लोक म्हणतात की, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल असलेला राग, आकस काही लपून राहिलेला नाही. ते लपवायचा प्रयत्नही करत नाहीत. संसदेमध्ये अनेकवेळा त्यांनी नेहरूंवर हातचं काहीही राखून न ठेवता टीका केली आहे. लोक म्हणतात त्यात खरोखर किती तथ्य आहे, जरा शोध घेण्याचा प्रयत्न करू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोक म्हणतात मोदी नेहरूंचा रागराग करतात, सतत त्यांना नावे ठेवतात. मला वाटतं लोकांचं हे मत मोदींवर अन्याय करणारं आहे. वस्तुस्थिती खरं तर याच्या उलट आहे. उदारीकरणाच्या काळानंतर, मृत्यूनंतर काहीशा विस्मृतीत गेलेल्या नेहरूंच्या स्मृती पुन्हा जिवंत करण्यासाठी त्यांच्यावर टीका, प्रसंगी कठोर टीका करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे मोदींइतकं कोणालाच ठाऊक नाही. समजा, मोदींपर्यंत झालेल्या पंतप्रधानांनी नेहरूंचं नेहमीच गुणगान गायलं तसंच मोदींनीही केलं असतं तर काय झालं असतं? फार काही फरक पडला नसता. जे लालबहादूर शास्त्री म्हणत असत, जे इंदिरा गांधी सांगत असत, ज्याबद्दल अटलबिहारी वाजपेयी अथवा डॉ. मनमोहन सिंग बोलत असत त्यापेक्षा वेगळा काही परिणाम साधला गेला असता का? शक्यता कमीच आहे.

हेही वाचा : वेदांमधून बुद्धिप्रामाण्याकडे नेणारे महर्षी दयानंद!

उलट आता ते नेहरूंवर जाणीवपूर्वक टीका करतात, जिथे गरज नसते तिथेही टीका करतात त्यामागील हेतू एकच असावा… लोकांनी ‘फॅक्ट चेकिंग’च्या नावाखाली का होईना वस्तुस्थिती पडताळावी. या रणनीतीनुसार, मोदी नेहरूंवर आरोप करतात, लोक जाऊन खरंखोटं करतात आणि नेहरूंच्या खऱ्या-खोट्या, चांगल्या-वाईट गोष्टी जगासमोर आणतात. तरुणांना कुतूहल वाटू लागतं. नेहरूंचं लोकशाहीप्रेम, समता, बंधुत्व, आधुनिकता, समानता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या मूल्यांविषयी असेलली निष्ठा हे सारं लोकांपर्यंत नव्याने पोहोचतं.

समाजवादासारखे मुद्दे कालबाह्य झाले असतील किंवा नसतीलही, कदाचित काळाच्या ओघात परत मुख्य प्रवाहात येतील किंवा कदाचित गरज संपल्यामुळे कायमचे नष्टही होतील. काहीही होऊ शकतं. पण या निमित्ताने लोक नेहरू वाचतात, समजून घेतात हे आपण पाहत नाही. यामध्ये मोदींचं कितीतरी मोठं योगदान आहे हे आपण नजरेआड करतो, हा अन्याय आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र हेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी!

