– डॉ. ऐश्वर्या

पुण्यात स्वारगेटमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे मी खूप अस्वस्थ झालेय. म्हणजे या एकाच घटनेने असे नाही. आधीच्या कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणाच्या धक्क्यातूनच मुळात मी बाहेर आलेली नाहीये. त्यात सतत, पुन्हा पुन्हा या घटना घडतच आहेत. राजकारणी लोक याबद्दल काही धोरण आखत आहेत किंवा हा विषय संवेनशीलतेने विधानसभा, लोकसभा इथे गंभीरपणे हाताळला जातोय असे काहीही घडताना दिसत नाहीये. उलट नीचतेचा कळस म्हणजे राजकारणातील स्त्री-पुरुष अशा घटना घडल्यावर बेजबाबदारपणे पुरुषाला पाठीशी घालणारी, पीडित मुलीला दोष देणारी संतापजनक व्यक्तव्ये करत आहेत. ती ऐकून की असे वाटते या सत्तांध लोकांना खरेच बलात्कार काय असतो ते समजत नाहीये की जनमानसाला भरकटवणारी अशी विधाने जाणीवपूर्वक करण्यात यांना राजकीय मर्दानगी वाटते ? आता तर हे सगळे इतके सामान्य आणि रोजच्या जिंदगीसारखे झाले आहे की पुन्हा पुन्हा तेच तेच किती वेळा मांडायचे, किती वेळा लिहायचे असे वाटून मी थकत चाललेय. समाज म्हणून आपण मुर्दाड बनत चाललोय का? पीडित मुलीला दोष देणारी वक्तव्ये वाचून तर वाटते की तुम्हाला अक्कल नाहीये का? किती वेळा पुन्हा पुन्हा इतक्या साध्या गोष्टी समजून सांगायच्या की मुलगी प्रतिकार करू शकली नाही म्हणजे तिची संमती होती असे नाही म्हणून? आजच्या मॉडर्न युगात, संमती म्हणजे काय हे सांगावे लागतेय इतके आपण नीच झालो आहोत. आणि म्हणे आपण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणार. उलट बरेच झाले म्हणा, ती कृत्रिम बुद्धिमत्ताच कदाचित उद्या समजून सांगेल की संमती म्हणजे काय, बलात्कार म्हणजे काय. ते अजून तरी माणसा सारखं हिडीस झालेले नाहीये.

तर पुण्यातील घटना घडली तेव्हा मी एका नवीन गावात गेलेले होते. तिथल्या लोकांनी हायवे लगतच्या हॉटेलात राहायची सोय केलेली. सकाळी लवकर उठून चालायला बाहेर पडावे असे ठरवले. पण लगेच मनात विचार आला की हायवेला चालताना जर कोणी मला बाजूला नेऊन बलात्कार केला तर? होऊच शकते हे कुठेही. असे झाल्यानंतर लोक काय म्हणतील तर ही बया सकाळी रहदारी कमी असताना हायवेवर गेलीच कशाला, इथपासून ते मी परगावात एकटी कशी काय गेले, घरच्या कोणाला सोबत का नेले नाही, म्हणजे माझेच चारित्र्य खराब असणार इथपर्यंत माझ्यावर सगळे आरोप केले जातील.

मुख्य म्हणजे बलात्कार फक्त बाहेर होत नाहीत तर घरातसुद्धा होतात ही वस्तुस्थिती आपल्या तथाकथित भारतीय संस्कृतीला मुळीच मान्य नाही. स्वारगेटला मुलगी अनोळखी व्यक्तीशी का बोलली म्हणे? तिला काय स्वप्न पडले होते का की पहाटे पहाटे तिच्यावर बलात्कार होणार आहे आणि म्हणून कोणाशी बोलायचं नाही म्हणून? बस स्टॅन्डवर गेल्यावर आपण चौकशी करतोच. अगदी नैसर्गिक आहे हे. मी तर कारने एकटी फिरतानासुद्धा अनेकवेळा थांबून चौकशी करते. याचा अर्थ बलात्काराला संमती असते का?

