जयदेव रानडे
परराष्ट्रमंत्रीपदावरील व्यक्तीला हटवणे भाग पाडल्याखेरीज जिनपिंग यांना जेरीस आणण्यातले यश जगाला दिसणार नाही, असा हिशेब या राजकारणामागे असेल, तर माजी चिनी राष्ट्राध्यक्ष जिआंग झमीन यांचाही संबंध त्याच्याशी असू शकतो..
चीनचे परराष्ट्रमंत्रीपद चिन गांग यांच्याकडून काढून घेऊन त्या जागी पुन्हा माजी परराष्ट्रमंत्री वांग यी यांना नेमण्याचा निर्णय आणि अशा निर्णयासाठी चीनच्या ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’च्या स्थायी समितीची (‘एनपीसीएससी’) २५ जुलै रोजी झालेली तातडीची बैठक, हे अघटितच आहे. गांग यांचे प्रांतिक परिषद सदस्यपदही काढून घेण्याचे अधिकार ‘एनपीसीएससी’कडे असताना, तसा काही निर्णय झालेला नाही. किंबहुना वाद आणि बेबनावाच्या कोणत्याही खुणा दिसूच नयेत म्हणून, गांग यांच्याऐवजी वांग यी यांच्या नेमणुकीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे शिक्कामोर्तब झालेले असल्याचा उल्लेख फक्त करण्यात आला.
गांग यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे नंतर अनौपचारिकरीत्या उघड करण्यात आले म्हणून बरे, नाही तर चीनमध्ये राजकीय अस्वस्थता आहे असाच त्या देशातील या घडामोडींचा अर्थ निघाला असता.
तो अर्थ (राजकीय अस्वस्थता) निघू शकण्याचे कारण शोधण्यासाठी अधिक मागे जावे लागेल. क्षी जिनपिंग यांनी राजकीय परंपरा मोडून आपणच तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचे संकेत दिले तेव्हापासून म्हणजे २०१७ पासून चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणे नाराजी धुमसते आहे. यातच चिनी उद्योजक आणि व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार किंवा शिक्षणपातळीला साजेशा नोकऱ्या न मिळालेले तरुणही आहेत कारण चीनची अर्थव्यवस्था मंदावते आहे. कोविडकाळातील राक्षसी टाळेबंदी आणि अन्य निर्बंधांमुळे लोकांची नाराजी आहेच. क्षी जिनपिंग यांच्याचवर लोक नाराज असल्याची अन्य उदाहरणेही सांगता येतील.
सर्वात मोठे उदाहरण म्हणजे चिन गांग यांनी २५ जूनपासूनच सार्वजनिक जीवनातून दिसेनासे होणे आणि मग परराष्ट्रमंत्रीपदावरून त्यांना ‘हटवले’ जाणे. क्षी जिनपिंग यांना पक्षांतर्गत विरोधच किती आहे, हे यातून दिसले. आजतागायत चिन गांग यांच्या ठावठिकाण्याबद्दल कोणीही अवाक्षरदेखील काढलेले नाही. चिनी परराष्ट्र खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून चिन गांग यांचा उल्लेख असलेले मार्च २०२३ पासूनचे सर्वच संदर्भ/ दुवे २६ जून रोजी काढून टाकण्यात आले. मात्र ‘चिन गांग हे प्रांतिक परिषद सदस्य आहेत’ असा उल्लेख कायम ठेवण्यात आला. चीनमधले हे प्रांतिक परिषद सदस्यपद मंत्र्यांपेक्षा मोठे, पण उपराष्ट्राध्यक्षापेक्षा कमी मानले जाते. गांग यांना पूर्णच टाकून देऊ नये हा क्षी जिनपिंग यांचा आग्रह तडीस गेल्याचे यातून दिसते.
