भक्तीकडून भानाकडे होणारा प्रवास ग्रंथांच्याच साथीनं होत असतो. देशाभिमान आणि देशभक्ती यांसाठी इतिहासाचं वाचन उपयोगी ठरतं खरं, पण चौकस वाचकाचा हा प्रवास इतिहासापुरताच राहात नाही.. तो आणखी पुढे जात राहातो, याची साक्ष देणारं हे टिपण..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र कुलकर्णी

इतिहासाबद्दल कुतूहल असलेली व्यक्ती माहितीचे पहिले स्रोत वाचत नाही. कुणी तरी विद्वानाने त्याचे केलेले इंटरप्रिटेशन त्याच्या वाचनात असते व ते टाळता येत नाही. त्या विद्वानाच्या राजकीय श्रद्धा, त्याचा धर्म, तो अध्ययन करत असलेले ठिकाण या सगळय़ाचा प्रभाव त्याच्या लिखाणावर असतो. त्यामुळेच इतिहासकार कुठे संपतो व राजकीय वा धार्मिक माणूस कुठे सुरू होतो हे समजण्यासाठी वाचकाने सदैव जागरूक राहणे आवश्यक आहे. भारतातल्या इतिहासकारांवर व वाचकांवर स्वातंत्र्य चळवळीचा आणि फाळणीचा प्रभाव आहे. भूतकाळाचे चित्र मनात निर्माण करताना द्वेष आणि प्रेम या दोन्ही टोकाच्या भावना बाजूला ठेवून भारतीय इतिहासाबद्दलची जी पुस्तके मनात राहिली ती एका मर्यादेपर्यंत सत्य आहेत. या सत्यतेच्या सीमा मात्र मागेपुढे होत राहतात.

आर्यावर्त की भारत?

माझ्या शालेय इतिहासातील पाठय़पुस्तकांनी ‘भारतात आर्य बाहेरून आले होते’ असेच सांगितले. याचा सरळ अर्थ होता की आता जो वर्तमान भारताचा नकाशा पुस्तकात दिला होता त्याच्याही पलीकडून कुठून तरी ते आले. यावरून नंतर बरेच रणकंदन मजल्याचे लक्षात आले. विद्वानांपासून ते राजकारण्यांपर्यंत या गोष्टीवर तट पडले आहेत. त्या वादाला पार्श्वभूमी, नंतर झालेल्या धर्माधिष्ठित मुस्लीम आक्रमणाची आहे हे लक्षात आल्यावर मी त्याचा नाद सोडून दिला. या प्रश्नाचा निकाल लागणे अशक्य आहे. मात्र आर्य सप्तसिंधूंच्या प्रदेशात होते व त्याला त्यांनी आपले मानले होते हे तेथे निर्माण झालेल्या साहित्यावरून खरे आहे. नंतर ते आणखी पूर्वेकडे गंगा-यमुनेच्या खोऱ्यात वसले आणि त्यांची राज्ये बनत गेली. हे सारे समजावणारे दोन लेखक महत्त्वाचे होते. हिंदू समाजात हिंद्वीतरांचा समावेश लिहिणारे वि. का. राजवाडे  व वंशसे राज्यतक लिहिणाऱ्या रोमिला थापर.

पाठय़पुस्तकात नसलेले..

मुघल आणि त्याआधीच्या दिल्लीच्या सुलतानशाह्या या पाठय़पुस्तककारांच्या लाडक्या आहेत हा समज खोटा नाही. चौहान घराण्याविषयी काही ओळींची माहिती आहे व त्याआधीचा जवळपास इ. स.पूर्व ५०० मधल्या बिम्बिसारापासून ते इ. स.  ६०० तल्या सम्राट हर्षांपर्यंतचा १००० वर्षांचा इतिहास एका धडय़ात संपवला आहे. त्यामुळे तो आहे हे विसरलेच जाते. या इतिहासाची खरोखरच कल्पना घ्यायची असेल तर अब्राहम इराले यांचे ‘द फस्र्ट स्प्रिंग’ हे ९०० पानांचे पुस्तक हाताशी धरण्यावाचून पर्याय नाही. अनेक राजपदांच्या उपलब्धींची माहिती चकित करणारी आहे. अवंतीवर्मन हा नवव्या शतकात काश्मीरवर राज्य करणारा राजा. त्याने व त्याच्या सुय्या नावाच्या मंत्र्याने वितस्ता (झेलम) नदीचे पाणी अशा प्रकारे नियंत्रित केले होते की त्यामुळे बराच प्रदेश तिच्या पुरापासून वाचला व शेतीलाही पाणी मिळाले. त्याच्या राज्यात धान्याचा भाव इतर ठिकाणांपेक्षा तिपटीने कमी असे. ‘सुय्या एखाद्या गारुडय़ाप्रमाणे नद्यांना खेळवी’ असे कल्हणाने लिहिले आहे.

