एका परदेशी पर्यटकाच्या प्रवासवर्णन सदृश लेखात वाचलेला किस्सा असा की- काही वर्षांपूर्वी मी उत्तर भारतात एकटाच फिरायला गेलो होतो. वाटेत फाटके- मळके कपडे घातलेला मुलगा दिसला. त्याने अचूक इंग्रजीत मला विचारलं- सर तुमचा छंद कोणता? माझ्यासाठी हा धक्काच होता. त्यातून सावरत मी म्हटलं- अॅस्ट्रोफोटोग्राफी (ग्रहताऱ्यांचं छायाचित्रण). त्याला ते कितपत कळलं, कोण जाणे, पण तो सराईतपणे म्हणाला, उत्तम. माझा छंद आहे नाणी गोळा करणं. मी विविध देशांची नाणी गोळा करतो. प्लीज तुम्ही मला तुमच्या देशाचं एखादं नाणं द्या. कोणतंही चालेल, पण द्याच. तो माझ्या मागेच लागला होता. भारतात भीक मागण्याचा हा नवाच मार्ग यानिमित्ताने मला कळला… ‘एथिकल ट्रॅव्हलर्स’ या मंचावर ‘अ फिस्टफुल ऑफ रुपीज – कोपिंग विथ बेगिंग ऑन थर्ड वर्ल्ड ट्रेल्स’ या शीर्षकाखाली जेफ ग्रीनवॉल्ड यांचा हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात भारतात पैसे, अन्न वा वस्तू मागण्याला असलेला परंपरेचा आधार इथपासून ते लहान मुलं काही मागू लागलीच, तर त्यांना काय द्यावं, काय देऊ नये इथपर्यंत संपूर्ण विवेचन अनुभवांच्या आधारे मांडलं होतं… हा किस्सा आता आठवण्याचं कारण म्हणजे मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये यापुढे भीक मागणाऱ्याला आणि देणाऱ्याला दंड ठोठावला जाणार आहे.
भारतात भीक मागणं हा कायद्याने गुन्हा असूनही कोणत्याही शहरात-गावात रेल्वे स्थानक, एसटी स्टँड, रिक्षा-टॅक्सी थांबे, ट्रॅफिक सिग्नल्स, देवळं, बाजार अशा ठिकाणी भिकारी हमखास दिसतात. भारतीय न्याय संहिता लागू झाल्यापासून सारं काही या नव्या संहितेमुळेच शक्य झालं, असं भासवलं जाऊ लागलं असलं, तरी मूळ भारतीय दंड संहितेतही हा नियम समाविष्ट होता. अल्पवयीनांचं अपहरण करून त्यांना भीक मागण्यास भाग पाडणं हा भादविच्या कलम ३६३-ए नुसार आणि सार्वजनिक ठिकाणी भीक मागणं हा कलम २६८ नुसार दंडनीय गुन्हा होता. आता भारतीय न्याय संहितेत कलम १४३ नुसार हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. अशाप्रकारे कारवाई केलेल्या भिकाऱ्यांसाठी पूर्वीपासून ठिकठिकाणी भिक्षेकरी स्वीकारगृहं होती, आजही आहेत. (त्यांची अवस्था काय, हा भाग अलाहिदा) पण कुठे आणि किती कारवाई करणार म्हणून सोडून दिल्या जाणाऱ्या गुन्ह्यांपैकीच हाही एक गुन्हा. आता मध्य प्रदेशात या मुद्द्यावर काम करण्यास सुरुवात झाल्याचं दिसतं. पण त्यामागचं उद्दीष्ट किती प्रामाणिक आहे, यावर हे काम किती काळ टिकेल, हे अवलंबून असेल.
भोपाळमध्ये येत्या २४ आणि २५ फेब्रुवारीला ग्लोबल इनव्हेस्टर्स समिट होणार आहे. त्यामुळे जी २० च्या वेळी जसं दिल्लीत रातोरात शेकडो भिकाऱ्यांची धरपकड करून त्यांना परिषदेच्या काळापुरतं शहरापासून दूर नेऊन ठेवण्यात आलं होतं तसाच तर हा प्रकार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या शंका फोल ठरल्या तर उत्तमच. अन्यथा हे गरिबी हटवण्याऐवजी गरिबांना हटवणंच ठरेल. भोपाळविषयी काही प्रमाणात आशा वाटते कारण, मध्य प्रदेशातल्याच इंदूरमध्येही डिसेंबरपासून भीक मागण्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि तिची अंमलबजावणी अद्याप तरी सुरू आहे.
पण केवळ दंडात्मक कारवाई किंवा शिक्षा करून भिकाऱ्यांचा प्रश्न कायमचा सुटेल का? त्यांना उदरनिर्वाहाचं पर्यायी साधनही मिळवून द्यावं लागेल, असं म्हणणं सोपं आहे, पण ज्या देशात बेरोजगारी ही प्रचंड मोठी समस्या आहे तिथे भिकाऱ्यांना रोजगार देणं हे अशक्य कोटीतलं लक्ष्य ठरतं. त्यात भर म्हणजे बहुतेकांना भीक मागण्यात काही गैर आहे, असं वाटत नाही. अनेकांसाठी तो एक व्यवसाय किंवा जोडधंदा आहे.