मी स्वतः बार्शी या लहान गावची. दहावी बारावीत मेरिट लिस्टमध्ये नंबर आलेला. बारावीत मेडिकलसाठी असलेल्या सीईटीमध्ये चांगले मार्क्स पडलेले. प्रवेश कुठे घ्यायचा चर्चा चाललेली. मुंबईचे कॉलेज बेस्ट, एक नंबर. पण मला मुंबईला पाठवायचे नाही यावर सर्वांचे एकमत होते, का तर मोठ्या शहराची भीती. वडिलांची इच्छा की गुपचूप जवळच्या जवळ सोलापूरला प्रवेश घ्यावा. पण आईचे माहेर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर. आईने सोलापूर जिल्ह्यातील पुरुषसत्ताक मानसिकता जवळून पाहिलेली. त्यामुळे हट्टाने तिने मला पुण्याला शिकायला पाठवले. बार्शीतील मी अगदी गावठी होते. मोठ्या शहरात गेल्यावर बावचळून जाते माणूस. कधी बस तर कधी रेल्वेने एकटीने प्रवास केलाय. बसमध्ये इतके सारे नकोसे स्पर्श व्हायचे की वाटायचे पुरुषाच्या बाजूला असणारा हात, खांदा याला लोखंडी काटेकुटे असलेले काहीतरी आवरण घालावे आणि कोणी चिटकले की त्याला ते टोचावे. भीतीने पुढे बस प्रवास बंद केला. ट्रेनमध्ये तरी कुठे पुरुष चुकायचे? गर्दीत स्पर्श करण्यापासून ते मोबाईल नंबर मागण्यापर्यंत किती तऱ्हा. मी इतकी घाबरलेली असायचे की मोबाईल देणार नाही हे म्हणायची हिम्मतसुद्धा नव्हती. गुपचूप नंबर देऊन टाकायचे.

पुण्यात पुढे सोमवार पेठेत रहायला होते. रेल्वे स्टेशनला उतरून चालत जायचे घरी. २० मिनिटांचा रस्ता. पण एकदा संध्याकाळच्या सुमारास काही मुले पाठी लागली. घाबरून पटकन मी आमच्या ससून रुग्णालयात शिरले. तेव्हापासून स्टेशजवळच्या परिसरात एकटीने चालायची भीती बसली. पुढे कितीतरी लैंगिक अत्याचाराचे प्रसंग घडत गेले. तोंड बंद करून शिवून टाकले. का तर, त्यात अशा अनेक गोष्टी असतात जिथे तुम्हाला विचारले जाऊ शकते, तू तिथे का गेलीस, का बोललीस, असे का, तसे का… पुढच्या काही क्षणांत आपल्यासोबत असे काही घडणार आहे हे जर कोणाला माहिती असते तर कोणी कशाला धोका पत्करला असता? किंबहुना तो धोका वाटलेलाच नसतो. अनेकवेळा ओळखीची जागा असते, ओळखीची व्यक्ती असते. कधी अनोळखी व्यक्ती, नवीन भाग असला तरी आपण सार्वजनिक जागी असतो, समाजावर आपला विश्वास असतो. पण कधी कधी तर घरीच बलात्कार होतात. तेव्हा कोण जबाबदार?

‘लडके तो लडके होते है’ असं राजकारणी लोकांनी म्हणणे आणि ‘मेन विल बी मेन’च्या सेक्सिस्ट विनोदी जाहिराती गमतीने पाहणे, असली पुरुषसत्ताक दांभिक मनोवृत्ती असलेल्या समाजात कुठल्याच मुलीला सुरक्षित वाटत नसते. त्यात प्रिव्हिलेज नसणाऱ्या मुली म्हणजे सहजपणे हाती लागणारे सावज. त्यात समाजात सत्ता आणि संपत्ती आणि जात रचना या दृष्टीने सर्वात खालच्या स्तरावर असणारी मुलगी किंवा स्त्री ही तर अशा गुन्ह्यासाठी अतिशय योग्य बळी. कारण अशा वेळी गुन्हेगार सत्तेत किंवा उच्च जातीचे असतात. मग कशाला त्यांना शिक्षा होतेय? बलात्कार हे काही वासना अनावर होऊन नकळतपणे चुकून झालेले कृत्य नाही. गुन्हेगार व्यवस्थित सावज हेरतो. कोणावर शक्तीचा वापर करून ओव्हर पॉवर करता येईल, कोणाचा आवाज बंद करता येईल. त्यात लहान मुले मुली तर आणखी जास्त बळी पडतात. तर दुसरीकडे कोणाला धडा शिकवायला म्हणून, दहशत पसरवायला म्हणून, दंगल, नागरी संघर्ष, यात बलात्काराचा राजकीय हत्यार म्हणून वापर होतो. धार्मिक गुरु बलात्कार करतात तेव्हा त्यांनाही माहिती असते की त्यांच्या पाठीशी मोठी सामाजिक आणि राजकीय ताकद उभी असते.

