारी उप-उद्दिष्टे हे शिक्षणाशी संबंधित आहेत. शिक्षणाशी संबंधित याच शाश्वत-विकास उद्दिष्टांनुसार भारतानेदेखील दर्जेदार, सर्वसमावेशक, समन्यायी तसेच आजीवन शिक्षण संधी उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेता प्रचलित भारतीय शिक्षणपद्धतीत काही आवश्यक बदल करणे आता अगत्याचे झाले आहेत.
उच्च शिक्षण प्रणालीत सध्या अस्तित्वात असणारे विद्याशाखानिहाय, विषयनिहाय विघटित शैक्षणिक पर्यावरण, एकल-विद्याशाखीयता, उच्च-माध्यमिक अथवा उच्च शिक्षणाच्या सुरुवातीलाच स्वतःचा कल अथवा आवड विचारात न घेता केलेली विद्याशाखेची निवड अशा बाबींच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षण आणि संशोधनात बहुविद्याशाखीयतेचा अवलंब अधोरेखित करते. अनेक विद्यार्थ्यांना योग्य वयात शिक्षणशाखेच्या निवडीविषयी योग्य मार्गदर्शन लाभत नाही. अशा वेळी या विद्यार्थ्यांना आपल्याला या विद्याशाखेत रस नाही, असे वाटू लागले किंवा या विद्याशाखेतून करिअर घडविण्याच्या संधी नाहीत, असे लक्षात आले, तरीही त्यांना त्याच विद्याशाखेतून शिक्षण पूर्ण करावे लागते. काही विद्यार्थ्यांना एकमेकांशी थेट संबंध नसणाऱ्या, एकाच विद्याशाखेत समाविष्ट नसणाऱ्या विषयांचा अभ्यास करण्याची इच्छा असते उदाहरणार्थ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याला संगीतही शिकण्याची किंवा एखाद्या भाषाविषयात प्राविण्य संपादन करण्याची इच्छा असते, मात्र हे दोन्ही विषय एकाच शाखेतून शिकता येत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीनिवडींना मुरड घालावी लागते. हा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न नवीन शैक्षणिक धोरण करणार आहे. उदा. पदार्थविज्ञानात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास पदार्थ विज्ञानांतर्गत येणाऱ्या विविध विषयांच्या अभ्यासाबरोबरच इतर अनुषंगिक विषय तसेच आवड असलेल्या अभिनय, गायन, वादन, नृत्य, चित्रकला, भाषा अथवा एखादे विशिष्ट कौशल्य-विकसित करता येईल. त्याच्या प्रशिक्षणाचा समावेश नियमित अभ्यासक्रमात करून घेणे बहुविद्याशाखीय पद्धतीमुळे शक्य होणार आहे.
एखाद्या भागातील प्रदूषण समस्येवर तोडगा काढण्यासाठी पर्यावरणतज्ज्ञांच्या बरोबरीनेच रसायनशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, लेखक यांचेही सहकार्य मिळू शकेल. त्यातून समस्या निराकरणार्थ अथवा नवनिर्मितीस्तव केले जाणारे संशोधन एककल्ली न राहता विविध विद्याशाखांच्या सहाय्याने केले गेले, तर मिळणारे परिणाम निश्चितच सर्वसमावेशक, बहुव्यापी आणि उपयोगी ठरतील. त्यामुळेच एकल विद्याशाखीयतेच्या मर्यादा ओलांडून आणखी काही विद्याशाखांच्या साहाय्याने आंतरविद्याशाखीय अथवा बहुविद्याशाखीयतेचा अवलंब करून ज्ञाननिर्मिती करणे, समस्या-निराकरणार्थ ज्ञानाचे, कौशल्याचे उपयोजन करणे आवश्यक ठरते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या धोरण दस्तावेजात भारतीय उच्च शिक्षण संस्थांमधून बहुविद्याशाखीय शिक्षणाचा पुरस्कार प्राधान्याने करावा, असे ध्वनित होते. या अनुषंगाने विचार करता एकमेकांना पूरक ठरतील अशा विद्याशाखांचे लवचीक आकृतिबंध तयार करावे लागतील. असे आकृतिबंध तयार करतानाच उच्च शिक्षण संस्थांची पुनर्रचना, या संस्थांमधील समन्वय, भौतिक साधने-सुविधा, मनुष्यबळाची उपलब्धता, श्रेयांकांची विभागणी, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विहित कालावधी, बहुपातळी प्रवेश आणि निर्गमन अशा महत्त्वपूर्ण बाबीही प्राधान्याने विचारात घेणे आवश्यक ठरणार आहे.
एकल विषयांच्या ज्ञानात्मक मर्यादा ओलांडून, अनेक विषयांची एकमेकांस पूरक ठरेल अशी योजना करून बहुविद्याशाखीय ज्ञाननिर्मिती करणे, त्याआधारे समस्येचे निराकरण करणे या उद्देशाने उच्च शिक्षणातील बहुविद्याशाखीयतेच्या अवलंबाविषयी निश्चितच उत्सुकता निर्माण झालेली आहे. प्रश्न आहे, तो अंमलबजावणीचा. अभ्यासक्रमांची योग्य रचना केल्यास विद्यार्थ्यांचाही या प्रणालीला उत्तम प्रतिसाद लाभेल आणि त्यातून शैक्षणिक व्यवस्था अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करू लागेल.
( लेखिका शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत. )
gunjalmadhuri@gmail.com