कला-संग्रहालयांमधल्या विचित्र घडामोडी गेल्या काही दिवसांत ओळीने घडत गेल्या. आधी पॅरिसच्या ‘लूव्र’ संग्रहालयातील मोनालिसाच्या चित्रावर केक फासला गेला, नंतर लंडनमध्ये, व्हॅन गॉगच्या ‘सनफ्लॉवर्स’ या चित्रावर टोमॅटो सूप फेकले गेले, जर्मनीतील पॉट्सडॅममधील एका संग्रहालयात क्लॉड मोने या ‘इम्प्रेशनिझम’चा जनक मानल्या जाणाऱ्या चित्रकाराच्या गाजलेल्या चित्रावर बटाट्याचे फतफते (मॅश्ड ॲण्ड लिक्विफाइड पोटॅटो) फेकले गेले. अगदी परवाच, द हेग येथील संग्रहालयात व्हरमीरच्या ‘गर्ल विथ पर्ल इअरिंग’वरही टोमॅटो सूपसारखे लाल पाणी फेकण्यात आले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या साऱ्या घटना संग्रहालयांमध्ये घडल्या, अनमोल किंवा कलेच्या इतिहासात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चित्रांबद्दल घडल्या आणि प्रत्येक घटनेत खाण्याचा पदार्थ वापरूनच ‘हल्ला’ करण्यात आला. याच्या खेरीज आणखी एक महत्त्वाचे साम्य म्हणजे, हे सारे प्रकार पर्यावरणवादी आंदोलकांनी केलेले होते आणि त्यामागे आंदोलकांचे हेतू सारखेच होते. हवामानाच्या संकटाबद्दल आत्मसंतुष्टता संपवा आणि खनिज-इंधनाचा वापर थांबवा, अशा त्यांच्या मागण्या होत्या , त्यांबद्दल सरकारांवर दबाव आणण्यासाठी, त्यांनी अशा युक्तीचा अवलंब केला.

कोणत्याही चित्राचे यात नुकसान झाले नाही, कारण ही सर्व चित्रे संरक्षक काचेमध्ये बंद करण्यात आली होती. पण आंदोलकांची कृती ‘व्हायरल’ झाली आणि वादविवादाचे आंतरराष्ट्रीय मोहोळ उठले. पृथ्वीला वाचवण्यासाठी स्वत: काहीही करायचे नाही आणि हे असले आचरट प्रकार करून पर्यावरणवादी चळवळीला उलट बदनाम करायचे, अशीही टीका या आंदोलकांवर झाली आणि ‘या तरुणांना कुणीतरी बहकवते आहे’ असेही आरोप झाले. ते सारे खरे मानायचे का?नाही तर, त्यांना इतके विचित्र कृत्य करणे कोणत्या विचारामुळे मनातून पटले असेल? मुळात असे अन्न फेकायचे वगैरे अनेकांना चुकीचेच वाटणार… पण आंदोलकांनी जे केले ते जर काहीएक हेतूने केले असेल तर तो हेतू तरी पुरेसा सफल झाला की नाही कोण जाणे.

पण पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे असे की, हे निषेध यशस्वी ठरले… कारण त्यांनी आजवरच्या कोणत्याही आंदोलनापेक्षा अल्पकाळात, जास्त लक्ष वेधून घेतले. अनेक दशके लॉबिइंग, याचिका, मोर्चे आणि सविनय कायदेभंग हे सारे मार्ग वापरूनसुद्धा , तापमानवाढीला चालनाच देणारे खनिज-इंधन किंवा जीवाश्म इंधन वापरणे काही कमी होत नाही… या इंधनांमुळे होणारे उत्सर्जन उच्च पातळीवर आहे आणि पुढील हवामान आपत्ती टाळण्याला अत्यंत कमी वाव उरला आहे.

‘जस्ट स्टॉप ऑइल’ या संघटनेने लंडनमधील प्रकार केला होता. तो का केला, असे त्या संघटनेलाच ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने विचारले तेव्हा संघटनेचे प्रवक्ते मेल कॅरिंग्टन म्हणाले, “आम्ही रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न केला, आम्ही ऑइल टर्मिनल्स ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला अक्षरशः शून्य प्रेस कव्हरेज मिळाले, तरीही सर्वात जास्त परिणाम करणारी गोष्ट म्हणजे उत्कृष्ट कलाकृतीला झाकणाऱ्या काचेच्या तुकड्यावर टोमॅटो सूप फेकणे,” लंडनच्या ‘नॅशनल गॅलरी’मध्ये व्हॅन गॉगच्या ‘सनफ्लॉवर्स’वर १४ ऑक्टोबर रोजी सूप फेकल्यानंतर, ‘जस्ट स्टॉप ऑइल’चे कार्यकर्ते पळून नाही गेले. दोघाही कार्यकर्त्यांनी त्यांचे हात तिथेच भिंतीला चिकटवले. या दोघांपैकी एकजण- २१ वर्षांचा फोबी प्लमर हा कार्यकर्ता तिथल्या लोकांना विचारत होता,“अधिक मोलाचे काय आहे, कला की जीवन?”

