हरिहर आ. सारंग
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे हिंदुत्ववादी असले तरी त्यांचा मूळ पिंड हा समाजसुधारणावादी होता, हे त्यांच्या एकूण जीवनचरित्रावरून स्पष्ट होण्यासारखे आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास ते पुढीलप्रमाणे सांगता येईल – ‘माझा पिंड राजकारणी नसून समाजकारणी, सामाजिक उत्क्रांतीशिवाय राजकारणी क्रांती फोल, हा माझा मनोमन रुजलेला सिद्धांत आजही कायम आहे.’ (प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय- खंड पहिला)
म्हणूनच त्यांच्या हिंदुत्वाला हा सुधारणावादी विचार व्यापून असल्याचे आपल्याला सातत्याने आणि स्पष्टपणे आढळून येत राहते. समाजसुधारणा आणि धर्म यांच्या बाबतीतील त्यांचा दृष्टीकोन त्यांच्या पुढील वक्तव्यात नि:संदिग्धरित्या व्यक्त होतो. “पन्नाशी साठी उलटलेल्यांना जर लागतील तेवढ्या बायका करण्याची मुभा तर बालविधवांनाच मज्जाव का ? का त्यांची पुन्हा लग्ने लावून देत ? म्हणे धर्म आडवा येतो! येतो, तर त्या धर्माला छाटला पाहिजे… जो धर्म माणसांना माणुसकीने वागण्याइतपतही सवलत देत नाही, सदानकदा देवाची इच्छा या सबबीखाली अश्रापांचा छळ खुशाल होऊ देतो, तो देव तरी कसला नि तो धर्म तरी काय म्हणून माणसांनी जुमानावा ?”(प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय- खंड पहिला)
त्यांचे वरीलप्रकारचे विचार लक्षात घेतल्यास ते खरोखरच हिंदुत्ववादी होते काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तथापि त्यांनी १९१८ च्या सुमारास गजाननराव वैद्य यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीच्या कार्यांत सक्रिय भाग घेतला होता. या कार्याचा भाग म्हणून त्यांनी अहिंदुंना हिंदू करून घेण्याच्या चळवळीतही काम केले होते. तसेच त्यांनी सुरु केलेल्या प्रबोधन या प्रसिद्ध पाक्षिकाच्या पहिल्याच अंकात त्याचे ध्येय स्पष्ट करताना खालील घोषणा केलेली आढळून येते.
“…आजचा प्रसंग असा बिकट आहे की हिंदूंना साऱ्या जगाशी तोंड देऊन जगावयाचे आहे. आजची घटका अशी आहे की हिंदूच्या संस्कृतीची मान साऱ्या जगाच्या राजकारणाच्या चापात सापडलेली आहे. चालू घडीचा मामला असा आहे की सर्व भेदभावांचा सफाई सन्यास करून हिंदुजनांना निरलस भ्रातृभावाने आलेल्या व येणाऱ्या परिस्थितीशी तोंड देऊन आपले हिंदुत्व, आपले आत्मराज्य कायम ठेवून, हिंदू साम्राज्याच्या विशाल आकांक्षांनी हिंदी राष्ट्राचे विराट हृदय चबचबीत भिजवून सोडले पाहिजे.” (प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ् मय)
वरील वस्तुस्थिती लक्षात घेतली तर ते हिंदुत्ववादी होते, याविषयी फारशी शंका राहत नाही. पण त्यांचे हिंदुत्व हे त्यांच्या काळातील प्रचलित असलेल्या हिंदुत्वाहून तसेच सद्यकालीन हिंदुत्वाच्या कल्पनेहूनही अगदीच भिन्न होते. या वेगळेपणाची जाणीव असल्यानेच त्यांनी स्वत:ला तत्कालीन हिंदुत्वाच्या संघटनांपासून कटाक्षाने दूर ठेवले होते. एवढेच नव्हे तर ते या हिंदुत्ववाद्यांचे सातत्याने टीकाकार म्हणूनच वावरले होते. एकीकडे त्यांनी हिंदू समाजातील अंधश्रद्धा, रूढी, जातीभेद, पुरोहितशाही… यांचा परखडपणे आणि धारदार विरोध केला आहे, तर दुसरीकडे हिंदुत्वाचाही पुरस्कार केलेला आढळून येतो. सध्याच्या हिंदुत्ववादी मंडळींनी हिंदुत्वाचे जे ‘नॅरेटिव्ह’ रूढ केलेले आहे, त्यावरून प्रबोधनकारांच्या विचारांत काही विसंगती आहे की काय, असे आजच्या तरुण पिढीला वाटू शकते. परंतु प्रबोधनकारांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व लक्षात घेतल्यास ही विसंगती दूर होते. एवढेच नाही तर त्यांच्या हिंदुत्वाच्या अपेक्षेत आजच्या हिंदुत्वाची कल्पना अत्यंत संकुचित, हिंदू परंपरेशी विसंगत आणि आपल्या देशासाठी घातक असल्याचेही स्पष्ट होते.
