पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश..
मी आज पाहतो आहे की भारताचे जनमन आकांक्षित जनमन आहे. अभिव्यक्त होणारा समाज कोणत्याही देशाचा सर्वात मोठा ठेवा असतो. समाजाच्या प्रत्येक वर्गात, प्रत्येक घटकात आकांक्षा उधाणावर आहेत. प्रत्येक नागरिकाला गती हवी आहे. प्रगती हवी आहे. ७५ वर्षांत उराशी बाळगलेली स्वप्ने आपल्याच डोळय़ांसमोर साकार होताना पाहण्यासाठी तो आतुर आहे. जेव्हा अभिव्यक्त समाज असतो तेव्हा सरकारांनाही काळासोबत धावावे लागते. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, स्थानिक स्वराज्य संस्था असोत, कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था का असेना, या प्रत्येक व्यवस्थेला, आपल्या अभिव्यक्त समाजाला उत्तर द्यावे लागेल. आपल्या या अभिव्यक्त समाजाने बराच काळ वाट पाहिली आहे. पण आता ती आपल्या येणाऱ्या पिढीला वाट बघायला लावू देण्यासाठी तयार नाही. आणि या अमृतकाळाची ही पहिली पहाट, या अभिव्यक्त समाजाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण गेल्या काही दिवसांत एका प्रचंड सामर्थ्यांचा अनुभव घेतला आहे. भारतात एका सामूहिक चेतनेचे पुनर्जागरण झाले आहे. हे पुनर्जागरण बघा, १० ऑगस्टपर्यंत कदाचित लोकांना ठाऊकही नसेल की देशाच्या गाभ्यात कोणती ताकद आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून ज्या प्रकारे तिरंग्यासंदर्भात, तिरंग्याची ही यात्रा घेऊन देश ज्या प्रकारे मार्गस्थ झाला आहे, मोठमोठे समाज अभ्यासक, सामाजिक विषयातले तज्ज्ञ, तेही कदाचित कल्पना करू शकत नसतील की माझ्या देशात किती प्रचंड सामर्थ्य आहे. हे एका तिरंगा ध्वजाने दाखवून दिले आहे. जेव्हा जनता कर्फ्यू म्हटले जाते, प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याचे पालन होते. ही त्या चेतनेची अनुभूती आहे. देश जेव्हा टाळी, थाळी वाजवून करोना योद्धय़ांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो तेव्हा चेतनेची अनुभूती होते. जेव्हा दिवे उजळून देश करोना योद्धय़ांना शुभकामना देण्यासाठी उभा ठाकतो तेव्हा त्या चेतनेची अनुभूती होते. करोनाच्या काळात सारे जग, लस घ्यायची की नाही, लस उपयोगी आहे की नाही या संभ्रमात होते त्या वेळी माझ्या गावातील गरीबही २०० कोटी लसमात्रा घेऊन जगाला थक्क करून टाकणारे काम करून दाखवतात. ही चेतना आहे. हेच सामर्थ्य आहे. या सामर्थ्यांने आज देशाला नवी ताकद दिली आहे.
आपण ज्या प्रकारे संकल्प घेऊन मार्गस्थ झालो आहोत, जग हे बघत आहे, आणि जगही याबाबत आशा बाळगून जगत आहे. आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य कुठे एकवटले आहे हे त्याला दिसू लागले आहे. मी याला त्रिशक्तीच्या – तीन सामर्थ्यांच्या- रूपात बघतो. ही त्रिशक्ती आहे अभिव्यक्तीची, पुनर्जागरणाची, आणि जगाच्या आशेची.
जेव्हा राजकीय स्थिरता असेल, धोरणांमध्ये वेग असेल, निर्णयांमध्ये गतिशीलता असेल, सर्वव्यापकता असेल, सर्वसमावेशकता असेल तर विकासासाठी प्रत्येक जण भागीदार होतो. आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन निघालो होतो. पण बघता बघता देशवासीयांनी त्यात ‘सबका विश्वास’ आणि ‘सबका प्रयास’ने त्यात आणखी रंग भरले आहेत. मला वाटते येणाऱ्या २५ वर्षांसाठी आपण पाच प्रणांवर – पाच निर्धारांवर- आपल्या शक्ती केंद्रित करायला हव्यात. आपल्या संकल्पांना केंद्रित करायला हवे. सन २०४७, जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होतील तोवर देशप्रेमींची स्वप्ने साकारण्याची जबाबदारी घेऊन पुढे जायला हवे.
पहिला प्रण* : आता देश मोठे संकल्प घेऊनच पुढे जाणार. आणि तो मोठा संकल्प आहे, विकसित भारत. आता त्यापेक्षा काहीच कमी नाही.
दुसरा प्रण : मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात, आपल्या आत, आपल्या सवयींत गुलामीचा एकही अंश अजूनही असेल तर त्यास कोणत्याही अवस्थेत राहू द्यायचे नाही. गुलामीने आपल्याला शत प्रतिशत जखडून टाकले होते. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत विकृती निर्माण केल्या होत्या. आपल्याला गुलामीशी जोडलेल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी जर कुठे दिसल्या, आपल्या आसपास दिसल्या.. तर आपल्याला त्यापासून आता मुक्त व्हावेच लागेल.
तिसरा प्रण : आपल्याला आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान असला पाहिजे. याच वारशामुळे भारताने कधी काळी सुवर्णकाळ अनुभवला होता. हाच वारसा आहे ज्यात काळानुरूप बदलण्याची सवय जडलेली आहे. ज्याने कालबा गोष्टींचा त्याग केला आहे, नावीन्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळेच या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा.
