दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असं म्हटलं जातं. पण गेल्या वर्षीपासून या सणामधून राजकीय विखारच भरून वाहतो आहे. सामान्य नागरिक खऱ्या अर्थाने दसरा या सणाचा आनंद लुटतात. विशेष म्हणजे यात कुठेही आकस, तिरस्कार यांची भावना नसते. असते ते केवळ निखळ, निरपेक्ष प्रेम.
इमारती, चाळी, रो हाऊस, बंगले इत्यादींच्या संकुलांत सायंकाळी एकत्र येत एकमेकांना आपट्याची पाने देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि गरबा – दांडिया खेळला जातो. यात कुठेही आरडाओरडा – गडबड गोंधळ नसतो. सर्व काही शांतपणे – नियोजनबद्धपणे होते. संकुलातील प्रत्येकजण उत्साहाने दसऱ्याचा आनंद घेतो. पण राजकारण्यांचा दसरा वेगळा असतो, असे चित्र दिसते.
शिवसेनेत दोन गट पडल्यापासून म्हणजे मागील वर्षापासून मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. यंदाही तसेच झाले. नाव दसरा मेळावा. पण दसरा या सणाचे महत्त्व जनहिताच्या दृष्टीने समाजासमोर मांडले गेले नाही. एकमेकांवर टीका करण्यासाठी वर्षाचे बारा महिनेही अपुरे पडावेत, अशी सध्या राजकीय चिखलफेक होते आहे. ती करता यावी आणि बघा तुमच्याचे संख्याबळ आमच्या तुलनेत कसे नगण्य आहे, हे दाखवण्यासाठीच जणू हे दसरा मेळावे घेतले गेले. या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याची केलेली ही स्थिती संतापजनक आहे.
हेही वाचा : नवीन भूमीवर नवे पॅलेस्टाईन?
एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी दसरा सणाचा उपयोग करायला या लोकांनी सुरूवात केली आहे. हे बंद करून दसरा मेळावा आदर्श पद्धतीने साजरा कसा करता येईल, यावर मंथन करण्याची तसदी घेतली जात नाही. उलटपक्षी आम्हीच कसे बरोबर याची टिमकी वाजवली जाते. काय तर म्हणे आम्ही हिंदुत्वाचे कैवारी. यांच्या हिंदुत्वात सण हा सणाप्रमाणेच साजरा केला पाहिजे या मुद्द्याला स्थान नाही, असेच दिसते. सणाचा सण म्हणून आदर करू शकत नाही, असले बेगडी हिंदुत्व काय कामाचे ? सणाचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाच नाही, सण म्हणजे खेळणे नव्हे, हे आपल्या राजकारण्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
प्रतिदिन राजकीय पातळीवरील तिरस्कारात भर पडत आहे. आता खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व लोकसभा निवडणुका जवळ येतील तसे बाहेर काढले जाईल. हिंदुत्व म्हणजे आम्ही करतो तेच, हा जो काही फुसका आव आणला जात आहे, तो हिंदू समाज ओळखून आहे. हिंदुत्व म्हणजे या समाजाच्या नावे राजकारण करणे नव्हे. आधी सण सणाप्रमाणे साजरे करण्यास शिकून मग हिंदुत्वाची भाषा करा. हिंदुत्वाच्या नावे संभ्रम निर्माण होत आहे. आपल्यामुळे असे होत असल्याचे सोयरसुतकही या लोकांना नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे केवळ घोषणाबाजी करण्यासाठी नाव घेऊन उपयोग नाही, तर त्यांच्याप्रमाणे जगणे जमते का ते पहावे.
हेही वाचा : पैशांपलीकडची सामाजिक संपत्ती
सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा जनतेला वैताग आला आहे. अहो, सणाला तरी आम्हाला सोडा आणि त्या सणाला अनुसरून बोला, असे सांगण्याची वेळ येणे यातच काय ते आले. या मेळाव्यांतून केल्या जाणाऱ्या राजकीय टीकेमुळे लोक आता या मेळाव्यांनाच कंटाळले आहेत. या मेळाव्यांची उत्सुकता केवळ संबंधित पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यापर्यंतच सीमित राहिली आहे. तिला व्यापक स्वरूप आणण्यासाठी आणि लोक त्यात सहभागी व्हावेत यासाठी राजकारण बाजूला ठेवत दसरा मेळावे पार पडतील का, हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे. या मेळाव्यांतून कार्यकर्त्यांनी तरी काय शिकावे ? ज्यांच्यावर या मेळाव्यांतून टीका झाली ते मेळावे संपल्यावर आरोपांना प्रत्युत्तर देतात. आरोप आणि प्रत्यारोप असेच या मेळाव्यांचे स्वरूप दिसते. दसरा झाला तरी हे सुरूच राहाते. या लोकांनी एका चांगल्या सणाचा विचका करून टाकला आहे. असेच हे मेळावे चालणार असतील तर दसरा झाल्यावर कधीही सभा घेऊन जे बोलायचे आहे ते बोला. पण दसऱ्याला राजकीय टीकेचे माध्यम बनवू नका. सण – उत्सव कुटुंबातील सदस्यांसह साजरे करता यावेत यासाठी नोकरी – व्यवसाय – शिक्षण यानिमित्ताने घराबाहेर असलेले घरी येतात. असे समाधान आपल्या कार्यकर्ते मंडळींनाही मिळावे असे वाटत नाही का ?
हेही वाचा : मग करून दाखवा पुष्पक विमानाची निर्मिती, पाठवा सूक्ष्म देह चंद्र-मंगळावर!
नेत्यांचे आदेश निघतात आणि कार्यकर्ते जातात. ये-जा करायला त्यांच्यासाठी बस, खासगी गाड्या असतात. शिवाय न्याहारी-जेवण यांची सोय असते. पण, हे सर्व करून परत घरी येताना पदरी काय असते? तर विखारी राजकीय टीका. ही आग कार्यकर्त्यांच्या मनात धगधगत राहाते आणि त्या बळावर स्थानिक राजकारण होत राहाते. अशी शिदोरी सामान्यांच्या उपयोगाची नाही. त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी प्रतिदिन किमान आठ तास तरी कामावर झिजावे लागते. तेव्हा कुठे त्यांचे कुटुंब चालते. भाषणबाजी करणाऱ्यांचा याच्याशी काही संबंधच नसतो.
राजकीय झुंजी लावण्यासाठी कोणीतरी पाहिजे म्हणून कार्यकर्ते नावाची ढाल पुढे करण्याला काहीच अर्थ नाही. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. असे म्हटले जाते आणि तसे दिसतेही. फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे चालू असलेले उद्योग बंद केले तर बरे होईल. जेणेकरून अन्य राज्यात उद्योग जात आहेत, या आरोपावर आवश्यक विचार करण्यास अवधी मिळेल. परिणामी येथील लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल.
हेही वाचा : बिहारची जातीय जनगणना राजकीय बदल घडवू शकेल ?
दसरा मेळाव्यांतून राजकीय टीका – टिप्पणी – टोमणे असेच चालू राहिले तर उद्या लोकच न्यायालयात जातील आणि या संदर्भात जनहित याचिका दाखल करतील. या मेळाव्यांत काय बोलावे, हे न्यायालायलाच सांगावे लागेल. या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे.
नवरात्र या सणाच्या नावाखाली राजकीय मनमानी करणे देवीलाही आवडणारे नाही. देवीचे भक्त होता येत नाही, तर राजकीय मनमानी करून चुकीचे पायंडे तरी पाडू नका.
jayeshsrane1@gmail.com