ओ .पी . जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी या स्वायत्त शैक्षणिक संस्थेतील विधी शाखेच्या प्राध्यापिका व स्त्रीवादी लेखिका डॉक्टर समीना दलवाई यांच्या विरोधात ‘महिलांच्या प्रतिष्ठेची हानी’ आणि ‘धर्माच्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव’ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ‘मुस्लिम ओळख आणि विशिष्ट राजकीय विचारसरणी’ यामुळेच त्यांच्यावर असा गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्टपणे दिसते. हरियाणा राज्याच्या महिला आयोगाने स्वतःहून दखल घेत (सूओ मोटो) हा फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नक्कीच धक्कादायक आहे. हरियाणामध्ये भाजपचे हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यांनी नेमलेल्या महिला आयोगाने ही ‘कारवाई’ केली आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. या कारवाईचा जागतिक पातळीवर निषेध केला जाणे हे नक्कीच लक्षणीय आहे.

समीना दलवाई यांच्याविरुद्ध केली गेलेली अन्याय्य कारवाई हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणायला हवे. कारण ही अपवादात्मक घटना नाही, हे ठळकपणे लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात पुरोगामी, उदारमतवादी विचार मांडणाऱ्या प्राध्यापक, शिक्षकांना ठिकठिकाणी त्यांच्या शाळा, कॉलेज आणि संस्थांमध्ये हिंदुत्ववादी विद्यार्थी आणि बजरंग दलासारख्या संघटनांकडून कोंडीत पकडण्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत आणि घडत आहेत. या विषयी संबंधित प्राध्यापक आणि शिक्षणसंस्था उघड बोलायला कचरत आहेत. स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता या संवैधानिक मूल्यांच्या आधारावर शिक्षण देणाऱ्या प्राध्यापक व शिक्षण संस्थांवर देशभरात विविध पद्धतीने दबाव आणला जात असल्याचे पुढे येत आहे.

chairperson state women commission rupali chakankar on alandi unauthorized warkari educational institution
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर दोन दिवसांत करवाई करा; राज्य महिला आयोगाच्या सूचना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bopapur school, Bopapur teacher suspended ,
अजबच! दोन शिक्षक मारामारी करतात आणि विद्यार्थ्यास बदडतात, अखेर निलंबित ?
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
teaching being hampered due to various committees are being formed
अबब, राज्यातील शाळांत १८ समित्या! शिक्षक मग शिकवितात केव्हा?
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा

हेही वाचा – मियाँ तानसेनच्या घराण्याचा वारसदार; विलंबित ख्याल गायकीवर प्रभुत्व

अशा घटनांविषयी एक अहवाल कोल्हापूरमधील ‘शांतीसाठी स्त्री-संघर्ष मंच’ या महिलांच्या आघाडीने नोंदला आहे. या अहवालानुसार कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरगाव, कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज, श्री विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी, सेवन्थ डे ॲडवांटिस्ट स्कूल, कोल्हापूर तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, पाचवड, सातारा, कोल्हापूर आणि हुपरी या ठिकाणच्या कॉलेजमधील शिक्षक, प्राध्यापक आणि संस्था चालकांना त्यांच्या सामाजिक प्रश्नांवरील मतांसाठी किंवा हिजाबच्या मुद्द्यावरून किंवा ‘लव जिहाद’च्या प्रश्नावरून हिंदुत्ववादी जमावाने त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी अनेक प्रकरणात ‘स्त्री प्राध्यापकांना समोर हजर करा आणि माफी मागायला लावा’ अशी मागणी करण्यात आली. तर काही प्रकरणात अशा ‘वादग्रस्त’ वाटणाऱ्या प्राध्यापकांची बदली करा’ असा आग्रह धरण्यात आला. पुणे, अहमदनगर जिल्ह्यातही अशा घटना घडल्या आहेत. मात्र त्याविषयी ‘व्यक्तिगत दडपणा’मुळे उघडपणे बोलले जात नाही.

अनेक ठिकणी या घटना घडवणाऱ्या हुल्लडबाजांना स्थानिक हिंदुत्ववादी पुढाऱ्यांचा किंवा राजकारण्यांचा छुपा पाठिंबा असतो. हीच मंडळी मध्यस्थी करायला येतात. कधी अडचणीत आणल्या गेलेल्या प्राध्यापकांवर दबाव आणतात, तर कधी ‘तडजोड’ म्हणून प्राध्यापकांची बदली केली जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्था चालक एकटे पडतात. त्यामुळे ते अशा हुल्लडबाजीला शरण जातात. परिणामी संवैधानिक मुल्यांचा किंवा रास्त शिस्तीचा आग्रह धरणाऱ्या प्राध्यापकांना प्राप्त परिस्थितीसमोर मान तुकवावी लागते.

