राम मांसाहारी होता की शाकाहारी, यावर महाराष्ट्रात वादंग सुरू झाले आहे. भाजपने हा वाद अधिकच वाढविण्याचे ठरविलेले दिसते. राम मांसाहारी नव्हता, यावर ठाम असणारे लोक अप्रत्यक्षपणे मांस खाणे वाईट असल्याचेच मान्य करतात, हे स्पष्ट आहे. असे असले तरी, मांसाहाराला विरोध करणाऱ्यांतील अनेकजण उघडपणे किंवा चोरून मांसाहार करतात, हे सर्वांना माहीत असते. त्यांना ‘रामासाठी वाईट असलेले मांस’ खाण्यात अडचण येत नाही. पण त्यांच्या देवाला मांसाहारी म्हटल्याने मात्र राग येतो. त्यामुळे राम मांसाहारी असल्याचे कितीही पुरावे दाखविले तरी राम हा मांसाहारी होता, हे अशा लोकांना मान्यच होऊ शकत नाही.
प्रत्यक्षातला (तसे असेल तर) राम काय खात होता, हा त्यांच्यासमोरील प्रश्न नाहीच. त्यांच्या मनातला, त्यांना भारून टाकणारा, त्यांच्या मनात द्वेषाचा वणवा पेटवू शकणारा राम हा मात्र निश्चितपणे शाकाहारी आहे. कारण तो शाकाहारी असल्याशिवाय ग्रेट आणि सामान्यजनांपेक्षा वेगळा ठरतच नाही. त्यामुळेच प्रत्यक्षातल्या रामापेक्षा ज्याच्यावर अशा लोकांची आस्था आहे, तोच राम खरा. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयालाही रामजन्मभूमी ठरविण्यासाठी पुराव्यांपेक्षा लोकांच्या या आस्थेला अधिक महत्त्व द्यावे, असा साक्षात्कार झाला असावा, असे वाटते. दुसरी बाब म्हणजे, या निमित्ताने आपल्या विचारधारेला सातत्याने खटकणाऱ्या एका नेत्याविरुद्ध लोकांमध्ये क्षोभ निर्माण करण्याची संधी वाया घालवायची नसते. सामान्य लोक भोळे असतात. त्यांचा केव्हा आणि कसा वापर करायचा, हे चतुर आणि कारस्थानी लोकांना चांगलेच कळत असते. खरे म्हणजे कोणताही ऐतिहासिक महापुरुष असो. तो कितीही पूजनीय असो. त्याला आपल्या काळाच्या मर्यादा असतात. श्रेष्ठ पुरुष कमी-अधिक प्रमाणात काळाच्या पलीकडे पाहू शकतात, हे खरेच. पण त्यांना त्या काळाच्या मर्यादा पूर्णपणे ओलांडता येत नाहीत, हे मान्य केले पाहिजे. त्यामुळे त्या काळातील समज, प्रथा, परंपरा, आहार, वेशभूषा, भौतिक-अभौतिक सृष्टिविषयीचे ज्ञान यांचा प्रभाव त्या महापुरुषावर पडतोच. तो आपल्या सामर्थ्याने काही प्रमाणात नवीन सांस्कृतिक जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे जग म्हणजे तत्कालीन जगाचे काही प्रमाणात मॉडिफिकेशन असते. यात काही नवीन निर्मिती असली तरी त्याच्या या निर्मितीला कच्चा माल म्हणून तत्कालीन सांस्कृतिक घटकांचाच वापर करावा लागतो. आहाराच्या बाबतीतही तसेच आहे.
हेही वाचा – गरिबी कोणी कमी केली? ‘यूपीए’ने की भाजपने?
