पन्नालाल सुराणा

कर्पुरी ठाकूर यांची उणीव पुढल्या पिढ्यांना भासू नये अशी परिस्थिती देशात निर्माण करणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरणार आहे.

समाजवादी नेते जयप्रकाश नारायण व डॉ. राममनोहर लोहिया यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सुमारे चार वर्ष भूमिगत राहून ब्रिटिश सरकारची यंत्रणा खिळखिळी करण्यात महत्वाची कामगिरी बजावली होती. विद्यार्थीदशेपासूनच ते समाजवादी विचाराने भारावलेले होते. १९५६ साली लोहियांनी त्यावेळच्या काँग्रेस सरकारविरुध्द मोठे आंदोलन सुरू केले होते. आपल्या समाजात जातीभेदावर आधारलेली विषमता भयंकर आहे. तिला सुरूंग लावल्याशिवाय केवळ आर्थिक क्षेत्रात समता आणता येणार नाही अशी भूमिका मांडून मागास जातीना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. बिहारमध्ये उच्च जातींचा विलक्षण वरचष्मा होता. शेतजमीन मोठया प्रमाणावर भूमीहार व राजपूत यांच्या हातात एकवटली होती आणि सरकारी नोकरशाहीत खेडयातील पटवान्यांपासून तो राज्य सरकारच्या सचिवांपर्यंत कायस्थ जातीचा एकाधिकार होता. त्यामुळे लोहियांच्या आंदोलनाला बिहारमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात चमकून निघाले कर्पुरी ठाकूर यांचे नेतृत्व.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

हेही वाचा >>> जननायक कर्पुरी ठाकूर; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष लेख

बिहारमधील समस्तीपूर जिल्हयातील पितोझिया या छोटयाशा खेडयात एका केशकर्तनाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुटूंबात ता. २४ जानेवारी १९२४ रोजी कर्पुरी ठाकूर यांचा जन्म झाला. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी बी.ए. पदवी प्राप्त केली. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी उडी घेतली. २६ महिने तुरुंगवास भोगला. बाहेर आल्यावर समाजवादी पक्षाच्या कामात झोकून दिले. १९५२ च्या निवडणुकीत ताजपूर या मतदारसंघातून ते विधानसभेवर ते निवडून गेले. ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजूरांचे प्रश्न तेथे लावून धरले. त्यावेळच्या वळणानुसार एक समाजवादी या नात्याने त्यांनी कामगार चळवळीत भाग घेतला. १९६० सालच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, पोस्ट व टेलीग्राफ कर्मचारी यांच्या संघटनेतही त्यांनी मोठे काम केले. दक्षिण बिहारमधील टाटा स्टीलच्या कामगारांच्या १९७० सालच्या संपात उतरल्याबददल त्यांना शिक्षा झाली. त्यावेळी त्यांनी २८ दिवसांचे उपोषण केले.

हेही वाचा >>> ‘प्राणप्रतिष्ठा’ होऊन गेल्यावर तरी संविधानाचे प्राण, धर्मनिरपेक्षतेची प्रतिष्ठा जपू या…

सरकारी कामकाज व शिक्षण यांचे माध्यम इंग्रजी ही परकीय भाषा असणे म्हणजे ८०-९० टक्के लोकांना त्यापासून वंचित ठेवणे होय, प्रशासन व शिक्षण याचे माध्यम लोकभाषाच असले पाहिजे या भूमिकेतून लोहियांनी ‘अंग्रेजी हटाव’ ही चळवळ चालवली होती. १९७० साली बिहारमध्ये पहिले बिगरकाँग्रेसी मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. वरिष्ठ जातीतले महामायाप्रसाद सिंह हे मुख्यमंत्री होते तर कर्पुरी ठाकूर उपमुख्यमंत्री होते. प्रशासन हिंदी भाषेतून चालावे असा आग्रह त्यांनी धरला त्यावर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. वरिष्ठ जातीचे दडपण विलक्षणच होते. त्यावेळच्या समाजवादी पक्षातसुध्दा त्यांचाच वरचष्मा होता म्हणून पक्षाचा राजीनामा देऊन कर्पुरी ठाकूर हे चरणसिंह यांच्या भारतीय क्रांती दलात सामील झाले. राज्यभर दौरे काढून ते मागास जातींना संघटित करत होते. १९७१ सालच्या भूमीमुक्ती आंदोलनात भाग घेऊन अनेक जिल्हयांत त्यांनी मागस जातीच्या शेतमजुरांना शेतजमिनी मिळवून दिल्या. १९७५ साली इंदिरा गांधींनी लादलेल्या अंतर्गत आणीबाणीत कर्पुरी यांना वर्षभर स्थानबध्द करून ठेवले होते. १९७७ सालच्या निवडणुकांत बिहारमधे समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला बहुमत मिळाले. कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाले. त्यांनी राज्यप्रशासनाची भाषा हिंदी केली. मागास जातींना सरकारी नोकऱ्यांत पुरेसे आरक्षण दिले. १९८० सालच्या मंडल आयोगाचीही सुरूवातच होती. खेडयापाडयात दारूच्या व्यसनामुळे गरीब श्रमिक फारच भरकटले होते व त्याचा जाच महिलांना जास्त सोसावा लागत होता. ते पाहून कर्पुरीजींनी दारूबंदींचा कायदा राज्यात लागू केला. त्याविरूध्दही वरिष्ठ जातीयांनी आगपाखड केली. पण गावोगावच्या बाया या ‘जननायक’ ला आपला खरा रक्षणकर्ता मानू लागल्या.

सतत संघर्षशील राहिलेल्या कर्पुरी ठाकूर यांचा मृत्यू दि. १२ डिसेंबर १९८८ रोजी झाला. भारतातील समाजवादी चळवळीला तळागाळापर्यंत पोहोचवण्यात कर्पुरीजींचा सिंहाचा वाटा आहे. देशात आजही सामाजिक न्यायासाठी मागास समाजांना संघर्ष करावा लागतो आहे. कर्पुरी ठाकूर यांची उणीव पुढल्या पिढ्यांना भासू नये अशी परिस्थिती देशात निर्माण करणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरणार आहे.
समाप्त