अशा काही प्रकरणांत वर्गात शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे बोलणे त्यांच्या पूर्व परवानगीविना, बेकायदेशीरपणे वर्गातील विद्यार्थ्यांनी हेतुत: रेकॉर्ड केले आणि त्यात मोडतोड करून ते व्हायरल केले गेले. सदर प्राध्यापक ‘हिंदू विरोधी’ आहेत’ इ. अपप्रचार केला गेला. त्यांना ‘ट्रोल’ केले गेले. तसेच त्यांनी माफी मागावी यासाठी शिक्षण संस्थेवर दबाव आणणे असे प्रकार घडले आहेत. विशेषतः स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या संघटना किंवा विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाज गटातर्फे दबाव आणण्याच्या घटना घडत आहेत. तर मोठ्या शहरांपासून दूर असणाऱ्या लहान गावातील कॉलेजच्या संवैधानिक मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या प्राध्यापकांवर आणि प्राचार्यांवर हिंदुत्ववादी विद्यार्थी गट आणि संघटना दबाव आणत आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

अहमदनगर शहरात हिंदुत्ववादी विद्यार्थ्यांच्या गटांनी स्थानिक महाविद्यालयात कोणते कार्यक्रम घ्यावेत, कोणते घेऊ नयेत यामध्ये उघड उघड हस्तक्षेप करण्याच्या घटना घडल्या आहेत. वरील सर्व घटनांविषयी ‘सलोखा संपर्क गटा’तर्फे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर इत्यादी भागातील धार्मिक हिंसाचाराचा एक अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. या सर्व घटना ‘स्वतंत्र’ घटना म्हणून सुट्यासुट्या पाहता येणार नाहीत. महाराष्ट्रातील शैक्षणिक वातावरणात ‘धार्मिक ध्रुवीकरण’ करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे. महाराष्ट्रात फुले आंबेडकर, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, कोकण एज्युकेशन सोसायटीचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले ना. गो. पाटील यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांनी समतावादी, लोकशाहीवादी मूल्ये देणाऱ्या शिक्षण संस्था उभारल्या. दलित-बहुजन-अल्पसंख्य समाजात शिक्षण प्रसार केला. या परंपरेला छेद देण्याऱ्या संकुचित एककल्ली धार्मिक वर्चस्वाची मूल्ये विद्यार्थ्यांच्या गुंडगीरीच्या माध्यमातून लादण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे.

यासाठी हे विशिष्ट तंत्र वापरले जात आहे. शाळा महाविद्यालयात समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मुल्यांचा प्रसार करणाऱ्या प्राध्यापक शिक्षकांना ‘हिंदुत्ववादी’ भूमिका घेण्यास भाग पाडायचे. वर्गात शिक्षक एकटा असतो. खोडसाळपणे प्रश्न विचारून त्यांना वादात ओढायचे. त्याचा व्हिडीओ करायचा आणि पाच दहा हुल्ल्डबाज विद्यार्थ्यांनी त्यांची कोंडी करायची हे ते तंत्र. एखाद्या प्राध्यापकाला असा त्रास दिला तरी केवळ त्या कॉलेजमधीलच नाही तर आसपासच्या शाळा कॉलेजमधील प्राद्यापक आणि संस्था चालकांवर वचक बसतो. भीतीचे वातावरण पसरते. ही झुंडशाही आहे. शाळा कॉलेजमधील प्राध्यापकांना आणि संस्था चालकांना संभावित मार्गानी ‘झुंडबळी’ दिले जात आहे!

दुसऱ्या बाजूला शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यातून काय संदेश दिला जात आहे? अशा हुल्लडबाजीला सरकारचा पाठिंबा आहे. अनेक प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी ‘शांतता सुव्यवस्था’ टिकावी म्हणून कोंडी केलेल्या प्राध्यापकांनाच ‘दिलगीरी’ व्यक्त करण्याचा सल्ला दिला. याचा अर्थ शिक्षणसंस्था आणि महाविद्यालयांमध्ये गुंडगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियंत्रित करण्यासाठी आता कोणतेही शासकीय संरक्षण नाही. ही निव्वळ अराजकतेची स्थिती आहे.

