प्रवीण ठिपसे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंदनंतर कोण, असा प्रश्न अनेक वर्षे भारतीय बुद्धिबळप्रेमींना भेडसावत होता. त्याचे उत्तर हळूहळू मिळण्यास सुरुवात झाली आहे.

बुद्धिबळ या अलौकिक खेळाची जन्मभूमी असलेल्या भारताला या खेळावर आपले वर्चस्व मिळवण्यासाठी वेळ लागला. मात्र, माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदने बुद्धिबळविश्वात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले. त्यामुळे बुद्धिबळात भारताचाही दबदबा निर्माण झाला. मात्र आनंदनंतर कोण, असा प्रश्न अनेक वर्षे भारतीय बुद्धिबळप्रेमींना भेडसावत होता. त्याचे उत्तर हळूहळू मिळण्यास सुरुवात झाली. भारतात ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंचे प्रमाण वाढले. यापैकीच चार बुद्धिबळपटूंना यंदा बाकू, अझरबैजान येथे झालेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. विशेष म्हणजे, जेमतेम १८ वर्षांचा असलेल्या आर. प्रज्ञानंदने थेट अंतिम फेरीपर्यंतचा पल्ला गाठला. त्याच्या आणि अन्य युवा खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताची बुद्धिबळाच्या पटावरील झपाटय़ाने होणारी प्रगती पुन्हा अधोरेखित झाली.

अद्वितीय, अलौकिक कामगिरी

विश्वचषकाच्या अंतिम लढतीत प्रज्ञावान प्रज्ञानंदला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले, तरीही त्याची कामगिरी लक्षणीय होती. विश्वचषक स्पर्धेत मोठय़ा प्रमाणावर बुद्धिबळपटू सहभागी होतात आणि थोडय़ा विषमतेने सामने खेळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास अग्रमानांकित खेळाडू हा ६४ व्या स्थानी असणाऱ्या खेळाडूशी खेळतो, तर ३२ व्या स्थानी असणारा खेळाडू ३३ व्या स्थानी असणाऱ्या खेळाडूचा सामना करतो. प्रज्ञानंदचे ‘रेटिंग’ हे गुकेश आणि विदिथ गुजराथी यांच्यापेक्षा कमी असल्यामुळे तो स्पर्धेत ‘बॉटम हाफ’मध्ये खेळला. त्यामुळे सुरुवातीच्या काही फेऱ्या सोडल्यास प्रज्ञानंदसमोर चांगले ‘रेटिंग’ असलेल्या व नामांकित खेळाडूंचे आव्हान होते. फ्रान्सच्या मॅक्सिम लगार्डविरुद्ध प्रज्ञानंद यश मिळवेल, याची अपेक्षा कोणालाच नव्हती. आनंद व कार्लसनचा अपवाद वगळता लगार्डने इतर खेळाडूंना बऱ्याचदा नमवले आहे. चेक प्रजासत्ताकाच्या डेव्हिड नवाराविरुद्धही प्रज्ञानंद जिंकला. भारतीय सहकारी अर्जुन एरिगेसीविरुद्ध प्रज्ञानंदची कामगिरी वाखाणण्याजोगी झाली. एरिगेसी योजनाबद्ध खेळ करण्यात सक्षम समजला जातो. एकवेळ प्रज्ञानंद सामन्यात हरण्याच्या स्थितीत होता, पण निर्णायक स्थितीत प्रज्ञानंदने सामना जिंकण्यात यश मिळवले. या सामन्यात प्रज्ञानंदने दाखवलेले प्रसंगावधान विशेष कौतुकास्पद होते. त्यापूर्वी, त्याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला नमवले होते. नाकामुरा जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारातील सर्वात गुणवान बुद्धिबळपटूंपैकी एक मानला जातो. नाकामुराने जागतिक अतिजलद स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत कार्लसनही होता. अशा खेळाडूला अतिजलद प्रकारात नमवणे हे प्रज्ञानंदचे यश फार मोठे आहे. नाकामुराला नमवल्यानंतर प्रज्ञानंदच्या शेजारील पटावर खेळणाऱ्या कार्लसनने उठून कौतुक केले. अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाविरुद्धही पारंपरिक प्रकारात प्रज्ञानंद पराभवाच्या छायेत होता; परंतु कारुआनाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. यानंतर दहा मिनिटांच्या डावात प्रज्ञानंदने त्याच्यावर एकतर्फी विजय नोंदवला. कार्लसनविरुद्धच्या अंतिम लढतीत पारंपरिक पद्धतीचे दोन डाव बरोबरीत राहिल्यानंतर अनेकांच्या प्रज्ञानंदच्या बाबतीत आशा वाढल्या होत्या. परंतु, कार्लसन त्या दिवशी उत्तम खेळला. आनंदविरुद्ध २०१३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाच्या स्थितीत असताना तो पुनरागमन करत असे. त्याच पद्धतीने तो प्रज्ञानंदविरुद्ध खेळला आणि तो डाव जिंकला.

