डॉ.श्रीकांत कामतकर
इंग्रजी भाषेतील वैद्यकीय शिक्षण प्रादेशिक भाषांमध्ये देण्यासाठी शासकीय स्तरावर नियोजन प्रयत्न, प्रयोग, अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याची उपयुक्तता अनुभवानंतर समजेलच.
केवळ प्रादेशिक भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षण देण्याचा एका मर्यादेपर्यंत निश्चित फायदा होईल, पण वैद्यकीय पेशाला बहुभाषिक संवाद कौशल्यासाठी तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे याचा वैद्यकीय शिक्षणाच्या नियोजनाशी संबंधितांनी विचार करणे गरजेचे आहे. एका उत्तम डॉक्टरला वैद्यकीय पेशाचा आदर्श प्रवास करण्यासाठी उत्तम भाषा संवादकौशल्याची जोड द्यावी लागते.अन्न वस्त्र निवारा यांनंतर भाषा ही माणसाची मुलभूत गरज आहे.
माझा गुरांचा डॉक्टर झालेला बालमित्र गमतीने म्हणाला, “ मी तुला तपासतो तू मला तपास”. हा विनोद गाजला, सगळेच हसलो… इतक्या वर्षांच्या वैद्यकीय पेशातल्या अनुभवानंतर मला कळले तो विनोदाचा विषय नव्हता त्यामागे मोठे तत्त्वचिंतन दडले होते. तो एक अभ्यासाचा विषय होता, तो विषय म्हणजे वैद्यकीय पेशा साठी लागणाऱ्या संवादभाषेचा विषय. ती भाषा अबोल होती, न कळणारी होती, ती भाषा समजून घ्यायची होती, वापरून पाहायची होती, ताडून पाहायची होती, सतत सुधारण्याची तयारी ठेवण्याची होती आणि कायमच शिकण्याची होती. पशुवैद्यक पेशातले डॉक्टर काय आणि रुग्ण/नातेवाईकांची संवाद भाषा न कळणारे माणसांचे डॉक्टर काय, दोघांची परिस्थिती सारखीच असते. संवादभाषेच्या मर्यादेतच त्यांना काम करावे लागते, त्यासाठी संवाद भाषेचे कसब कमवावे लागते.
यातले निष्णात अभ्यासक देहबोलीची भाषा, नजरेची भाषा, स्पर्शाची भाषा यांच्या निरीक्षणाच्या जोरावर काही अंदाज बांधतात आणि जास्त यशस्वी होतात. आज तर वैद्यकीय पेशात संवादभाषा वापरायचे संदर्भ, अनेक अर्थांनी विस्तारले आहेत. विविध कारणांनी काहीसे गुंतागुंतीचेही झाले आहेत. प्राचीन काळी , दळणवळणाची साधने नव्हती तेव्हा घरातल्या आजीबाईचा बटवा आणि गावातलाच वैद्य यांच्यामुळे भाषेची अडचण नव्हती. आज दळणवळणाची साधने वाढली, वैद्यकीय पर्यटनही सुरू झाले, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पदवी स्तरावर १५ टक्के आणि पदव्युत्तर स्तरावर ५० टक्के परप्रांतीय अर्थात त्या राज्याची भाषा अवगत नसणारे विद्यार्थी, पेशात येऊ लागले. आसामपासून तामिळनाडू, गुजरात, बंगाल, काश्मीर, ओरिसापर्यंतचे विद्यार्थी इथे येतात, ते तपासत असलेल्या इथल्या रुग्णांची संवादभाषा या नव्या पिढीच्या डॉक्टरांच्या आकलना पलीकडची!
मराठी डॉक्टर तरी मराठीत बोलतात?
अगदी मराठी भाषा येणाऱ्यांचा जरी विचार केला ,तरी मराठवाड्यातली बोलीभाषा, खान्देशातली बोलीभाषा, कोकणातील बोलीभाषा, विदर्भातली बोलीभाषा, सदाशिवपेठी मराठी, कोल्हापुरी मराठी, आदिवासी भागातील मराठी, बोलीभाषेत वैद्यकीय पेशाशी संबंधित वापरण्यात येणारे अनेक शब्द, भाषाशास्त्राच्या अभ्यासकांना ही माहिती नसण्याची शक्यता असते अशी परिस्थिती आहे. आपल्याकडे मराठी माध्यमांमध्ये शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या घसरली आहे . वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी भाषेचे गुण विचारात घेतले जात नाहीत हाही मुद्दा आहेच. त्यामुळेच सुरुवातीपासूनच मातृभाषा असून सुद्धा मराठी शिकण्याकडे हुशार विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष, ही वस्तुस्थिती आहे.
