लोकांपुढे भाषण करताना नेते मंडळी ८० टक्के समाजकारण अन् २० टक्के राजकारण असा आदर्श उद्घोष करतात.पण प्रत्यक्षात मात्र हे प्रमाण उलटे असते. म्हणजे ही मंडळी ८०- ९० टक्के राजकारण करतात अन् १५-२० टक्के समाजकारण करतात. एकदा आपण यांना निवडून दिले की यांचे समाजकारण संपते अन् राजकारण सुरू होते. तीही जग येते निवडणुकीच्या तोंडावर! निवडणुका जवळ आल्या की आश्वासनांचा, सवलतींचा पाऊस पडतो. सरकारकडे पैसा, तरतूद असो वा नसो, तिजोरी खाली केली जाते. हे फुकट ते फुकट, हे माफ ते माफ अशी आमिषे दिली जातात. खरे तर तरुण पिढी असो की महिला, कुणालाही फुकटचे काही नको आहे. प्रत्येकाला स्वाभिमानाने जगायचे आहे. कष्ट करायचे आहेत. त्यांना त्यांच्या योग्यतेचे काम हवे आहे. रिकामपण आहे म्हणून ही मंडळी बिथरलेली दिसतात. आपण जे मोर्चे, आंदोलन बघतो हे बेरोजगारीतून आलेले नैराश्य आहे. माणसाच्या हाताला काम असेल, कष्टातून त्याला जीवनाच्या मूलभूत गरजा भागवता येत असतील तर तो फुकटचे काही मागणार नाही. पण नेत्यांना हे नको आहे. त्यांना अस्वस्थ, चळवळ्या समाज हवा आहे. रिकामटेकडा युवा वर्ग हवा आहे. त्यांच्या भोवती गर्दी करायला. मोर्चे काढायला. त्याचा जयजयकार करायला. नारे द्यायला…

आजचे राजकारण हे जाती धर्मात वाटलेले, द्वेशाला खतपाणी देणारे, समाज वर्गात दरी निर्माण करणारे गलिच्छ राजकरण आहे. राज्याच्या, देशाच्या प्रगती विषयी कुणाला फारसे देणेघेणे असलेले दिसत नाही. प्रत्येक नेत्याला आपली खळगी भरायची आहे. आपलेच वारस पुढे आणायचे आहेत. समाजाला लुटून बंगले बांधायचे आहेत. आपल्या सात पिढ्यांची सोय करायची आहे. त्यासाठी त्यांना तेव्हढ्यापुरते तुमचे लांगुलचालन करायचे आहे.

आणखी वाचा-जगभरातील नद्यांचे नाले झाले, कारण…

कुणी म्हणेल, असे कसे म्हणता? गेल्या ६०-७० वर्षात काहीच विकास झाला नाही का? देश प्रगत झाला नाही का? नवे तंत्रज्ञान, सोयी सुविधा मिळाल्या नाहीत का? तर मिळाल्या, प्रगती झाली. प्रत्येक क्षेत्रात विकास झाला. शाळा, कॉलेजेसची संख्या वाढली. इंजिनियरिंग, मेडिकल, आयआयटी, आयएएम अशा संस्थांची संख्या कितीतरी पटीने वाढली. दळणवळणाची साधने तर अमाप झालीत. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने लोकसंख्या वाढली हे आपण विसरतो. देशाची जमीन, नैसर्गिक संसाधने, तेव्हढीच. नद्या, समुद्र, जंगले तेव्हढीच. पण भूमिती श्रेणीने वाढलेल्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक असमतोल वाढला, प्रदूषण वाढले, नैसर्गिक प्रकोप वाढले. गांधीजी म्हणायचे आपल्या गरजेपुरते देवाने भरपूर दिलेय आपल्याला. पण आपल्या लोभी, लालची वृत्ती पोटी मात्र निसर्ग हतबल झालाय.

या असंतुलनाला देशापेक्षा स्वार्थाला महत्व देणाऱ्या नेते मंडळींनी आधिकच बिघडवले. सध्याची अवतीभवतीची परिस्थिती पाहिली तर काय चित्र दिसते? न्याय, नीतीचे नाव नाही. कुठलीही निष्ठा नाही. प्रामाणिकपणा नाही. पक्षाचे धोरण हा पोरखेळ झालाय. कोण कोणत्या पक्षात कधी जाईल सांगता येत नाही. जो तिकीट देईल, पद देईल, मलिद्याची सोय होईल तो यांचा पक्ष. सरड्यासारखे यांचे रंग दिवसा मासात बदलणार! आपण आपल्या देशाला सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश समजतो. पण ही लोकशाही म्हणजे काय तर शिरगणती. म्हणजे जिकडे जास्त डोकी त्यांचे सरकार! त्या डोक्यात काय आहे (किंवा काही आहे की नाही) याला काही महत्व नाही! हे आयाराम गयारामचे घाणेरडे नाटक पाहून लोक अक्षरशः वैतागले आहेत. हे थांबवण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही या विचाराने हतबल झाले आहेत. कारण ही नेते मंडळी जनतेला कठपुतळीसारखे नाचवताहेत आपल्या तालावर. जादूगार मदारी नाही का नाचवत माकडाला आपल्या डमरूच्या तालावर? तसाच डोंबाऱ्याचा, मदाऱ्याचा खेळ सुरू आहे राजकारणात! यात समाजकारण कुठेच दिसत नाही. राष्ट्रप्रेम, गरिबांविषयी कळवळा कुठेच जाणवत नाही. दिसते ती स्वार्थी, आप्पलपोटी धडपड! भ्रष्टाचारी घराणेशाही… सरकारी तिजोरी, गरिबाच्या हक्काची कमाई लुटणारी दरोडेशाही!

आणखी वाचा-‘डेरा’वाल्यांचे राजकारण जिंकत राहाते…

आश्चर्य हे की हे सारे आपण मग गिळून बघत बसतो. खपवून घेतो. आपल्या हाती संविधानाने दिलेले अधिकार, स्वातंत्र्य असूनही आपण हा राजकारणी गोंधळ सहन करतो. आपल्यापुढे पर्याय नसतो? की पर्याय असूनही आपण हतबल झालेले असतो?

ही सत्तापिपासू वृत्ती, हा धर्म द्वेष, हा वर्ग संघर्ष एका राज्यापुरता, एका देशापुरता मर्यादित राहिला नाही आता. अनेक देश युध्दात होरपळून निघताहेत. शांती, सामंजस्य, सहनशीलता, माणुसकी, मानवधर्म सारे सारे वेशीवर टांगून एक प्रकारची दांडेलशाही माजली आहे जिकडे तिकडे! खरे तर कोणताच धर्म, पंथ या द्वेषाचे, स्वार्थाचे, संकुचित विचारसरणीचे समर्थन करीत नाही. तरीही प्रत्येकाला आपलीच मनमानी करायची आहे.

जगातील सर्वात सुंदर संविधान, उत्तम सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा, सुदृढ लोकशाही, कायद्याचे राज्य हे सारे सारे असूनही अवती भवती हा निसरडा चिखल कुठून आला, का आला, केव्हा आला याचा विचार, अभ्यास करायची वेळ आली आहे. हे वादळ महायुध्दापेक्षाही भयंकर आहे. यदा यदाही धर्मस्य…या उक्तीप्रमाणे कुणा एका भगवान कृष्णाची वाट बघणे एव्हढेच बहुधा आपल्या हाती आहे.