चौथा प्रण : एकता आणि एकजूट. देशात कोणी परका नसला पाहिजे. ही एकतेची ताकद ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या स्वप्नपूर्तीसाठी आपला निर्धार तडीस नेईल.
पाचवा प्रण : नागरिकांचे कर्तव्य. ज्यातून पंतप्रधानांनाही सवलत नाही, मुख्यमंत्र्यांनाही सवलत नाही.. तेही नागरिक आहेत.
आपण हे करू शकतो!
जेव्हा मी इथूनच माझ्या पहिल्या भाषणात स्वच्छतेबद्दल बोललो होतो तेव्हा देशाने त्या दिशेने वाटचाल सुरू केली. अस्वच्छतेविषयीचा तिटकारा हे आपले स्वभाववैशिष्टय़च झाले. हा देश करू शकतो. देश आखाती देशातील खनिज तेलावर अवलंबून आहे. अशा वेळी दहा टक्के इथेनॉल मिश्रणाचे स्वप्न मोठे आणि आपला पूर्वइतिहास लक्षात घेता, अशक्यप्राय वाटत होते. मात्र नियोजित कालमर्यादेआधीच देशाने हे स्वप्नही पूर्ण करून दाखवले. अडीच कोटी लोकांपर्यंत इतक्या कमी कालावधीत विजेची जोडणी पोहोचवणे हे छोटे काम नव्हते. देशाने करून दाखवले. लाखो कुटुंबीयांच्या घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे काम आज देश वेगाने करतो आहे. उघडय़ावर शौचाला जाण्याच्या परिस्थितीतून सुटका करून घेणे, आज आपल्या भारतात शक्य झाले आहे.
अनुभव सांगतो, की एकदा का आपण सगळेच संकल्प घेऊन त्या दिशेनं वाटचाल सुरू केली, की आपण निश्चित केलेली ध्येये नक्कीच गाठू शकतो. त्यामुळेच मी म्हणतो आहे की, आगामी २५ वर्षे ही मोठय़ा संकल्पाची असायला हवीत. आपल्याला गुलामीपासून मुक्त व्हायचे आहे. मला आशा आहे, ज्या पद्धतीच्या विचार मंथनातून, कोटय़वधी लोकांची मते विचारात घेऊन नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झाले आहे, त्या धोरणातला प्रत्येक अंश आपल्या मातीशी नाळ सांगणारा आहे. यातून आम्ही कौशल्यांवर भर दिला आहे, जे आपल्याला गुलामीपासून मुक्तीसाठीची ताकद देईल. जेव्हा आपण आपल्या मातीशी जोडले जाऊ तेव्हाच तर आपण उंच उड्डाण घेऊ शकू. तेव्हाच आपण जगाच्याही समस्या सोडवू शकू. आपण ते लोक आहोत ज्यांना निसर्गासोबत जगणे माहीत आहे, निसर्गावर प्रेम करणे माहीत आहे. आज जग पर्यावरणीय समस्यांचा सामना करत आहे. अशा वेळी जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर उपाययोजनेच्या दिशेने जाणारा मार्ग आपल्याकडे आहे, तो आपल्याला आपल्या पूर्वजांनी दाखवला आहे. जगभरातल्या व्यक्तिगत तणावाबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा लोकांना योगाभ्यास आठवतो. सामूहिक पातळीवरच्या तणावाची चर्चा होते तेव्हा भारताची कौटुंबिक व्यवस्था आठवते. संयुक्त कुटुंबासारखा मौल्यवान वारसा, जो वर्षांनुवर्षे आपल्या माता- भगिनींनी केलेल्या त्यागातून आपल्याकडे जी कुटुंब नावाची व्यवस्था विकसित झाली आहे, त्या वारशाचा अभिमान आपल्याला का वाटू नये? आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. एकता. एकसंधता. इतका मोठा देश, त्यातली विविधता आपल्याला साजरी करायची आहे. कितीतरी बंध, परंपरा.. कुणीही उच्च नाही कुणीही नीच नाही सगळे जण समान आहेत. सगळेच आपले आहेत ही भावना एकतेसाठी खूप आवश्यक आहे. घरातही एकता तेव्हाच जपली जाते जेव्हा आपण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करत नाही. लिंगभाव समानता ही आपल्या एकतेची पहिली अट आहे. जगात, ज्या ज्या देशांनी प्रगती केली आहे, त्यातून काही मुद्दे समोर येतात. एक शिस्तबद्ध जीवन, दुसरा कर्तव्यासाठी झोकून देणे. हा मूलभूत मार्ग आहे. म्हणूनच आपल्याला कर्तव्यावर जोर द्यावाच लागेल. हे शासनाचे काम आहे की २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मात्र दुसरीकडे नागरिकाचे हे कर्तव्य आहे की जेवढी जास्तीत जास्त युनिट वीज वाचवता येईल तेवढी वाचवली पाहिजे. पोलीस असो नाहीतर सामान्य जनता, शासक असो अथवा प्रशासक, हे सर्व घटक नागरिकांना लागू असलेल्या कर्तव्यांपासून वेगळे असू शकत नाहीत. प्रत्येकाने आपापले नागरिक कर्तव्य बजावले तर मला विश्वास आहे की आपण आपले उद्दिष्ट, वेळेच्या आधी गाठण्याची सिद्धी प्राप्त करू शकतो.
*‘प्रण’ या हिंदी शब्दाचा अर्थ प्रतिज्ञा, निर्धार असा होतो.