या साऱ्याचा परिणाम वैद्यकीय पेशावर होतो. आजच्या तंत्रज्ञान प्रगत जगात वैद्यकीय संशोधनाचा वेग फार गतिमान आहे. वैद्यकीय पेशातील लोकांना या संशोधनांशी सुसंगत बदलांना सामोरे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागत आहे. रुग्णसेवेचे मापदंड बदलत आहेत.विविध तपासण्या करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पुराव्यावर आधारित चिकित्सा- निदान आणि उपचार पद्धती , (एव्हिडंस बेस्ड डायग्नोसिस, ट्रीटमेंट ) हा परवलीचा शब्द आहे.
या सर्वांमध्ये रुग्ण एखादी वस्तू नव्हे तर शरीराबरोबरच मन, भावना, अपेक्षा यांच्यासहित वावरणारा माणूस आहे, याचा विसर पडू नये याचीही दक्षता वैद्यकीय पेशातील लोकांना घ्यावी लागते. वैद्यकीय पेशा हे फक्त शास्त्र नव्हे, त्यात कलाही आहे आणि ही कला भाषासंवाद कौशल्य, आत्मीयता, जिव्हाळा, अभिनयकौशल्य, समंजसपणा, प्रगल्भता. समयसूचकता, अशा अनेक विविध पैलूंची रोज परीक्षा घेत असते, रोज विकसित करावी लागते. वैद्यकीय पेशातील कलेचा विचार करता त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संवादभाषेचा विचार म्हणूनच महत्त्वाचा आहे.
रुग्ण -डॉक्टर संबंध ,डॉक्टर – समाज संबंध आज कमालीचे तणावग्रस्त झाले आहेत आणि परस्पर अविश्वासाच्या ढगांआड झाकोळून गेले आहेत. संवादातील भाषेचा अयोग्य वापर, अपुरा वापर, भाषा समजून घेण्यात असणारा उणेपणा, भाषा न कळल्यामुळे होणारे अपसमज यांच्याशी निगडित प्रश्न आहेत… संवादभाषेचे भक्कम पूल उभारल्याशिवाय हा प्रवास सुखकर होणार नाही. डॉक्टर- रुग्ण परस्पर विश्वास हा वैद्यकीय पेशाचा आत्मा आहे. आणि तो टिकवून ठेवण्यासाठी संवादभाषेचा डोळस अभ्यास आणि वापर दोघांकडूनही तितकाच आवश्यक आहे.
एकच नव्हे, एकापेक्षा जास्त भाषा…
बहुभाषिक समाजाची आवश्यकता ही काळाची गरज बनली आहे. सांगली ,सोलापूर ,उस्मानाबाद ,लातूर नांदेड ,सारख्या किंवा धुळे-जळगाव सारख्या इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्ह्यात मुंबई ,पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांत मराठी सोडून इतर अनेक भाषांचा वापर करणारे परभाषक लोक राहतात. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या सगळ्या भाषांचे किमान ज्ञान असणे ही अपेक्षा आहे. उपचार करणारे डॉक्टर्स ,वैद्यकीय कर्मचारी ,परिचारिका, औषध निर्माते, रुग्ण परिचर वगैरे सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कामाशी निगडित संवादभाषेतल्या नेहमीच्या शब्दांची ओळख ,त्यांचा योग्य वापर ,त्यांच्या चुकीच्या वापराने येणाऱ्या समस्या याविषयी माहिती मिळणे आवश्यक आहे.
अलीकडे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात सामाजिक मार्गदर्शक असतात पण त्यांच्या कामाचे स्वरूप हे उपचाराशी संबंधित सोयी-सुविधांची माहिती देणे आणि उपचार साखळीतल्या सर्वांशी समन्वय करून देणे इतकेच मर्यादित असते. त्यांना ही बहुभाषिक संवाद कला आणि स्थानिक भाषेवर (महाराष्ट्रात मराठीवर) प्रभुत्व मिळवण्यासाठी तयार करावे लागेल.