भगवान बुद्धांनी अहिंसेचा आग्रह धरला होता. परंतु त्यांनी मांसाहाराचा सर्वंकष निषेध केला नाही. कारण त्यावेळच्या समाजाचा आहारच तसा होता. वैदिकांना तर मांसाहाराचे किंचितही वावडे नव्हते. ज्याला मानवधर्मशास्त्र म्हणून गौरविले जाते, त्या मनुस्मृतीत मांसाहाराचे अनेक उल्लेख असल्याचे मान्य करावे लागते. तसेच आपल्या वैद्यक शास्त्रालाही मांसाचे वावडे नव्हते. भगवान बुद्ध आणि महावीर यांनी आपल्या शिकवणुकीतून अहिंसेचा पुरस्कार केला. तत्कालीन जनमानसावर त्यांचा आणि त्यांच्या उपदेशाचा प्रभाव पडला असल्याचे इतिहासावरून सिद्ध होतेच. परंतु तरीही तत्कालीन भारतातील लोक अनेक शतके बहुसंख्येने मांसाहारीच असावेत. बुद्ध- महावीर यांच्या प्रभावातून पुढे वैष्णव संत, महाराष्ट्रात वारकरी- महानुभाव संत, जोडीला अल्पसंख्याक पण प्रभावी असे जैन आदींनी आहिंसेचा विशेष आग्रह धरला. त्यातूनच जनमानसात शाकाहार प्रचलित झाला असावा आणि त्याला मान्यता मिळाली असावी. वैदिकांनीही पुढे मांसाहार सोडून शाकाहाराचे माहात्म्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. जणू काही आपणच शाकाहाराचे प्रणेते आहोत, असा त्यांचा आविर्भाव होता. तरीही जनसामान्य मात्र फक्त शाकाहारी कधीच राहिले नाहीत. पण संतांच्या प्रभावाने तसेच वैदिकांच्या धार्मिक आदेशांनी समाजात शाकाहारच श्रेष्ठ अशी मान्यता प्रस्थापित झाली. त्यामुळेच एकीकडे न चुकता मांसाहाराचा आस्वाद घ्यायचा आणि दुसरीकडे शाकाहाराचे श्रेष्ठत्व मान्य करायचे असा दुटप्पी व्यवहार प्रचलित झाला असावा. एकादशी, श्रावण अशा पुण्यसमयी मांसाहार वर्ज्य करण्याच्या पद्धतीतून हेच स्पष्ट होते. त्यामुळे आपला देव, राम हा मांसाहारी होता, हे कसे मान्य करता येईल? वर्तमानकालीन मान्यता भूतकाळावर लादण्याची अनैतिहासिक प्रवृत्ती भारतात सर्वत्र दिसून येत आहे. अलीकडे तर ती फारच वाढल्याचे दिसते.
हेही वाचा – ‘कशाला हवेत नगरसेवक?’ असे वाटण्याचे वेळ कोणी आणली?
राम हे ऐतिहासिक विभूतीमत्त्व असेल तर त्याच्या काळात; तो काल्पनिक असेल तर रामायण या ग्रंथाच्या कर्त्याच्या काळात, समाज जे खात असेल तेच राम खात असण्याची शक्यता आहे. तो समाज जर शाकाहारी असेल तर रामही शाकाहारी असण्याचीच शक्यता आहे. आणि तो समाज मांसाहारी असेल तर रामही मांसाहारी असणे स्वाभाविक नाही काय? परंतु दुटप्पीपणा हेच ज्यांचे वैशिष्ट्य आहे ते विशिष्ट समाजघटक आणि त्यांचे संधिसाधू राजकीय नेते, हे कसे मान्य करणार? ते आपलेच म्हणणे रामावर लादल्याशिवाय राहणार नाहीत, असे दिसते.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या देशातील कोट्यवधी लोकांना अर्धपोटी राहावे लागते, त्या देशात राम काय खात होता, हा ज्वलंत विषय राहू शकतो, हे आपल्या देशाचे दुर्दैवाचे ठरते, यात शंका नाही. जनतेने या नेत्यांना त्यांचा मुद्दाच नसलेल्या आरडाओरड्याला प्रतिसाद न देण्याची कटाक्षाने काळजी घ्यावी. असे झाले तरच राजकीय पक्षांना त्यांची खरी जागा आणि कर्तव्ये कळतील आणि ते आपल्या स्वार्थासाठी जनतेचा वापर करणार नाहीत.
harihar.sarang@gmail.com