देवेंद्र गावंडे

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लोकसत्ताचे अ‍ॅप डाऊनलोड करून लॉग-इन करा

अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करा
download app

सध्याचा काळ वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सदेह घराघरांत पोहोचण्याचा. त्याचा फायदा सारेच उचलताना दिसतात. त्यात राजकीय पक्ष आघाडीवर. त्यात भर पडली ती महाराष्ट्रात गेली पावणेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीची. एकाशी काडीमोड, दुसऱ्याशी घरोबा, त्यातून सुरू झालेले पक्षफुटीचे राजकारण, यामुळे छोटा पडदा बहुतांशी राजकीय घडामोडींनी व्यापलेला. त्याचा परिणाम असा झाला की राज्यातल्या चार प्रमुख पक्षाचे प्रवक्ते सर्वाधिक काळ या पडद्यावर झळकत राहिले. समोर दिसणाऱ्या चलचित्रातील व्यक्तीचे केवळ म्हणणे ऐकून सोडून देणे हा भारतीय प्रेक्षकांचा स्वभाव नाहीच. मग तो नेता असो, अभिनेता असो वा प्रवक्ता. त्यांची बोलण्याची लकब, हावभाव, विशिष्ट शब्दांवर जोर देण्याची सवय, हातवारे करण्याची पद्धत या साऱ्यांची चिकित्सा घराघरांतून होऊ लागली ती प्रेक्षकांच्या या स्वभावामुळेच. फक्त पक्षाच्या प्रवक्त्यांपुरता विचार केला तर कोण चांगली बाजू मांडतो, स्वत:चे म्हणणे पटवून देण्याची पद्धत कुणात चांगली आहे, यावर समाजात चर्चा होत असते. हे लक्षात आल्यावर प्रत्येकच राजकीय पक्षांनी प्रवक्ते घडवण्याकडे लक्ष दिले. त्यातून अनेक नावे उदयाला आली व लोकप्रियसुद्धा झाली. अपवाद फक्त शिवसेनेचा (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे).

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’

या पक्षाने याकडे पुरेसे लक्ष दिलेच नाही. त्यांचा सारा कारभार संजय राऊत या एकखांबी तंबूवर विसंबून राहिला. आता तेच गजाआड झाल्यावर या पक्षाची झालेली अडचण सर्वांना जाणवू लागली आहे. माध्यमांना सहज उपलब्ध असणे, टू द पॉइंट व बिटविन द लाइन बोलणे, भाषेवर प्रभुत्व, परिस्थितीचे आकलन आणि तर्कबुद्धी ही कोणत्याही प्रवक्त्याची प्रमुख वैशिष्ट्ये. राऊत यांच्यात या साऱ्या गुणांचा समुच्चय होता. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते सतत झळकत असायचे. इतरांच्या तुलनेत त्यांची पडद्यावर वावरण्याची शैलीही थोडी वेगळी. त्यामुळे ते पडद्यावरून निघून गेल्यावरसुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात राहायचे. त्यांच्या सतत ‘दिसण्याचा’ व बोलण्याचा उबग आला होता असे शिंदे गटातील प्रत्येकजण आता म्हणत असला तरी त्यामागे असूयेची भावना जास्त असू शकते. शिवाय त्यांनी महाविकास आघाडी घडवण्यात बजावलेली, पण आता या गटाला पटेनाशी झालेली भूमिकाही कारणीभूत.

हेही वाचा… नागपुरात ‘उजळणीची गरज’ आणि दिल्लीत ‘अपमान’? ‘२२ प्रतिज्ञां’च्या बाबतीत भाजपची दुटप्पी भूमिका?

हा राजकीय वैराचा भाग वजा केला तर राऊतांनी सेनेची भूमिका दीर्घकाळ अतिशय समर्थपणे मांडली. याला कारणीभूत ठरली ती त्यांची पत्रकारितेची पार्श्वभूमी. आता ते मैदानात नसल्यामुळे सेनेची अनेक ठिकाणी पंचाईत होताना दिसते. वृत्तवाहिन्यांचा पैस विस्तारल्यावर सर्वच राजकीय पक्षांनी प्रवक्त्यांचे पॅनल तयार केले. कोण कुठे जाईल हे रोज ठरू लागले. इतरांप्रमाणे सेनेनेही ही कृती केली, पण त्यांच्या इतर प्रवक्त्यांना राऊतांची उंची गाठता आली नाही. कधीकाळी काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून उत्तम काम करणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींना सेनेने पक्षात घेतले, मात्र मराठीच्या अडचणीमुळे त्या राज्यात लोकप्रिय ठरू शकल्या नाहीत. मुळात राजकीय पक्ष ही काही दाखवता येण्याजोगी गोष्ट नाही. सामान्यांना दिसत असतो तो त्या पक्षाचा नेता व प्रवक्ता. नेते बाजू मांडण्याची कामे करीत नाही, ते काम प्रवक्त्यांचे. त्यामुळे त्यांच्या विधानांना कमालीचे महत्त्व असते. एखादी घडामोड घडल्यावर काही क्षणांत त्यावर पक्षाची भूमिका मांडणे सोपे नाही. त्यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणाचा, अंतर्गत घडामोडींचा अभ्यास असावा लागतो. राऊतांचा तो होता. रटाळ भाषेत पक्षाची भूमिका अनेकजण मांडतात. त्यामुळे प्रेक्षकही अनेकदा त्याकडे पाठ फिरवतात. राऊत अनेकदा शेरोशायरीचा आधार घ्यायचे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य जास्तीतजास्त लोकांपर्यंत वेगाने पोहचायचे. तशी शैली सेनेच्या इतर प्रवक्त्यांनी अजूनही विकसित केलेली दिसत नाही.

