हिरालाल मेंढेगिरी
या वर्षातील ऑगस्ट व सप्टेंबर हे अतिपावसाचे महिने शिल्लक असून त्यावेळी धरणे ही भरलेली असल्याने जलाशयाचे परिचालन कार्यक्षमपणे करणे हे जलसंपदा विभागातील अभियंत्यासमोर आव्हान असेल.

जुलै २०२४ च्या चौथा आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागात सततच्या जोरदार पावसामुळे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी नेहमीप्रमाणे धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली, अशी टीका सुरू झाली. वास्तविक महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठ्याचे आकारमान ठरविताना पूर नियंत्रणासाठी वेगळी अशी पाणीसाठ्याची तरतूद करण्याची पद्धत नाही. तशी तरतूद केल्यास मोठ्या आकाराचे धरण नियोजित करावे लागल्याने भूसंपादन व पुनर्वसनाची व्याप्ती वाढ होऊन अनेक सामाजिक व आर्थिक व्यवहार्यतेचे प्रश्न निर्माण होतात. तरीही धरण नियंत्रक अभियंत्याद्वारे जलाशयाचे कार्यक्षम परिचालन करून काही प्रमाणात पूराचे पाणी तात्पुरत्या स्वरूपात धरणात साठवून पुराची तीव्रता कमी केली जाते.

During Deepotsava FDA urged food sellers to follow rules and warned against adulteration
दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण…
Pune Rural Police arrested 21 illegal Bangladeshi nationals in Ranjangaon Industrial Colony
पिस्तुलांची तस्करी रोखण्याचे आव्हान
Consumer Protection Act 2019, defects in goods and services., Consumer Protection, Consumer Protection news,
ग्राहक राजा सतर्क हो…!
new water purification project, water purification Bhandup Complex, Mumbai,
मुंबई : भांडूप संकुलातील नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामला सुरुवात, जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
Raghuram Rajan Against Excluding Food Inflation From Interest Rates
व्याजदर निश्चित करताना खाद्यान्न महागाईला वगळणे गैर- रघुराम राजन
pcmc to construct biodiversity park in talawade says commissioner shekhar singh
पिंपरी : तळवडेत साकारणार जैवविविधता उद्यान; स्वच्छतेची कामे करणाऱ्या कंपनीला ७६ कोटींचे काम

जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात आलेली धरणे ही मुख्यतः सिंचन, घरगुती, औद्योगिक व जलविद्युत निर्मितीच्या पाणी वापरासाठी आहेत. जून ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या कालावधीत उपलब्ध होणारा येवा व याच कालावधीत होणारा पाणी वापर विचारात घेऊन पावसाळ्याच्या शेवटी जलाशय पूर्ण क्षमतेने हमखास भरेल, असे नियोजन केले जाते. त्यासाठी मुख्य अभियंत्यांनी प्रत्येक द्वारयुक्त धरणासाठी जलाशय परिचालन सूची (सूची) म्हणजे ‘आरओएस’ मंजूर करावयाची असते. त्यामध्ये पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्या दिनांकास किती पाणीसाठा करावयाचे हे दर्शविलेले असते. म्हणजेच सुरुवातीच्या कालावधीत धरण पूर्णपणे न भरता टप्या-टप्याने भरून काही प्रमाणात पूर नियंत्रणासाठी जागा उपलब्ध ठेवलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात सुरुवातीच्या कालावधीत पूर आल्यास पुराचे पाणी साठविण्यासाठी जलाशयात जास्त जागा उपलब्ध असल्याने पुराचा विसर्ग (ऑऊटफ्लो) कमी करणे शक्य होते. मात्र पावसाळ्यात शेवटच्या कालावधीत धरण जवळ जवळ भरलेले असल्याने पूर आल्यास विसर्ग कमी करण्यासाठी अभियंत्यांना संवर्धन साठ्याची जोखीम घेऊन जलाशयाचे परिचालन करावे लागते. अशावेळी पाणलोट क्षेत्रातील पाऊस पूर्वानुमान अभ्यासून तसेच पडलेल्या पावसाची त्वरेने रिअल टाईम माहिती मिळवून त्याचे विश्लेषण करून येणारा विसर्ग व येवा अंदाजित करून जलाशयाचे परिचालन केल्यास धरणातून सोडायचा विसर्ग (ऑऊटफ्लो) कमी करून पुराचे पाणी काही प्रमाणात सामावून घेणे शक्य होते.