आसाम व दक्षिणेतील राज्ये यांचा इतिहासही दुर्लक्षित राहिला आहे. विजयनगर साम्राज्याची रूपरेखा सांगणारे ‘अ फरगॉटन एम्पायर’ हे रॉबर्ट सिवेलचे, फेर्नो नुईझ या पोर्तुगीझ व्यापाऱ्याच्या माहितीवर आधारलेले पुस्तक बराच काळ लोकप्रिय आहे. अनंत सदाशिव आळतेकरांचे ‘प्राचीन भारतीय विद्यापीठे’ व ‘स्टेट अ‍ॅण्ड गव्हर्नमेंट इन अ एन्शंट इंडिया’ हे दोन मोह पडणारे ग्रंथ आहेत. भारतातल्या प्राचीन लोकशाह्यांचा काही लोक फार गाजावाजा करतात. त्या फार मर्यादित अर्थाने लोकशाह्या होत्या. रोमिला थापर यांच्या ‘अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाबरोबर वाचण्याचे हे (आळतेकरांचे) पुस्तक आहे. ए. एल. बॅशम यांच्या ‘अ वंडर दॅट वॉज इंडिया’मध्ये रोमन साम्राज्याशी भारताच्या असलेल्या व्यापारासह, अंतर्गत नौकानयनाचे मार्ग दिलेले आहेत. ‘जन्मावरून उच्चनीचता होती पण जगातल्या इतर ठिकाणी जेवढे गुलाम होते त्यांच्यापेक्षा भारतात ते किती तरी पट कमी होते,’ असे बॅशमचे म्हणणे. साधारण इ. स. पूर्वी १००० वर्षे सुरू झालेला हा इतिहास एका संपन्न प्रदेशाचा आहे. हा बहरलेला वसंत सातव्या शतकात उतरणीला लागला. त्याचे आर्थिक कारण ज्या रोमन साम्राज्याबरोबर व्यापार भरभराटीला आला होता ते साम्राज्य उतरणीला लागले.

या काळातील ज्ञानपरंपरेचा, साहित्याचा उल्लेख पाठय़पुस्तकात ठाशीव का नसावा याचा उलगडा होत नाही. या परंपरेचे भान देणारी सुरेश मथुरे यांची ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ नावाची मुलांसाठी असलेली दोन पुस्तके मी कधीची जपून ठेवली आहेत. श्री ग दीक्षितांचे ‘भारतीय तत्त्वज्ञान’ हे नेहमी लागणारे पुस्तक आहे.

मुघलांचे सांस्कृतिक योगदान

भारतातला इस्लामचा विजय हे जगातले सर्वात रक्तलांच्छित प्रकरण आहे असे जे विल डय़ुरांटने लिहिले ते नि:संशय खरे आहे. याचा अर्थ इस्लामचे इथे सांस्कृतिक योगदान नाही असा होत नाही. विशेषत: मुघल काळातील संगीत व स्थापत्य यातले योगदान कसे नाकारता येईल? मुघल इथल्या संस्कृतीला अपरिचित राहिले नाहीत. अकबराच्या दरबारात संस्कृतचा शिरकाव पर्शियन भाषेमुळे झाला. पंचतंत्राची दोन नवीन भाषांतरे त्याने करवली. ते इराणमध्ये आधीपासून माहीत होते. ब्राह्मण व जैन समाजातील पंडितांचा वावर त्याच्या दरबारात होता. शाक्यभावन हा इस्लाम धर्म स्वीकारलेला पंडित अकबराच्या दरबारात होता, त्याने अथर्ववेदातील काही श्लोकांचा अर्थ लावताना ‘हिंदू धर्मात काही वेळा मृताला दहनाऐवजी दफन करण्याची परवानगी आहे’ व ‘गोमांसाचे भक्षण करायला हरकत नाही’ असे निर्वाळे दिले. अकबराला या सर्वाची शंका येऊन त्याने अथर्ववेदाचे भाषांतर करायला दरबारातल्या इतर पंडितांना सांगितले. महाभारताचे विशेष महत्त्व अकबराने जाणले होते. त्याचे पर्शियन नाव युद्धाचे पुस्तक अशा अर्थाचे होते. त्यानंतर त्याच्या दरबारातल्या कवी फैजने भास्कराचार्याच्या लीलावती, कल्हणाच्या राजतरंगिणीचे व पंचतंत्राचे भाषांतर केले. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत जवळपास २४ पर्शियन रामायणे अस्तित्वात होती. त्यातल्या एकावर जहांगीरने स्वत:च्या अक्षरात लिहिले आहे, ‘‘हे प्राचीन भारतातले महत्त्वाचे पुस्तक आहे. माझे वडील, अकबरांच्या सांगण्यावरून या पुस्तकाचे पर्शियनमध्ये  भाषांतर करण्यात आले. विश्वास बसणार नाही अशा कथा यात आहेत.’’ हे सारे ‘संस्कृत इन मुघल कोर्ट’ या पुस्तकात ऑड्री ट्रुष्क या विदुषीने लिहिले आहे. या बाईंची राजकीय मते बाजूला ठेवून व महत्त्वाचे म्हणजे पुस्तकात दिलेल्या माहितीत वाहावत न जाता हे सारे वाचणे जमले पाहिजे. 

