सुजित तांबडे
महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ पुण्यात सर्वधर्मीय शिवप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांनी पुकारलेल्या पुणे बंदला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाला. बंदच्या काळात एकही अनुचित प्रकार न होता एकीचे दर्शन पुणेकरांनी घडविले. शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मूक मोर्चाद्वारे सामान्य माणसाच्या मनातील एल्गार व्यक्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेला कमालीचा आदर, छत्रपती उदयनराजे भोसले यांची मोर्चाला प्रत्यक्ष हजेरी याबरोबर रिक्षा बंद आंदोलनाची या बंदला मिळालेली साथ यामुळे कडकडीत बंद होऊ शकला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्वधर्मीय शिवप्रेमींनी बंदची हाक दिली. त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बंदला पाठिंबा दिल्याने या बंदला राजकीय स्वरूप येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केल्याने बंदचे चित्र पालटले. त्याचबरोबर पुण्यातील व्यापारी संघटनांनीही बंदला पाठिंबा दर्शविला. प्रत्यक्ष बंदच्या काळात सर्वपक्षीय एकीचे दर्शन घडल्याने कोणताही गैरप्रकार न घडता शांततेच्या मार्गाने बंदची यशस्वी सांगता झाली.
उदयनराजेंची उपस्थिती
वरकरणी हा बंद सर्वधर्मीय शिवप्रेमींनी पुकारला, तरी त्याला महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या विरोधाची किनार होतीच. मूक मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय जाहीर सभेत ते दिसून आले. छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपस्थिती हे बंदचे प्रमुख आकर्षण होते. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते लाल महाल या मार्गे मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात छत्रपती उदयनराजे भोसले हे केवळ सहभागी झाले नाहीत, तर डेक्कन ते लाल महाल या मार्गे ते चालत गेले. त्यामुळे या बंदची उंची वाढली. मात्र, त्यानंतर लाल महाल येथे झालेल्या जाहीर सभेला छत्रपती उदयनराजे हे थांबले नाहीत. ती सभा म्हणजे राजकीय व्यासपीठ होणार, याचा अंदाज असल्याने त्यांनी या सभेसाठी न थांबता बंदला राजकीय स्वरूप येऊ नये, याची खबरदारी घेतल्याचे दिसले.
शिवरायांबद्दल आदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेला कमालीचा आदर या मोर्चातून दिसून आला. पुण्यात बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. ही दुकाने बंद करण्याचा आततायीपणा कोणीही केला नाही. यातून सामाजिक संवेदनशीलता पाहायला मिळाली. हातात भगव्या झेंड्यांबरोबरच निळे आणि हिरव्या रंगाचे झेंडे हे एकीचे दर्शन घडविणारे होते. मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हाती ‘ना जातीसाठी, ना धर्मासाठी, आम्ही उतरलो रस्त्यावर शिवरायांसाठी’ असे आशय असलेले फलक होते. या मोर्चात सहभागी झालेल्या संघटनांतून सर्वधर्मसमभावाचे प्रत्यंतर आले. महाविकास आघाडीबरोबरच आम आदमी पक्ष, युवक क्रांती दल, स्वराज्य प्रतिष्ठान, रिपब्लिकन युवा मोर्चा, पुणे शहर जिल्हा मातंग समाज, लहुजी समता परिषद, रिजनल ख्रिश्चन सोसायटी, मराठा टायगर फोर्स, मराठा सेवक समिती, संभाजी ब्रिग्रेड, उलेमा ए हिंद, जमायते आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यातून सर्वपक्षीय एकीचे दर्शन घडले.
रिक्षा बंदची साथ
या बंदला रिक्षा बंदची नकळत साथ लाभली. बाइक टॅक्सीच्या विरोधात विविध रिक्षा संघटनांनी बंद पुकारला होता. त्यामध्ये रिक्षा पंचायत ही प्रमुख संघटना सहभागी नव्हती. मात्र, पुणे बंदच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे बंदच्या काळात रिक्षा रस्त्यावर दिसल्या नाहीत. त्यामुळे पुण्यात कडकडीत बंद पाळला गेल्याचे चित्र दिसले. बंदच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पीएमपीच्या मोजक्या बसेस प्रमुख मार्गांवर सोडण्यात आल्या होत्या. बससेवेत खंड पडू नये, याची काळजी आंदोलकांनीही घेतली होती. त्यामुळे बसेसवर दगडफेक करणे किंवा अन्य कोणताही प्रकार घडू शकला नाही.
राजकीय मनसुबे
या बंदमागे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा आदर हा प्रमुख हेतू होता. मात्र, राजकीय लाभ घेण्याचा राजकीय पक्षांचा सुप्त हेतू जाहीर सभेद्वारे उघड झाला. मूक मोर्चाची सांगता झाल्यावर लाल महाल येथे जाहीर सभा झाली. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भाषण हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसले. त्यातून महाविकास आघाडीचे राजकीय मनसुबेही निदर्शनास आले.
भाजपची समयसूचकता
बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुण्यातील भाजपने शांततेची भूमिका घेतली होती. या बंदला विरोध केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि वेगळाच संदेश नागरिकांपर्यंत जाईल, याची जाणीव शहर भाजपला होती. त्यामुळे बंदच्या काळात विरोधाचे गालबोट लागणार नाही, याची पुरेपूर खबरदारी भाजपने घेतली होती. बंद यशस्वितेमागे हे एक कारणही कारणीभूत ठरले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपचे खासदार असले, तरीही बंदमध्ये सामील होण्याच्या त्यांच्या कृतीवर टीका-टिप्पणी न करण्याची समयसूचकताही भाजपने दाखविली. त्यामुळे बंदची यशस्वी सांगता होऊन पुणेकरांचा एल्गारही पाहायला मिळाला.
sujit.tambade@gmail.com