प्राजक्ता महाजन
या ऑक्सफर्ड विद्यापीठातील विदा (डेटा) संशोधन केंद्रात काम करणाऱ्या संशोधक हॅना रिची यांचे ‘नॉट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ (जगाचा शेवट आलेला नाही) हे पुस्तक याच वर्षी म्हणजे २०२४ मध्ये प्रकाशित झाले. हॅना मुख्यत: पर्यावरण, ऊर्जा, प्रदूषण, अन्न अशा विषयांवरच्या विदेवर काम करतात. पर्यावरण बदलांना सामोरे जाताना शासन-प्रशासनाला त्याचे पुरेसे गांभीर्य जाणवणे आणि आपण आपल्या जीवनशैलीत तातडीने बदल करणे अत्यावश्यक आहे. अनेकदा या प्रश्नाच्या राक्षसी रूपावर (तसे ते आहेच) लक्ष केंद्रित केले जाते. प्रश्न न सुटणाराच असेल आणि सगळे लयालाच जाणार असेल, तर ते ऐकून माणूस निष्क्रिय होण्याखेरीज काहीच घडत नाही. म्हणून प्रश्नाची व्याप्ती आणि गांभीर्य कमी न करता, प्रश्नाची उत्तरे कशी शोधली जात आहेत हे विस्ताराने, आकडेवारीसह सांगणारे हे आशावादी पुस्तक आहे.
वायुप्रदूषण
या शतकाच्या सुरुवातीला बीजिंग हे जगातील सर्वांत प्रदूषित शहर होते. पण चीनने मनावर घेतले आणि २०१३ ते २०२० या काळात बीजिंगचे वायुप्रदूषण ५५ टक्क्यांनी तर चीनचे वायुप्रदूषण ४० टक्क्यांनी कमी झाले. एकेकाळी म्हणजे १९५२ मध्ये लंडनचे वायुप्रदूषण आजच्या दिल्लीपेक्षा जास्त होते आणि धुरके वाढून चार दिवसांत १० हजार लोक मृत्युमुखी पडले होते! आताच्या लंडनची हवा कितीतरी पटीने स्वच्छ आहे. आर्थिक प्रगती होऊनही वायुप्रदूषण कमी करता येते याचे हे दाखले! या उदाहरणांवरून दिसते आहे, की हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे इतर देशांनीही हा प्रश्न मार्गी लावावा, असे लेखिकेचे म्हणणे आहे. गरिबीतून बाहेर येताना आधी वायुप्रदूषण वाढते, मग सहन करण्यापलीकडे जाते आणि दबाव वाढल्यावर ते कमी करायचे उपाय योजावेच लागतात. ओझोनचे छिद्र, आम्ल-वर्षा हे प्रश्न गांभीर्याने घेतल्यावर सोडवता आले, तसा हाही सुटणारा प्रश्न आहे, असे लेखिका म्हणते.
हेही वाचा >>>‘लॅटरल एण्ट्री’ची पद्धत राबवायचीच असेल तर…
पर्यावरणातील बदल (वाढते तापमान)
आपण जे उष्णता-धारक वायू वातावरणात सोडतो, त्यांचे प्रमाण अजूनही दरवर्षी वाढतेच आहे. पण दरडोई उत्सर्जन हळूहळू कमी होऊ लागले आहे. जगात अमेरिकेची लोकसंख्या चार टक्के आहे आणि त्यांचा उत्सर्जनातील वाटा मात्र १४ टक्के आहे. अमेरिकेएवढाच राहणीमानाचा दर्जा असूनही स्वीडनचे दरडोई उत्सर्जन अमेरिकी माणसाच्या २५ टक्केच आहे. म्हणजेच उत्सर्जन कमी करायचा मार्ग उपलब्ध आहे. इंग्लंडसारख्या देशांना आर्थिक विकासाची कर्बउत्सर्जनाशी असलेली जोडी तोडण्यात यश आलेले आहे. नवीन हरित-तंत्रज्ञान दिवसेंदिवस स्वस्त होत आहे. गेल्या काही दशकांत सौरऊर्जा ८९ टक्क्यांनी तर पवनऊर्जा ७० टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. आता गरीब देशही हे तंत्रज्ञान वापरून आर्थिक प्रगती करू शकतात. २०१४ साली उरुग्वेत पवनऊर्जेचा वापर फक्त ५ टक्के होता, आज तो ५० टक्के झाला आहे. त्याच काळात चिलीमध्ये सौरऊर्जेचा वापर शून्य होता आणि आज तो १३ टक्के झाला आहे. लेखिकेने सकारात्मक माहिती आणि आकडेवारी देऊन ‘वाढत्या तापमानाला आळा घालणे शक्य आहे आणि त्या दिशेने काम करायला हवे,’ असे म्हटले आहे. श्रीमंत देशांनी यासाठी गरीब देशांना मदत करावी असेही म्हटले आहे.