सर्वात अलीकडे, नेहरूंनी देशवासियांना आळशी ठरवलं आणि नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते, असे दोन नवीन आरोप मोदींनी अनुक्रमे लोकसभेत आणि राज्यसभेत नेहरूंवर केले. आणि त्याचा परिणाम अपेक्षित असाच झाला. लोकांनी नेहमीप्रमाणे ‘फॅक्ट चेकिंग’ केलं. ‘आराम हराम है’ असा मंत्र देणारे नेहरू खरंच तमाम भारतीयांना आळशी म्हणाले होते का, हे शोधून काढलं गेलं. त्यामध्ये असं दिसलं की, नेहरू भारतीयांना आळशी म्हणाले नव्हते तर युरोप, अमेरिका, जपान येथील लोकांप्रमाणे आपणही अधिक मेहनत करायला हवी असं आवाहन त्यांनी १९५९च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये केलं होतं. हे आवाहन त्यांनी थेट लोकांना केलं होतं. त्यामध्ये लपूनछपून काहीच नव्हतं. दुसरा मुद्दा आरक्षणाचा. आरक्षणाच्या बाबतीत, भारतीयांना आरक्षण देण्याऐवजी शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं नेहरूंनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना २७ जून १९६१ रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलं होतं. त्यानुसार, ‘सर्वांसाठी शिक्षण’ हे धोरणही लागू करण्यात आलं होतं. या विस्मृतीत गेलेल्या बाबी लोकांना का नव्यानं समजल्या? कारण त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केले. मोदी यांनी नेहरू आरक्षणविरोधी असल्याची टीका परवा-परवा भर संसदेत केलीच नसती, तर त्या १९६१ पत्राच्या मूळ मसुद्याकडे पाहण्याचे कष्ट तरी कोणी आजच्या काळात घेतले असते का? ते अनेकांनी घेतले, म्हणून तर समजलं की, त्या पत्रात नेहरूंनी नमूद केलेली कळकळ तांत्रिक शिक्षणातही मागास वर्गीयांना आरक्षण देण्याची होती. ‘आयआयटीत राखीव जागा नकोतच’ अशी मागणी आजही आपल्या देशात अधूनमधून होत असते आणि अमेरिकेतल्या काही माजी आयआयटीयन्सचाही या मागणीला पाठिंबा असतो, हे लक्षात घेता या प्रौद्योगिकी संस्था सुरू करणारे नेहरू हेच त्या संस्थांतल्या आरक्षणाचा पुरस्कार करत होते, हा तपशील आज समजणं महत्त्वाचंच की!

पंडित नेहरूंची धोरणंच नव्हे तर त्यांच्या काळातील इतर नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध याबद्दलही मोदींनी अनेकदा जाणीवपूर्वक लोकांना ‘फॅक्ट चेकिंग’ ची प्रेरणा दिलेली आहे. त्यामागील त्यांचा उदात्त हेतू लक्षात न घेता त्यांच्यावर टीका करण्यात आली. उदाहरणार्थ, पंडित नेहरू यांचे सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा नेत्यांशी कसं वैर होतं याबद्दलही मोदींनी जाणीवपूर्वक लोकांना ‘फॅक्ट चेकिंग’ची संधी दिली. त्यानंतर पटेल हे स्वातंत्र्याच्या वेळी थकलेले होते, त्यामुळे गांधीजींनी दूरदर्शीपणाने पंडित नेहरूंना पंतप्रधानपदासाठी पसंती दिली, पहिली निवडणूक १९५२ला झाली त्यापूर्वीच १९५०मध्ये पटेल याचं निधन झालं होतं, त्यामुळे ते तेव्हा पंतप्रधान होणं शक्यच नव्हतं, अशा गोष्टी नव्यानं समोर आल्या. याच प्रकारे गांधी-पटेल या आधीच्या पिढीनंतर पुढल्या फळीतले नेहरू आणि बोस यांच्यामध्ये कसं स्नेहपूर्ण आणि आपुलकीचे नातं होतं हेही लोकांना कळलं.

हेही वाचा : इम्रान खान “प्लेयर ऑफ द मॅच”; लोकांनी तर कौल दिला, आता पाकिस्तानात काय होणार?

पंतप्रधान मोदी यांनी मनावर घेतलं नसतं तर यापैकी कितीतरी गोष्टींना उजळा मिळालाच नसता. ‘नेहरू हे थोर, धोरणी आणि दूरदर्शी नेते होते’ इतकीच माहिती घेऊन आताच्या आणि पुढच्या पिढ्या पुढे जाण्याचा धोका होता. तो मोठ्या कष्टाने मोदींनी दूर केला आहे. तरीही जर त्यांच्यावर नेहरूंचा राग करण्याचा, नेहरूंबद्दल आकस बाळगण्याचा आरोप होत असेल तर ते वेदनादायकच म्हणायला हवं!

((समाप्त))

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi s love for pandit jawaharlal nehru css
Show comments