प्रतिष्ठेचा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ स्वीकारताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी १३ नोव्हेंबर रोजी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश.. ‘व्यावसायिकता’ हे मूल्य पत्रकारितेत रुजले की नाही याची चर्चा उपस्थित करतानाच, ‘वैचारिकते’चे व्यवसायनिष्ठ स्वरूप आणि वैचारिक बांधिलकीच्या नावाखाली पत्रकारितेने गाठलेली पातळी यांबद्दलही सांगणारा..

नमस्कार, अनंत भालेराव यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना एक प्रकारची धाकधूक वाटते. ज्यांच्याकडून लेखनप्रेरणा घेतली, त्या गोविंद तळवलकर यांना हा पहिला पुरस्कार मिळाला होता. अनंतराव भालेराव यांचं मोठेपण ऐकलं ते गोविंदरावांच्या तोंडून. हैदराबाद मुक्तिलढय़ातील शेवटच्या काळातील अनंत भालेराव आणि तळवलकर यांच्यातील पत्रव्यवहारही तळवलकरांनी दाखविला होता. अनंत भालेराव यांच्याबरोबर काम करण्याची किंवा नरहर कुरुंदकरांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैवच. अनंतराव माणसांत रमणारे; तर गोविंदराव माणसांशी कमीत कमी संबंध येईल असं वागणारे. हे दोन्ही पत्रकार किती मोठे हे सांगण्याची आवश्यकता नाही. या दोघांचा विचारवारसा पुढे नेण्यासाठी ‘त्यांच्या पावलावर पाऊल टाकून..’ म्हणता येणार नाही, पण काही अंशानं पुढे जाताना नम्रतेची आणि जबाबदारीची जाणीव हा पुरस्कार स्वीकारताना मनात नक्की आहे.

Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
98th All India Marathi Literary Conference
साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
Marathi people from abroad , Marathi Sahitya Samelan,
साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
Disagreements in sports over government authority Controversy over highest sports award again
सरकारच्या अधिकारावरून क्रीडाक्षेत्रात मतभिन्नता; सर्वोच्च क्रीडा पुरस्कार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

टिळक, आगरकर यांच्या पत्रकारितेचा दाखला नेहमी आम्हाला दिला जातो. त्यांच्यासाठी पत्रकारिता हे मुख्य साधन नव्हतं, त्यांची ध्येयं खूप मोठी होती. त्यांच्या ध्येयपूर्तीचं माध्यम पत्रकारिता होतं. मराठी पत्रकारितेत बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. मराठीचे आद्य पत्रकार, प्रणेते असे त्यांना म्हटले जाते. पत्रकारिता हा बाळशास्त्री जांभेकरांच्या आयुष्यातला सर्वात कमी कार्यक्षमतेचा कामाचा भाग. जांभेकर सात-आठ भाषांचे पंडित होते. फारसी, उर्दू, ग्रीक, लॅटिन अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. ते गणितज्ञही होते. मुंबईची वेधशाळा स्थापन करण्यामागे जांभेकरांचा वाटा होता. इंग्लंडचा इतिहास लिहिण्याचं काम जांभेकरांना दिलं गेलं होतं. त्यांना ‘दर्पण’पुरते मर्यादित करणं हा आपला करंटेपणा ठरेल. दर रविवारच्या बैठकांत जांभेकरांकडून प्रेरणा घेणाऱ्यांत दादाभाई नौरोजी होते. जांभेकरांच्या पत्रकारितेचा दाखला आताच्या पत्रकारितेला देणं, हा त्यांच्यावर आणि आताच्या पत्रकारितेवरसुद्धा अन्याय आहे.

‘हे त्यांचं ध्येय होतं, आता व्यवसाय झाला आहे,’ अशी शब्दांची खेळी करून ही तुलना केली जाते. त्याचा नेहमी माझ्या पिढीला फटका बसतो. चांगल्या अर्थाने व्यवसाय असणं काहीही वाईट नाही. व्यावसायिक नीतिनियमांचं, चौकटीचं आणि रिवाजाचं पालन करून एखादा व्यवसाय वाढत असेल तर तो वाढायलाच हवा आणि व्यावसायिकता असेल तरच व्यवसायही वाढू शकतो. ब्रिटनमधली, अमेरिकेतली पत्रकारिता व्यावसायिक झाल्यामुळेच वाढत गेली. भारतामध्ये खऱ्या अर्थानं आपण व्यावसायिकता अंगीकारलेलीच नाही. एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक अमुक पक्षाचा खासदार असेल, तेव्हा त्यांनी ती माहिती तळटिपेमध्ये दिली पाहिजे. वाचकांचा तो अधिकार आहे. व्यावसायिक नीतिनियमांमध्ये हे बसतं. पण आपला मार्ग अर्धवट इकडे आणि अर्धवट तिकडे असा. त्यामुळे पत्रकारितेच्या आवरणाखाली अनेक उद्योग करणारे वाढत गेले.

