श्याम पेठकर
निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे मतदान आटोपले आहे. आता ते कमी झाले तर ते कुणाच्या फायद्याचे, अशा मनोरंजक चर्चा सुरू राहणारच! टिव्ही वाहिन्यांवरील मालिकांमध्ये त्या भागाचा शेवट करताना एक ‘हुक पॉइंट’ दिला जातो. म्हणजे नायिकेला मारायला कुणी आले आहे आणि ती आता दार उघडायला दारापाशी आली आहे, अशा दृष्यावर तो भाग ‘फ्रीज’ केला जातो. काय होणार? म्हणून लोक दुसऱ्या दिवशीचा भाग अगदी सुरुवात न चुकवता पाहतात… टीआरपीची गणिते असतात ही. तसेच या निवडणुकीचे आहे. याची पटकथा, संवाद कोण लिहीत असते हे अखेरपर्यंत कळत नाही; पण आता पहिल्या टप्प्यानंतर भाजपने आपल्या प्रचाराची निती बदलली आहे. पंतप्रधान मोदी यांनी थेटच काँग्रेसच्या अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाला पुन्हा हात घातला आहे. दलित, बहुजन हा मतदार घटना बदलण्याच्या काँग्रेसच्या प्रचाराने दूर जातो आहे, हे लक्षात आल्यावर आता काँग्रेसची सत्ता आली, तर बहुजनांची संपत्ती आणि आरक्षण अल्पसंख्याक बहुलेकूरवाळ्यांना (म्हणजे कोण ते वेगळे काय सांगायचे?) वाटून देणार आहे, असा थेट हल्ला करण्यात आला आहे. भाजपा सुरुवातीच्या प्रचारात उत्तरदायी ठरत होता. काँग्रेसच्या ‘घटना बदलणार’ या प्रचाराला भाजपला उत्तरे द्यावी लागत होती. आता भाजपाने नॅरेटिव्ह सेट केल्याने काँग्रेसला उत्तरे द्यावी लागत आहे.
मोदी नको, तर मग कोण?
अर्थातच भाजपचा पूर्ण चेहरा पंतप्रधान मोदी हेच आहेत. मोदी राजवटीला लोक कंटाळले आहेत, नापसंती निर्माण झाली आहे, असे वातावरण असताना विरोधी पक्षात कोण? असा सवाल केला जातो. मोदींनी विरोधी पक्षातही कुणालाच शिल्लक ठेवलेले नाही. राहुल गांधींचा ‘पप्पू’ केला होता, त्यातून ते बाहेर पडत आहेत. तरीही राहुल गांधी देशाचे नेतृत्व करू शकतील, यावर जनतेचा विश्वास नाही. त्यामुळे मोदी नको, तर मग कोण? असा प्रश्न समर्थकांकडून विचारला जातो. मोदींनी विरोधात कुणाला उभेच राहू दिले नाही. बाहेर नाही अन् पक्षातही नाही. त्यामुळे भाजपकडून जे काय महत्त्वाचे बोलायचे ते मोदीच बोलतात आणि मग त्यांनी म्हटलेले प्रचाराचे स्तोत्र त्यांचे इतर तारांकित प्रचारक म्हणतात. अर्थात भाजपात इतर तारे प्रचारक हे मिणमिणते आहेत. आता नंतरच्या टप्प्यासाठी ही नीती आली ती मोदी नागपूरला तब्बल १० तास मुक्काम करते झाल्यावरच, असे युट्युबच्या वाहिन्या सांगत आहेत. खरेखोटे काय ते असो; पण त्यानंतर मोदींनी ही आक्रमक भाषा केली आहे.
हेही वाचा : कलाटणी देणारा तिसरा टप्पा…
अल्पसंख्याकांच्या मतांची पर्वा कशाला?