जंगलतोड
जंगलतोडीचे मुख्य कारण शेती आणि त्यातही गोमांस आहे, हे आकडे देऊन स्पष्ट केलेले आहे. बऱ्याच लोकांना असेही वाटते, की पाम तेलावर बहिष्कार घालून निर्वनीकरणाला चाप बसेल. पण प्रत्यक्षात त्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होईल. एका हेक्टरमधून २.८ टन पाम तेल निघते तर नारळाचे तेल हेक्टरी ०.२६ टन म्हणजे दहा पटीने कमी निघते. ऑलिव्हचेही कमीच निघते. म्हणजेच पामऐवजी वेगळे तेल वापरले तर जास्त जमीन लागेल आणि जंगलतोड आधिक वाढेल. जंगलतोडीला कारणीभूत उत्पादनांमध्ये ४१ टक्के वाटा गोमांसाचा, १८ टक्के तेलबियांचा आणि १३ टक्के कागदाचा आहे. अमेरिका, युरोप आणि आशियात हरित क्रांती झाली आणि शेती उत्पादन कितीतरी पटींनी वाढले. आफ्रिकेतील एकरी उत्पादन त्या प्रमाणात वाढले नाही. तेथील जंगलतोड थांबवायची असेल तर तिथे शेतीच्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करावी लागेल.
हेही वाचा >>>करदात्यांचा घामाचा पैसा फुकट वाटायचा अधिकार सरकारला कुणी दिला?
अन्न
हरितक्रांती आणि रासायनिक खतांच्या उल्लेखाशिवाय अन्नाबद्दलची चर्चा होऊच शकत नाही, असे लेखिकेचे मत आहे. आज जगातल्या १० टक्के लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही तर ४० टक्के लोक हे जास्त खाऊन स्थूल झाले आहेत. मनुष्याच्या इतिहासात प्रथमच स्थूलता हा भुकेपेक्षा मोठा प्रश्न ठरत आहे. आपण दरवर्षी आपल्या गरजेच्या दुप्पट धान्य पिकवतो. दरवर्षी ३ अब्ज टन धान्य पिकवले जाते आणि त्यातील ४१ टक्के गुरांना (मुख्यत: मांसासाठी) तर ११ टक्के इंधनासाठी वापरले जाते. सोयाचे ७५ टक्के उत्पादन हे गुरांसाठी वापरले जाते. त्यामुळे मांसाहार कमी करणे हे खूप महत्त्वाचे आहे. जंगलतोडीचे सर्वांत महत्त्वाचे कारण शेती आहे आणि ७५ टक्के शेतजमीन ही गुरांना चरण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी धान्य पिकविण्यासाठी वापरली जाते! स्थानिक अन्न खाणे चांगलेच, पण स्थानिक मांस खाण्यापेक्षा आयात केलेली फळे बरी, असे लेखिकेने आकडेवारी देऊन सांगितले आहे. तसेच स्वीडनसारख्या देशाने टोमॅटो आयात करण्याऐवजी हरितगृहांचा उपयोग करून देशातच त्याचे पीक घेतले तर १० पट जास्त ऊर्जा लागेल. म्हणून स्थानिक अन्नाचा आग्रह धरताना तारतम्य बाळगावे, असे लेखिकेला वाटते. जैविक शेतीच्या परिसंस्था रासायनिक शेतीपेक्षा जास्त चांगल्या असतात म्हणून जैविक शेती चांगली, असा एक प्रवाह आहे. तर जैविक शेतीचे उत्पन्न कमी येते आणि त्यामुळे शेतीसाठी जास्त जमीन लागून परिसंस्थांचा जास्त नाश होतो, असा दुसरा मतप्रवाह आहे. दोन्ही बाजूंनी अभ्यास होत आहे, असे लेखिका नमूद करते.
घटणारी जैवविविधता
निसर्गातल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या साखळ्या आणि अवलंबन हे गुंतागुंतीचे असते. एकच भाग सुटा करून त्याचा उपयोग किंवा मोल लक्षात येत नाही. माणसाने बऱ्याच सस्तन प्राण्यांना नामशेष केले आहे. आज जगातल्या सर्व सस्तन प्राण्यांचे वजन केले, तर त्यात माणसाचे ३४ टक्के, गायींचे ३५ टक्के, डुकरांचे १२ टक्के आणि वन्य प्राण्यांचे फक्त चार टक्के आहे. माणूस आणि माणसाने पाळलेल्या प्राण्यांमुळे अन्य सर्व प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या ५०० वर्षांत ज्या गतीने जीव नामशेष होत आहेत, ते पाहिल्यास आपण आता पुढच्या सामूहिक विलोपनात (मास एक्स्टिंक्शन) आहोत असे वाटते. पण त्याच वेळी माणूस हे थांबवायला सक्षम आहे, हेही खरे. १९८० साली भारतात १५ हजार हत्ती होते, आज ३० हजार आहेत. अशाच प्रकारे युरोप आणि अमेरिकेत रानगव्यांना वाचविण्यात यश आले आहे. जैवविविधता राखण्यासाठी शिकार आणि शेती आटोक्यात ठेवली पाहिजे, असे लेखिकेला वाटते.