हा एकमेव व्यवसाय असा आहे जो मनाची मशागत करतो. पण ती करत असताना, हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांचा बौद्धिक दर्जा, सामाजिक बांधिलकी, हे जर वाचकांना माहीत नसेल तर मग ते त्यांच्यावर अन्यायकारक आहे. एक पद हाती असताना वाढलेल्या ओळखी परिचयातून निवृत्तीनंतर दुसरे काही उद्योग करू नयेत म्हणून ‘कूलिंग ऑफ पीरियड’ अनेक देशांत असतो. म्हणजे दोन-तीन वर्षे त्यानं अन्यत्र कुठंही काम करायचं नाही. असा नियम आपल्याकडे नाही अगदी सर्वोच्च न्यायालयातल्या सरन्यायाधीशांनासुद्धा नाही. ही व्यवस्थेशी प्रतारणा आहे. ती सातत्यानं आपण सहन करतो. पत्रकारांच्या बाबतीतसुद्धा ते होतं. व्यावसायिकता आणि पत्रकारितेची ध्येयवादी वाट यांत आताशा गल्लत होते. मूल्यमापन करताना जर पाश्चात्त्य निकष जर लावायचे असतील त्या निकषांना निश्चित करण्याची नैतिक व्यवस्थाही त्याच दर्जाची असायला हवी. आता टिळक-आगरकर आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ असे एकत्र नाही ना नांदू शकत.

पुढला मुद्दा हल्लीच्या एकंदर प्रसारमाध्यमांबाबत. या पत्रकारितेमुळे नव्या नायकवादाचा उदय झालेला आहे. एकदा तुम्ही नायक निश्चित केला की, खलनायक असायलाच हवा. त्याच्याभोवतीच सगळं खेळणं.. हे पत्रकारितेनं करू नये. पण आम्ही नेमकं तेच करतो. विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे हे जास्त होत गेलं. मग छापील वर्तमानपत्राच्या हातात काय राहतं? – नायकवादाच्या फुगलेल्या फुग्याला टाचण्या लावणं. कुठलाही विषय असू दे, नायकवादाचाच आरसा हा पत्रकारितेमध्ये प्रतिबिंबित होताना दिसतो. कारण खऱ्या विषयाकडे जाण्याची आमची बौद्धिक क्षमताच नाही. ‘वारा ज्या दिशेला जातो, त्याच्या विरुद्ध दिशेला नजर असायला हवी’ असे गोविंदराव तळवलकर नेहमी म्हणायचे. आता वारा ज्या दिशेने वाहतो, त्याच्या आधीच आम्हीपण त्या दिशेनं धावत सुटतो. ही पत्रकारिता नाही.

पत्रकारितेत व्यावसायिकतेचा भाग आपण अंगीकारणार आहोत की नाही? त्या अभावी महत्त्वाच्या मुद्दय़ांना, विषयांना हातच घातला जात नाही. आणि हा नायकवादाचा धोका डॉ. आंबेडकरांनी घटना लिहिताना वेगळय़ा संदर्भात दाखवून दिला होता. नायकवाद व्यक्तीला मोठं करतो. पण बरेच प्रश्न तसेच्या तसे राहतात. पूर्वीच्या पत्रकारितेत नायकवाद तसा नव्हता. युरोपमध्ये बौद्धिक परंपरेचा दबदबा निर्माण झाला, त्या रेनेसाँचा प्रभाव आजही आहे. महाराष्ट्र आणि भारतामध्ये रेनेसाँ झाला नाही. पण महाराष्ट्रामध्ये साठ, सत्तर, ऐंशीच्या दशकामध्ये पत्रकारितेत बौद्धिक परंपरेचा दबदबा निर्माण झाला त्या काळात गोविंद तळवलकर, अनंत भालेराव लिहायचे, रंगा वैद्य सोलापूरमधून, तर माडखोलकर नागपूरमधून लिहिणारे होते. आता का तसं नाही?
एक पत्रकार मला म्हणाले, ‘आता कोणाला वाचण्याची आवड राहिलेली नाही.’ एखादा मिठाईवाला कधी असं म्हणत नाही की, लोक आता मिठाई खात नाहीत म्हणून आम्ही दुकान बंद करू. शिंपी असतो, तो म्हणतो का? हल्ली लोकांना कापड आणून शिवलेले कपडे घालायला आवडत नाहीत म्हणून..? लोकांना वाचायला आवडत नाही, हे जर पत्रकारच म्हणत असतील तर तो पत्रकारिता करणाऱ्या व्यवसायातील लोकांचा पराभव आहे. लोकांना वाचायला आवडतं. लोकांना अधिक चांगल्या पद्धतीनं वाचायला द्यायला हवं, ही आमची जबाबदारी.

