पद्माकर कांबळे
यंदाचा ‘जागतिक महिला दिन’ साजरा होत असतानाच काल-परवापासून समाजमाध्यमांवर, प्रिया दास ही युवती चर्चेत आहे. तिने ‘मनुस्मृती’ जाळत सिगारेट शिलगावली तसेच ते जाळून त्यावर चिकनही शिजवले. तिच्या या कृतीचा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित (व्हायरल) झाला. एका रात्रीत देशभरातील माध्यमांचे लक्ष तिने वेधून घेतले.
अनेक दैनिकांच्या संकेतस्थळांनी सदर वृत्त ठळकपणे दिले. हे वृत्त ‘लोकसत्ता’च्याही संकेतस्थळावर आहे.
सदर कृतीबद्दल माध्यमांसमोर स्पष्टीकरण देताना प्रिया दास म्हणाली की, ‘मनुस्मृती’ दहन हे प्रतीकात्मक आहे… मनुस्मृतीची ती ‘विचारसरणी’ (सोच) जी आजही अप्रत्यक्षपणे अस्तित्वात आहे… ती मला संपवायची आहे!
तिचे हे विचार लक्षात घेतल्यास, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, एका मुलीने सवंग प्रसिद्धीसाठी केलेला निव्वळ ‘स्टंट’ म्हणून या घटनेकडे पाहून सोडून देता येणार नाही!
जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर… समाजमाध्यमांचा वापर प्रभावीपणे करून घेत प्रिया दास या मुलीने एका रात्रीत सगळ्या देशाचे लक्ष स्वतःकडे वळवून घेतले हे मान्य करावे लागेल…
तिच्या वयाचे अनेकजण ‘इन्स्टाग्राम’वर ‘रील्स’ तयार करत असतात, त्याहीपेक्षा कित्येकजण ‘रील्स’ पाहात असतात, हे तिला माहीत असेलच, पण ती तेवढेच करत बसली नाही.
समाजकारण आणि राजकारणात येत्या काही वर्षात सक्रिय होणारी नवी पिढी किती ‘अभ्यासू’, ‘सजग’ आणि ‘धाडसी’ आहे याचं हे एक उदाहरण आहे…
प्रिया दाससारखी, उत्तर भारतातल्या- आजही सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या- भागातून आलेली एक मुलगी उघडपणे हे ‘धाडस’ करते, हेच अनेकांच्या पचनी पडणार नाही, मग तिचा त्यामागचा विचार दुर्लक्षित करून, केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी तिने हे केले, असे शिक्के मारण्यास बरेच लोक उत्सुक असणारच!
वास्तविक, स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी किंवा स्वतंत्र भारतातही अनेक समाजकारणी आणि राजकारणी यांनी जाहीररीत्या ‘मनुस्मृती’चे दहन केले आहे… मग प्रिया दासने निराळे काय केले, असाही प्रश्न काहीजण करतील… इथेच खरी मेख आहे!
पण यात ‘मनुस्मृती’दहन करणारी व्यक्ती ही पुरुष असे…जी महिलांप्रती असलेल्या भेदभावाच्या तसेच जातीव्यवस्थेच्या विरोधात स्वयंस्फूर्तीने ही कृती करत असे.
पण ज्या वेळी एक ‘मुलगी’ स्वतःहून याबाबत (पहिल्यांदाच!) पुढाकार घेते, तेही देशातील अशा भागातून… जिथे आजही पुरुषसत्ताक पद्धतीचा पगडा जबरदस्त आहे… त्यावेळी ‘महिला दिना’च्या निमित्ताने ही घटना निश्चितच वेगळी ठरते!
एकोणिसाव्या शतकात, ‘महिला कोणकोणत्या बाबतीत पुरुषांच्या बरोबरीने आहेत?’ या प्रश्नावर भारतात चर्चा झाल्या आहेत…
त्या वेळी या प्रश्नाचा, ‘एक दारू पिणे सोडल्यास… इतर सर्व बाबतीत महिला या पुरुषांच्या बरोबरीतच आहेत!’ असाही वैचारिक प्रतिवाद महिला समाजसुधारकांनी केला असल्याची उदाहरणे या महाराष्ट्राने पर्यायाने देशाने पाहिली आहेत.
त्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने प्रिया दास हिचे ‘सिगारेट शिलगावणे’, ‘चिकन शिजवणे’ यावर फक्त चर्चा न होता,
सामान्य घरातून आलेली एक मुलगी… तिच्या कुटुंबाला कोणतीही विशेष राजकीय पार्श्वभूमी नसताना, धाडस करत प्रवाहा विरोधात पोहायचा प्रयत्न करते आहे, अधिक लक्षात राहते…
तिची यामागील ‘वैचारिक कृती’ लक्षात घेतली जाईलच असे नाही, आज देशातील एकंदरच वातावरण पाहता प्रिया दास हिचा ‘मनुस्मृती’ जाळण्याच्या कृतीमागील विचार लक्षात न घेता, तिची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात न घेता… फक्त ‘सिगारेट’ आणि ‘चिकन’ यावरच चर्चा घडवून आणल्या जातील… आणि समाज माध्यमांतून ‘ट्रोल’ करत तिचे चारित्र्यहनन केले जाईल!
हेच घडूही लागले आहे… कारण आज भारतात ‘मनु’चा कायदा अस्तित्वात नसला, तरी मनुचे ‘चाहते’ असलेल्यांची संख्या आजही भारतीय समाज व्यवस्थेत काही कमी नाही!
