मिलिंद परांजपे

इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज तर अमेरिकेत हार्वर्ड आणि येल विद्यापीठांच्या रोइंग म्हणजे बोट वल्हवण्याच्या स्पर्धा दर वर्षी, गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ होत आलेल्या आहेत हे आपणास माहीत असते. रोइंग स्पर्धा ऑलिम्पिकमध्येही सर्वात जुन्या खेळांपैकी आहे. त्या संघात भाग मिळणं सोपं नसतं हे उघडच आहे. खूप सरावानंतरच ते शक्य होतं. संघातील वल्हवणाऱ्यांची नावं, वय, उंची, वजनंदेखील वर्तमानपत्रात छापून येतात इतकी लोकप्रियता या खेळाला आहे. पण या खेळातल्या संघात अमेरिकेत कोणी कधी काळ्या तरुणांचा भाग घेतलेला पाहिला नाही. जणू काही हा खेळ फक्त गोऱ्या आणि सुस्थितीतील विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी आहे.

शिकागोमधील गरीब मागास वस्तीतील काळ्या विद्यार्थ्यांनी सांघिक प्रयत्नाने शालेय स्पर्धेत भाग घेऊन प्रथमच ही कल्पना मोडीत काढली त्याची कथा सांगणारं हे पुस्तक त्या संघातीलच आर्शय कूपर याने लिहिलं आहे. शिकागोचा ‘वेस्ट साइड’ म्हणजे मवाली, गर्दुल्ले, वेश्या वस्तीचा भाग. वेस्ट साइडमध्ये लेखकाची आई तिच्या चार मुलांना घेऊन दोन खोल्यांत राहायची. ती स्वत: अमली पदार्थांच्या व्यसनातून चर्चच्या मदतीने बाहेर पडली होती. सावत्र बाप तुरुंगात हवा खाऊन आला होता. त्यांच्या शाळेतही टोळीयुद्धं व्हायची ती शिक्षकांना सोडवावी लागत. शाळेतली मुलं फुटबॉल, बास्केट बॉल असल्या खेळात भाग घेणारी. वेस्ट साइडमधील विद्यार्थ्यांना रोइंगची गंधवार्ताही नव्हती. ‘आयव्ही लीग’ कधी ऐकलंही नव्हतं. लेखकाच्या शाळेत एक दिवस वल्हवण्याची प्रत्यक्ष बोट आणि ‘जॉइन टीम’ असं लिहिलेली भित्तिपत्रिका-पोस्टर-त्याने पाहिलं. कुतूहल म्हणून तो चौकशीस गेला आणि नावच नोंदवून टाकलं.

टीमच्या कोच त्यावेळेस एक गोऱ्या बाई होत्या. वल्हवण्याच्या अरुंद बोटी चार जणांच्या किंवा आठ जणांच्या असतात. सुरुवातीस यांच्या टीमला सहा किंवा सातच जण मिळायचे. आठवा आलाच तरी नियमित येईल की नाही याची शाश्वती नसे. त्यामुळे आठांच्या बोट स्पर्धेत भाग घेण्याऐवजी चारांचा सराव सुरू केला. हा खेळ अपरिचित म्हणून इतर मुलं यांची टिंगल करायची. थोडेच दिवसांत यांनाही कळून चुकलं की या रोइंग खेळाला खूप मेहनत आणि अंगी शिस्त बाळगावी लागते. एकदा बोट वल्हवणं सुरू केलं की एकाग्रता महत्त्वाची असते. मध्येच बोटीतील एकालाही थांबवणं शक्य नसतं. संघातील सर्वांना एकमेकांशी जुळवून घ्यावंच लागतं. सर्वांची वल्ही एकाच वेळी पाण्यात जावी, बाहेर यावी लागतात. सर्वांची सुसंगती (synchronisation) लागतेच. क्षणाचाही विलंब चालत नाही. वल्ह्याचं पात पाण्यात उभंच (व्हर्टिकल) असावं लागतं. चुकून आडवं -हॉरीझॉन्टल- झालं तर ते पाण्यातून बाहेर काढायला खूप जोर देऊन उचलणं भाग पडतं. त्यात सर्वांचाच वेळ जातो. त्याला ‘catching crab’ -’खेकडा पकडला’-म्हणतात. बोट तेवढी मागे पडते. हे सर्व शिकणं खूप सरावानेच शक्य होत. संघातील एकजण कॉक्स (cox) – सुकाणी होतो म्हणजे बोटीच्या मागील टोकाला सुकाणूू धरून बोटीला दिशा देतो. त्या बोटीचा तो कॅप्टनच असतो. सर्व सूचना, हुकूम तो देतो.