बलात्कार संस्कृती म्हणजे काय तर एक तर गुन्हेगाराला पाठीशी घालणे आणि पीडित व्यक्तीला दोषी ठरवणे. याने होते काय तर पुरुषांवरची जबाबदारी झटकली जाते. जणू पुरुष आहे तर तो असाच वागणार असे एकदा म्हटले की हा गुन्हाच नाहीये अशी समाजाची मानसिकता घडवली जाते. उलट स्त्री बाहेर पडली किंवा असे असे वागली किंवा असे कपडे घातले किंवा खालच्या जातीची असून उर्मटपणे बोलली अशी कारणे देत, समाजाला दाखवले जाते की विशिष्ट वागणुकीची अशी शिक्षा मिळेल. पीडित व्यक्तीला या सगळ्यात प्रचंड मानसिक, सामाजिक, आर्थिक त्रास होतोच. त्या व्यक्तीला न्याय मिळायची शक्यता धूसर होते, वैयक्तिक आयुष्यात तिचे मोठे नुकसान होते, जसे की लग्न, नोकरी इथे त्रास, सामाजिक अप्रतिष्ठा. आणि या सगळ्यातून इतर स्त्रियांना दोनप्रकारे संदेश मिळतात. एकतर तुमच्यासोबत असे काही झाले तर गप्प बसा. बोलून स्वतःची इज्जत घालवू नका.

दुसरे म्हणजे, तुमच्यासोबत असे काही होऊ नये याची जबाबदारी केवळ आणि केवळ तुमची आहे. त्यामुळे आपोआपच स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच होता. अनेकवेळा मुली स्वतःहून स्वातंत्र्य घेणे टाळतात, तर इतर ठिकाणी कुटुंब त्यांना स्वातंत्र्य द्यायचे नाकारते. बस स्टॅण्डवर अशी घटना घडल्याने आता किती मुली प्रवास टाळतील याची कल्पना येतेय का आपल्याला? समाज म्हणून आपल्याला हे जाणवते का की मुलींना सुरक्षित वाटत नसेल तर त्या शिकण्यासाठी परगावी जातील का? मुलीला परगावी शिकायला पाठवणे हे अजूनही ग्रामीण भागात सहजासहजी घडत नाही. आर्थिक प्रश्न असतातच पण सुरक्षिततता हा मोठा प्रश्न असतो. पुण्यासारख्या ठिकाणी अशा घटना घडू लागल्या आणि त्या मुलीवर अशाप्रकारे वादग्रस्त ताशेरे ओढले जात असतील, तर ग्रामीण भागातील मुलींच्या मानसिकतेवर याचा किती गहिरा नकारात्मक परिणाम होऊ शकतो?

ग्रामीण भागातील मुलगी असेही तिच्या घरी किती सुरक्षित असते? माझे खेड्यातील नातेवाईक त्यांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणार होते. मी तेव्हा एमबीबीएस करत होते. मी त्यांना चिडून म्हणाले की इतक्या कमी वयात का लावताय लग्न? त्यांचे उत्तर की ते शेतात गेल्यावर मुलगी एकटी घरी असते. तिच्यासोबत काही लैंगिक अत्याचार घडला तर तिचे लग्न होणार नाही. मुलगी सुरक्षित रहावी म्हणून तिच्या शिक्षणाचा, निकोप वाढीचा हक्क नाकारणारा आपला समाज. लग्नानंतरही कुठे आहे ती सुरक्षित?

असंही आम्हा मुलींना समजायला लागल्यापासूनच सतत सुरक्षिततेचा विचार करून वागायची, बोलायची सवय लागलेली असते. पुरुषांना हे कधीही कळू शकणार नाही. पुरुष म्हणून घरीदारी, सार्वजनिक ठिकाणी कुठेही कधीही कसंही काहीही करता येतं, वावरता, बोलता येतं. पुरुष असणं हे जगण्याच्या पातळीवर निवांत असतं.

स्त्री असणं मात्र फार फार वेगळं. सतत अवती भवतीचा अंदाज घेत, वागायचं, उठायचं, बसायचं, बोलायचं. घरात असलं तरी घरातील लोकांचा अदृश्य दबाव. कसं कुठं बसायचं, कोणासमोर झुकायचं, किती आवाजात बोलायचं, सतत सगळे हिशोब. बाहेर पडताना कधी, कुठं, कशाला, कोणासोबत, का, किती वेळ, कोणते कपडे, सतत हे आराखडे बांधत आयुष्य जगायचं. खांदे पाडून, छाती लपवत, भिरभिर नजरेनं आजूबाजूला नजर ठेवत, मन सतर्क ठेवत, कोणालाही वाईट वाटेल असे काहीही न बोलायची खबरदारी घेत, आपलं अस्तित्व कोणाच्याही डोळ्यात खुपणार नाही, कोणी आपल्याला बोल लावणार नाही, आपण कोणाला उद्धट वाटणार नाही, कामाच्या ठिकाणी कोणाला भावनिक किंवा बायकी वाटणार नाही इत्यादी इत्यादी इत्यादी शे दोनशे लिखित अलिखित सामाजिक-सांस्कृतिक – राजकीय – व्यावसायिक -नैतिक – आर्थिक नियम डोक्यात ठेवत मुलगी किंवा स्त्री म्हणून जगायचं असतं. जागतेपपणी प्रत्येक प्रहरी हे नियम. बलात्कार फक्त शारीरिक नसतात. मानसिक छळ, दहशत, नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळ, चिमूटभर पैशांसाठी कामकरी स्त्रियांच्या अब्रूची लक्तरे तर कुठे वैद्यकीय व्यवसायानेच पुरुषासत्ताक व्यवस्थेशी हातमिळवणी करत स्त्रीच्या शरीराशी केलेली हिंसा. कुठे शिक्षण व्यवस्थेनेच तिला पुरुषी समाजात तिची पायाशी असलेली जागा ओळखून वागायला शिकवावे तर न्याय व्यवस्थेने लग्नातील बलात्कार नाकारत, खुनी नवऱ्याला शिक्षा न देता सोडून द्यावे (संदर्भ छत्तीसगड).