हेही वाचा : राजीव साने : एक सृजनशील विचारक

महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाचे मार्गदर्शक सूचनांनुसार जलाशयाचे परिचालन अलवचिक (रिजिड) ऐवजी अर्धंलवचिक (सेमी-रिजिड) सूची प्रमाणे करावयाचे आहे. म्हणजेच पावसाळ्यात पूर परिस्थिती नसताना सर्वसामान्य येवाच्या वेळी जलाशय पातळी मंजूर सूचीच्या महत्तम आलेखानुसार ठेवावयाची असते. मात्र तीव्र पुराचे पूर्वानुमान असल्यास पूर सामावण्यासाठी आगाऊ तयारी म्हणून जलाशय पातळी तात्पुरत्या स्वरूपात मंजूर सूचीच्या निम्न आलेखानुसार खाली आणून जागा करावयाची असते. महापुराचे पाणी (पीक इनफ्लो) धरणात पोहोचते, त्यावेळी तात्पुरत्या काळासाठी जलाशय पातळी सूचीच्या महत्तम आलेखाच्या वरही जाऊ शकते. म्हणजेच महापुराच्या वेळी सर्वसाधारण परिचालन सूचीऐवजी आपत्कालीन पूर नियमन सूची वापरावयाची असते. पुराची तीव्रता कमी झाल्यानंतर सामावून घेतलेले अधिकचे पाणी सोडून जलाशय पातळी सूचीच्या महत्तम आलेखानुसार आणावयाची असते.

या पद्धतीमुळे पुराचे पूर्वानुमान करून अगदी आधी परिचालन केल्याने धरणातून सोडत असलेल्या विसर्गावर (ऑऊटफ्लो) अंशतः नियंत्रण राहते. मात्र याप्रमाणे अर्धलवचिक सूची न वापरता तीव्र पूराच्या वेळी सूचीच्या महत्तम आलेखानुसार जलाशय पातळी ठेवून विसर्ग सोडल्यास व पूर कमी झाल्यानंतर लगेच जलाशय पातळी महत्तम आलेखानुसार ठेवण्यासाठी सोडलेला विसर्ग कमी केल्यास कमी कालावधीत पूर व्यवस्थापन झाल्याने पूर नियंत्रित करण्यात काही मर्यादा येतात.

हेही वाचा : बौद्धिक उपासमार आणखी किती काळ?

नदीची नैसर्गिक स्थिती असताना म्हणजे त्यावर धरण नसताना पुराच्या वेळी नदीमधील पाण्याची पातळी जसजशी वाढते, तसतसे काही प्रवाह तात्पुरत्या स्वरूपात नदीच्या पृष्ठभागावरील खाच-खळग्यात साठून (व्हॅली स्टोरेज) प्रवाह (पीक इनफ्लो) कमी होण्यास मदत होते. धरण असतानाच्या स्थितीमध्ये पूर आल्यानंतर जलाशय पातळी वाढू न दिल्यास नदीच्या खाच-खळग्यात पाणी न साठल्याने धरणाच्या ठिकाणी पोहोचलेला विसर्ग हा नदीची नैसर्गिक स्थिती असताना आलेल्या विसर्गापेक्षा जास्त येऊन लवकरही पोहोचतो. अशावेळी धरणातून सोडलेला विसर्ग (ऑऊटफ्लो) नैसर्गिक पुरापेक्षा जास्त असू शकतो. धरणात आलेला इनफ्लो जलाशयात पाणी प्रवेश करताना न मोजता जलाशय पातळीत होणाऱ्या वाढीनुसार हिशोबात घेतला जात असल्याने त्यात भर पडू शकते. म्हणून कार्यक्षम जलाशय परिचालन होण्यासाठी पुराचे पूर्वानुमान करून पूर सामावण्यासाठी आगाऊ तयारी म्हणून जलाशय पातळी खाली आणणे व महापुराचे पाणी धरणात पोहोचते त्यावेळी तात्पुरत्या काळासाठी जलाशय पातळी सूचीच्या महत्तम आलेखाच्या वर नेणे आवश्यक असते. ही पद्धत वापरल्यास धरणात येणाऱ्या विसर्गा (पीक इनफ्लो) पेक्षा सोडलेला विसर्ग (ऑऊटफ्लो) कमी क्षमतेने सोडणे शक्य होईल. सोबतच्या आकृतीत याचे विश्लेषण केले आहे. यामुळे महापुराच्या वेळी मालमत्ता व जीवित हानी कमी होईल. या वर्षातील ऑगस्ट व सप्टेंबर हे अतिपावसाचे महिने शिल्लक असून त्यावेळी धरणे ही भरलेली असल्याने जलाशयाचे परिचालन कार्यक्षमपणे करणे हे जलसंपदा विभागातील अभियंत्यासमोर आव्हान असेल. अशा परिस्थितीत नदीच्या उपखोऱ्यात अनेक धरणांची साखळी असलेल्या प्रणालीमध्ये महापुराच्या वेळी समन्वयाने एकात्मिक जलाशय परिचालन करून एकत्रित पुराचा विसर्ग खालील बाजूकडील मालमत्तेस धोका निर्माण करणार नाही किंवा कमीत कमी नुकसान होईल, याला महत्व देणे आवश्यक आहे.

लेखक जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव असून ‘जलाशयाचे परिचालन’ विषयाचे अभ्यासक आहेत.
ई-मेल- hiralal.mendhegiri @gmail.com