भारत सरकारने दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाली, प्राकृत, मराठी, बंगाली व असामी या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. त्यानिमित्ताने इथे प्रामुख्याने पाली भाषेचे वेगळेपण कसे आहे आणि का आहे याचा विचार प्रामुख्याने करू या.

सर्वप्रथम पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केल्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. गेली अनेक वर्षे यासाठी साहित्यिक, बौद्ध विचारवंत, पाली भाषेचे अभ्यासक सातत्याने मागणी करत होते. वास्तविक पाहता, पाली भाषेला हा दर्जा याआधीच मिळणे आवश्यक होते. याचे कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असली पाहिजे आणि तिचे स्वतंत्र साहित्य वाडमय असायला हवे, लिखित पुरावे असायला हवेत, असे प्रमुख निकष आहेत. पालीभाषा ही सुमारे तीन हजार वर्षे जुनी आहे. बुद्धांच्याही अगोदर ५०० वर्षापासून ती प्रचलित आहे. मात्र बुद्ध काळापासून ती अधिक प्रचलित आणि लोकभाषा बनली. विशेषतः बुद्धाच्या काळापासून या भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती झालेली आहे.

हे ही वाचा… अग्रलेख : भामटे आणि तोतये…

पाली भाषा ही भारतीय उपखंडातील इंडो युरोपियन भाषा समूहातील भाषा आहे. या भाषेला मागधी या नावानेही ओळखले जाते. मगध देशातील बोलली जाणारी भाषा. अर्थात मगध देश म्हणजे आत्ताचा बिहार, ओरिसा हा प्रांत. मागधी भाषेलाच पुढे पाली या नावाने ओळखले जाऊ लागले. तथागत भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना केल्यानंतर आपल्या धम्माचा उपदेश त्यांनी याच पाली भाषेतून जनमानसात केला. त्या काळात पाली ही लोकभाषा होती. जनमानसाची भाषा होती. सबंध भारत वर्षात अर्थात जम्बुद्वीपात पाली या भाषेत सर्व प्रकारचे व्यवहार होत होते आणि म्हणूनच या भाषेला राजाश्रय, लोकाश्रय मिळाला होता. बुद्धांनी याच लोकभाषेतून आपला धम्म लोकांना समजावून दिला. सर्व बुद्ध वचने, धम्माची शिकवण याच पाली भाषेतून सांगितले गेले आहेत.

तथागत भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनी राजगृहावर प्रथम धम्म संगीती घेण्यात आली. ती सहा महिने चालली. त्यामध्ये ५०० विद्वान बौद्ध भिख्खु सहभागी झाले होते. ज्याचे अध्यक्षस्थान महाकश्यप यांनी भूषवले होते. त्या संगीतीमध्ये बौद्ध भिक्खूंनी तथागतांच्या बुद्ध वचनांचे संगायन केले. मुखोद्गत असलेली बुद्ध वचने पाली भाषेमध्ये लिहिण्यात आली. पाली भाषेसाठी ब्राह्मी लिपी तथा धम्म लिपीचा वापर केला गेला. पाली भाषेच्या लिपीला धम्मलिपी असे म्हटले जाते. बुद्धांच्या महानिर्वाणानंतर पाली भाषेत हे लिखित साहित्य रचले गेले. विभिन्न काळात सहा धम्म संगीती पार पडल्या. त्यामधून पाली भाषेतील साहित्याला आकार येत होता. पुढच्या काळात दुसरी धम्म संगीती वैशाली येथे पार पडली. ही संगीती बुद्धांच्या निर्वाणानंतर शंभर वर्षांनी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये देखील विद्वान ७०० बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे तिसरी धम्म संगीती २२६ वर्षांनी सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे आयोजित केली होती. त्या संगीतीचे अध्यक्षस्थानी विद्वान भंते मोगल्लीपुत्त तिस्स हे होते. ही संगीती नऊ महिने चालली. त्या संगीतीमध्ये तथागत भगवान बुद्धांचा विचार, धम्माची शिकवण, धम्माची तत्वे ही संकलित करून लिपीबद्ध करण्यात आली. हे अत्यंत अजोड असे कार्य पाली भाषेत सम्राट अशोकांच्या काळामध्ये करण्यात आले. त्यातूनच बौद्ध धम्मातील प्रमुख ग्रंथ मानला जाणारा त्रिपीटक हा आकाराला आला. जो या पाली भाषेमध्ये लिहिला गेला आहे.

हे ही वाचा… कलाकारण : कुठून कुठे जाणार हे इस्रायली?

