संवाद हे भाषेचे मुख्य काम आहेच. परंतु, ज्या भाषेतून प्रगती, विकास साधला त्यातून संवाद साधला तर तो जास्त विचारपूर्वक, परिणामकारक ठरतो. संवादापासून व्यवहारापर्यंत प्रत्येक पायरीवर याचा उपयोग होतो. या अर्थाने जगण्यातील मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण. ‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित ‘मराठीने घडवलेले’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी या पुस्तकात सहभागी झालेल्या मान्यवरांच्या परिसंवादात हाच विचार प्रकट झाला.

इंग्रजीचा न्यूनगंड नको

शासकीय सेवेत काम करताना ठरावीक वातावरणात काम करावे लागते. अशा वेळी एकतर आपण त्यासारखे होतो किंवा त्याचा द्वेष करतो. ते योग्य नाही. लोकांची भाषा समजून, शासकीय भाषेत गल्लत न करणे महत्त्वाचे. अनेक शब्दांची भीतीही वाटते. पण शब्दांत गुरफटलो, तर मूळ उद्देश बाजूला पडतो. शासकीय कार्यालयात भाषेपासून अडचण सुरू होते. ‘लोकसत्ता’ आणि अग्रलेखांतून भाषेचा अभ्यास होत राहतो. इंग्रजी आले, तरच यश मिळते हा गैरसमज आहे. मातृभाषेत कोणतीही परीक्षा देता येते. इंग्रजी येत असल्याचा फायदा होतो. म्हणून इंग्रजी येत नाही याचा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. समविचारी लोकांनी एकत्र येऊन भाषेसाठी काम केले पाहिजे.सनदी अधिकारी अभिजित बांगर

उद्याोगाचा इंग्रजीशी संबंध नाही

उद्याोग क्षेत्रात वावरताना मराठी वापरण्यात अडचण आली नाही. माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले. गणित चांगले होते. जगभरातील ८० देशांत फिरलो. काही देश वगळता फार कोणी इंग्रजीत बोलत नाही. रसिकता, अभ्यास, आनंदाचा संस्कार मातृभाषेत चांगला होतो. इंग्रजीत शिकून ‘प्रेझेंटेशन’ चांगले करता येते, पण त्यात ‘मजकूर’ नसतो. मातृभाषेत शिकलेल्यांकडे चांगला मजकूर असतो, तो महत्त्वाचा. उद्याोगाचा इंग्रजीशी संबंध नाही. त्यासाठी माणूस कळणे महत्त्वाचे. माणूस कळला, तर कुठेही व्यवसाय करता येतो. आताच्या काळात आपल्या संकल्पना, मानसिकता बदलली पाहिजे. अपयश येणार याची खात्री बाळगून अपयशही साजरे केले पाहिजे. बॉक्सिंग रिंगमध्ये बॉक्सर पडला, तर पराभूत होत नाही; पडून उठला नाही, तर पराभूत होतो. मराठी माणसानेही पडले, तरी उठायला शिकले पाहिजे. बहुतांश मराठी माणसे अजूनही नोकरी मागणारी आहेत. पण, आता हळूहळू विचार बदलताहेत. अनेक नवोद्याोग चांगले उभे राहत आहेत. फक्त मराठीतील काही म्हणी बदलून, ‘एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ असे म्हणण्याची आता गरज आहे.ज्येष्ठ उद्याोजक दीपक घैसास

संवाद महत्त्वाचा

चित्रपट क्षेत्रात जावे असा काही विचार नव्हता. मात्र, चित्रपटात काम करू लागल्यावर पुढे हिंदीतही चांगली माणसे भेटली. त्यांच्याशी उत्तम संवाद होत राहिला. मराठी म्हणून मला काही वेगळी वागणूक मिळाली नाही. चित्रपट करणे ही जटील गोष्ट आहे. त्यामुळे सर्वजण एकमेकांना सावरून घेतात. ‘रॉटरडॅम’ महोत्सवातील ‘वळू’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी आम्ही तिथे मराठीतच संवाद साधला. त्या वेळी आपण आपल्या भाषेचा आग्रह धरू शकतो, हे लक्षात आले. अखेरीस संवाद महत्त्वाचा आणि आपण आपल्या भाषेत जास्त चांगला संवाद साधू शकतो. आपण जसे आहोत तसे राहणे महत्त्वाचे असते. आपण आपल्या भाषेवर प्रेम केले, तर अन्य भाषांवरही प्रेम करतो. अन्य भाषा शिकण्याचाही प्रयत्न करावा. चित्रपट ही मराठी माणसाची सांस्कृतिक गरज नाही, असे अलीकडे वाटते. तेच पुस्तकांच्या बाबतीतही आहे. पण, त्या पलीकडे आर्थिक कारणही आहे. अनेकांना मल्टिप्लेक्स संस्कृतीने बिचकायला होते. त्याशिवाय तिकिटाचा खर्च न परवडणारा आहे. मराठी चित्रपटातून रोजच्या गोष्टी पाहण्यापेक्षा अन्य भाषांतील मोठे चित्रपट पाहिले जातात. त्यामुळे पैशाच्या नाड्या मराठी माणसाने हाती घेऊन सांस्कृतिक झळाळी दिली पाहिजे.अभिनेते गिरीश कुलकर्णी

मराठी अर्थार्जनाची भाषा व्हावी

भाषा हे माध्यम आहे. भाषेचे संस्कार पहिल्या पाच-सहा वर्षांत चांगले होतात. विचारांची बैठक मातृभाषेतून तयार होते. विचारांचा गाभा कमकुवत राहू नये, यासाठी मातृभाषेतून शिक्षणाला पर्याय नाही. मराठी अर्थार्जनाची भाषा झाली पाहिजे. ‘लोकसत्ता’चा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उपक्रमांतून भाषेबाबतचा दृष्टिकोन बदलेल.डॉ. निखिल दातार

भाषा लोकांनीच जपावी

भाषाशास्त्राचे अभ्यासक सांगतात, की भाषा ही विचारांचा अविभाज्य भाग असते. बोलण्याची कृती करायच्या आधी विचार मनात येतात आणि विचार भाषेवर आरूढ होऊन येतात. इंग्रजी येण्यासाठी सगळेच विषय इंग्रजीतून शिकले पाहिजेत, या गैरसमजातून आपण इंग्रजी हे संपूर्ण शिक्षणाचेच माध्यम करून ठेवले आणि लोकप्रियही केले. यामुळे कधीही भरून येऊ शकणार नाही, असे प्रचंड नुकसान झाले आहे. संस्कृतीप्रमाणे भाषाही प्रवाही असते. जुने किंवा अभिजनांचे, तेच फक्त सोने हा आग्रह जितका संस्कृती आणि भाषेला मारक असतो, तितकेच ती भाषा बोलणाऱ्यांनी भाषेकडे केलेले दुर्लक्ष, तिची हेळसांड आणि भाषेच्या तथाकथित शुद्ध रूपाव्यतिरिक्त ‘इतर’ रूपांचा अवमान हेही मारक असते. भाषा लोकांची आणि लोकांसाठी असते. ती त्यांनीच जपावी आणि जोपासावी लागते. त्यांनीच ती बळकट करत न्यावी लागते.अभिनेते अतुल कुलकर्णी

Story img Loader