“या कृतीचा उद्देशच मुळी लोकांना उत्कृष्ट कलाकृतीच्या संभाव्य नुकसानाचा भावनिक अनुभव घेण्यास भाग पाडणे हा होता. जेव्हा तुम्ही ‘अमूल्याचे नुकसान’- ‘आपल्या आवडत्या गोष्टीचे नुकसान’ असा विचार करता, तेव्हा पुढे तुम्हाला, पृथ्वीच्या नुकसानाचाही विचार करणे सोपे जाते”, लोकांना थेट अनुभव येतो, तेव्हा तो अनुभ देणाऱ्यांशी संवादही सुरू होतो… “आम्हाला हे संभाषण करायचे आहे, आणि हवामानातील बिघाड टाळण्यासाठी आणि कोसळू नये यासाठी काय करणे आवश्यक आहे याबद्दल आमच्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत” असे कॅरिंग्टन यांचे म्हणणे.

पण असे खरोखरच होते आहे का? लोकांचा प्रतिसाद अद्याप लक्षणीयरीत्या नोंदवला गेलेला नाही हे खरे, पण अन्य ठिकाणचे पर्यावरणवादी कार्यकर्ते मात्र अशा कृती करण्यास तयार होत आहेत. उदाहरणार्थ जर्मनीमध्ये हवामान कार्यकर्त्यांनी दखल घेतली . जर्मनीतील ‘द लास्ट जनरेशन’ या पर्यावरणवादी संघटनेचे दोन कार्यकर्ते पॉट्सडॅममधील बार्बेरिनी संग्रहालयात गेले आणि क्लॉद मोनेच्या यांचे ‘ग्रेन स्टॅक्स’ हे चित्र त्यांनी निवडले. हल्लीच- २०१९ मध्ये तब्बल ११ कोटी अमेरिकी डॉलरना विकण्यात आलेले हे चित्र… त्याच्या काचेवर बटाट्याच्या जाडसर सूपसारखे फतफते फेकण्यात आले.

याबद्दल लास्ट जनरेशन या संघटनेच्या प्रवक्त्या कार्ला हिनरिक्स म्हणाल्या की, इंग्लंडच्या किनारपट्टीवरील तेल आणि वायूच्या शोधाच्या नियोजित विस्तारावर प्रकाश टाकण्यासाठी जस्ट स्टॉप ऑइल या क्षणाचा कसा उपयोग करत आहे हे पाहिल्यावर त्या प्रेरित झाल्या. “माझ्या मते, असे करायला सुचण्यात अलौकिक बुद्धिमत्ताच दिसून येत” असे सांगून हिनरिक्स म्हणाल्या, “अशा कृत्यामुळे लोकांना सुरुवातीला धक्का जरूर बसतो… मग एखादी जुनी बंद खिडकी जोराने धाडकन उघडावी, तशी त्यांच्या मनाची खिडकी उघडते आणि ऐकू लागतात”

“ आमच्या कृतीनंतर लगेच रविवारी, हवामान संकटावर राजकारणी प्रतिक्रिया देतात तेव्हा आमचा विजय होतो,” असे हिनरिक्स यांनी नमूद केलेच, पण त्या म्हणाल्या : “ अखेर हे संवादाच्या वाटेवरील एक पाऊल आहे, असे पाऊल की ज्याबद्दल लोक बोलतात, ते दुर्लक्षित नाही…”.

न्यूयॉर्क विद्यापीठातील प्राध्यापक स्टीफन डंकोम्बे हे अमेरिकेतील ‘सेंटर फॉर आर्टिस्टिक ऍक्टिव्हिझम’ अशा नावाच्या संस्थेचे सह-संस्थापकही आहेत. कला आणि चळवळ यांची सांगड योग्यरीत्या किंवा उत्तमरीत्या घालण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम ही ‘ना-नफा’ संस्था करते. प्रा. डंकोम्बे म्हणाले की, वृत्तपत्रे किंवा अन्य माध्यमांतून या (संग्रहालयांतील निषेधाच्या) कृतींबद्दल जे भाष्य झाले, त्याचा एकंदर सूर पाहाता अशा प्रकारच्या निषेधाच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. थोडक्यात, असा निषेध अपेक्षित परिणाम घडवेलच अनेक नाही, कारण त्याला तात्काळ धिक्कारलेच जाते किंवा त्याच्याकडे एक बालीश, विनोदी प्रकार म्हणून पाहिले जाते.

