पहिल्या स्वरातच पुढील मैफलीचा अंदाज यावा आणि तो खरा ठरावा, असे पं. प्रभाकर कारेकर यांच्याबाबतीत अनेकदा घडत आले. घराणेदार गायकीचा परिणाम ठायी ठायी दिसतानाच त्यामध्ये स्वप्रतिभेचे शिंपण करण्याची त्यांची कलात्मक दृष्टी रसिकांना दाद द्यायला भाग पाडत असे. गळ्यावर ‘चढलेले’ संस्कार हळुवारपणे पण तितक्याच ताकदीने मांडण्याची त्यांची हातोटी वेगळी होती. त्यामागे असामान्य कष्ट, वेदना आणि असहाय परिस्थितीची पुंजी होती. संगीताच्या क्षेत्रात अशी पुंजी साठवलेल्या कलाकारांची यादी खूपच मोठी. संगीतावरच जगायचे असं ठरवून त्या ध्यासासाठी सारे आयुष्य वेचायची तयारी असणारे कलावंत आता विरळा. पण अगदी अलीकडेपर्यंत ज्या ज्या कलावंतांनी भारतीय संगीतात आपले स्थान पक्के केले, त्यांनी खाव्या लागणाऱ्या खस्ता ना त्यांच्या कलेत दिसून आल्या, ना त्यांनी कधी त्याचा जाहीर उच्चार केला. प्रभाकर कारेकर हे त्या पिढीतले शेवटचे शिलेदार.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोव्याच्या मातीत ज्या अनेक गुणी कलावंतांची मांदियाळी निर्माण झाली, त्यातीलच एक कारेकर. घरात गायन परंपरा नाही, पण आवड मात्र होती. मुलाचा गळा चांगला आहे, म्हणून त्याला गुरू मिळवून द्यायला हवा, यासाठी त्या काळात पित्याने छातीवर दगड ठेवून आणि भविष्याची काळजी न करता, दोन्ही मुलांना मुंबईत नेऊन सोडले. अतिशय गोड गळ्याच्या सुरेश हळदणकरांनी गाणे शिकवायचे मान्य करणे हीच इष्टापत्ती होती. हलाखीच्या स्थितीतही संगीताची आराधना करायची अशी जिद्द बाळगून कारेकरांनी शिकणे सुरू ठेवले. आज बालवयातच लोकांसमोर जाणाऱ्या कलाकारांना आणि खरेतर त्यांच्या पालकांना त्याचे मोल कळणे शक्य नाही. भविष्याची कोणतीही खात्री नसताना संगीतासारख्या अतिशय बिनभरवशाच्या वाटेला जाणे हे तेव्हा भिकेचे डोहाळेच होते.

हळदणकरबुवांनी कारेकरांना आपल्या घरीच राहायला बोलावल्याने त्यांचा निवासाचा प्रश्न सुटला आणि रियाजाचाही. गुरुमुखातून मिळवता येणारी आजही शिल्लक असलेली संगीत ही बहुधा एकच कला असावी. ध्वनिमुद्रिका ऐकून, त्याबरहुकूम गाता येते खरे, पण त्याला संगीत येणे असे म्हणत नाहीत. नक्कल आणि अस्सल यातला फरक लक्षात येण्यासाठी गुरूसमोर बसून त्याचे अनुभवाचे बोल कानामनात साठवून ठेवणे आणि ते आपल्या कलेत उतरवणे, हे वाटते तितके सोपे नाही. कारेकरांनी हे सारे केले ते संगीताच्या विशुद्ध प्रेमापोटी. दहा वर्षे गुरूकडे गाणे शिकल्यानंतरही स्वतंत्र मैफल करण्यास गुरूची परवानगी मिळवण्याची सक्ती असणाऱ्या काळात कारेकरांवर किती मोठे दडपण आले असेल, याची कल्पनाही आता कुणाला करवणार नाही. स्वत:ला सिद्ध करायची संधी सोडायची की गुरूचा रोष ओढवून घ्यायचा, यापैकी काहीही निवडले, तरी होणाऱ्या वेदना अपरिमित. कारेकरांना अशा संकटांना तोंड देत कलेची साधना करावी लागली. गुरुऋण ही संगीतातील सर्वात मोठी गोष्ट. पण त्याही पलीकडे कलावंत म्हणून सिद्ध करण्याची जिद्द बाळगून कारेकरबुवांनी जितेंद्र अभिषेकींसारख्या कमालीच्या सर्जनशील आणि तपस्वी कलाकाराकडे शिष्यत्वाची याचना केली. गुरूंना चांगला शिष्य मिळणे आणि शिष्यांना उत्तम गुरू लाभणे ही निदान संगीताच्या क्षेत्रातील अपूर्वाईची घटना. प्रभाकर कारेकर त्याबाबतीत नशीबवान खरेच. पं. सुरेश हळदणकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. सी. आर. व्यास यांच्यासारख्या कलावंतांकडून कारेकरांनी जी विद्या मिळवली, ती त्यांच्यासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाची होती. हे तीनही गुरू मैफली गवई असल्याने सादरीकरणातील बारकावे, खाचाखोचा आणि संगीताकडे पाहण्याची दृष्टी कारेकरांना प्राप्त झाली.

