‘काँग्रेसमुळे देशाची बदनामी’ झाल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे वृत्त (लोकसत्ता- ७ फेब्रुवारी) वाचले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला दिलेल्या उत्तरात नेहमीप्रमाणे पंतप्रधानांनी दुबळ्या काँग्रेसला लक्ष्य करत असताना आपल्या भाषणात एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावरकरांवर कविता प्रसारित करायची होती म्हणून त्यांना आकाशवाणीतून बडतर्फ केले.’ काही वर्षांपूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही आपल्या एका मुलाखतीत ‘आपण मुंबई आकाशवाणीच्या नोकरीत असताना सावरकरांची कविता सादर केल्यामुळे नोकरीतून बडतर्फ केले,’ असे सांगितले होते. त्याच मुलाखतीचा धागा पकडून माननीय पंतप्रधानांना भाषणाच्या वेळी हा संदर्भ पुरविण्यात आला असावा.
पंडितजी जे काही बोलून गेले ते आधारहीन आणि तथ्यहीन असण्याची शक्यताच जास्त आहे, असे दिसते. कारण त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वा कार्यक्रम अधिकाऱ्याने नोकरीतून इतके सत्वर नुसते निलंबित न करता बडतर्फच केले असेल तर त्या अधिकाऱ्याच्या तत्परतेला मानलेच पाहिजे. पंडितजींनी कोणत्या वर्षी आकाशवाणीची कोणती परीक्षा दिली होती आणि त्यांची निवड कोणत्या पदावर झाली होती; हे पंडितजींनी सांगणे अपेक्षित आहे. शिवाय त्यांना ज्या अधिकाऱ्याने बडतर्फ केले त्याचे नाव सांगण्यास काय हरकत आहे? आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये कलाकारांची कार्यक्रम विभागात निवड करत असताना ती दोन प्रकारे केली जाते, एक कायमस्वरूपी आणि दुसरी कंत्राटी पद्धतीने. कंत्राटी कामगारांना, कलाकारांना महिन्यातून सहा ड्युटी (सहा दिवस काम) देण्याची पद्धत आजही आहे. ज्या कर्मचाऱ्यांना/ कलाकारांना कायमस्वरूपी नोकरी मिळते त्यांना परीक्षा द्याव्या लागतात, त्यात उत्तीर्ण व्हावे लागते, तसेच मुलाखतीला सामोरे जावे लागते; तेव्हा कुठे त्यांची नोकरीत निवड होते. तीच पद्धत कंत्राटी कामगारांसाठी, कलाकारांसाठी, निवेदकांसाठी आजही योजिली जाते.
पंडितजी जेव्हा मुंबई आकाशवाणी केंद्रात नोकरीला लागले तेव्हा त्यांनी वरील दोनपैकी कोणती परीक्षा दिली असेल बरे? पंडितजींचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७चा आणि त्यांनी संगीतकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली १९५५ साली आलेल्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटापासून, तेव्हा त्यांचे वय अवघे १८ होते. आता त्यांच्या कारकिर्दीला ७० वर्षे पूर्ण झाली. या वरून अंदाज काढला तर, पंडितजी आकाशवाणीच्या नोकरीत १८ वर्षे पूर्ण होण्याआधी लागले असतील, असे गृहीत धरून चालू. कदाचित विशेष बाब म्हणून त्यांची ‘कायमस्वरूपी बालकलाकार’ म्हणून आकाशवाणीमध्ये नियुक्ती केली गेली असण्याची शक्यता अधिक आहे. १८ वर्षांच्या आतील कलाकारांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याची तरतूद ब्रिटिश काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळात करण्यात आली असेल काय, हा एक संशोधनाचा विषय आहे. पंडितजी स्वतः म्हणाले होते की, ‘मला आकाशवाणीमधून सावरकरांचे गाणे गायले म्हणून बडतर्फ करण्यात आले होते.’ आकाशवाणी केंद्रांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक दिग्गज मराठी साहित्यिकांनी कायमस्वरूपी वा कंत्राटी म्हणून काम केलेले आहे. पार मर्ढेकरांपासून ते माडगूळकर ते आनंद यादव यांच्यापर्यंत अनेकांचा त्यात समावेश होता. ‘पंडितजी आकाशवाणीत होते आणि त्यांना बडतर्फ करण्यात आले होते,’ हे पूर्वीही कुणी कुठेही सांगितले नव्हते आणि आता तर ती पिढी या जगात असण्याची शक्यताच संपलेली आहे. आता तरी पंडितजींनी पुढे येऊन ‘होय, आपण नभोवाणीच्या नोकरीत होतो आणि आपणास बडतर्फ करण्यात आले होते,’ हे सांगण्याची अत्यंत गरज आहे, कारण संसदेच्या पटलावर माननीय पंतप्रधानांनी केलेले भाषण ही ऐतिहासिक नोंद होते. संसदेच्या इतिहासात किमान चुकीची नोंद होऊ नये; यासाठी तरी पंडितजींनी पुढाकार घेऊन मनाचा मोठेपणा दाखवणे गरजेचे होते आणि खरे काय झाले होते, ते सांगणे अपेक्षित होते.
पंडितजींच्या भगिनी लतादीदीही नेहमी सांगत असत की, ‘मला मुंबई आकाशवाणी केंद्रावर आवाज चांगला नाही म्हणून डावलले गेले होते.’ खरे खोटे त्यांच्यासोबत गेले. निदान पंडितजींनी तरी माननीय पंतप्रधानांनी राज्यसभेत त्यांचे नाव घेऊन जे काही सांगितले, त्यावर व्यक्त झाले पाहिजे. ही अपेक्षा अप्रस्तुत नाही!
shahupatole@gmail.com
(‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकाचे लेखक)