पुढचा मुद्दा जाहिरातींचा. अनेक जण अधिक जाहिराती बघून ‘काय हो, किती जाहिरात छापता?’ असं विचारतात, तेव्हा मी म्हणतो, ‘जाहिरात नको असेल तर ४५ रु. होईल अंकाची किंमत!’ त्यावर हे सर्व गप्प. आर्थिक आधार नाही म्हणून अनेक दर्जेदार पाक्षिकं बंद पडली. ‘सत्यकथा’, ‘मौज’चं काय झालं? पुण्याहून ‘माणूस’ काढायचे श्री. ग. माजगावकर, त्याचं काय झालं? बौद्धिक सुमारीकरणाचा आरोप इतरांवर करताना त्या-त्या वेळच्या सुमारीकरणामध्ये आपणही सहभागी आहोत, हा मुद्दाही वाचकांनी लक्षात घेतला पाहिजे.

मी पत्रकारितेमध्ये आलो त्या वेळी दोन गट असायचे – हा समाजवादी, तो संघीय. शहरी नक्षल, नक्षल असे गट जन्माला यायचे होते. पुढच्या ३५ वर्षांच्या प्रवासामध्ये मला असं जाणवलं की, कोणत्या तरी वैचारिक गटाच्या पोथिनिष्ठ बांधिलकीमुळे त्या-त्या विचारसरणीला वाहिलेले पत्रकार किंवा त्या-त्या विचारसरणीचा अंगीकार करणारे पत्रकार त्या-त्या विचारसरणीचाच उदो-उदो करतात. अशी विचारसरणीची व्यवस्था असेल तर त्या विचारसरणीला- पर्यायानं त्या विचारसरणीच्या नावाखाली चालणाऱ्या राजकारणाला किंवा समाजव्यवहाराला प्रश्न विचारलेच जात नाहीत. इथं मला कुरुंदकरांचं मोठेपण जाणवतं. ते संघाचे आहेत का, की समाजवादी, पण ते कम्युनिस्ट दिसतात.. अशी ही त्यांच्याविषयी ‘ओळखा पाहू कोण?’ अशी चर्चा बुद्धिवादी गटात होती आणि हे मी अनुभवलं आहे. वैचारिक बांधिलकी मानणाऱ्यांच्या पत्रकारितेच्या मर्यादा दिसतात. पण पत्रकारितेचा खरा दृष्टिकोन हवा तो सगळय़ांनाच प्रश्न विचारायला हवेत. आमची वैचारिक बांधिलकी ही पत्रकारितेशी असायला हवी. पत्रकारिता हीच एक वैचारिकता आहे. कुठलाही एक वाद परिपूर्ण नाही. गांधीवाद, मार्क्सवाद.. कुठलाही वाद घ्या, त्याच्यामध्ये जगातल्या सगळय़ाच प्रश्नांची उत्तरं आहेत असं नाही. मग असं असताना कुठल्याही विचारवादाशी पत्रकारानं का बांधून घ्यावं स्वत:ला? अलीकडे हा प्रश्न अधिक भेडसावतो, जाणवतोय.

प्रामाणिक व्यावसायिकता नसल्यामुळे आपल्याकडे माणसाची उभारणी करताना त्याच्या कपाळावर काही तरी शिक्का लागायला हवा आणि शिक्का नसलेलं कपाळ मिळालं की, समोरचा गांगरतो, असा माझा अनुभव आहे. हा ‘आपल्यातला’ आहे किंवा ‘त्यांच्या गटातला’ आहे, ही वर्गवारी अनेकांना हवी असते. मला वाटतं, ही अवस्था येणं वाईट आहे. त्यासाठी ‘अशा’ प्रकारची बांधिलकी नसावी. ही बांधिलकी व्यवसायाशी, व्यावसायिक मूल्यांशी असावी.

शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे तो म्हणजे पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाचा. बदलतं स्वरूप म्हणजे काय? मला असं वाटतं की, बातमी देणं हा काही आता फार कौशल्याचा भाग राहिलेला नाही. आता बातमी ‘स्वयंचलित’ झाली आहे. आता लंडनला काय घडलं, रशियाला काय घडलं, याची माहिती मोबाइलवर सोशल मीडिया किंवा ट्विटर असेल तुमच्यावर येऊन पडतेच. मग या बदलाला सामोरं जाण्यासाठी पत्रकारिता बदलली आहे का? ‘काय, कधी, केव्हा, कुठे, का आणि कसे’ यापुढे जाऊन पत्रकारितेचं काम काय असायला हवं? ‘आताच का?’ – ‘पुढे काय?’ ही उत्तरे जर पत्रकारितेला देता येत नसतील तर पत्रकं वाटणं आणि पत्रकारिता यामधील फरकच नष्ट होईल. आम्ही जर हे करू शकलो नाही – जे काही घडलं, त्यामध्ये पुढे काय, आताच का हे आम्ही जर सांगू शकलो नाही – तर मला असं वाटतं की, ती आमची मर्यादा आहेच आहे. बाकी काही जमलं नाही म्हणून पत्रकार झालो, या पातळीवर आपण येऊन थांबलेलो आहोत. विषयाच्या मुळाशी जाणं हा एक भाग जो या पत्रकारितेमध्ये अंतर्भूत असायला हवा, तो आपल्याकडे होता.

तो पुन्हा आणायचा असेल तर त्यासाठी हा बदल करायला हवा आणि यासाठी वैचारिकता असायला हवी. पत्रकारितेसाठी. अन्यथा जे सार्वत्रिक मनोरंजनीकरण सुरू आहे, त्या मनोरंजनीकरणातील अनेक विदूषकांमधले आम्हीही एक विदूषक बनण्याचा धोका दिसतोय. ‘का वाचायचं?’ याची उत्तरं जर मलाच देता येत नसतील तर माझे वाचक का वाचतील? ती उत्तरं शोधण्याची क्षमता आमच्यात तयार करणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं, एक चांगली परंपरा महाराष्ट्रात होती बुद्धिनिष्ठतेची. त्याचा कुठे तरी आठव यानिमित्तानं आपण करायला हवा. वैचारिकतेचा धागा कुठे तरी पुन्हा एकदा सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.. त्यासाठी वाचकांची साथ लागेल!

पुरस्कार स्वीकारतानाची भावना..
हा पुरस्कार मिळाल्याचा दूरध्वनी जेव्हा संस्थेच्या सचिव सविता पानट यांनी केला आणि पुरस्कार देण्याविषयीची बातमी दिली तेव्हा आठवलं विम्बल्डन संग्रहालय. त्या सभागृहातील गोरान इवानिसेविच यांच्या छायाचित्राखाली एक ओळ लिहिली होती. विजेतेपद पटकावल्यानंतर त्यानं व्यक्त केलं होतं – यापुढे माझा किमान माजी विम्बल्डन विजेता असा उल्लेख नक्की होईल. याप्रमाणे, यापुढे मराठी पत्रकारितेमधील अनंत भालेराव स्मृती पुरस्कार विजेता अशी माझीही ओळख राहील!


निजामाच्या जोखडातून बाहेर पडतानाच्या वेदना टिपणारे आणि हैदराबाद मुक्तिलढय़ानंतर मराठवाडय़ातील माणसांचा आवाज म्हणजे अनंत भालेराव. त्यांनी हैदराबाद मुक्तिलढय़ाचा इतिहास सलगपणे लिहिला. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील आवाज म्हणजे ‘दैनिक मराठवाडा’ असे त्यांच्या पत्रकारितेचे सूत्र होते. ते मराठवाडय़ातील पत्रकारितेची मानध्वजच. ‘शील, शालीनता आणि शैली असा संगम म्हणजे अनंत भालेराव. त्यांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवल्याने त्यांची पत्रकारिता कधीच विभागीय राहिली नाही,’ असे वर्णन गोविंद तळवलकरांनी करून ठेवले आहे. हैदराबाद संस्थानातील माणसे, त्यांची वैचारिकता हे अनंतरावांच्या लेखणीचा गाभा होती. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे यांच्यासारख्या तपस्वी व समाजहितासाठी झटणाऱ्यांच्या भूमिका आणि अनंत भालेराव यांची पत्रकारिता एकरूप झालेली होती. म्हणूनच विजय तेंडुलकर यांनी अनंतरावांची लेखणी ही माणसे ओळखणारी होती, असे म्हटले होते. एका अर्थाने अनंतरावांनी मराठवाडा जगवला, त्यांनी मराठवाडय़ाला जगण्याचे बळ दिले!

Story img Loader