या परिस्थितीचा थेट परिणाम आज अल्पसंख्य समाजातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील काही शाळातील अल्पसंख्य समाजातील विद्यार्थ्यांना उघड उघड अपमानित केले जाते. अशा काही विद्यार्थ्यांनी या दडपणामुळे महाविद्यालयात जाणे सोडले असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा काही प्रकरणात संस्था चालकांशी बोलल्यावर त्यांनीही आपली हतबलता दर्शवली. ‘तुम्ही विद्यार्थ्याला दुसऱ्या महाविद्यालयात घाला किंवा काही दिवस वर्गात पाठवू नका.’ असा सल्ला दिला. तर अनेक गरीब परिस्थितीतील अल्पसंख्य समाजातील मुलींचे शिक्षण बंद केले जात आहे. शाळा महाविद्यालयातील या धार्मिक दबावाला समांतर महाराष्ट्राच्या गावागावात अत्यंत कमी संख्येने राहणाऱ्या मुस्लिम समाजाला विविध धार्मिक भेदभावाच्या आणि हिंसाचाराच्या घटनांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हा समाज अधिकाधिक कोंडीत सापडत आहे. महाराष्ट्रातील सव्वा कोटी मुस्लिम समाजावर असे उपेक्षित जीवन लादणे म्हणजे नवी सामाजिक विषमता निर्माण करणे होय.

या पार्श्वभूमीवर डॉक्टर समीना दलवाई यांच्यावर झालेल्या अन्याय्य कारवाईची घटना म्हणजे अशा ‘दबावतंत्रा’चे टोक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. डॉक्टर समीना दलवाई यांच्या प्रकरणात ‘राज्य महिला आयोग’ म्हणजे एका संवैधानिक संस्थेनेच ओ. पी. जिंदाल या खासगी शिक्षण संस्थेच्या कारभारात परभारे घुसखोरी केली आहे. देशातील मुक्त शिक्षण व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारी ही वाटचाल निश्चितच अस्वस्थकारक आहे.

देशातील सर्वसामान्य नागरिकांत आजही विविध धर्मश्रद्धा, सांस्कृतिक परंपरा सहजपणे स्वीकारल्या जातात. विविध धर्मीय नागरिक एकमेकांचे सण-समारंभ स्वाभाविकपणे साजरे करतात. आज लोकांचे एकमेकांशी असलेले असे जैव नाते तोडून धार्मिक पायावर नागरिकांचे ध्रुवीकरण करण्यासाठी ‘हिंदूराष्ट्र’वादी मंडळी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी विविध पद्धतीचे दबावगट समाजात निर्माण केले जात आहेत. शाळा आणि महाविद्यालय ही आता यासाठी ‘नवे क्षेत्र’ म्हणून वापरले जात आहे. याची नोंद घ्यायला हवी.

हेही वाचा – डझनावारी कामगार संघटना एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय करतात?

एकूणच या घटना म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रावर धर्मांध घटकांचा विळखा घट्ट होत चालल्याचे चिन्ह आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्तेच्या काळात सर्वप्रथम शिक्षण क्षेत्र धर्मांध तालिबान्यांनी उद्ध्वस्त केले होते. त्याची आठवण यावी अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची संवेदनाशीलता आजचे सरकार आणि सामाजिक, राजकीय नेतृत्व दाखवत नाही, ही चिंतेची बाब आहे. समतावादी शिक्षणाची भक्कम परंपरा फुले, आंबेडकर, शाहू महाराजांनी उभी केली आहे. अशा महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील मुक्त वातावरण वेगाने दूषित होत आहे. अशा काळात राज्यातील पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या शिक्षण संस्थांनी, शिक्षण तज्ज्ञांनी आणि विचारवंतांनी तातडीने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मुक्त शिक्षणाला आणि शिक्षकांच्या स्वायत्त अध्यापन हक्कांवर गदा आणणाऱ्या या बाह्य राजकीय हस्तक्षेपाला वेळीच रोखणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य अद्याप तरी दर्जेदार शिक्षणसाठी प्रसिद्ध आहे. हा दर्जा आणि मुक्त शैक्षणिक वातावरण टिकवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.

लेखक मुक्त पत्रकार आणि समन्वयक तसेच सलोखा संपर्क गटाचे सदस्य आहेत.

Story img Loader