भक्ती बिसुरे
करोना विषाणूने निर्माण केलेल्या महासाथीने जगभर हाहाकार निर्माण केला. जगभरातील कोट्यवधी नागरिकांना या संसर्गाने ग्रासले आणि लक्षावधी रुग्णांचा जीवही करोनामध्ये गेला. भारतही याला अपवाद नाही. भारतातून आता करोनाची महासाथ जवळजवळ संपुष्टात आली आहे, तरी करोनानंतर उद्भवलेल्या प्रकृतीच्या तक्रारींशी मात्र अनेक जण आजही दोन हात करत आहेत. करोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना त्यानंतर मधुमेह, हृदयरोग, मेंदूविकार, फुप्फुस आणि श्वसनविकार, अस्थिरोग अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे. ‘पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन’ म्हणून यातील आणि यासारखे बरेच त्रास रुग्णांना आजही होत असल्याची निरीक्षणे विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर नोंदवतात. त्यामुळे करोनाचा ज्वर ओसरला तरी करोनानंतरच्या काळात व्याधींचा ज्वर ओसरलाय असे म्हणायला अद्याप वाव नाही. प्रकृतीच्या याच गुंतागुंती आता ‘लाँग कोविड’ या नावाने ओळखल्या जातात.
करोनानंतर शरीरातील सगळेच अवयव किंवा परिसंस्थांवर दूरगामी परिणाम झाले. हृदय, मेंदू, अस्थि, फुप्फुसे… अगदी मनोविकारही याला अपवाद नाहीत. मात्र, उभ्या उभ्या एखादा माणूस कोसळणे आणि त्याचा मृत्यू होणे, व्यायाम, आहाराची शिस्त पाळणाऱ्या, कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला अचानक पक्षाघाताचा झटका येणे असे अनेक प्रकार गेल्या एक दोन वर्षांत दिसून येत आहेत. यातल्या बऱ्याच गोष्टींच्या मुळाशी लाँग कोविड असल्याचे डॉक्टर सांगतात.
घरीच बरे झालेल्यांपैकी काही…
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण बारी म्हणाले, ‘करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे किंवा रक्ताच्या गुठळ्या होऊन निर्माण होणारी गुंतागुंत अशा अनेक चिंतेच्या गोष्टी दिसून येतात. काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका हा केवळ ज्येष्ठांचा आजार होता. करोनापूर्वी वयाच्या चाळिशीत रुग्णाला आलेला हृदयविकाराचा झटका गंभीर समजला जाण्याचा काळ आला. आता करोनानंतर मात्र अगदी वयाच्या तिशीतील रुग्णांनाही हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारांसाठी दाखल करावे लागत आहे. करोना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना किमान रक्त पातळ करणारी औषधे दिली गेली, मात्र ज्यांना करोनाची लक्षणे जाणवली नाहीत आणि घरच्या घरी उपचारांनी जे रुग्ण बरे झाले त्यांना अशी औषधे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्यांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण लक्षणीय आहे. हृदयक्रिया (आकस्मिकरीत्या) बंद पडून होणारा मृत्यू हेही अलीकडच्या काळात वारंवार दिसून आले आहे. असे मृत्यू टाळणे शक्य आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेला कार्डिओ पल्मनरी रिस्युसायटेशनचे (सीपीआर) प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.’ आपल्या डोळ्यांसमोर एखादी व्यक्ती अचानक कोसळल्यास त्याला सीपीआर दिल्याने किमान डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत त्या रुग्णाची शरीर क्रिया सुरू ठेवणे शक्य असल्याचे डॉ. बारी यांनी सांगितले.
स्टिरॉइडने सांध्यांवर परिणाम
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नितीन भगली म्हणाले की, करोनातून बरे झालेल्या कित्येक रुग्णांमध्ये स्नायू आणि सांध्यांचे दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, अजिबात ऊर्जा नसणे अशा अनेक तक्रारी दिसत आहेत. सर्व प्रकारच्या चाचण्या करूनही त्यांच्या दुखण्याचे कारण काही निदान होत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये त्रासलेपणाची भावना प्रचंड आहे. जे रुग्ण करोनावरील उपचारांसाठी रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांत दाखल होते, ज्यांना स्टिरॉईड उपचार दिले गेले, त्यांच्यामध्ये अव्हॅस्क्युलर नेक्रॉसिसचे प्रमाण प्रचंड आहे.’ या रुग्णांना सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांशिवाय पर्याय नाही असे सल्ले दिले जातात व जातील, परंतु प्रत्यारोपण केलेल्या सांध्यांचे आयुष्य मर्यादित आहे, त्यामुळे रुग्णांच्या हालचाली, व्यायाम यांवर कायमस्वरूपी निर्बंध आले आहेत, असे निरीक्षण डॉ. भगली नोंदवतात.
करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसणारा आणखी एक प्रमुख त्रास म्हणजे पक्षाघाताचा झटका किंवा स्ट्रोक अशा आजारांसाठी मेंदू आणि मणकेविकार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसून आले. करोना या आजाराने थेट श्वसनसंस्थेवर परिणाम केला. त्यामुळे धाप लागणे, थकवा, वजन कमी होणे, स्नायूंचे दुखणे अशा अनेक तक्रारींसाठी छाती आणि श्वासरोग तज्ज्ञांकडे रुग्णांची गर्दी दिसून आली. निदानासाठी केलेल्या तपासण्यांमध्ये या रुग्णांना लंग फायब्रॉसिस असल्याचे निदान झाले. मात्र, जीवनशैलीतील बदल, औषधोपचार यांच्या मदतीने हे रुग्ण मोठ्या प्रमाणावर करोनापूर्व आयुष्य जगत आहेत, असे साधारण चित्र आहे.
‘पहिल्यासारखे’ जगता येईल?
डॉ. मुकुंद पेनूरकर म्हणाले, ‘अनेक रुग्णांमध्ये पूर्वी कधीही तपासण्या न केल्याने समोर न आलेल्या मधुमेहाचे निदान झाले. काही रुग्णांना करोना उपचारांमुळे दिलेल्या स्टिरॉईड्समधून मधुमेह झाल्याचे दिसून आले. ज्या रुग्णांना मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही त्यांनादेखील मधुमेह झाल्याचे दिसले. काही रुग्णांची साखरेची पातळी अत्यंत गंभीर प्रमाणात वाढल्याचे किंवा खाली गेल्याचेही या काळात दिसून आले. मात्र, योग्य उपचार, आहार, व्यायाम यांच्या मदतीने हे रुग्णही आता निरोगी आयुष्य जगत आहेत. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे निदान झाले. या आजारासाठी दीर्घकाळ औषधोपचार घेणे आवश्यक आहे.’ या आजाराचे रुग्ण पूर्ण बरे झाले असे चित्र नाही, मात्र त्यांच्या प्रकृतीतील गुंतागुंती कमी झाल्या आहेत, असेही डॉ. पेनूरकर स्पष्ट करतात.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच करोना साथरोगाचा जगाला पडलेला विळखा आता सैलावत असल्याचे आशादायक विधान केले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही दैनंदिन रुग्णसंख्या काहीशी कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे, मात्र लाँग कोविड म्हणून करोनाने केलेले दीर्घकालीन परिणाम अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. करोनाची लक्षणे दिसली नाहीत तरी बहुसंख्य लोकसंख्येला संसर्ग किंवा लसीकरण या दोनपैकी एका कारणाने करोनाचे संक्रमण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकृतीच्या कोणत्याही तक्रारींकडे दुर्लक्ष करणे अयोग्य असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.
bhakti.bisure@expressindia.com