आपला महाराष्ट्र..

उत्तरेकडील संस्कृतीची भव्यता महाराष्ट्रात लगेच पोहोचली नाही. ‘महाराष्ट्राची  वसाहत’ यात राजवाडय़ांनी महाराष्ट्राची संस्कृती रांगडी राहण्याचे कारण दिले आहे. ‘‘त्याच्यावर वैदिक धर्माची, उपासना मार्गाची, बौद्ध, सर्पोपासनेची अशी पंचविध छाप बसून अमुक देवधर्माचे मराठे कट्टे विश्वसनीय अनुयायी आहेत असे म्हणण्याची सोय राहिली नाही.’’ कोणतीही एक संस्कृती नसल्याने मराठे पोटासाठी कोणाच्याही बाजूने लढत आणि ते काम नसेल तर एकमेकांमध्ये लढत याचे मूळ राजवाडय़ांनी शोधले आहे व ते म्हणजे ‘त्यांना स्वत:चे असे काहीच नव्हते’. अजूनही आर्यपूर्वकालीन स्वभावविशेष महाराष्ट्राला पुसता आलेले नाहीत. मराठय़ांची तुलना अफगाण लोकांशी करणाऱ्या जदुनाथ सरकारांकडे  दुर्लक्ष केले तरी राजवाडय़ांनीदेखील मराठय़ांना आडमुठे म्हटले आहे. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी लिहिले की, मुघलशाही घशात टाकणे महादजी सिंद्यांना सहज शक्य होते, पण त्यांनी ते केले नाही. अब्राहम इरले या प्राध्यापकांनी म्हटले, ‘‘औरंगजेबाच्या पश्चात सारा भारत थंडगार पडून गेला होता. थोडा जिवंतपणा दाखवला तो मराठय़ांनी; पण आपण दिल्लीचे राज्य करू शकतो, हे त्यांच्या लक्षात फार उशिरा आले.’’ याचे परिणाम आजही महाराष्ट्राला भोगावे लागतात.

रा. भा पाटणकरांनी त्यांच्या ‘अपूर्ण- क्रांती’ या ग्रंथात अठराव्या व एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांच्या आगमनानंतर महाराष्ट्रात जी सामाजिक, सांस्कृतिक व मुख्यत: आर्थिक परिवर्तने घडली त्याचा वेध घेतला आहे. मराठय़ांनी स्थापलेले स्वराज्य नंतर वाढत गेले आणि त्याच्या आर्थिक तजविजीसाठी चौथाईशिवाय दुसरा मार्ग मराठय़ांना दिसेना. पाटणकरांनी मार्मिकपणे लिहिले आहे की यासाठी मराठय़ांच्या तलवारी अनेकांविरुद्ध उठल्या व अनेकांच्या त्यांच्याविरुद्ध. जदुनाथ सरकारांचा हवाला देऊन ते पुढे लिहितात की यामुळे एक युद्धजन्य राष्ट्र अस्तित्वात आले ज्याच्यासाठी शांतता हा मृत्यू होता.’’