अल्पसंख्याकांच्या मतांची पर्वा करण्यात काहीही अर्थ नाही, कारण त्यांची संख्या आहेच किती? बहुजन हिंदू म्हणून आपल्या पाठीशी उभे राहिले तर अल्पसंख्याकांच्या मतांसाठी त्यांचे तुष्टीकरण करण्याची गरज नाही. त्यांना सत्तेमागे फरफटत यावेच लागेल अन् नाही आले तर त्यांची अवस्था काय होईल, हे विविध उदाहरणांतून न बोलता सांगितले जाते. दलित मतांमध्येही हिंदू दलितांचीही संख्या मोठी आहे. इतर दलित आणि मुस्लीम मतांचे धृवीकरण करण्यासाठी ओवेसी, प्रकाश आंबेडकर, मायावती हे आहेत. बहुजनांना अल्पसंख्याकांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतल्याने बरे वाटते. आपला धर्म आपणच राखला पाहिजे, हे त्यांना विविध मार्गांनी पटवून देण्यात आले आहे. त्यामुळे ते भाजपा अर्थातच मोदींच्या मागे भक्कमपणे उभे राहतात. आपला धर्म संकटाक सापडला असताना एकच व्यक्ती आपल्याला वाचवू शकते आणि ती म्हणजे मोदी आहे, हा आता बहुजनांच्या श्रद्धेचा विषय झाला आहे.
अर्थात हे अलीकडच्या काळातल्या परिश्रमाचे फळ नाही. उजव्या विचारांच्या संघटनांनी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हा हिंदुस्थान आहे, हिंदूंचा देश आहे, अशी भूमिका मांडणे सुरू केले होते. गेल्या दशकात पैसा, सत्ता, साधनसंपत्तीची जोड मिळाली. सत्तेच्या वळचणीला कायम असणारा हा घटक असतो, आता तोही येऊन मिळाला आणि मग बहुसंख्याकांचा धर्म हाच राष्ट्रधर्म, हे खोलवर रुजत गेले आहे.
हेही वाचा : यंदाची निवडणूकही कांद्याची!
काँग्रेसच देशातील हिंदूंचा सर्वांत मोठा पक्ष होता
काँग्रेसने खरेच अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण केले का, याचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. समाजमाध्यमांवर त्या संदर्भात जे पसरले आहे ते आता खोलवर रूजले आहे. हेही खरे आहे की, काँग्रेसने अल्पसंख्याकांना कुरवाळत ठेवले होते. त्यामागची कारणे निवडणुकीचे राजकारणच होते, असे नाही. फाळणीनंतर जो मुस्लीम समाज (आधी बांधव म्हटले जायचे, म्हणावे लागायचे, हा आताचा बदल.) भारतात राहू इच्छीत होता त्यांच्याबाबत दोन भूमिका होत्या. त्यात महात्मा गांधी अर्थातच काँग्रेसची भूमिका- ते हा देश आपला समजतात आणि राहू इच्छितात तर त्यांना या देशात परकेपणा वाटू नये, अशी होती. घटनेतील सर्वधर्मसमभावाचे तत्त्व राखले जावे व या देशाचा चेहरा हाच असावा, यासाठी काँग्रेसने मुस्लिमांना सांभाळून ठेवले. सोबतच या देशातील बहुसंख्य हिंदूंचेही हक्क नाकारले जाऊ नयेत, त्यांचे अहित होऊ नये, हेही काँग्रेसी सत्तेने पाहिले. त्या अर्थाने काँग्रेसच या देशातील हिंदूंचा सगळ्यात मोठा पक्ष होता. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचाही काळ पाहिला तर काँग्रेसवर सवर्णांचेच सर्चस्व होते. त्याची ध्येय- धोरणे ठरविणारी, नेतृत्व करणारी मंडळी उच्चवर्णीयच होती. तरीही फाळणीनंतर देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात दलित, मुस्लीम, ख्रिश्चनांना सत्तेत वाटा व सर्वच क्षेत्रांत समान संधी मिळावी अशी धोरणे राबविली गेली. तो तत्त्वविचार होता. तरीही बहुसंख्य हिंदूंचे अहित होईल, असे काँग्रेसने काही केले नाही. इंदिरा गांधींचे स्टाईल स्टेटमेंट म्हणून पाहायचे झाल्यास त्यांच्या हातातली रुद्राक्षांची माळ हेच होते. त्यांची हत्या झाल्यानंतर देशातील आघाडीच्या दैनिकांनी पहिल्या पानावर ही एकमुखी रुद्राक्षाची माळ तुटली, विखुरली असे दाखविले होते. काँग्रेसच्या काळातही धीरेंद्र ब्रह्मचारी, सत्यसाई आणि इतर अनेक बाबा, अध्यात्मिक संत उदंड झाले होतेच.
