रामानुज मुखर्जी यांच्या एका एक्स पोस्ट वरून गोव्यातले व्यावसायिक आणि सरकार एवढे संतापले की त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की गोव्यातल्या पर्यटनाला उतरती कळा लागली आहे. परदेशी पर्यटकांची संख्या घटली आहे. देशांतर्गत पर्यटकही लवकरच कमी होतील, अशी चिन्हं आहेत. हा दावा करताना त्यांनी चायना इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या (सीईआयसी) आकडेवारीचा हवाला दिला होता. त्यात म्हटलं होतं की २०१९ मध्ये गोव्यात ८५ लाख परदेशी पर्यटक आले होते आणि ही संख्या २०२३मध्ये १५ लाखांपर्यंत घसरली.
रामानुज यांचा दावा चुकीचा किंवा पूर्वग्रहदूषित असेलही, पण त्यावरून गोवेकर भलतेच संतापले आहेत. एरवी ‘तुम्ही काहीही म्हणा आमचं काही बिघडत नाही,’ अशा आविर्भावात वावरणारे गोवेकर अचानक गोव्यात पर्यटन कसं वाढत आहे, परदेशी पाहुण्यांची संख्या अजिबातच घटलेली नाही वगैरे सांगू लागले आहेत. असं का झालं?
हे ही वाचा… यूजीसीच्या दोन अधिसूचना चर्चाग्रस्त ठरताहेत, कारण…
रामानुज यांची पोस्ट हे केवळ निमित्त ठरलं. त्यांच्या पोस्टवर पडलेला प्रतिक्रियांचा पाऊस हा गोवेकरांसाठी खरा चिंतेचा मुद्दा आहे. सीईआयसीचा अहवाल खोटा असेल किंवा त्यामागे काही छुपे हेतू असतीलही. कारण गोवा पर्यटन विभागाच्या आकडेवारी नुसार गोव्यात कोणत्याही वर्षात ८५ लाख परदेशी पर्यटक आलेले नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये सर्वाधिक परदेशी पर्यटक आले तेव्हा हा आकडा आठ- नऊ लाखांच्या आसपास होता. त्यामुळे हा अहवाल प्रमाण मानण्याचं काहीच कारण नाही. पण तिथलं स्थानिक वृत्तपत्र ओ हेराल्डोमधल्या वृत्तानुसार २०१९ मध्ये गोव्याला ९ लाख ४० हजार परदेशी पर्यटकांनी भेट दिली आणि २०२३ पर्यंत हे प्रमाण ४ लाख ३ हजार एवढं घसरलं. म्हणजे तब्बल ६० टक्के घट…
पण गोवा सरकार आणि तिथल्या व्यावसायिकांसाठी खरा चिंतेचा मुद्दा आहे तो गोव्याबद्दल वरचेवर उमटू लागल्या नकारात्मक प्रतिक्रिया. रामानुज विनाकारण बदनाम करत आहेत, समाजमध्यमी इन्फ्लुएन्सर वैयक्तिक रोषातून टीका करत आहेत अशी आगपाखड गोवा पर्यटन विभाग करू लागला आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याचं दर्शवणारी आकडेवारी पर्यटन परिषदा भरवून देण्यात येऊ लागली आहे. अनेक वर्षांपासून देशी विदेशी पर्यटकांच्या गळ्यातला ताईत आलेल्या राज्यावर आणि आम्हाला कोणीही स्पर्धक नाही अशा विश्वासात वावरणाऱ्या तिथल्या व्यावसायिकांवर ही वेळ का आली?
परदेशी पर्यटकांच्या समस्या
गोव्यात परदेशी पर्यटक आणि त्यातही प्रदीर्घ काळ राहणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण लक्षणीय आहे. अनेकजण पावसाळा संपताच म्हणजे साधारण ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये गोव्यात येतात आणि उन्हाळ्याची चाहूल लागेपर्यंत – साधारण फेब्रुवारीपर्यंत तिथेच राहतात. प्रदीर्घ वास्तव्यात अन्न, वस्त्र, निवारा, मद्य यावर पैसा खर्च करताना मागे-पुढे न पाहणारे हे परदेशी पाहुणेच गोव्याला श्रीमंत करतात. मात्र २०२०-२२ या कालावधीत आलेल्या कोविडच्या लाटांचा मोठा तडाखा तिथल्या पर्यटनाला बसला. त्यातून सावरेपर्यंत रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धं सुरू झाली. गोव्यात मोठ्या प्रमाणात रशियन, ब्रिटिश आणि इस्रायली पर्यटक येतात. साहजिकच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तणावाचा फटका गोव्यातील पर्यटनाला बसला असावा.