इस्लामी राजवटीची गुलामी संपते न संपते तोच ब्रिटिशांचे जे राजकीय, सांस्कृतिक आक्रमण आले त्याची झळ जास्त मोठय़ा वर्गाला लागली. पण हा वर्ग किती मोठा होता? विश्रब्ध शारदेच्या पहिल्या खंडात १८१७ ते १९४७ या काळातील महाराष्ट्रातील १५०० माणसांची पत्रे आहेत. त्याच्या प्रस्तावनेत दि के बेडेकरांनी याचा उल्लेख करून विचारले आहे की, ‘‘वारली भिल्ल गोंड तर सोडाच पण १८७५च्या दुष्काळात देशोधडीला लागलेली माणसे .. या पत्रांतून दिसतात कुठे?’’ नेमका हाच प्रश्न मायकेल ओ’डवायरने आपल्या, इंडिया अ‍ॅज आय न्यू इट या आत्मचरित्रात विचारला आहे. ‘‘केवळ अर्धा डझन नाकतोडे आपल्या आपल्या किरकिरीने वात आणत असताना अनेक गायीगुरे शांतपणे ब्रिटिश साम्राज्याच्या छायेत रवंथ करत आहेत. अशा वेळेला केवळ नाकतोडेच शेतात आहेत असे समजून चालणार नाही.’’ तो पुढे लिहितो, ‘‘ज्या क्षणी ब्रिटिश शासन येथून नाहीसे होईल त्या क्षणी जातीच्या उतरंडीवर तळात असलेल्या १२ कोटी माणसांच्या गळय़ात परत साखळदंड येतील.’’ जोतिबा फुल्यांशी, पंडिता रमाबाईंशी आणि शाहू महाराजांशी जे वर्तन स्वातंत्र्यासाठी भांडणाऱ्या व्यक्तींनी केले ते पाहता ओ’डवायरने घातलेली भीती चुकीची नाही. या संदर्भात लोकमान्यांना पडलेले पेच विठ्ठल रामजी शिंद्यांच्या प्रकरणात उघड दिसतात. या वेळची महाराष्ट्रातील उलघाल सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’मध्ये अनुभवता येते.

..

महात्मा गांधींनी ही कोंडी फोडली याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. अनेकांनी त्यांच्याविषयी लिहिलेले आहे. त्यांच्यावरील मला सर्वात आवडणारे  पुस्तक म्हणजे अनु बंदोपाध्याय लिखित ‘बहुरूप गांधी’. या लहानशा पुस्तकातील प्रकरणात गांधींच्या विविध रूपांचे वर्णन आहे. शिक्षक, लेखक.. कपडे धुणारे, संडास साफ करणारे, चपला शिवणारे.. अशी अनेक रूपे. त्यांचे नेतृत्व या मातीतल्या परंपरेतून आले होते. साहजिकच या भूमीच्या परंपरेशी फटकून वागणारा इस्लाम त्यांच्या प्रभावाखाली आला नाही. भारताच्या फाळणीची अनेक करणे देता येतील. पण हे दोन्ही समाज वेगळे असल्याची जाणीव दोन्हीकडे प्रथमपासून होती. त्याची कारणे मुख्यत: धार्मिक होती आणि त्याला पंजाबमधल्या जमीनदारीची आर्थिक किनार होती. या सर्वाचा वेध घेणारे प्रा. बिमल प्रसाद यांचे, ‘पाथवेज टू इंडियाज् पार्टिशन’चे तीन खंड महत्त्वाचे.

आज जे मला दिसते त्यात वरील पुस्तकांचा महत्त्वाचा वाटा आहे. पण त्याने फार फरक पडत नाही. आनंद कुमारस्वामीसारख्या महापंडिताने म्हटले आहे, ‘‘भारतीय माणूस निरक्षर असेल, गरीब असेल पण तो असंस्कृत नाही. सांस्कृतिकदृष्टय़ा तो श्रीमंत आहे. .. भारतीय संस्कृतीत हे महत्त्वाचे नाही की ती भारतीय आहे.. ती अशी संस्कृती आहे की मानवतेच्या प्रवासात तिचे म्हणून असे काही योगदान आहे.’’ पंडित महादेवशास्त्रींनी संपादित केलेला दहा खंडांचा भारतीय संस्कृतीकोश वेगवेगळय़ा कारणपरत्वे चाळताना हे नेहमी जाणवते आणि, ‘‘तुम्ही भारतीय आहात आणि तुम्हाला त्याचा अभिमान नाही हे कसे शक्य आहे?’’ असे इंदिरा गांधींनी विचारले होते ते आठवते. मला वाटते हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा.  

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patriotic books bhakti patriotism of history curiosity ysh