पण येत्या काही आठवडय़ांत चिन गांग यांच्या चौकशीचे आदेश निघाले, तर एक प्रकारे क्षी जिनपिंग यांच्या अधिकारालाच आव्हान दिले जाईल. गांग यांना गेल्या दोन वर्षांत दोनदा मोठय़ा बढत्या देण्याचा निर्णय एकटय़ा जिनपिंग यांचाच होता आणि त्यामुळे अन्य अनेक वरिष्ठांना डावलले गेले होते. गांग यांना आधी चीनचे राजदूत म्हणून अमेरिकेला पाठवण्यात आले आणि त्यांचा तो कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच ते परराष्ट्रमंत्री झाले. ऑक्टोबर २०२२ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) विसावे अधिवेशन झाले, तेव्हा गांग यांची वर्णी ‘सीसीपी’च्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर लावणारेही जिनपिंगच होते. अशा मध्यवर्ती कार्यकारिणीवर येणाऱ्यांनी आधी अतिथी सदस्य तरी असावे अशी रीत असते, ती डावलून गांग थेट कार्यकारिणीत आले.
वास्तविक, ‘विवाहबाह्य संबंध’- मग ते एका व्यक्तीशी असोत वा अनेक व्यक्तींशी- ठेवणे हा काही ‘सीसीपी’मध्ये फार शिक्षापात्र गुन्हा मानला जात नाही. कित्येकांचे तसले संबंध असूनही पक्षातील पदे ते उजळ माथ्याने मिळवतात, याचे ताजे उदाहरण उपराष्ट्राध्यक्ष शांग गाओली यांचे. त्यांच्यावर चिनी राष्ट्रीय टेनिसपटू पेंग शुआई हिने नोव्हेंबर २०२१ मध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र नंतर, हा आरोप मागे घेत असल्याचे पेंग शुआईने जाहीर केले.
या संदर्भात, चिन गांग यांचे चीनमधील ‘फीनिक्स टीव्ही’च्या अँकर फू शाओतिआन यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याबद्दलचे तर्कवितर्क तसेच शाओतिआन यांना ब्रिटिश गुप्तचर खात्यानेच इथे पाठवल्याची कर्णोपकर्णी यांत काहीही तथ्य नसू शकते. अर्थात, या फू शाओतिआन यांनी चीनमध्ये परततेवेळी पाठवलेला एक कथित ईमेल संदेश सध्या उघड झाला आहे, त्यावरून इतके नक्की दिसते की चिनी सार्वजनिक सुरक्षा खात्याची करडी नजर फू शाओतिआन यांच्यावर होती.. पण याचा संबंध पुढे चिन गांग यांच्याशी लावता येईल काय, हे अजिबात स्पष्ट झालेले नाही.
गुप्तचर म्हणून खुद्द चिन गांग यांचाही अनुभव मोठा आहे. मुळात ते चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘आंतरराष्ट्रीय संपर्क विभागा’त (इंटरनॅशनल लिआझाँ डिपार्टमेंट) बराच काळ होते. तिथूनच त्यांना क्षी जिनपिंग यांनी २००८ मध्ये चिनी परराष्ट्र खात्यात आणले. एरवी साऱ्या चिनी राजनैतिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ‘चायना फॉरेन अफेअर्स युनिव्हर्सिटी’तून होत असते, पण गांग तिथे शिकलेले नसून, अनेक चिनी गुप्तचर जेथे शिकले त्या ‘बीजिंग युनिव्हर्सिटी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स’मधून पदवीधर झाले. या पदवीनंतर गांग यांना चिनी सार्वजनिक सुरक्षा खात्याच्या अखत्यारीतील ‘बीजिंग डिप्लोमॅटिक सव्र्हिसेस ब्यूरो’मध्ये पाठवण्यात आले, तिथून मग ‘युनायटेड प्रेस इंटरनॅशनल’च्या बीजिंग कार्यालयात- थोडक्यात, त्यांचा प्रवास सरळ वा एकरेषीय नाही.