पण प्रिया दासला हे असेच करावे लागले, ‘भारतीय समाज व्यवस्थेची पारंपरिक चौकट’ मोडायचीच आहे, याची आठवण तिला अशाच प्रकारे द्यावी लागली, कारण त्याआधीच्या विचारांकडे आपण आजवर दुर्लक्षच केले…
खरंच विचार करा की, आज एकविसाव्या शतकाचे तिसरे दशक उजाडले आहे… तरी किती भारतीय महिला ‘भारतीय समाज व्यवस्थेची पारंपरिक चौकट’ ओलांडण्याचा प्रयत्न करतात? (ही चौकट ओलांडणे म्हणजे पाश्चात्त्य चौकटीत जाणे नव्हे. गेल्या १०० वर्षांत पाश्चात्त्य पारंपरिक चौकटही तिथल्या कित्येकींनी ओलांडलेलीच आहे)
आज आपल्याकडेही ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ उत्साहात ‘साजरा’ केला जातो… म्हणजे काय केले जाते?
आपण या महिला दिनाचे सुद्धा ‘भारतीय पारंपरिक समाज व्यवस्थेच्या चौकटी’त बसेल असे ‘सुलभीकरण’ करत असतो.
आठ मार्च या दिवशीच आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो? कोणत्या पार्श्वभूमीवर ‘महिला दिना’ची सुरुवात झाली?
या प्रश्नांची उत्तरे बहुतांश भारतीय महिलांना आजही देता येत नाहीत!
दूरचित्रवाणी/वृत्त वाहिन्या, छापील प्रसारमाध्यमे, समाज माध्यमे, राजकीय आणि सामाजिक पक्ष/ संघटना… या सर्वांनी एका ‘इव्हेंट मध्ये रूपांतर केले आहे.
महिलांना खरोदीवर सूट (डिस्काउंट) ते नाचगाणी- खेळ व्हाया हळदीकुंकू समारंभ असा आपला महिला दिनाचा प्रवास असतो!
माध्यमेसुर्दंधा अशाच गोष्टींना प्रसिद्धी देतात. अशा प्रकारे महिला दिन ‘साजरा’ करण्याचे हे खूळ आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे!
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, स्त्री-वादी लेखिका, कार्यकर्ती बेटी फ्रीडन हिने, ‘कोणीही स्त्री म्हणून जन्मत नाही, स्त्रीत्व घडवलं जातं!’ ही जी भूमिका मांडली; ती ‘स्त्रीत्व घडविण्याची प्रक्रिया’ – त्या ‘स्त्रीत्वा’चा उपयोग पुरुषप्रधान जगालाच अधिकाधिक व्हावा अशाच प्रकारे स्त्रीला ‘आनंदी ठेवण्या’ची युक्ती- महिला दिना’च्या निमित्ताने अधिक जोरकसपणे होत आहे की काय अशी शंका घ्यायला पुरेसा वाव आहे!
आज महाराष्ट्रासारख्या प्रगत, पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यातही सत्तर-ऐंशीच्या दशकात ज्या प्रकारे महिलांच्या प्रश्नांवर आंदोलनं होत, तशी आज होताना दिसत नाहीत.याचा अर्थ महिलांचे सगळे प्रश्न मिटले/सुटले आहेत असा नाही…
जी काही आंदोलने होतात तीही सुट्या प्रश्नांवर…एक ‘स्त्री’ म्हणून एकत्र नाही…!
शहरी-ग्रामीण, शेतकरी-कष्टकरी, दलित-आदिवासी, बहुसंख्य-अल्पसंख्य हा भेदही त्यात आहेच!
हे वास्तव आहे की, आजही भारतीय समाजातील मोठा महिला वर्ग मोकळ्या मनाने ‘फुले-शाहू-आंबेडकर’ यांना आपलं मानत नाही… त्यांना जाणणं, पारंपरिक भारतीय स्त्रीत्वाची चौकट मोडण्यासाठी फुले आणि आंबेडकरांचा विचार का महत्त्वा याचा विचार करणं तर दूरच…!
आजही महिला जितक्या ‘उत्स्फूर्त’पणे सोसायटीच्या किंवा परिसरातील हळदीकुंकू किंवा इतर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात तितका सहभागी होण्याचा ‘उत्साह’ स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनी सोसायटी किंवा परिसरात होणाऱ्या झेंडावंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांकडून दिसतो का?
आपण संत गाडगेबाबा यांचे काय केले? त्यांना फक्त ‘स्वच्छते’ पुरते मर्यादित ठेवले! पण या गाडगेबाबा यांनी, हातात खराटा घेऊन फक्त गावे साफ नाही केली तर आपल्या कीर्तनातून लोकांची मनेही साफ केली… लोकांचे प्रबोधन केले. जसा गाडगेबाबा यांच्या या कार्याचा आणि त्यांच्या ‘दशसूत्री’चा आपल्याला विसर पडला, तसेच आपण ‘महिला दिना’चे केले आहे.
फुले- आंबेडकरांपासून बेटी फ्रीडनपर्यंत सारा स्त्रीवादी विचार बासनात बांधून, आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पूर्वपीठिकाही जाणून न घेता आपण एक ‘इव्हेन्ट’ साजरा करतो आहोत, अशा वेळी प्रिया दासने दिलेल्या धक्क्यामुळे तरी आपल्याला थोडीफार जाग येईल का?!
padmakarkgs@gmail.com