सम्राट अशोकाने या भारतासह आजूबाजूंच्या देशावर दीर्घकाळ राज्य केले. कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने युद्धाचा मार्ग सोडून तथागत गौतम बुद्धांच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. आपल्या राजसत्तेखालील प्रदेशात ठिकठिकाणी अशोक स्तंभ उभे केले. शिलालेख लिहिले. या स्तंभांवरून, शिलालेखांवरून त्यांनी शांततेचा, अहिंसेचा, बुद्धाचा संदेश दिलाच. त्याचबरोबर उत्तम शासनकर्ता कसा असावा याचा नमुनाही सादर केला. सम्राट अशोकाने लिहिलेले हे शिलालेख, स्तंभलेख याच पाली भाषेतील आणि धम्म लिपीतील (ब्राह्मी)आहेत. या भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य दाखवणारे हे सज्जड पुरावे आजही आपला उर अभिमानाने भरतात.

त्या काळात आलेले अनेक परदेशी पर्यटक, अभ्यासक यांनी केलेली भारताची वर्णने आणि त्या वेळचा असलेला भारत, या देशातील बौद्ध धम्म, राज्यकर्ते यांची केलेली वर्णाने यामधून पाली भाषेचे महत्त्व अधोरेखित होते. मौर्यकाळात या भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला होता. मौर्य काळानंतरही ही भाषा सर्वत्र प्रचलित होती. त्यामुळे या भाषेत निर्माण झालेले साहित्य हे विशेष लोकप्रिय आहे. प्रामुख्याने बौद्ध साहित्यची निर्मिती या भाषेत झाली असली, तरी त्याखेरीजही इतर अन्य प्रकारचे साहित्यही मोठ्या प्रमाणात लिहिले गेले आहे.

विशेषतः पाली भाषेतील बौद्ध साहित्यामध्ये त्रिपिटक हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. त्यामध्ये विनयपिटक, सुत्तपीटक व अभिधम्मपिटक असे तीन भाग असून त्यामध्ये अनेक उपग्रंथ आहेत. विनयपिटकांमध्ये पाराजीका, पाचितियादी, महावाग्ग, चुल्लवगग, परिवारपाठ याचा समावेश आहे. तर सुक्तपिटकांमध्ये दिघनिकाय, मज्जिमनिकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय याचा समावेश होतो. यापैकी खुद्दकनिकाय या भागामध्ये १५ ग्रंथांचा समावेश होतो. त्यामध्ये खुद्दकपाठ, धम्मपद, उदान, इतिवुत्तक, सुत्तनिपात, विमानवत्थू , पेतवत्थू, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निद्देस , पटीसंभिदामग , अवदान, बुद्धवंस, चरियापिटक यांचा समावेश आहे. आणि शेवटच्या तिसऱ्या भागात अर्थात अभिधम्मपिटकामध्ये धम्मसंगीनी, विभंग, धातुकथा, पुग्गलपय्यती, कथावत्थू , यमक, पठठान या ग्रंथांचा समावेश होतो. याखेरीज मिलिंदपन्हा, दीपवंस , महावंस या विशेष ग्रंथांचाही समावेश आहे. पाली भाषेतील हे साहित्य अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

हे ही वाचा… भूगोलाचा इतिहास : धरतीची जन्मकथा

त्यामुळे पाली भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भारत सरकारच्या वतीने भाषेच्या संवर्धनासाठी, तिच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईलच. परंतु ही भाषा जनमानसात रुजावी, यासाठी प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे. आज या भाषेची स्थिती काय आहे असे पाहिले तर दिसून येईल की भारतातील बौद्ध धर्मीय लोक आपली प्रार्थना अर्थात बुद्ध वंदना आणि बुद्ध पूजा पाठ हा पूर्णतः पाली भाषेमधूनच घेतात. प्रत्येक बौद्ध कुटुंबात वेगवेगळ्या सुखदुःखांच्या कार्यक्रमातून, मंगल कार्यक्रमातून बुद्ध पूजा ही पाली भाषेतून घेतली जाते. सान थोरांसह ती म्हटली जाते. लोकांच्या ती मुखोद्गत आहे. पाली भाषेतील बुद्ध वचने, गाथा मुखोद्गत आहेत. मात्र तरीही शासन दरबारी तिची नोंद होताना दिसत नाही. या भाषेच्या विकासासाठी आगामी जनगणनेमध्ये भारतातील सर्व बौद्धांनी आपल्या भाषेची नोंद करताना आपल्या मातृभाषेसोबतच दोन नंबरचे स्थान पाली भाषेला देणे आवश्यक आहे. व त्यानंतर इतर भाषांचा उल्लेख करायला हरकत नाही. असे झाले तर पाली भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या निश्चितपणे वाढलेली दिसून येईल. त्याचप्रमाणे या भाषेतून साहित्य निर्मिती सोबतच विविध कलांची निर्मिती करणे देखील आवश्यक आहे. जेणेकरून लोकांना त्याबद्दलची रुची निर्माण होईल. शासनाने पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी तिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी या भाषेच्या अभ्यासकांनी वेगवेगळे उपक्रम योजनेची आवश्यकता आहे. बुद्ध काळातील जनमानसाची ही लोकभाषा आज अभिजात भाषा बनलेली आहे, ती चिरकाल टिकून राहावी असे वाटते.

sandeshkpawar1980@gmail.com