रुग्णाच्या उपचारांची सुरुवात डॉक्टरांनी आजारांच्या लक्षणांविषयी रुग्णाशी, रुग्णाच्या नातेवाइकांशी होणाऱ्या संवादाने होते आणि उपचार घेऊन परत जाताना औषधे कशी घ्यावी फेरतपासणीला कधी यावे, आहार काय असावा काय असावे अशा भाषा संवादाने शेवट होतो. सांगण्याचा हेतू हाच या उपचार सेवेच्या प्रत्येक पातळीवर भाषा संवादाचे महत्त्व आहे.
गंभीर आजारात, रुग्ण मरणासन्न अवस्थेत असताना रुग्णाला अतिदक्षता विभागात असताना, वाईट बातमी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना कशा पद्धतीने सांगायची याचे पुस्तकी धडे नसतात. अभ्यासातून ,अनुभवातून (कधी चुकतमाकत सुध्दा) आणि आपल्या वरिष्ठांकडून डॉक्टर लोक हे शिकत असतात .अशावेळी वापरायची संवादभाषा, तिचा लहेजा, उच्चारांची पद्धत ,समोरच्या माणसाला संभाषण नीट कळले आहे की नाही याची खातरजमा करणे, अशा अनेक बाबी असतात. वैद्यकीय ज्ञानाबरोबरच अशा वेळी निष्णात डॉक्टरांच्या संभाषण कौशल्याच्या वापराचा कस लागतो.
नेमक्या शब्दांचे शब्दभांडार त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे ही पण काळाची गरज आहे. भाषेच्या वापरातील अरे, अगं अशा एकेरी शब्दांचा वापर काही बोलीभाषांमध्ये नैसर्गिक असतो म्हणजेच ‘ए म्हाताऱ्या’ हा शब्द आजोबांच्या वयाच्या माणसांसाठी कुठे नैसर्गिक असेल, कुठे उद्धट – याची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा अशा शिक्षकांची आवश्यकता आहे.
फक्त ‘फॅमिली डॉक्टर’ नव्हे…
रुग्णालयात उपचार साखळीमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरून काम चालू असते. म्हणजे सकाळीच खोली साफ करणारा, रुग्णाची शारीरिक स्वच्छता करणाऱ्या ,सलाईन लावणाऱ्या, इंजेक्शन औषधे देणाऱ्या परिचारिका ,आहार ठरवणारे तज्ज्ञ, सतत उपस्थित असणारे निवासी डॉक्टर आणि उपचारांशी निगडित असलेले वेगवेगळे विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्यांची सांगड घालणारे रुग्णाचे मुख्य डॉक्टर अशी साखळी काम करत असते, शिवाय उपचाराशी निगडित नसलेले ,पण रुग्णालयाच्या लेखा विभागाशी संबंधित कर्मचारी… अशा सगळ्यांच्या संवाद समन्वयाची गरज असते आणि हा संवाद समन्वय पुन्हा भाषेच्या वापराशी निगडित आहे.
हे सगळे इतके तपशीलवार सांगण्याचे कारण एवढेच की, वैद्यकीय पेशात भाषा संवाद किती महत्वाचा आहे याची कल्पना यावी. बालरोग तज्ज्ञ ,स्त्री रोग तज्ज्ञ ,मानसोपचार तज्ज्ञ आणि सर्व अतिविशेष उपचार तज्ज्ञ यांच्या कामांसाठी तर भाषेच्या जास्तच तपशीलवार ज्ञानाची गरज असते. वैद्यकीय पेशात आणखी एक अनुभव येतो एकच शब्द वेगवेगळ्या लक्षणांसाठी वापरला जातो हेही उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लक्षात घ्यावे लागते. दम लागतोय म्हणणाऱ्यांना श्वसनाची धाप असू शकते , पोट गच्च झाले आहे असे सांगायचे असते. किंवा अशक्तपणा जाणवतो हे सांगायचे असते.
चक्कर येतेय या शब्दाचेही नेमके वर्णन ऐकल्यावर वेगवेगळ्या आजारांची लक्षण एकाच शब्दात सांगण्याचा प्रयत्न होतो, हे लक्षात येते आणि ते ओळखायचे कसब ही सरावाने साध्य होते हे लक्षात घेतले पाहिजे. वैद्यकीय पेशाचा असा बारिकसारिक पद्धतीने ही भाषेशी संबंध येतो हे लक्षात घेतले पाहिजे. वैद्यकीय पेशाशी संबंधित संवाद भाषा शिकवताना भाषा तज्ज्ञांना या सगळ्या गोष्टी शिकवणे गरजेचे आहे.
लेखक सोलापूर येथील वैद्यकीय व्यवसायिक आहेत.
drkamatkar@gmail.com