‘दोषी’ असा शिक्का बसलेले पहिलेच माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ठरल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आता कैद होईल का, वगैरे निर्णय न्यू यॉर्कचे न्यायाधीश यथावकाश घेतीलच, कैद होईल किंवा होणारही नाही- पण तितका काळ मताधिकार गमावण्याची शिक्षा ट्रम्प यांना होऊ शकते. अमेरिकी कायद्यांमध्ये तरतूद अशी की, स्वत:चा मताधिकार गमावलेली व्यक्तीसुद्धा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकते! या तरतुदीचे पहिलेवहिले लाभार्थी ट्रम्पच ठरतील हे उघडच आहे- ‘मला दोषी ठरवणाऱ्या निकालात खोट आहे, खरा फैसला पाच नोव्हेंबरला (मतदारांकडून) होईल,’ असे म्हणत त्यांनी प्रचाराचा नारळही पुन्हा फोडलेला आहेच. पण मुद्दा निवडणूक लढवून ते जर जिंकलेच तर काय, हा आहे आणि त्याविषयी सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चेत भलेभले विद्वान, अनुभवी लोक उतरले आहेत.
पॉल क्रूगमन हे त्यांपैकी एक. अर्थशास्त्राच्या नोबेल (२००८) पारितोषिकाचे मानकरी क्रूगमन हे ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आर्थिक आणि राजकीय विषयांवरही स्तंभलेखन करतात. त्यांनी ‘ट्रम्प जिंकल्यास, २०२४ ची निवडणूक ही अमेरिकेसाठी ‘खऱ्या अर्थाने लोकशाहीतली’ अशी अखेरचीच निवडणूक ठरेल’ अशी इशाराघंटा वाजवली आहे! ती का, हे पुढे पाहूच. पण या क्रूगमन यांच्या मताला ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने संपादकीयातही दुजोरा दिलेला आहे ‘ट्रम्प यांनी निवडणूक पद्धती आणि गुन्हेविषयक न्यायपद्धती या दोहोंचे गांभीर्य घालवणारे प्रकार केलेले आहेत. निवडणूक आणि न्यायपालिका हा आपल्या लोकशाहीचा कणा आहे आणि ट्रम्प यांनी वार केल्यानंतरही तो मोडलेला नाही. ज्युरींनी न्यायालयीन निवाडा दिलेला आहे आणि ‘जनतेच्या न्यायालयात’ नोव्हेंबरमध्ये फैसला आहेच. पण आपले प्रजासत्ताक शाबूत राहायचे असेल, तर सर्वांनीच – अगदी ट्रम्प यांनीसुद्धा- या संस्थांचे गांभीर्य शिरोधार्य मानले पाहिजे… मग निकाल काहीही लागो’- असे न्यू यॉर्क टाइम्सच्या ३१ मे च्या अंकातला अग्रलेख सांगतो.
हेही वाचा…आव्हाने, संधी, उत्सुकता आणि हूरहूर…
ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी संधी मिळाली तर अमेरिकी व्यवस्थेवरच प्रहार होतील, ही चिंता काही आजची नाही. सहा जानेवारी २०२१ रोजी सशस्त्र ट्रम्पसमर्थकांनी थेट लोकप्रतिनिधीगृहावर हल्ला चढवून जो धुडगूस घातला होता, तेव्हापासून गेल्या चार वर्षांत विवेकीजनांना हीच काळजी आहे. पण ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षात पर्याय नाही हेही गेल्या सहा महिन्यांत, पक्षांतर्गत प्राथमिक फेऱ्यांतून स्पष्ट झाले. या फेऱ्या होत असताना ‘द ॲटलांटिक’ या वैचारिक नियतकालिकाने ‘ट्रम्प परतले तर काय?’ असा विशेषांकच काढला होता आणि त्यात हुकुमशहांचा इतिहास नेमकेपणाने अभ्यासणाऱ्या ॲने ॲपलबॉम यांच्यासह एकंदर २४ तज्ज्ञांचे लेख होते. यापैकी अनुभवी पत्रकार आणि दहा पुस्तकांचे अमेरिकी राष्ट्रीय पुरस्कार-विजेते लेखक जॉर्ज पॅकर यांनी माध्यमांच्या ऱ्हासाचा मुद्दा मांडला, तो लक्षणीय आहे. ट्रम्प माध्यमांना बोलावून मुलाखती देत, त्यामुळे माध्यमांच्या खपात वाढसुद्धा होई- पण प्रत्यक्षात, मुख्य प्रवाहातील माध्यमे आपल्या बाजूची नाहीत, ती अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या नावाखाली निव्वळ आपल्याला विरोध करतात, असा प्रचार ट्रम्प आणि त्यांच्या यंत्रणेने चालवला होता- अनेक धोरणात्मक घोषणासुद्धा त्या वेळच्या ‘ट्विटर’वर करून खुद्द ट्रम्पही माध्यमांना कमी लेखत होते. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन समर्थकांपैकी ५८ टक्के लोक आज ‘आमचा माध्यमांवर विश्वास नाही’ असे म्हणतात, हा अविश्वास ट्रम्प दुसऱ्यांदा आल्यास रसातळाला जाऊ शकतो.