हेही वाचा… पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

जगभरात केवळ राजकारणच नाही तर इतर सर्व क्षेत्रांत प्रवक्त्याला कमालीचे महत्त्व आहे. भारतही त्याला आता अपवाद नाही, मात्र राजकीय प्रवक्त्याची रुजुवात भारतात काँग्रेसच्या काळात सुरू झाली. दीर्घकाळ सत्तेत राहिल्यामुळे नेते जास्त व प्रवक्ते कमी अशी या पक्षाची अवस्था झाली. याच काळात आधी प्रवक्ता व मग नेता होण्याची परंपरा सुरू झाली. ती याच नाही तर सर्वच पक्षांत आता रुजली आहे. तरीही काँग्रेसमध्ये उत्कृष्ट प्रवक्ते म्हणून आजही विठ्ठलराव गाडगीळांचे नाव घेतले जाते. सातत्याने विरोधी पक्षात राहिल्याने भाजपमध्ये आधी प्रवक्ता व मग संधी मिळाली तर नेता अशी परंपरा सुरू झाली. अरुण जेटली, प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, धर्मेंद्र प्रधान अशी कितीतरी नावे घेता येतील. विरोधात असताना प्रवक्ताच जनतेच्या न्यायालयात पक्षाची बाजू मांडणारा एकमेव वकील असतो. त्यामुळे भाजपचा जनाधार वाढवण्यात यासह अनेक नेत्यांनी प्रवक्ता म्हणून मोठी भूमिका बजावली. आता पक्षफूट व विरोधात बसण्याची वेळ आली असताना सेनेजवळ असा तोडीचा प्रवक्ता नाही ही या पक्षासमोरची सध्या सर्वात मोठी अडचण आहे. हे का घडले याला कारणही सेनेची रचना व नेतृत्वात दडले आहे. याला दुसरे कुणीही जबाबदार नाही.

हेही वाचा… अचलपूर-परतवाड्यात पुन्हा धार्मिक विद्वेषाचे निखारे

वृत्त वाहिन्यांच्या काळात प्रवक्ते मोठी भूमिका बजावू शकतात हे लक्षात येताच सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची फळी निर्माण करण्याकडे लक्ष दिले. भाजप व राष्ट्रवादीने तर प्रवक्त्यांची प्रशिक्षण शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यावर भर दिला. त्याचे दिसणे, वागणे, बोलणे, शैली याकडे बारकाईने लक्ष दिले गेले. शिवसेना या पातळीवर ढिम्मच राहिली. त्यांनी असे काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. सेनेने काही पत्रकारांना थेट राज्यसभेत संधी दिली, पण राऊतांचा अपवाद वगळता इतर कुणी प्रभाव टाकू शकले नाही. थोडेफार चांगले बोलणारा आहे की मग करा प्रवक्ता याला असाच सेनेचा कारभार राहिला. त्यामुळे इतरांकडून पक्षाच्या बाजूची प्रभावी मांडणीच होऊ शकली नाही. राऊत ते एकटेच हा डोलारा सांभाळत राहिले. आता ते उपलब्ध नसताना किमान या पातळीवर तरी पक्ष मागे पडत चालला आहे. उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरेंना रोज माध्यमासमोर येणे भाग पडते ते यामुळेच. सुभाष देसाई यांनी राऊतांच्या आधीपासून ही जबाबदारी पार पाडली, मात्र सध्याच्या ‘चंट’ जमान्यात त्यांच्यासारखा शांतपणे बोलणारा माणूस वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात कमी पडतो असे वाटतो. अनिल देसाई, विनायक राऊत बोलतात, पण प्रेक्षकांना आकर्षून घेणारी शैली त्यांच्याजवळ नाही. प्रवक्ते म्हणून लोकप्रिय होणे तर दूरच राहिले. त्यामुळे सेनेला सुषमा अंधारे या परिवर्तनवादी चळवळीतील व्यक्तिमत्त्वाला जवळ करावे लागले. त्यांनी दसरा मेळावा गाजवला, मात्र पक्षाच्या खाचा, खळगा यापासून त्या अजून दूर आहेत हे सतत जाणवत राहिले.

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

आता सेनेला या दिसण्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘प्रवक्ते’ या पदाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. चौफेर अभ्यास, समोरच्याला निरुत्तर करण्याची पद्धत, वेगवेगळे संदर्भ तोंडपाठ असणे, पक्षाची भूमिका मांडतानाच वाक्यावाक्यातून माध्यमांना स्वतंत्र व वेगळ्या बातम्यांसाठी खाद्य पुरवणे यासारखे उपजत गुण प्रत्येकात नसतात. त्यासाठी प्रशिक्षण व अभ्यासाची गरज असते. त्याकडे सेनेला आता लक्ष द्यावे लागेल. राजकारणात पर्यायाला कमालीचे महत्त्व आहे. एक नसेल तर दुसरा तयार ठेवावा लागतो. राऊत असल्याने ठाकरेंनी त्याकडे लक्ष दिले नाही. पण आता ही उणीव त्यांना भरून काढावी लागणार आहे.. प्रवक्ता नुसता बाजू मांडणारा हवा असे नाही तो सामान्यांना, विशेषत: प्रेक्षकांना आपलासा वाटायला हवा. याच भूमिकेतून सेनेला याकडे बघावे लागेल. इतर पक्ष व आता आठ वर्षे विरोधात बसल्यामुळे जागे झालेला काँग्रेस पक्षसुद्धा या प्रवक्तेपणाकडे लक्ष देत असताना सेनेची या मुद्द्यावरून पंचाईत होत असल्याचे सातत्याने बघायला मिळते…

devendra.gawande@expressindia.com

Story img Loader