जाती-पातींच्या राजकारणाला प्राधान्य
देशाचेच नॅरेटिव्ह या आधी दोन वेळा बदलले आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वधर्मसमधाव, समानसंधी हे तत्त्व होते. आणीबाणीनंतर उजव्यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिक आक्रमक झाली. सर्वधर्मसमभावाच्या धोरणाचा चेहरा तोच ठेवत प्रत्यक्ष वागणूक बदलली गेली. अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण म्हणावे तसे सुरू झाले. बहुजन जातीपातींत विभागले गेले. उजव्यांच्या सकल हिंदू या संकल्पनेला तोड देण्यासाठी काँग्रेसने हिंदूंना जातीत विभागले. निवडणुकीचे राजकारण जातींवर खेळले जाऊ लागले. कुठलाही धर्म प्रबळ होण्यापेक्षा जातीचे राजकारण परवडले किंवा जातीय हितांचा एकत्रित परिणाम धर्महित, असा काहिसा चमत्कारिक, विचित्र विचार त्यामागे असावा. जातीच्या आधारावर बुहसंख्य हिंदूंना वेगवेळ्या गटांत हाताळता येते, हा राजकीय चाणाक्षपणा त्यामागे होता. मुस्लीम, ख्रिश्चन हे अल्पसंख्यच होते आणि ते जातीत विभागले गेले नसल्याने त्यांच्या मुल्ला-मौलवींच्या, पोपच्या नाकदुऱ्या काढल्या, की एकगठ्ठा मते मिळविता येत होती. म्हणून मग आणीबाणीनंतर किंवा इंदिराजींच्या काळात निवडणुका आल्या की जामा मशिदीच्या इमामांना सलाम करण्यासाठी काँग्रेसवाले जात आणि मग इमाम फतवा काढत. पोपला पायघड्या अंथरल्या जात.
हेही वाचा : अर्थव्यवस्थेचे भले हुकुमशाहीमुळे होते का?
हिंदू सर्वधर्मसमभाववादी होता, आहेदेखील…
हिंदू हा धर्मवादी नव्हता. तो सर्वधर्मसमभाववादी होता. हा देश अखेरीस आपलाच आहे, असे मानणारा होता. (आहेदेखील) अल्पसंख्याकांना आपले बंधू, आश्रित, आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या देशात राहिलेले म्हणून समभावाने वागविणे, ही आपली भारतीय संस्कृती आहे, अशी श्रद्धा, विश्वास असणारा होता. त्यामुळे त्या काळात हेच तत्त्व मांडणारे साहित्य, चित्रपट आले. ‘शेजारी’ सारखा चित्रपट असो की मनोज कुमार यांचे चित्रपट असोत… अगदी रामजन्मभूमी आंदोलनापर्यंत व नंतर २०१४पर्यंत बऱ्यापैकी हा बंधुभाव कौतुकाचा विषय होता. फाळणीच्या जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी हिंदू-मुस्लीम सलोख्याच्या बातम्या व्हायच्या. अगदी अलीकडे सलमान खानकडे दहा दिवसांचा गणपती असतो, अशी बातमी आली होती.
‘त्यांना’ त्यांचा देश आहे ना?