हे ही वाचा… अग्रलेख : मर्दुमकीच्या मर्यादा
हे दोन्ही प्रश्न सोडवणं भारत किंवा गोवा सरकारच्या हातात नव्हतं. मात्र अन्य देश कोविडनंतरच्या परिस्थितीत आपलं पर्यटनक्षेत्र तगून राहावं म्हणून विविध प्रयत्न करत असताना भारतात आणि गोव्यात मात्र त्यादृष्टीने कोणतेही बदल झाले नाहीत. अनेक देशांनी व्हिसा ऑन अरायव्हल सारखे अगदी ऐनवेळी सुटी मिळालेल्यांनाही आकर्षित करून घेणारे पर्याय उपलब्ध करून दिले. काही देशांनी व्हिसाच्या शुल्कात कपात केली. अनेक देशांत परदेशी पर्यटकांना त्यांच्या स्वदेशातील पदार्थ मिळणारी अनेक रेस्टॉरन्ट्स उपलब्ध असताना गोव्यात मात्र असे पर्याय फार कमी आहेत. शिवाय भारतातल्या रेस्टॉरन्ट्समधील स्वच्छता आणि अन्नाच्या दर्जाविषयी अनेक परदेशी पाहुण्यांना शंका असतात. या शंका दूर करण्यात गोवा यशस्वी झालेला नाही. सामान चोरी होणं, विक्रेते आणि टॅक्सीचालकांकडून लुबाडणूक आणि काहीवेळा मारहाण, भाषेचं ज्ञान नसल्याचा गैरफायदा घेतला जाणं, महिलांना न्याहाळणं, छेडछाड करणं अशा प्रकारांमुळे एकंदरच भारतातल्या परदेशी पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे साधारण तेवढेच पैसे खर्च करून अन्य एखाद्या अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सर्व सोयीसुविधा देणाऱ्या देशाचा पर्याय स्वीकारणाऱ्यांचं प्रमाण वाढू लागले आहे.
भारतीय पर्यटकांना दुय्यम वागणूक
परदेशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्यामुळे गोव्यातल्या बहुतेक व्यावसायिकांचा भारतीय पर्यटकांविषयीचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. ३-४ दिवस फारतर आठवडा पंधरवडाभर राहणाऱ्या या पर्यटकांना दुय्यम वागणूक देण्याची, गृहीत धरण्याची प्रवृत्ती वाढू लागली आहे. गोव्यातल्या किनाऱ्यांवरची गर्दी, हॉटेलपासून प्रवासापर्यंत सारं काही तुलनेने महाग, अनेकदा गेल्यामुळे सरलेल नाविन्य यामुळे बरेच भारतीय आता गोव्याकडे पाठ फिरवू लागले आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पाँडिचेरीमधले अधिक शांत, स्वच्छ, सुंदर किनारे त्यांना खुणावू लागले आहेत. गोव्याच्या तुलनेत ही राज्य अधिक आथित्यशील आहेत. तिथे राहण्याच्या आणि प्रवासाच्या सोयी परवडणाऱ्या आहेत. आमच्या राज्यात किनाऱ्यांपलीकडेही पाहण्या- अनुभवण्यासारखं, शिकण्यासारखं बरंच काही आहे हे ठसवण्यात ही राज्य अधिक यशस्वी झाली आहेत. समाजमाध्यमी इन्फ्ल्यून्सरमधली स्पर्धा त्यांना अशी नवी ठिकाणं शोधण्यास उद्युक्त करू लागली आहेत. अर्थात त्यामुळे आज ना उद्या या राज्यांतली स्थितीही गोव्यासारखी होण्याची भीती आहेच. पण सध्या तरी ही राज्य गोव्यासमोर स्पर्धक होऊन उभी ठाकलेली दिसतात.
गोवा नेहमीच परदेशी पर्यटकांचं अधिक अगत्याने आतिथ्य करताना दिसतं. २०१८ मध्ये तर तत्कालीन मंत्री विजय सरदेसाई यांनी स्पष्टच म्हटलं होतं की गोव्याकडे केवळ संपन्न आणि उच्चभ्रू पर्यटकांचं आकर्षित होतील अशी धोरणं आखणं गरजेचं आहे. गोव्यात सारं काही एवढं महाग करावं की भारतीय पर्यटकांना इथे येणं परवडूच नये असा प्रस्तावही त्यांनी मांडला होता.
आम्हाला पर्यटक नकोच आहेत!