बरे, हा प्रकार एकदा झाला, म्हणून सर्वत्र होईलच असे नाही… काही संग्रहालये आता सुरक्षा वाढवण्याचा विचार करीत आहेत . एका स्पॅनिश संग्रहालयाच्या संचालकाने सांगितले की बॅकपॅकचे एक्स-रे काढताना कर्मचारी अन्नाकडे लक्ष ठेवतील.

यासंदर्भात आणखी एक निराळा मुद्दा ‘ॲक्ट अप’ या एड्स कार्यकर्ता गटाच्या न्यूयॉर्क विभागाचे माजी संयोजक ब्रायन झॅबिक यांनी मांडला. म्हणाले की, सर्वात प्रभावी निषेध हे लक्ष्यांशी स्पष्ट संबंध असलेलेच असतात (निषेध करायचा आहे पर्यावरण हानीचा आणि लक्ष्य मात्र कलाकृती, असे कसे चालेल?) . नागरी हक्क आंदोलकांनी वर्णभेदमूलक कायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांचे उल्लंघन केले. ग्रीनपीस कार्यकर्ते व्हेलिंग जहाजे आणि आण्विक साइट्सच्या मागे गेले. पेटा समर्थकांनी फरवर ऑइलपेंट फेकला. ‘ॲक्ट अप’ ने एड्सच्या कलंकाशी लढा दिला आणि मोठ्या प्रमाणात “डाय-इन” (मेल्यासारखे पडून राहून धरणे कार्यक्रम) आणि “किस-इन” आयोजित करणे, वैज्ञानिक परिषदा आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणणे, सरकारी कार्यालयांवर मोर्चा काढणे आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी’चे प्रमुख अँथनी फौची यांच्या पुतळ्याची धिंड काढणे असेही प्रकार होते.

तरीही नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीतील जागतिक शाश्वत विकासाच्या व्याख्याता हीदर अल्बेरो म्हणाल्या की, अशा प्रकारच्या लक्ष वेधून घेणाऱ्या कृती सर्वच आहेत परंतु निषेधाचे पारंपारिक मार्ग मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले आहेत. त्यासाठी आता, जीवाश्म इंधनावर बनवलेली संपत्ती आणि अर्थव्यवस्था यांच्यातील दुव्यांना हेरून, प्रचंड किमतीच्या कलाकृतींना लक्ष्य करणे अर्थपूर्ण ठरते. “ आज आपण अशा परिस्थितीत आहोत की, पर्यावरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कोणतेही साधन वर्ज्य मानू नये” असे अल्बेरो म्हणाल्या.

न्यू यॉर्क टाईम्सला पाठवलेल्या ईमेलमध्ये, ‘जस्ट स्टॉप ऑइल’ची कार्यकर्ती आणि सूप फेकणाऱ्यांपैकी एक असलेल्या २० वर्षीय ॲना हॉलंडने लिहिले की, व्हॅन गॉगच्या पेंटिंगबद्दल लोकांना वाटणारी आपुलकीची, आदराची बचावात्मकतेची भावना , पृथ्वीवरील जीवनाबद्दलही लोकांना वाटू लागावी, अशी तिला आशा आहे. खुद्द व्हॅन गॉगनेच त्याचा भाऊ, थिओ याला लिहिलेल्या पत्रात जे लिहिले होते, त्याचा दाखला ॲना हॉलंडने या ईमेलमध्ये दिलेला आहे.

त्या पत्रात व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांनी लिहिले होते , “चित्रकारांची भाषा ऐकायला हवी असे लोक म्हणतील, पण खरी ऐकायला हवी ती निसर्गाची भाषा” “ गोष्टी स्वतः अनुभवणे, वास्तव अनुभणे हे चित्रकलेच्या अनुभवापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, किमान ते अधिक उत्पादनक्षम आणि जीवनदायी तर नक्कीच आहे”

मूळ लेख कॅरा बक्ली यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये लिहिला होता, त्याचा हा संपादित अनुवाद आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protect environment protest will successful by throwing fluid on paintings asj