प्रज्ञानंदने या स्पर्धेत आपल्याहून चांगल्या चार खेळाडूंवर विजय मिळवला. पहिल्या फेरीत प्रज्ञानंदला पुढे चाल मिळाली आणि फक्त दोनच खेळाडू त्याच्यापेक्षा कमी क्रमवारी असलेले होते. इतर चार खेळाडूंना त्याने लीलया हरवले आणि कार्लसनविरुद्ध त्याने चांगला खेळ केला. तसेच, कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना बरोबरीचा विचार करतो, यातच खरे तर प्रज्ञानंदचे यश म्हणावे लागेल. त्यामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी निवडला गेला. आनंदनंतर ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा खेळणारा प्रज्ञानंद हा केवळ दुसराच भारतीय बुद्धिबळपटू आहे. तसेच, बॉबी फिशरनंतर या स्पर्धेत खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू आहे.

सुरुवात ‘ऑलिम्पियाड’पासून

भारतात झालेल्या ऑलिम्पियाडचा फायदा देशातील बुद्धिबळपटूंना झाला. यामध्ये खेळाडूंची निवड ‘रेटिंग’नुसार होते. तुम्ही कमी ‘रेटिंग’ असलेल्या खेळाडूविरुद्धही खेळू शकता. त्यामुळे खेळाडूची मानसिकता जिंकण्यापेक्षा डाव बरोबरीत राखण्याची अधिक असते. याच कारणाने कार्लसन व अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनसारख्या खेळाडूंची ऑलिम्पियाडमधील कामगिरी फारशी चमकदार नाही. भारतीय संघ यजमान असल्याने त्यांना दोन संघ खेळवता आले. त्यामध्ये तरुणांचा एक संघ होता, यामध्ये गुकेश, प्रज्ञानंदसारखे खेळाडू होते. स्पर्धा संपली तेव्हा गुकेशला वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले. कार्लसनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. निहाल सरीनला दुसऱ्या पटावर वैयक्तिक सुवर्ण मिळाले. तर, ११व्या मानांकित या युवा संघाने पदक जिंकले. दुसरा मानांकित भारतीय ‘अ’ संघ चौथ्या स्थानी राहिला. कार्लसनने जेव्हा दोन्ही संघांना पाहिले, तेव्हा पहिल्या संघापेक्षा दुसरा संघ मजबूत असल्याचे त्याने सांगितले. गुकेश, प्रज्ञानंद, निहाल व अर्जुन या खेळाडूंना आपण कार्लसनसारख्या आघाडीच्या खेळाडूंपुढे येऊ शकतो हे लक्षात आले. या चारही खेळाडूंचा विकास ऑलिम्पियाडमध्ये झाला. यापैकी गुकेश किंवा प्रज्ञानंद २०२६ वा २०२८ची जागतिक अजिंक्यपद लढत खेळण्याची शक्यता वाटते.