क्षी जिनपिंग यांच्याविरोधी कारवायांचा भाग म्हणून गांग यांना जावे लागले असेल तर त्या कारवायांमागे आहे कोण, असा प्रश्न रास्त ठरतो आणि त्या दृष्टीने, माजी चिनी राष्ट्राध्यक्ष जिआंग झमीन यांचे विश्वासू आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरो स्थायी समितीचे माजी सदस्य झेंग चिंगहाँग यांच्याकडे अंगुलिनिर्देश करणारे काही विश्वासार्ह दुवे सापडतात. गांग यांचे संबंध ‘फीनिक्स टीव्ही’च्या अँकर फू शाओतिआन यांच्याशी जोडण्यामागे हे चिंगहाँग असल्याचे म्हटले जाते. यापूर्वीच नोंदवल्याप्रमाणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे हे काही चिनी कम्युनिस्ट पक्षात शिक्षापात्र मानले जात नाही. परंतु परकीय गुप्तचरांशी लागेबांधे असणे हे मात्र अत्यंत गंभीर मानले जाते. चीनच्या सार्वजनिक सुरक्षा खात्याचे चाँगकिंग प्रांतप्रमुख वांग लिजुन यांच्यावर स्वत:च्याच खात्याकडून होणारी अटक टाळण्यासाठी चेंग्डू या चिनी शहरातील अमेरिकी वाणिज्य दूतावासामध्ये आश्रय मागण्याची नामुष्की २०१२ सालात ओढवली होती, तेव्हापासून परकी गुप्तचरांशी हातमिळवणीचा नुसता आरोपही अतिगंभीरच, हे दिसून आले आहे. बरे, जिआंग झमीन आणि त्यांचे विश्वासू झेंग चिंगहाँग यांचा क्षी जिनपिंग यांना असलेला विरोध तर जिनपिंग जेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे शांघाय प्रांत सरचिटणीस झाले, तेव्हाही दिसलाच होता.
तरीसुद्धा जिनपिंग हेही लेचेपेचे नाहीत, हे अगदी नक्की. चिन गांग यांच्याचपुरते पाहायचे तर, २५ जूनपासून पुढल्या ३० दिवसांनंतरच परराष्ट्रमंत्रीपदावरून त्यांची अधिकृत उचलबांगडी करविली जाण्यात अखेर यश आले, यातून पक्षांतर्गत विरोधाला किती तगडा प्रतिकार झाला असेल याचीही कल्पना करता येते. ‘लक्ष्य’ किंवा भोज्ज्या म्हणून गांग यांनाच निवडण्यात आल्याची कारणे फारच उघड आहेत- एक तर गांग यांचा उत्कर्ष क्षी जिनपिंग यांनीच घडवला आणि दुसरे म्हणजे जगाच्या नजरेत येण्यासाठी परराष्ट्रमंत्रीपदासारखे दुसरे पद नाही. त्यामुळे गांग यांना हटवले जाणे हे जिनपिंग यांचा अधिकार खिळखिळा करण्याचे एक पाऊल मानले जाईल, यात शंका नाही. अन्य पावले आर्थिक क्षेत्रातील असू शकतात- सध्या जिनपिंग यांच्याच जुन्या धोरणांच्या विपरीत, चीनमधील खासगी उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला सवलती दिल्या जाताना दिसताहेत. पण त्याच वेळी, जिनपिंग हेही काटशह देण्यासाठी स्वत:चे आसन भक्कम करण्याच्या प्रयत्नात दिसतात.. त्याशिवाय का त्यांनी सार्वजनिक सुरक्षा खात्याचे मंत्री वांग शिआओहाँग यांच्या जोडीने स्वत:चे विश्वासू वांग शिशाँग यांची ‘उपमंत्री’ म्हणून नेमणूक केली असती? या वांग शिशाँग यांना उपमंत्री करण्यासाठी अतक्र्य बढती देण्यात आलेली आहे, ती चिनी कम्युनिस्ट पक्षातील ‘नासक्यां’वर नजर ठेवण्यासाठीच, हे उघड आहे.
लेखक भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात अतिरिक्त सचिव होते, तसेच सध्या ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळा’चे सदस्य असून ‘सेंटर फॉर चायना अॅनालिसिस अॅण्ड स्ट्रॅटेजी’चे अध्यक्ष आहेत.
jayvins1@gmail.com