प्लास्टिक
प्रशांत महासागरात प्लास्टिकचा भलामोठा पट्टा तरंगतो आहे. तीन फ्रान्स देश बसतील एवढा मोठा हा पट्टा आहे. जगात दरवर्षी ४६ कोटी टन प्लास्टिक तयार होते, त्यातील ३५ कोटी टनांचा कचरा होतो आणि त्यातले १० लाख टन समुद्रात जाते. समुद्रात जाणारे ८० टक्के प्लास्टिक आशियातून जाते तर युरोपातून एक टक्का सुद्धा जात नाही. जे युरोपला शक्य आहे, ते इतर ठिकाणीही शक्य आहे. लेखिकेच्या मते प्लास्टिकचा वापर कमी करावा लागेल, पण थांबवता येणार नाही. वैद्याकीय क्षेत्रातील ऑक्सिजनच्या नळ्यांपासून ते वाहनांचे वजन (आणि म्हणून इंधनवापर) कमी करणारे भाग अशा कितीतरी ठिकाणी प्लास्टिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे गरज नाही तिथे प्लास्टिक वापर बंद करणे आणि इतर ठिकाणी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हाच उपाय आहे. ‘मायक्रोप्लास्टिक’ सर्वत्र आढळते आणि ते टाळणे अशक्य झाले आहे हे मान्य केले असले तरी त्या तपशिलात जाणे लेखिकेने टाळले आहे.
बेबंद मासेमारी
१९६० च्या दशकात सात लाख देवमासे मारले गेले होते. गेल्या दोन-तीन दशकांत हा आकडा २० हजारांखाली आला आहे. देवमासे नामशेष होण्यापूर्वी आपण सुधारणा केली आहे. ‘मासेमारी अशी करावी की माशांची संख्या इतकीही खालावू नये, की नंतर मासे मिळणे दुरापास्त होईल. मासेमारी टिकून राहील अशी माशांची अनुकूल पातळी टिकवणे म्हणजे शाश्वत मासेमारी,’ अशी व्याख्या लेखिकेने गृहीत धरली आहे. यामध्ये माणसाने मासेमारी कारण्यापूर्वीच्या काळाच्या तुलनेत निम्मेच मासे टिकतील. पण ही व्याख्या जास्त व्यवहार्य आहे. सध्या मासेमारीत होणारी वाढ ही मुख्यत: मत्स्यशेतीतली आहे, हे लेखिकेने दाखवून दिले आहे. पूर्वी मत्स्यशेतीतल्या माशांना अन्न पुरविण्यासाठी मासेमारी केली जात असे. पण आता हे प्रमाण कमी होऊन मत्स्यशेतीत वनस्पतींचे खाद्या वाढत आहे. दरवर्षी आपण नऊ कोटी टन मासे मासेमारी करून पकडले जातात. त्यातील फक्त ११ टक्के मत्स्यशेतीला खाद्या म्हणून जातात आणि मत्स्यशेतीतून उत्पादन मात्र १० कोटी टनांचे होते. युरोप आणि अमेरिकेत माशांची संख्या अनुकूल पातळीवर राहावी म्हणून नियमन आणि देखरेख केली जाते. मात्र आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेत तातडीने सुधारणा आवश्यक आहेत. मासे कमी खावेत, प्रत्येक देशाला आणि प्रत्येक बोटीला मासेमारीचा ठरावीक हिस्सा (कोटा) असावा आणि तो कडकपणे पाळला जावा असे सुचवले आहे.
पुस्तकात मोठ्या प्रमाणावर आकडे, तक्ते आणि आलेख आहेत. पुस्तक जास्त व्यवहारी आणि अडचणींमधून मार्ग काढायच्या दृष्टीने लिहिलेले आहे. पण व्यवहारी होताना कधी कधी ते सोयीचे होऊन जाते. त्यामुळे पर्यावरणाची किंवा शाश्वत विकासाची व्याख्यासुद्धा अतिशय व्यवहारी, मनुष्यकेंद्री आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना आवडेल अशी आहे. समतोल राखण्यापेक्षा मनुष्याच्या पुढच्या पिढ्यांना चांगले जीवन मिळेल एवढा निसर्ग शाबूत ठेवणे, असा दृष्टिकोन दिसतो. अर्थात, व्यवहाराच्या अंगाने असल्या तरी ‘‘युक्तीच्या’’ आणि आशावादी चार गोष्टी सांगितल्या आहेत, त्या खूपच महत्त्वाच्या आहेत.