या दरम्यान अगदी समांतर उजव्या विचाराची मंडळी आपले म्हणणे मांडत होती. हा देश हिंदूंचा आहे, हिंदुस्थान आहे आणि ‘त्यांना’ त्यांचा देश दिलाय ना वेगळा, मग हे इथे काय करतात? असा प्रश्न होता. आमच्याच देशात आम्हीच कोडगे का, असा थेट प्रश्न होता. गणपती, दुर्गोत्सवाच्या काळात दंगली व्हायच्या. किमान तणाव असायचा. संवेदनशील भागही होते. क्रिकेटचा सामना पाकिस्तान जिंकला की मोहल्ल्यात फटाके फोडून आनंद साजरा केला जातो, अशा बातम्या समाजमाध्यमे नसतानाही असलेली एक सुप्त कुजबूज यंत्रणा होती, त्यावरून प्रसारित केल्या जात होत्या. रामजन्मभूमी आंदोलनानंतर तर हा देश हिंदुस्थान असूनही हिंदूंना परकेपणाची, सापत्न वागणूक दिली जाते, हे पोटतिडीकीने मांडले जात होते. गांधी विरुद्ध सावरकर हा वाद, स्पर्धा हिरिरीने चालविली जात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला हा विचार चिकाटीने मांडत राहिला आहे. त्यांच्याकडे हेटाळणीच्या रूपात पाहिले जायचे. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाच्या माध्यमातून हा विचार खुलेपणाने राजकीय पटलावर मांडला जाऊ लागला. रामजन्मभूमी आंदोलनाने त्याचा पैस वाढला. आता तो विचारही बहुजन हिंदूंना पटू लागला. हळूहळू ते विचार रुजू लागले. काँग्रेस हे अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करते, हे बहुजन हिंदूंना पटू लागले होते. हिंदूंच्याच देशात हिंदूंवर अत्याचार होतात, परकेपणाची वागणूक दिली जाते, हे बिंबविण्यात उजव्यांना हळूहळू यश आले. १९९५ ला पहिल्यांदा सत्ता आली. पुन्हा एक सेटबॅक आला; पण नंतर धर्मक्षोभ वाढविण्यात यश आले. हा देश चालविण्याचाही एक विचार असू शकतो अन् तोही सशक्त असू शकतो, हे भिनत गेले.
हेही वाचा : आजचा भारत विकसित आणि विश्वबंधू
नव्या नॅरेटिव्हला बहुजनांचा प्रतिसाद
सर्वधर्मसमभावात दांभिकता वाढली. भ्रष्टाचाराचे आरोप झाले. गुजरात दंगलीने एक नवे नॅरेटिव्ह सेट होऊ लागले होते, ते सुप्त होते. कुणाला कळले नाही; पण बहुजन हिंदूंना सकल हिंदू ही संकल्पना रुचू लागली. समरतसा, जातीअंत मंचसारख्या संकल्पनांमधून बहुजन समाज हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र येऊ लागला. या देशाच्या हिंदू परंपरा आणि सण बहुजन हिंदूच मोठ्या प्रमाणात साजरे करतात. गावच्या यात्रा-जत्रांपासून राम, हनुमान, कृष्ण जयंती, विठ्ठलाच्या वारीपासून अगदी सत्यनारायणापर्यंत सगळी देवदेवकं बहुजन समाजच सांभाळत आला आहे. त्यामुळे एक नवे नॅरेटिव्ह सेट होत असताना तो त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राहिला.
एवढे करूनही सावत्रच!
काँग्रेसने अल्पसंख्याकांचे लाड केले तर त्यांची आजची अवस्था काय? त्या समाजाने प्रगती केली का? त्यांना आरक्षण आहे का? अजूनही फाळणीनंतरच्या समाजात त्यांना समावून घेतले आहे का? कुठल्याही वस्तीच्या टोकाला कुठेतरी त्यांची वस्ती असते. गावाच्या, शहराच्या मुख्य भागात त्यांचा मोहल्ला असतो. घटनेतले सर्वधर्मसमभावाचे तत्त्व राखण्यासाठी सामजिक सलोख्याच्या भावनेतून तशी सर्वसमावेशक छबी आपली असावी म्हणून आधी नेते किमान ईदला शिरखुर्मा घ्यायला जात. इफ्तार पार्टी होत होती. मात्र त्यामुळे त्या समाजाचे उन्नयन झाल्याचे दिसले नाही. तो समाज उपराच होता. सावत्रच होता. आता तर त्यांना थेट बाजूलाच करण्यात आले आहे. मोदींनी आक्रमक भाषा केल्यावर त्याचे पडसाद बहुजन हिंदूत फारसे नापसंतीचे उमटलेले नाही.
हेही वाचा : जागावाटपातील विलंब टाळता आला असता, तर बरे झाले असते..