धर्माचा अभिमान आणि काळजी
प्रबोधनकारांना हिंदू समाजाचा जितका अभिमान होता तितकीच चिंताही होती. कधीकाळी हिंदूंनी अखिल जगाला मार्गदर्शन केले होते यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे हिंदुसमाजाच्या आताच्या स्थितीबद्दल त्यांना खेद आणि संताप वाटत होता. हिंदू समाजाचा झेंडा जगात फडकला पाहिजे, अशी त्यांची आकांक्षा होती. त्यासाठी त्यांना हिंदू समाजात सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता वाटत होती. हिंदू समाजाचे पुनरुत्थान करावयाचे असल्यास वेद, उपनिषद, गीता, संतविचार आणि आधुनिक मूल्यांवर आधारित तत्त्वज्ञान पुनःस्थापित करणे आवश्यक आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यासोबतच मनुस्मृती, पुराणे, पुरोहितशाही, मंदिरांची व्यवस्था, देवदेवता आणि त्यांच्यासबंधित कर्मकांड, अंधश्रद्धा, कुप्रथा, जातीभेद, अस्पृश्यता यांचे पूर्णपणे उच्चाटन करणे हे हिंदूंच्या सुधारणेसाठी त्यांना आवश्यक वाटत होते. त्यासाठी त्यांनी ‘एको देव:’ या संकल्पनेचा पुरस्कार करून देवांच्या बजबजपुरीवर आपल्या कठोर शब्दांचे प्रहार केले. प्रबोधनकारांच्या समोर त्यावेळचा रुढीग्रस्त आणि तेजोहीन हिंदू समाज होता. प्रामुख्याने या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना या समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणावयाचे होते. त्यामुळे त्यांचे ‘समाजसुधारक हिंदुत्ववादी’ असणे त्यावेळी अपरिहार्यच होते, हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कोणती विसंगती होती, असेही म्हणता येणार नाही.
हिंदूंच्या अवनतीची मीमांसा करताना त्यांनी म्हटले की, आर्यांचा वैदिक सनातन धर्म हा उदारमतवादी आणि सर्वव्यापी होता. परंतु कालांतराने वर्णातून तो असंख्य जातींत विभागल्या गेला. ते याविषयी म्हणतात- “यज्ञयागादी कर्मकांडाच्या कांडणात धर्माच्या शुद्ध आध्यात्मिक भागाचा भूस निघाला. सर्व वर्णांना धर्म शिकविणारे एकटे काय ते आपण या भावनेमुळे ब्राह्मणांच्या आचारविचारांतही एक प्रकारचा एकलकोंडेपणा व अनियंत्रितपणा डोकावू लागला… आणि आचारविचारांच्या नियमनांचे कडकडीत नियम करून धर्माच्या सर्वव्यापी आणि सर्वग्राही पराक्रमाच्या नाड्या आखडून टाकल्या… ब्राह्मणांनी धर्मप्रसाराच्या आणि धर्मोपदेशाच्या पात्रापात्रतेचा लटका प्रश्न नवीन उपस्थित करून धर्माची व्याप्ती शक्य तितकी संकुचित, मर्यादित आणि सोवळी करून ठेवली… धर्माची सनातन तत्त्वे कायम ठेवून युगऱ्हासानुरूपत: सामाजिक जीवनात उदार धोरण ठेवण्याची प्राचीन वृत्ती ब्राह्मणी धर्माच्या मगरूरपणामुळे ठार मेली”
त्यांच्या प्रस्तुत मीमांसेनुसार प्रबोधनकारांना त्यांच्या हिंदुत्वामध्ये धर्मातील संकुचितता दूर करून व्यापकता, जातीभेद नष्ट करून समानता, उदारता आणि मोकळेपणा आणावयाचा होता. त्यासाठी त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीच्या जोडीनेच हिंदू धर्म आणि सुधारणा हा प्रश्न नेटाने सोडवायचा होता. त्यासाठी त्यांचे हिंदुत्व हे सर्वसमावेशकतेच्या तत्त्वावर आधारित असणे स्वाभाविक होते. म्हणूनच त्यांनी हिंदुसमाजातील