सीझनच्या स्थानिक स्पर्धेत त्यांच्या टीमने प्रथमच भाग घेतला, पण त्यांचा पार फज्जा उडाला. त्यांची बोट खूप अंतर मागे राहिली तरी त्यांनी स्पर्धा सोडून दिली नाही, पूर्ण केली. प्रेक्षकातील काहींनी टाळ्या वाजवल्या. संघातील वल्हाऱ्यांना त्या उपहासात्मक वाटल्या. सर्वजण मनाने अगदी खचले. त्यांना वाटलं हा खेळ आपल्यासारख्या काळ्या मुलांचा नाही. इतर टीममधील विद्यार्थी वकील, डॉक्टर, इंजिनीअर, व्यावसायिक वगैरे गोऱ्या उच्चभ्रू वडिलांची मुलं होती. आपण त्यांच्याशी कधीच चढाओढ करू शकणार नाही अशी कल्पना झाली. पण कोच खंबीर राहिली, तिने प्रोत्साहन देणं कायम ठेवलं. नुसता सराव सुरू ठेवला नाही तर खेळाडूंची क्षमता वाढविण्यासाठी पळणे, इतर व्यायाम आणि योग्य आहार यावरही भर देत होते. काही दिवसांनी त्यांना इतर राज्यांत जाऊन तिथल्या स्पर्धात भाग घेण्याची दोन वेळेस संधी मिळाली. मनोधैर्य वाढलं. इतर राज्यातील विद्यापीठेही बघायला मिळाली, दृष्टी बदलत, रुंद होत गेली. वल्हवण्याचा वेग वाढला होता.

खेळासाठी लागणारी मानसिक बांधिलकी येऊ लागली. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर मिडवेस्ट परिसरातील प्रसिद्ध शाळांच्या मुख्य २००० मीटर स्पर्धेत भाग घेण्यास आठ वल्हाऱ्यांचा संघ मिशीगन राज्यात गेला. त्या स्पर्धेला गर्दी होऊन खूप प्रसिद्धी मिळते. काळ्या विद्यार्थ्यांची ही टीम प्रेक्षक प्रथमच पाहत होते. संघाच्या सदस्यांची तयारी होती, जिंकण्याच्या ईर्षेनेच ते स्पर्धेत उतरले होते. स्पर्धा सुरू झाल्यावर अटीतटीत निम्म्याहून अधिक अंतर त्यांची बोट सर्वांच्या पुढेच राहिली. सर्व जण जीव ओतून वल्ही ओढत होते. प्रेक्षकांकडून प्रशंसेच्या टाळ्या, घोषणा मिळत होत्या. फिनिश लाइनच्या अगदी थोडं आधी लेखकाचं लक्ष त्याकडे जाऊन चित्त विचलित झालं. वल्हे ओढण्यास एक-दोन क्षण उशीर झाला आणि वल्ह्याने ‘खेकडा पकडला’. तेवढ्या क्षणाच्या उशिराने मागची बोट पुढे गेली. त्याने पुन्हा वल्ह सरळ करून वल्हवणं चालू ठेवलं. सुकाणी आवेशाने प्रोत्साहन देतच होता. पण आणखी एक बोट पुढे जाऊन हे तिसरे आले. तरी लोकांकडून उत्तम रोइंग केल्याच्या वाहवाचा वर्षाव झाला. त्या दमलेल्या स्थितीत संघाला स्पर्धा जिंकली नाही, याचं अपार दु:ख त्या वेळेपुरतं झालं.

जिंकणं, हरणं एवढाच काही खेळांचा उद्देश नसतो. टीममध्ये भाग घेतल्याने लेखकाच्या संघातील सर्वजण ‘वेस्ट साइड’च्या गुन्हेगारी, चोऱ्या, अमली पदार्थ, टोळीयुद्ध वातावरणातून कायमचे बाहेर पडले. संघात राहून स्पर्धा जिंकण्याच्या ईर्षेने का असेना, कोणी शाळा सोडली नाही-ड्रॉप आउट- झाले नाहीत. सर्वजण कायमस्वरूपी मित्र झाले. काही कॉलेजातही गेले आणि त्यांच्या संघात भाग घेतला. एक जण ‘आयव्ही लीग’ कॉलेजच्या टीमचा कोच झाला. आपापले व्यवसाय करू लागले. रोइंगच्या खेळात भाग घेतल्याने झालेला हा मुख्य फायदा. अशा टीममधूनच ऑलिम्पिकसाठी खेळाडू निवडले जातात. नंतर अनेक ठिकाणी रोइंग क्लब स्थापन करण्यास लेखकाने मदत केली. २०१७ साली लेखकास ‘यूएसरोइंग गोल्डन ओअर्स अवॉर्ड’ (USRowing Golden Oars Award) मिळाले. याच पुस्तकावर ‘अ मोस्ट ब्युटीफुल थिंग’ हा माहितीपट अलीकडेच निघाला आहे. रोइंगच्या सांघिक खेळात भाग घेतल्याने त्यांचं जीवनच बदलून गेलं हे सांगणं हा पुस्तकाचा उद्देश सफल झाला आहे.

ए मोस्ट ब्युटिफुल थिंग : ए ट्रू स्टोरी ऑफ अमेरिका’ज फर्स्ट ऑल ब्लॅक हायस्कूल रोइंग टीम’

लेखक : आर्शय कूपर,

प्रकाशक : फ्लॅटायन बुक्स

किंमत : पुुठ्ठा बांधणी १,२८६ रुपये

captparanjpe@gmail.com

Story img Loader