तुष्टीकरण ते बहिष्कार असा प्रवास…
बहुजनांची मते पुढच्या टप्प्यांमध्ये एकवटतील. अल्पसंख्याकांची मते काँग्रेसला गेली तर पुढच्या निवडणुकीच्या वेळी हे आकडेवारीनिशी दाखवून देता येईल की, बघा काँग्रेस हा कुणाचा पक्ष आहे… त्यातही ओवेसींसारखे तीही मते एकगठ्ठा काँग्रेसच्या पारड्यात पडू देत नाहीतच. या निवडणुकीत कुठल्याच पक्षाने (एमआयएम सोडल्यास) मुस्लीम उमेदवार दिला नाही. अगदी काँग्रेसनेही नाही. उत्तर-मध्य मुंबईतून आपल्याला काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या काँग्रसेने तिथून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. नसीम खान नाराज झाले आणि त्यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला. ते आता कुठल्या पक्षात जातील, यावर चर्चा सुरू आहे; पण त्यांना दुसरा कुठला पर्यायच नाही. शिंदे गटात जातील अन् आमदारकीसाठी मांडवली करतील, असे बोलले जात आहे. मात्र प्रखर हिंदुत्व धोक्यात येऊ शकते म्हणून शिंदेसेनाही त्यांना सध्याच काही आत घेणार नाही… हे इकडे असे असताना तिकडे राजस्थानात भाजपच्या मुस्लीम नेत्याने मोदींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. आम्ही मग आमच्या समाजाकडे भाजपसाठी मते कशी मागायची, असा प्रश्न त्याने विचारला. त्याच्यावर तातडीने कारवाई करून पक्षातून निष्कासित करण्यात आले. नंतर पोलिसांनी त्याच्यावर १५१ खाली गुन्हा दाखल केला आणि अटक केली. उस्मान घनी हा समाजात विषाक्त वातावरण निर्माण करतो आहे, असा आरोप पोलिसांनी ठेवला. त्याला किमान सहा महिन्यांची तरी शिक्षा व्हावी, अशी मागणी आम्ही न्यायालयात करणार आहोत, असे पोलीस म्हणाले… एकुणात तुष्टीकरण ते बहिष्कार असा हा प्रवास आहे. नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केल्यावर काँग्रेसने त्याची समजूत काढलेली नाही. ते तसे करते तर त्यांच्यावरच्या तुष्टीकरणाच्या आरोपाला बळकटी देणारे आणखी एक उदाहरण मिळाले असते.
पन्नास वर्षे तरी नॅरेटिव्ह बदलता येणार नाही!
काँग्रेससह सर्वच पक्षांना सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग पत्करावा लागला आहे. केजरीवालांनीही हनुमान चालिसा पठण केले. समाजवादी पार्टी हा मुस्लिमांचा पक्ष आहे, असे म्हटले जाते; पण त्यांनीही मुस्लीम उमदेवार अद्याप तरी दिलेला नाही. निवडणुका आल्या की जामा मशिदीच्या इमामाच्या नाकदुऱ्या काढल्या जाण्याचे दिवस आता गेले आहेत. दिवस बघता बघता बदलले आहेत. राहायचे असेल तर नीट राहा, आम्ही म्हणू तसे राहा नाहीतर तुमचा मार्ग मोकळा आहे, असाच निःशब्द संदेश देण्यात आला आहे. आधी किमान सर्वधर्मसमभावाने प्रेरित हिंदू बहुजन त्यांच्याशी बंधुभाव जोपासणे म्हणजे संस्कृती समजत होता. आता तोही परकेपणाने पाहू लागला आहेत. या निवडणुकीत काय होईल, कुणाची सत्ता येईल, हे सांगता येत नाही; पण सत्ता कुणाचीही येऊ दे, अल्पसंख्याकांचे काय होणार, हे आताच दिसू लागले आहे. सत्ता बदलत राहतात. काँग्रेसचा कालखंड संपला आहे. या निवडणुकीत पुन्हा मोदीच आले (भाजप नाही) तर काँग्रेस पक्ष आणि तो समभावी विचारही सत्तेपासून आणखी खूप