जातिभेद, अस्पृश्यता, कुप्रथा, संकुचितता, अंधविश्वास आणि त्यांना समर्थन देणाऱ्या ब्राह्मणशाहीवर अत्यंत निर्दयपणे प्रहार केले. या दृष्टीने प्रबोधनकारांचे हिंदुत्व हे सध्याच्या ‘मुख्य प्रवाहातील’ हिंदुत्वाहून मूलत: भिन्न असल्याचे आपल्याला स्पष्ट होते. सध्याचे हिंदुत्व भारतीय समाजाच्या ज्या विभागांना आपल्यात सामावून घेत असल्याचे सांगते, ते विभाग मात्र या हिंदुत्वापासून अंतर राखून असतात. कारण प्रश्न प्रामाणिकतेचा आणि कृती-उक्ती यांच्यातील सुसंगतीचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसमावेशकतेमध्ये सर्वच बाबींचा म्हणजेच शोषितांच्या हितसंबंधांच्या विरोधी आदर्शांचाही समावेश करून चालत नाही, ही बाब सध्याचे हिंदुत्ववादी लक्षात घेत नाहीत.
मुस्लिमविरोधाला नकार
इस्लाम आणि मुसलमान यांना विरोध आणि त्यांचा द्वेष करणे हे आजच्या हिंदुत्वाची पूर्वावश्यकता असल्याचे दिसून येते. या आधारावर हिंदुस्तानचे ध्रुवीकरण करण्याचे घातक कार्य पुण्यकर्म ठरत आहे. प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाला मात्र इस्लामचे मुळीच वावडे नव्हते. ते मुसलमानांबरोबर समाधानाने सहजीवन जगू शकत होते. हिंदू समाजाला बलवान करण्याच्या त्यांच्या कार्यात ते मुसलमानांना अडथळा मानत नव्हते. त्यामुळेच प्रबोधनकारांचे हिंदुत्व हे मुस्लिमांबरोबरचे सहअस्तित्व पुढील शब्दांत मान्य करते.
“आजचे हिंदुस्थानातील मुसलमान म्हणविणारे आमचे देशबांधव हे पूर्वाश्रमीचे आमचे हिंदू बंधूच होत. साष्टी प्रांतातल्या ख्रिस्ती बांधवांप्रमाणेच हे आमचे सारे हिंदी मुसलमान पूर्वीचे अस्सल हिंदूच असल्यामुळे हिंदुस्थान आपला मायदेश आहे, हा अभिमान बाळगण्याचा त्यांना हिन्दुंइतकाच अधिकार आहे, हे अधिक विषद करून सांगणे नको” (हिंदू धर्माचे दिव्य)
मुस्लीम धर्माच्या प्रसाराची मीमांसा करताना त्यांनी महंमद पैगंबर यांचा ‘पुण्यश्लोक’ असा उल्लेख करून त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या समतेच्या विचारांची भरभरून प्रशंसा केलेली आहे. मुहम्मद पैगंबर यांच्या कार्याचे रहस्य ‘आत्मोद्धारासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक राष्ट्राला आदर्शभूत’ आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे.
ते लिहितात, “इस्लाम धर्माचे मुख्य उत्पादक महंमद पैगंबर यांचा अवतार, त्यांची धोरणी कर्तबगारी आणि अल्पावकाशात त्यांच्या धर्मानुयायांची झालेली भरभराट इत्यादी गोष्टी चमत्कारपूर्ण आहेत की मानवी अंत:करणाला आश्चर्याने थक्क करून सोडणारी यासारखी दुसरी हकीकत जगाच्या उपलब्ध इतिहासात दुसरी मिळणे शक्य नाही.” (हिंदू धर्माचे दिव्य)
मुसलमानांचे धर्मांतरण हा नेहमीच एक वादग्रस्त विषय राहिलेला आहे. प्रबोधनकार यांनी याबाबत काही प्रमाणात इस्लामच्या तलवारीला दोष दिला आहे. पण त्याचे अपश्रेय आपल्या देशातील विषमतेला अधिक प्रमाणात दिले आहे. त्यासोबतच या धर्मांतराला इस्लामच्या समता या तत्त्वाचाही हातभार लागलेला आहे, हे प्रांजळपणे मान्य केले आहे. प्रबोधनकारांनी त्यांचा हा विचार पुढील शब्दांत व्यक्त केलेला आहे.