त्यामुळेच पहिल्या स्वरातच मैफल काबीज करण्याची क्षमता त्यांना मिळवता आली. रियाजाने गळा तयार होतो आणि गळ्यावरील संस्कार अधिक टोकदार होतात. पण त्याही पुढे जाऊन त्या संस्कारांवर स्वत्वाची झिलई चढवण्याची किमया साधणारा कलावंत अधिक काही मिळवण्याचा ध्यास धरू शकतो. देशभरातील उत्तमोत्तम संगीत महोत्सवात प्रभाकर कारेकरांनी गायन सादर केले, त्याला भरभरून दाद मिळाली. तरीही मनाची अतृप्तता हाच त्यांच्या कलेची उंची वाढवणारा घटक ठरला. कलेसमोर नतमस्तक होण्याचा त्यांचा स्वभाव आणि कला साध्य करण्यासाठी केलेल्या कष्टांची सततची जाणीव यामुळे त्यांचे गायन नेहमीच रसिकसापेक्ष राहिले. उत्तम आवाज ही निसर्गदत्त देणगी. पण त्यावर संस्कार करून संगीताबद्दलचे चिंतन आणि मनन यांचा समावेश करत आपले गायन अधिकाधिक समृद्ध कसे करता येईल, याचा विचार आयुष्यभर करणारे प्रभाकर कारेकर हे बहुमुखी कलाप्रकारांवर हुकमत गाजवणारे कलावंत ठरले. ‘श्रीरंगा कमलाकांता, हरि पदराते सोड’ या नाट्यपदाला अतिशय गोड गळ्याने नटवणारे पं. सुरेश हळदणकर, मराठी नाट्यसंगीताला एका नव्या सर्जनाच्या वाटेवर नेणारे प्रतिभावंत गायक संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी, मैफली गाजवणारे पं. सी. आर. व्यास यांच्यासारखे गुरू मिळालेले प्रभाकर कारेकर हे नशीबवानच. त्यांनी या तिघाही गुरूंकडून मिळालेल्या विद्योवर केलेला विचार त्यांच्या गायनात सहजपणे दिसतो. संगीतातील नाट्यमयता आणि अभिजातता यांचा सुरेख संगम कारेकरांमध्ये कायमच अनुभवायला मिळत असे. ख्याल गायनाचे शिवधनुष्य पेलणाऱ्यास ठुमरी, होरी, नाट्यगीतासारख्या ललित संगीतातही लीलया संचार करण्यासाठी प्रतिभावानच असावे लागते.

नाट्यसंगीत ही मराठी मनाच्या कलेची मशागत करणारा संगीतप्रकार. गेली सुमारे दीडशे वर्षे नाट्यसंगीताने मराठीजनांस रिझवत ठेवले, याचे कारण ते अभिजात संगीताचे अतिशय लालित्यपूर्ण लघुरूप होते. नाटक ही एक स्वतंत्र, स्वयंभू कला असली, तरीही त्यास संगीताचा मुलामा देण्यामागे रसिकांची उत्तम गाणे ऐकण्याची भूक होती, हे महत्त्वाचे कारण ठरले. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ती गरज ओळखली आणि एका नव्या कलाप्रकाराला जन्म दिला. त्याचे गारूड आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. प्रभाकर कारेकरांची नाट्यसंगीताची ओळख त्यांच्या ख्याल गायनाएवढीच, कदाचित काकणभर अधिक ठरली. ‘प्रिये पाहा, रात्रीचा समय सरुनि’ हे नाट्यगीत प्रत्येक मैफलीत गाण्याचा आग्रह करणारे रसिक कारेकरांच्या गायनातील चमकदारपणा पुन्हा पुन्हा ऐकू इच्छित असत. गळ्यात अतिशय गोडवा आणि संगीतातील सगळ्या अलंकारांचा सुयोग्य वापर यामुळे त्यांचे गायन अधिक रंजक ठरले. गळ्यात तान आहे, म्हणून तानेवरच भर देत आपला गळा फिरवत ठेवण्याची गरज त्यांना वाटली नाही. संगीत नाटकात भूमिका न करताही कारेकर नाट्यसंगीताचे बिनीचे शिलेदार ठरले. याचे कारण नाट्यसंगीताला बैठकीत सादर करण्यासाठी आवश्यक असणारे कलागुण त्यांच्यापाशी होते. हे संगीत आहे आणि ते त्याच्या नियमानुसार सादर करतानाही, त्यात भावभावनांना वाट करून देणाऱ्या जागा शोधण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यामुळेच संगीताकडे समग्रदृष्टीने पाहण्याचे भान त्यांना अवगत झाले.

प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने संगीत साध्य करण्यासाठी कमालीच्या हालअपेष्टा भोगणारे, पण त्याचा लवलेशही व्यक्तिमत्त्वात उतरू न देणारे एक कलापूर्ण व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे!

mukundsangoram@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhakar karekar music singing tradition art ssb