दूर फेकला जाईल. समजा इंडिया आघाडीचे सरकार आले तरीही आता ‘हिंदुस्थान’ हे नॅरेटिव्ह सेट झालेले आहे. ते बदलणार नाही. कारण भाजप व मित्रपक्षांचा विरोधक म्हणून दबाव असेल. ते तगडे विरोधक म्हणून कायमच सिद्ध झाले आहेत. ते क्षणाक्षणाला सत्ताधारी कसे हिंदूविरोधी आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कुणाचीही सत्ता आली, अगदी कम्युनिस्टांचीही सत्ता आली तरीही आता त्यांना किमान पन्नास वर्षे तरी हे नॅरेटिव्ह बदलता येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाळेमुळे सर्व क्षेत्रांत खूप खोलवर रुजली आहेत. इतकी की, कुठल्याही व्यक्तीची एक नाकपुडी समभावाचा श्वास घेत असेल तर दुसरी नाकपुडी त्याचवेळी हिंदुत्वाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा उच्छवास सोडत असते… त्यामुळे मोदी जातील, भाजपचीही सत्ता जाईल, मात्र कुठल्याची सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण संघाचा हिंदुत्ववादी विचारच करणार आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात जैवतंत्रज्ञानासाठी स्वतंत्र खाते हवे!
सत्ता कुणाचीही असो, विचार आमचाच!
काँग्रेसला पुन्हा सर्वधर्मसमभाव रुजवण्यासाठी, रूढ करण्यासाठी संघासारखेच शिस्तबद्ध न् चिकाटी असलेले संघटन हवे असेल आणि ते त्यांच्याकडे आता नाही. काँग्रेस ही चळवळ होती, त्यामागे विचार महत्त्वाचा होता. वैचारिक अधिष्ठान होते. नंतर त्याची जागा केवळ सत्तेनेच घेतली. संघविचार बळकट झाले. संघाची पाळेमुळे काँग्रेसच्या काळातच रुजली. संघविचार फोफावला, कारण काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार. हे जाणून असल्याने विरोधी विचारांचा आदर वगैरे नाही, ते चिरडून टाकले पाहिजे, हेच धोरण आहे. त्यामुळे आता सत्ता कुणाचीही येवो, धोरणे ते ठरवू शकतील पण आता मोदी राजवटीत रूढ झालेला बहुसंख्याकांचा धर्म म्हणजेच राष्ट्र, ही धारणा ते बदलवू शकणार नाहीत. म्हणूनच सरसंघचालक मोहन भागवतांना विचारले होते की, “तुम्ही भाजपलाच स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून का पुरविता?” त्यावर ते म्हणाले होते, “तसे काहीच नाही, इतरांनी आमचे स्वयंसेवक मागावेत, आम्ही त्यांनाही देऊ…” याचा अर्थ स्पष्ट आहे, राजकीय सत्ता कुणाचीही असो, विचार आमचा असला पाहिजे, धारणा आमच्या असल्या पाहिजेत. संघाकडे काँग्रेस कार्यकर्ते मागायला तेव्हाच जातील, जेव्हा ते संघ विचार स्वीकारतील. आता काँग्रेसी आदर्श, नायक पुरुष बदलले आहेत. आता ईदच्या शुभेच्छा दिल्लीकर सत्ताधीश देत नाहीत. ‘ठेविले दिल्लीश्वरे (किंवा बहुजन धर्मीयांनी) तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान!’ ही इतर अल्पसंख्य धर्मीयांची अवस्था झालेली आहेच. ‘इस देश मे रहना होगा तो…’ ही घोषणा बऱ्यापैकी प्रत्यक्षात येते आहे. बहुसंख्याक हिंदूंना हे सगळे छान वाटते आहे. वर्चस्व गाजवायला कुणालाही आवडतेच. त्याचा उन्मादही चढतो. खुमारी चढते… तसे होऊ लागले आहे. या निवडणुकीत कुठला राजकीय पक्ष, युती, आघाडी जिंको किंवा हरो… सत्ता या विचारांचीच असणार आहे!
pethkar.shyamrao@gmail.com