“हजारो वर्षे वरंच्यांचे दास्य करकरून उठवणीस आलेल्या या खालच्या लोकांना मुसलमानी धर्म स्वीकारल्यामुळे आपल्या स्थितीत एकदम महदंतर पडल्याचे दिसून येताच, हिंदू धर्माचे प्रेम त्यांनी झुगारून दिले आणि त्याचा मोठा प्रचंड ओघ हिंदू धर्माच्या छावणीला अखेरचा रामराम ठोकून इस्लाम धर्माच्या संघशक्तीला अधिक समर्थ आणि पराक्रमी करण्याकरिता निघून गेला.” (हिंदू धर्माचे दिव्य)
प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचे स्वरूप
प्रबोधनकार हिंदुत्ववादी असले तरी त्यांचा मूळ पिंड समाजकारणाचा होता, हे आपण पूर्वी पहीलेलेच आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते हिंदू धर्म जसा आहे तसा स्वीकारू शकत नव्हते. त्यांच्या सुधारक वृत्तीला हिंदू धर्मातील असंख्य दोष तीव्रपणे जाणवत होते. ही दोषरुपी काजळी दूर केल्याशिवाय मूळचे तेजस्वी हिंदुत्व जगाच्या दृष्टोत्पत्तीस येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच मूळच्या हिंदुत्वावर साचत आलेले रुढी,परंपरा, पौराणिक संस्कार यांचे विकृतिजनक थर आपल्या वाणीच्या धारदार हत्याराने खरडवून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी हिंदू आहे म्हणून हिंदूंची परंपरा, विचार, श्रद्धा, कर्मकांड, देव आणि देवळांची मांदियाळी, रूढी, कर्मकांड, विधी – निषेध हे सर्वच आदर्श आणि स्वीकारण्याजोगे असायला हवेत, अशी त्यांची गतानुगतिक आणि प्रतिगामी समजूत नव्हती. त्यामुळे आधुनिक काळाशी आणि मानवतावादाशी जे जे विसंगत किंवा विरोधी आहे त्या त्या त्या बाबींवर त्यांनी अत्यंत निर्दयपणे कोरडे ओढले आहेत. आता मनुस्मृती नव्हे जनस्मृती पाळायची आहे, असे त्यांनी निर्भयपणे जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेशी सुसंगत असलेली त्यांची धारणा पुढील शब्दांत व्यक्त झालेली आहे.
‘हिंदू धर्माने आपली प्रचलित प्रतिगामी वृत्ती साफ झुगारून देऊन, चालू मन्वंतराच्या ओघाशी केवळ अनुगमीच नव्हे, पण समगामी कसे बनावे याचाही मंत्र सांगत आज कित्येक महात्मे आपल्या कानाशी लागत आहेत’ (वरीलप्रमाणे)
यावरून ते केवळ हिंदुत्ववादीच नव्हते, तर काळाशी सुसंगत आधुनिकता आणि मानवतावाद ही त्यांच्या हिंदुत्वाची मार्गदर्शक तत्त्वे होती. म्हणूनच ‘सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीच्या जोडीनेच हिंदू धर्म आणि सुधारणा हा प्रश्न तितक्याच नेटाने त्यांच्या विचारक्षेत्रात संचार करू लागला…’ असे त्यांनी म्हटलेले आहे.
