– स्वरा औघडे

‘कोल्हापूर’, ‘लव जिहाद’च्या बातम्या बघताना एकच प्रश्न डोक्यात येत होता आणि तो म्हणजे, सरकारला प्रश्न विचारण्याचं धाडस लोकशाहीत खरे तर प्रत्येक सामान्य नागरिकात असायला हवं, ते आज कुणाकडेच का नाही? होय, हे धाडस माझ्यातही नाही. तरीही आज महाराष्ट्रासारख्या एवढ्या समृद्ध राज्यात आज नेमकं काय सुरू आहे, जे काही सुरू आहे त्याचा देशाच्या प्रगतीशी काही संबंध आहे का, हा प्रश्न पडतोच.

बालासोरनजीकच्या भीषण रेल्वे अपघातानंतर अनेकांना वाटून गेले की, बुलेट ट्रेन किंवा वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान गाड्यांपेक्षा सुरक्षित रेल्वेप्रवासाच्या ‘कवच’ यंत्रणेची गरज अधिक होती… ‘लोकसत्ता’नेही हीच लोकभावना ‘प्रश्न प्राधान्याचा आहे !’ या अग्रलेखाद्वारे (६ जून) व्यक्त केली. पण त्या अग्रलेखाचे शीर्षक – ‘प्रश्न प्राधान्याचा आहे!’ हे अनेक बाबतींत लागू पडणारं आहे… कारण आपण अनेक ठिकाणी नको त्या गोष्टींना प्राधान्य देत आहोत. जातीय-धार्मिक सलोख्याच्या अभावामुळे देशाचं नुकसान होतं, हे उघड आहे. पण त्याबद्दलचे मूलभूत प्रश्न बहुधा मांडलेच गेले नाहीत किंवा ते मांडण्याची संधीच मिळाली नाही. आपला भारत विविध परंपरा, संस्कृती, धर्म, जाती यांनी नटलेला आहे असं जर आपण म्हणतो तर पुन्हा-पुन्हा हिंदू-मुस्लिम असे प्रश्न का निर्माण करावेत? नको त्या गोष्टींना खतपाणी घालण्याची कामे आजचे नेते करत नाहीत का? मान्य आहे की इतर धर्माच्याही काही गोष्टी चुकत आहेत, मात्र आपणही काही गोष्टींचा अतिरेक करत आहोत, असं नाही का वाटत ?

Loksatta chatusutra Supreme Court 21st Article Krishna Iyer UAPA
चतुःसूत्र: जामीन हा नियम, तुरुंगवास अपवाद!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Loksatta editorial Narendra modi statement Karnataka govt arrested ganesh murti congress
अग्रलेख: कर्मभूमीतील धर्मकसोटी!
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
nitin gadkari
Nitin Gadkari : “राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?
Why does Vinesh Phogat want to enter politics here is her interview
‘खेळातले राजकारण’ अनुभवून दुखावलेल्या विनेश फोगटला ‘राजकारणाच्या खेळा’त का शिरायचे आहे?
article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?

हेही वाचा – ते बाहुबली; पण त्याही लिंबूटिंबू नाहीत..

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलं, त्याबद्दल नेहमीच आपण त्यांचे ऋणी राहू, मात्र आज त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे राजकारण केलं जात आहे, असं नाही का वाटत? औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्यात आलं, अहमदनगरचं रुपांतर अहिल्या नगरात करण्यात आलं, यामुळे आपली खरंच प्रगती झाली का? किंवा, ही नावं जुलमी आक्रमकांची होती म्हणून या शहरांची प्रगती आजतागायत थांबली होती का? – यावर उत्तर म्हणून ‘आक्रमक खरोखरच जुलमी होते’ असं सांगितलं जातं, पण प्रश्न जुन्या काळाचा नसून आजच्या प्रगतीचा आहे.

शहरांची नावं बदलण्यापेक्षा आज गरज आहे ती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची. ‘लोकशाही’ म्हणता तर लोकांच्या मनाचा असा कितीसा विचार केला जातोय? सगळ्या गोष्टी कळूनदेखील फक्त नेतेच काय तर आपण सामान्य नागरिकही या गोष्टींकडे कानाडोळा करत आहोत. हे दुर्लक्ष करणाऱ्यांत तरुणांचा सहभाग मोठा आहे, हे कबूल करावं लागतं. पण जर आमची पिढी उद्याचं देशाचं भविष्य असेल तर आमचं वर्तमान यासाठी चांगलं नसावं का ? या आजूबाजूच्या गोष्टी, धर्म आणि फक्त धर्म हे आम्हाला आमच्या लक्ष्यापासून विचलित करीत आहेत. आज कोल्हापूरच्या दंगलीमध्ये कितीतरी माझ्यासारखी तरुण मुलंच होती.

पण माझ्या वयाच्या अनेक मुलामुलींना कुस्तीपटूंच्या आंदोलनानंही आतून जागं केलं असेल. पोलिसांकडे तक्रार दाखल करणं, तिचा पाठपुरावा पोलिसांनी करावा अशी अपेक्षा करणं यासाठी हे आंदोलन करावं लागलं, पण या सरकारनं साधी लवकर दखलसुद्धा घेतली नाही. कुस्तीपटूंना मुली म्हणून जे सहन करावं लागलं, त्याबद्दल मनोमनी चीड माझ्यासारख्या अनेक मुलींना असेल. पण ती व्यक्त नाही झाली. आज मिरा रोड सारख्या कितीतरी घटना कानावर पडतात, पण तेव्हा खल होतो तो क्रूर कृत्यं करणाऱ्यांच्या आडनावांवर!

हेही वाचा – महारेराविरोधात प्रक्षोभ का?

आजकाल बातम्या ना पहाव्याशा वाटत ना वाचाव्याशा! नाही म्हणायला समाजमाध्यमांतून आजचे तरुण आजच्या वास्तवाशी या ना त्या प्रकारे संबंधित राहण्याचा प्रयत्न करतात. उलट, समाजमाध्यमांतलं ‘फॉरवर्डेड’ वास्तव त्यांना खऱ्या प्रश्नांपासून आणखीच दूर नेत असतं. हे बघून असं वाटत आहे की आपण आणखी २० – ३० वर्षं मागे जात आहोत.

जरी आमचं भविष्य आणि वर्तमान हे आमच्याच हातात असलं तरी भोवतालच्या गोष्टींचा आमच्यावर परिणाम नाही का होणार ? खरं तर आमच्या पिढीचा मार्ग हा अधिक खडतर आणि आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित करणारा आहे. यातून पळवाट न शोधता योग्य मार्ग निवडणं हे आपल्या हातात आहे. पण तो मार्ग देशापुढल्या प्रश्नांना टाळून कसा काय घेता येईल? मग, जर आपण स्वतःला ‘लोकशाही’ म्हणवून घेत आहोत, तर देशापुढल्या प्रश्नांवर खरोखरच चर्चा का नाही करत? अशी चर्चा होत नाही, मनातले प्रश्न विचारलेच जात नाहीत, म्हणूनच आपला देश १९४७ पासून आजपर्यंत ‘विकसनशील’ राहिला आणि ‘विकसित’ नाही झाला, असंही वाटू लागतं.

हे लिहिण्याचीही हिंमत होत नव्हतीच… आताही सांगते, माझ्यामुळे कोणाची मने दुखावली गेली असतील तर क्षमस्व! पण माझ्याकडून माझ्यासारख्या तरुण पिढीच्या हितासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे.

(लेखिका मिरा-भाइंदर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.)