दोन मुद्द्यांचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. पहिला मुद्दा हा की सर्वच भिकारी गरीब आणि बिचारे असतात का? आणि दुसरा काही नाणी वा नोटा त्यांच्या हातावर टेकवून हा प्रश्न सुटू शकतो का? पहिल्या मुद्द्यांचा विचार करताना अमुक एका भिकऱ्याकडे इतके लाख रुपये आढळले वगैरे धाटणी बातम्या आठवतात. अर्थात सर्वच भिकारी लक्षाधीश नसतात. अंध, अपंग, वृद्ध व्यक्तींकडे अन्य पर्याय नसल्यास ते या मार्गाने उदरनिर्वाह करतात. प्रत्येकाचे पैसे मागण्याचे मार्ग वेगळे. काही जण फुगे, पेन, खेळणी अशा वस्तू विकण्याच्या बहाण्याने जवळ येतात आणि कोणी खरेदी करो वा न करो, ते त्यांच्याकडे पैसे मागू लागतात. बहुतेकदा शॉपिंग मॉल्स, केक-आईस्क्रीम-भेटवस्तूंची दुकानं, चौपाट्या अशा ठिकाणी अशा वस्तू विकत फिरणारी कुटुंब दिसतात. आमची गाडी चुकली घरी जाण्यासाठी तिकीटाचे पैसे द्या किंवा एका वेळच्या जेवणापुरते पैसे द्या, असं सांगणारे आणि पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर दिसणारेही अनेक. यातील सर्वांत चिंताजनक प्रकार म्हणजे भीक मागणारी लहान मुलं. काहींना त्यांचे आई-वडीलच पैसे मागण्यास उद्युक्त करतात, मात्र अनेक लहान मुलं अनाथ असतात, अपहरण केलेली असतात. ही मुलं गुन्हेगारी टोळ्यांची बळी ठरतात. पोलिसांचे दंडुके, कुपोषण, लैंगिक शोषण अशा अनेक समस्यांतून त्यांना जावं लागतं. भीक मागणाऱ्यांत तृतीयपंथींचं प्रमाण मोठं आहे. त्यातही प्रत्यक्षात पुरुष असताना तृतीयपंथी असल्याचं भासवणारे कमी नाहीत. पाच-दहा रुपयांचं नाणं हातावर टेकवलं तर अधिक पैशांसाठी हटून बसणं, पैसे दिले नाहीत, तर शाप लागेल वगैरे धमकावणं, एक जण पैशांसाठी विनवण्या करत असताना दुसऱ्याने पाकिट किंवा फोन लंपास करणं, मिळालेल्या पैशांतून विड्या फुंकणं, दारू पिणं असे प्रकार करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. अंमली पदार्थांचं व्यसन असणारे आणि केवळ ते भागवण्यासाठी भीक मागणारेही आहेत.
भारतात भिक्षा मागणं किंवा दानधर्म करण्याची परंपरा पूर्वापार आहेच, पण त्यातही दान सत्पात्री असावं, असा आग्रह आहे. त्यामुळे केवळ खिशात चिल्लर आहे म्हणून चार पैसे कोणाच्या तरी हातावर टेकवल्याने खरंच आपल्याला पुण्य लाभणार आहे का आणि ज्याला ते दिले त्याच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे का, याचा विचार केला गेला पाहिजे. लहान मुलांना पैशांऐवजी खाऊ द्यावा असं अनेकांना वाटतं. पण खाऊ म्हणून जेव्हा चिप्स, चॉकलेट्स, बिस्किट्स, वडे-समोसे घेऊन दिले जातात, तेव्हा त्याने आधीच कुपोषित असलेल्या त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत असतील याचा विचार केला जातो का? ही मुलं दिवसभरात किती जणांकडे असं काहीबाही मागत असतील. त्यातून किती साखर, मीठ, तेल, मैदा त्यांच्या शरीरात जात असेल? पुण्य वगैरे असं काही अस्तित्त्वात असेल, तरी ते अशा तथाकथित दानातून लाभू शकेल का, याचं उत्तर प्रामाणिकपणे शोधणं गरजेचं आहे.
थोडक्यात भिकाऱ्यांची समस्या ही अंडी आधी की कोंबडी आधी या प्रश्नासारखी आहे. दानधर्म आधी सुरू झाला की भिक्षा मागणं अधी सुरू झालं, हे शोधणं कठीणच. सध्या तरी देणारे आणि मागणारे दोघांनाही दोषी ठरवण्याची सुरुवात झाली आहे. पण तेवढ्याने ही समस्या कायमची सुटणार नाही. फारतर एखादं शहर भिकारीमुक्त होईल. पण तिथले अन्यत्र स्थलांतर करतील. कोणी भीक मागणं सोडून अधिक गंभीर गुन्हे करू लागतील. ही समस्या केवळ एखाद्या नियमाची अंमलबजावणी करून सुटणारी नाही. त्यासाठी प्रदीर्घकाळ संपूर्ण समाजाचंच प्रबोधन करत राहावं लागेल. यातून गब्बर झालेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करावा लागेल. अनेक स्वयंसेवी संस्था फलाटांवर, पदपथांवर शाळा चालवतात. अशा स्वयंसेवकांना धमकावाऱ्यांना पायबंद घालावा लागेल. शिक्षण, कौशल्य विकासातून हळूहळू अर्थार्जनाच्या शक्यता लक्षात आणून द्याव्या लागतील. मानाचं जगणं ज्यांनी कधी अनुभवलंच नाही, त्यांना त्याची चव चाखवावी लागेल. ही प्रक्रिया देशभर, अनेक वर्षं, अखंडपणे सुरू राहिली, तरंच त्यातून काही निष्पन्न होईल. अन्यथा एका शहरातली समस्या दुसऱ्या शहरात स्थलांतर करत राहील.
vijaya.jangle@expressindia.com