आधुनिक, बुद्धिवादी हिंदुत्व
सामाजिक सुधारणेच्या मार्गानेच त्यांना हिंदू धर्माची आणि हिंदू समाजाची प्रगती साधायची होती. म्हणूनच हिंदूंच्या रूढी, देवदेवता, समजुती, हिंदूंची प्रतीके, देवळे आणि कर्मकांड यांच्यावरील टीका त्यांच्या हिंदुत्वाच्या आड येत नव्हती, नव्हे अशी टीका त्यांना हिंदुत्वाच्या उन्नतीसाठी आवश्यक वाटत होती. आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या हिंदू धर्माविषयीच्या अत्यंत दुबळ्या संवेदनशीलतेचा आपल्याला वारंवार अनुभव येत आहे. तसेच त्यांची हिंदू धर्माच्या टीकाकारांविषयीची हिंस्र प्रतिक्रिया आपल्याला व्यथित करीत असते. टीकाच कशाला कोणताही पुरोगामी विचार हा त्यांना हिंदूविरोधीच वाटतो. या निराशाजनक पार्श्वभूमीवर प्रबोधनकारांची धर्माविषयीची भूमिका किती पुरोगामी आणि प्रौढ आहे, हे स्पष्टपणे लक्षात आल्यावाचून राहत नाही. प्रबोधनकार ठाकरे यांनी तर रूढीग्रस्त हिंदू संस्कृतीला ‘बिनबुडाचे पिचके गाडगे’ (देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे) म्हणून तिचा अपमान केलेला आहे असे कुणाला वाटेल. तथापि असे केल्याने प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा अपमान तर होतच नाही, उलट अशा टीकेने ते अधिकच उजळून निघते. त्यांच्या ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तिकेतील विवरणाकडे लक्ष दिल्यास त्यांनी हिंदूंची ऊर्जा, तेज आणि गतिमानत्व नष्ट करणाऱ्या मनुस्मृति प्रणित धर्मशास्त्र, पुराणे, देवळे आणि त्यावर आधारित पुरोहित वर्ग यांच्यावर, आजही कोणी करू शकणार नाही एवढी टोकदार टीका केलेली आहे. या टीकेतून त्यांची हिंदू धर्म सुधारणेची तीव्र इच्छाच दिसून येते. त्यांचे हिंदुत्व अशा दोष दिग्दर्शनाने छिन्नविछिन्न होणारे दुर्बल आणि रोगट नव्हते, तर ते आधुनिकता आणि बुद्धिवादाच्या मात्रेचे वळसे घेऊन निरोगी आणि मजबूत बनलेले होते.
वरील विवेचनावरून प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचे स्वरूप धार्मिक नसून ते सामाजिक स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. आणि त्यांच्या समाजसुधारक वृत्तीशी ते सुसंगतच होते. त्यांना हिंदू समाजाची ऐहिक उन्नती साधायची होती. त्यामुळे त्यांनी मानवतावाद, समता आदी आधुनिक मूल्यांना विरोधी जाणाऱ्या धार्मिक समजुती, परंपरा, संस्कार यांची किंचितही तमा न बाळगता त्यांच्यावर निर्मम हल्ले चढविले. त्यांना हिंदुत्वाची उभारणी ही गीता, उपनिषद आणि संतविचार यांच्यातून प्रकट होणाऱ्या सनातन तत्त्वांच्या पायावर करायची होती. या उभारणीसाठी लागणारी सामग्री मात्र त्यांना आधुनिक काळातील विचार, मूल्ये, बुद्धिवाद यांच्यातून मिळवायची होती. काळानुरूप हिंदू धर्माचे स्वरूप बदलत आलेले आहे आणि आताही ते तसेच बदलले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच शंकराचार्यांच्या अध्यात्मप्रधान टिकेनंतर लोकमान्यांनी गीतेची कर्मप्रधान टीका केली, असे त्यांचे प्रतिपादन होते.
प्रबोधनकारांच्या हिंदू धर्मात ईश्वर आणि भक्त यांच्यामध्ये दलाल असण्याची गरज नव्हती. त्यामुळेच त्यांनी पुरोहीतशाहीवर तीक्ष्ण वाग्बाणांचा वर्षाव करून तिला छिन्न विच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला. ‘आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठया चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एक सारखा सुरूच ठेविला होता…’ (‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’) असे त्यांचे म्हणणे होते. त्याचबरोबर ज्या देवळाच्या आधाराने ही पुरोहितशाही बोकाळली होती त्या देवळांवर बहिष्कार टाकून त्यांतील मूर्ती प्रदर्शनात मांडण्याचे आवाहन त्यांनी हिंदू समाजाला केले. पौराणिक संस्कारांनी पुरोहितशाहीला बळ दिलेले आहे आणि त्यांनीच देवळांचे माहात्म्य वाढविलेले आहे त्यामुळे त्यांनी पुराणांना शौचकूप असल्याचे जाहीर केले. आणि हिंदू समाजात जातीभेद, अस्पृश्यता आणि श्रेष्ठ कनिष्ठता निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीच्या जागी नवी जनस्मृती आणण्याचे जाहीर केले. स्त्रियांवर आणि वंचितांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि धर्मादेश यांना त्यांच्या हिंदुत्वात मुळीच स्थान नव्हते.
harihar.sarang@gmail.com