काही लक्षवेधी, काहींकडून निराशा

पुरुषांमध्ये बाद फेरी पद्धतीच्या विश्वचषकाच्या चौथ्या फेरीच्या पुढे यापूर्वी कोणताही भारतीय खेळाडू गेला नव्हता. स्वत: प्रज्ञानंद गेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभूत झाला होता. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत भारताचे चार खेळाडू पोहोचले, ही कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल. २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत चीनचे तीन खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत होते. त्यातूनच डिंग लिरेन जगज्जेता झाला. यंदा विदिथ गुजराथी व अर्जुनला आपल्याहून कमी ‘रेटिंग’ असलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळण्यास मिळाले. विदिथने आपल्याहून चांगली ‘रेटिंग’ असलेल्या रशियाच्या इयान नेपोम्नियाशीला पराभूत केले; परंतु त्याची कामगिरी प्रज्ञानंदपेक्षा सरस अशी म्हणता येणार नाही, कारण प्रज्ञानंदने आपल्याहून चांगल्या खेळाडूंना नमवले होते. महिलांमध्ये कोनेरू हम्पी ही गेली २० वर्षे या स्तरावर खेळत आहे. द्रोणवल्ली हरिका व हम्पी यापूर्वी पाचव्या फेरीत पोहोचल्या आहेत. त्यामुळे चौथ्या फेरीत हम्पी आणि पाचव्या फेरीत हरिका पराभूत होणे ही कामगिरी फारशी समाधानकारक म्हणता येणार नाही.

प्रशिक्षणाचा सरस दर्जा

‘ऑलिम्पियाड’ आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत संघ पाठवताना आपण एकाच मापदंडाचा उपयोग करतो. ज्यांचे ‘रेटिंग’ चांगले ते खेळाडू अशा स्पर्धाना जातात. मात्र, यामुळे जे चांगले खेळाडू आहेत, त्यांना संधी मिळत नव्हती. इतर देशांतही असे खेळाडू असतात. उझबेकिस्तान संघाला ‘ऑलिम्पियाड’मध्ये सुवर्णपदक मिळाले. त्यांना स्पर्धेत १४वे मानांकन होते. भारतात झालेल्या ‘ऑलिम्पियाड’मुळे या युवा खेळाडूंना संधी मिळाली. भारतीय खेळाडूंनी आम्ही चांगली कामगिरी करू शकतो हे दाखवून दिले. आताचे खेळाडू जगज्जेतेपद मिळवण्याच्या मानसिकतेने खेळतात. काही जुने खेळाडू आपल्या मानसिकतेत अडकल्याने त्यांची वेळ निघून गेली. युवा खेळाडूंनी मात्र कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही. ‘ऑलिम्पियाड’मध्ये भारतीय संघांना प्रशिक्षण देण्याची मला संधी मिळाली. सर्व प्रशिक्षक आपल्या परीने प्रयत्न करत होते. परंतु, भारताच्या दुसऱ्या संघाचे प्रशिक्षक, ते म्हणजे प्रज्ञानंदचे गुरू आर. बी. रमेश मला सर्वात भावले. भारतात प्रशिक्षणाचा दर्जा खूप चांगला आहे. ‘फिडे’ वरिष्ठ ट्रेनर हे पद सहा भारतीयांना देण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना चांगली संधीही उपलब्ध झाली आहे. तसेच, विश्वनाथन आनंदने मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारण्याचे ठरवले आहे. तसेच तो बऱ्याच खेळाडूंना मदत करतो. ‘ऑलिम्पियाड’च्या यशस्वी आयोजनानंतर भारताला निधीही चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना प्रशिक्षणासाठी साहाय्य केले जाते.

कार्लसनचा तिढा..

जगज्जेतेपद लढतीबाबत कार्लसनचे मतपरिवर्तन होईल, असे दिसत नाही. त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या प्रारूपात खेळायची नाही. कार्लसनच्या काही कल्पना आहेत, पण त्या मानणे किंवा न मानणे हा वेगळा मुद्दा आहे. या पारंपरिक पद्धतीला विरोध म्हणून मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा खेळत नाही. ती वेगळय़ा प्रकारची स्पर्धा असल्यास मी खेळेन, असे कार्लसनचे म्हणणे आहे. मात्र, कुठल्या प्रकारात खेळायचे याबाबतही त्याची स्पष्टता नाही. त्यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांच्या मदतीने जगज्जेता शोधत असते. सध्या असलेल्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेचा प्रकार हा चांगला आहे, असे ‘फिडे’ला वाटते. मात्र, कार्लसनचे मत वेगळे आहे, त्यामुळे तो जागतिक लढतीत खेळण्याची शक्यता कमीच आहे.

(लेखक भारताचे तिसरे ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू होते. सध्या प्रशिक्षक आणि संघटक आहेत.)
शब्दांकन : संदीप कदम

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pragnananda indian chess viswanathan anand world cup amy