असल्या मेलेल्या समाजात जगून थकायला होते. किती ठिकाणी स्वतःचा बचाव करत रहायचे आणि किती ठिकाणी व्यवस्थेशी लढत रहायचे? पुन्हा पुन्हा स्वतः ला समजावत आवाज वाढवून हक्क मागत रहायचे. मी एवढ्यासाठीच हे करते कारण आज आपण आवाज उठवला तर निदान भावी तरुणाईसाठी काही गोष्टी सुलभ होतील किंवा आवाज उठवता येतो हे उदाहरण तरी त्यांच्यासमोर निर्माण होईल.

स्वारगेट घटनेतील मुलीने हिम्मत दाखवत केस केली ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या पोरीने आवाज उठवला म्हणून आंधळ्या व्यवस्थेला डोळे उघडावे लागले. गुन्हेगार पकडला गेला. आवाज उठवणे हे आपल्या सर्वांचे महत्वाचे काम. फक्त सोशल मीडियावर नाही तर खऱ्याखुऱ्या वास्तव आयुष्यात.

आणखी एक गोष्ट. निवेदिता मेनन यांच्या ‘सीइंग लाइक अ फेमिनिस्ट’ या पुस्तकात खूप महत्वाचा विचार मांडला आहे. लैंगिक अत्याचारांविरोधात आवाज उठवणे, न्याय मागणे हे एक टोक आणि हे अत्यंत महत्वाचे आहेच. सोबतच लैंगिक अत्याचाराभोवती असलेली लाज किंवा इज्जत कमी झाली सारखे भाव काढून टाकायला हवेत. बलात्काराचा मुलींसाठी असलेला ठपका काढायला हवा. चोरी, खून अशा इतर गुन्ह्यांसारखा हा एका गुन्हा असे याचे सामान्यीकरण व्हायला हवे. म्हणजे हेच की असा गुन्हा घडला म्हणून वैयक्तिक आयुष्यात स्त्रीची इज्जत कमी झाली असे वागवून तिचे नुकसान केले जाऊ नये, तिला चुकीची वागणूक दिली जाऊ नये. उलट घराबाहेर पडल्यावर जसे शारीरिक हल्ला, खून, अपघात हे कोणासोबतही घडू शकते, तसेच लैंगिक अत्याचार घडू शकतात आणि हा धोका पत्करून स्त्रियांनी घराबाहेर पडायला हवे. याचा अर्थ लैंगिक अत्याचार सहन करावे असे मुळीच नाही. तर या भीतीमुळे स्त्रियांचे स्वातंत्र्य काढून घेतले जाऊ नये. स्त्रीचा सार्वजनिक जीवनातील वावरावर निर्बंध घातले जाऊ नयेत. मुलींनी शिक्षणासाठी, फिरण्यासाठी, नोकरीसाठी घराबाहेर पडावे. अत्याचार घडला तर तात्काळ पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवावी. समुपदेशन घ्यावे. स्वतःला कुठेही दोष न देता, उजळ माथ्याने समाजात वावरावे. दुसऱ्या व्यक्तीने संमतीशिवाय आपल्या शरीराराची मर्यादा ओलांडल्यावर, त्रास होतोच. त्रासासाठी समुपदेशन घेऊया. न्याय व्यवस्थेकडे पुन्हा पुन्हा न्याय मागत राहूया. परंतु स्त्री म्हणून आपल्या अस्तित्वाचा संकोच करत जगणे आता बंद करूया. ताठ मानेने बाईमाणूस म्हणून जगूया.

स्त्रीरोगतज्ञ, स्त्रीवादी लेखक

zerogravity8686@gmail.com

Story img Loader