सगळी चूक गोव्यातल्या व्यावसायिकांचीच आहे का? तर नाही. पर्यटकही अनेकदा चुकतात. पर्यटनाची, मौजमजेची, प्रत्येकाची कल्पना वेगळी असते हे मान्यच. पण आपल्या मजेमुळे स्थानिकांना किंवा अन्य पर्यटकांना त्रास होणार नाही, सुंदर म्हणून जे पाहायला आलो आहोत ते आपल्यामुळे कुरुप, गलिच्छ होणार नाही आणि आपण जिथे मजा करायला आलो आहोत ते कोणाचं तरी कायमचं घर, शहर, गाव आहे याचं भानही राहिलं नाही की काय होतं हे गोव्यात पदोपदी अनुभवास येतं. परदेशी पर्यटक दिसले की त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी मागे लागणं, बिच वेअरमधल्या महिलांकडे टक लावून पाहणं- एवढं की त्यांना अवघडल्यासारखं वाटेल, किनाऱ्यावर ब्ल्यू टूथ स्पीकर नेऊन कर्कश आवाजात गाणी लावून नाचणं, भयंकर कचरा करणं, नशेत परस्परांशी भांडणं, मद्यधुंद होऊन वाळूत लोळत पडणं, पानं गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणं… कितीही अविश्वसनीय वाटलं तरी कलंगुट, बागा सारख्या किनाऱ्यांवर अनेक भारतीय पर्यटक खरोखरच असेच वागताना दिसतात. या पर्यटकांचं तिथल्या अर्थव्यवस्थेत योगदान कितपत असतं? अगदीच नगण्य. पण त्याच्यामुळे मोजावी लागणारी किंमत मात्र बरीच मोठी असते. सुरक्षेपासून, स्वच्छतेपर्यंत सर्वच यंत्रणांवर ताण येतो. आजकाल गोव्यात मिनी बस टुरिस्ट अशी संकल्पना रूढ झाली आहे. अशा बस भरून येणाऱ्या आणि एक-दोन दिवस धिंगाणा घालून, कचरा वाढवून जाणाऱ्या पर्यटकांकडे स्थानिक अतिशय तिरस्काराने पाहू लागले आहेत. गोव्याची दिल्ली करू नका, आम्हाला शांतता हवी आहे म्हणत आंदोलनं करू लागले आहेत. कोण किती पैसे खर्च करतं यावरून त्यांची किंमत करणं योग्य नसलं तरी या बेशिस्तपणाचं समर्थन कसं करणार?
हे ही वाचा… सैन्य दलांत सुधारणांचे वारे!
रील स्टार्स आणि प्री वेडिंग शूटचा ताप
आपल्या घराच्या दारात, अंगणात सतत अनोळखी टोळकी येऊन उभी राहिली, तर आपल्याला चालेल का? आपण आपल्या खासगीपणाविषयी किती आग्रही असतो ना? पण गोव्यात सुंदर सजवलेल्या बागा बाळगणाऱ्या घरांसमोर सतत कोणी ना कोणी फोटो काढत असतं, रील करत असतं. हे सारं समजमध्यामांत व्हायरल होतं. त्यामुळे आपल्याच घरात लपून बसण्याची वेळ आल्याचा अनुभव अनेक गोवेकरांना येऊ लागला आहे. काहींनी तर इथे फोटो काढल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा देणारे फलकदेखील फाटकांवर लावले आहेत. जे घरांबाबत तेच चर्चबाबत. गोव्यात जागोजागी लहान मोठी चर्च, चॅपेल आहेत. प्री वेडिंग शूटसाठी कोणीही कधीही आत जातं, कुठेही बसतं, आरडाओरड करतं त्यामुळे ‘आमची धार्मिक स्थळं म्हणजे शूटिंगची लोकेशन नाहीत,’ असा संताप गोवेकर व्यक्त करू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर गोव्यात नुकत्याच झालेल्या पर्यटन परिषदेत गोव्याच्या पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका यांनी असा दावा केला की २०२४ मध्ये २१ टक्के वाढ झाली असून डिसेंबर मध्ये ही वाढ ५४ टक्के एवढी लक्षणीय होती. भारतीय पर्यटकांचं प्रमाण २२ टक्के तर परदेशी पाहुण्यांचं प्रमाण ३ टक्क्यांनी वाढलं आहे, असा दावाही त्यांनी केला.
कोणाचे आकडे खरे यावर खल करण्यापेक्षा गोव्याने खरोखरच आपल्या पर्यटन संस्कृतीचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. किनारे आणि मद्य यापलीकडेही गोवा आहे. किनारपट्टीमुळे लाभलेली जैवविविधता, जंगलं, बॅकवॉटर, खाद्यसंसकृती, गोव्यातले सण- उत्सव, तिथले कलाकार, वास्तुकला, साहित्य असं बरंच काही आजही केवळ मूठभर पर्यटकांपलीकडे पोहोचलेलं नाही. या घटकांकडे पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी प्रयत्न करावे लागतील. टॅक्सी चालकांच्या मुजोरीला लगाम घालावा लागेल. वाहतूक नियमनासाठी प्रयत्न करावे लागतील. गर्दीचं नियमन करण्यासाठी, फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी, अस्वच्छता करणाऱ्यांना दंड करण्यासाठी धोरणं आखावी लागतील. हॉटेलचालक मनमानी शुल्क आकारणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आणि हे सारं करताना गोंयकरांना आपल्याच घरात परकं वाटणात नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. परिस्थिती नाकारून, आगपाखड करून आणि आकड्यांचे खेळ खेळून कोणाचंही भलं होणार नाही.
vijaya.jangle@expressindia.com