‘फॉरेन अफेअर्स’ या प्रतिष्ठित, गेली शंभर वर्षे सुरू असणाऱ्या नियतकालिकातील ताजा लेख ‘किसिंजर अध्यासना’चे (जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ) प्राध्यापक आणि परराष्ट्र धोरणाविषयी आठ पुस्तकांचे लेखक हाल बॅन्ड्स यांनी, ट्रम्प यांच्या दुसऱ्या खेपेतील परराष्ट्र धोरणाबद्दल लिहिला आहे. मुळात ‘अमेरिका प्रथम’ असे म्हणणे हेच अमेरिकी परराष्ट्र धोरणासाठी नुकसानकारक आहे, युक्रेनसारख्या देशांचे तर त्यातून भले होणार नाहीच पण खुद्द अमेरिकेचे मोठे नुकसान होईल – जगभरचा उदारमतवाद आधीच अस्तमान होत असताना अमेरिकेने स्वत:च्या भल्यासाठी तरी उदारमतवादी धोरणे स्वीकारण्याची गरज असताना आपण त्याउलट टोकाला जाणे हे अमेरिकेला एकटे पाडणारेच ठरेल- असे बॅन्ड्स यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा…या मुलांना पुन्हा पहिलीत बसण्याची संधी द्यायला हवी…
नोबेल-मानकरी क्रूगमन हे त्याहीपुढला इशारा देतात. गाझा आणि इस्रायल यांसंबंधी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर लोक नाराज असू शकतात आणि त्याचे प्रतिबिंब निवडणुकीत उमटू शकते… पण मुळात, उमेदवारांचे धोरण आणि त्यांचे संभाव्य परिणाम तपासण्याची ही अमेरिकी सवय सामान्य अध्यक्षीय निवडणुकीत ठीक आहे… यंदा जर ट्रम्प यांच्याशी सामना असेल, तर ती काही सामान्य निवडणूक ठरणार नाही; खुद्द लोकशाहीच अशा निवडणुकीत पणाला लागणार आहे, असे क्रूगमन म्हणतात. ट्रम्प-विजयामुळे आपल्याला माहीत असलेल्या राजकारणापेक्षा निराळेच राजकारण सुरू होऊ शकते, कारण याआधीच ट्रम्प आणि त्यांच्या यंत्रणेने, “डेमोक्रॅट्सनी जिंकलेली कोणतीही अध्यक्षीय निवडणूक बेकायदाच” आहे ही कल्पना मुख्य प्रवाहात आणलेली आहे, असा दाखलाही क्रूगमन देतात. ट्रम्प यांचा विजय झाल्यास आर्थिक धोरणांमध्ये सातत्य, एकसंधता उरणार नाही. ‘अमेरिकेला पुन्हा महान करण्या’च्या नावाखाली इलॉन मस्कसारखे लोक अधिक गबर होऊ शकतील आणि हे असे मूठभर धनाढ्यच जसे पुतिन यांनी रशियातील सत्ता टिकवतात, तशी ‘अल्पाधिपत्यशाही’ (ऑलिगार्की) अमेरिकेतल्या लोकशाहीच्या नावाखाली सुरू होईल, असे क्रूगमन यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा… लोकमाता अहिल्यादेवींचा मानवताधर्म!
क्रूगमन यांनी भारतातील विरोधी पक्षीयांकडून प्रेरणा घेतली की काय, हा प्रश्न इथे अत्यंत वावदूक ठरतो. पॉल क्रूगमन हे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे आहेत आणि त्यांच्या विचारांमध्ये सातत्यही दिसते. त्यामुळेच त्यांचा इशारा हा निव्वळ राजकीय प्रलयघंटावाद म्हणून सोडून देता येणार नाही.
(समाप्त)