ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. स्वराज्य मिळाले. पण, त्याचे सुराज्यात रूपांतर अजूनही झालेलेच नाही. २६ जानेवारी १९५० ला देश प्रजासत्ताक झाला आणि भारत हा जगातील बलाढ्य लोकशाहीचा म्हणून नावारूपास आला. लोकांनी, लोकांसाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे चालवला जाणारा कारभार म्हणजे लोकशाही, ही व्याख्या पुस्तकांमध्ये वाचण्यापुरती, शाळा- महाविद्यालयांमध्ये शिकवण्यापुरतीच राहिली. प्रत्यक्ष भारतीय माणसाच्या जीवनात आज ती फारशी दिसत नाही.
आज भारताची संपूर्ण लोकशाही मूठभर लोकांच्या हातात गुलाम झाली आहे. भ्रष्ट नेता पुढारी, भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट भांडवलदार आपल्या स्वार्थासाठी तिला राबवत आहेत. ज्या निवडणुकांच्या माध्यमातून ही लोकशाही प्रगल्भ होणार होती; लोकशाहीचा आधार ज्या निवडणुका आहेत, त्याच निवडणुका आज धनिकांच्या हातचे बाहुले झाल्या आहेत. ज्याच्या जवळ धन असेल, तोच या लोकशाही निवडणुका लढवू शकतो. निवडणुकांना आज व्यापाराचे स्वरूप आले आहे. जेथे व्यापारी प्रवृत्ती शिरते, तेथे सेवा नांदूच शकत नाही. दहा लावा आणि लाख मिळवा हा व्यापाऱ्यांचा नियम तेथे लागू होतो. राजकारण हा झटपट श्रीमंतीचा मार्ग आहे, असे वातावरण आज देशात आहे. या देशातील सर्वसामान्य नागरिकांनी यावर विचार केला नाही, तर हा देश पुन्हा परकीय शक्तींचा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा : ‘अमेरिकन ड्रीम’ दु:स्वप्न का ठरत आहे?
भारताजवळ नैसर्गिक, वैज्ञानिक सर्वप्रकारची साधनसंपत्ती आहे. याचा आमचे राज्यकर्ते नेहमी गाजावजा करतात. पण, आज निर्यातीमध्ये आपला क्रमांक जगात कुठे आहे? आज आपल्याकडे आयातच आयात होत आहे. जगातील लहान देश जेथे वनसंपदा कमी आहे, जेथे नैसर्गिक, खनिजसंपत्ती कमी आहे, जेथे उत्पादनाला लागणारे हात कमी आहेत, असे देशच आपल्या वस्तू आयात करतात. जागतिक बँकेच्या जोरावर हा देश रस्ते, पूल, धरणे बांधत आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आमची लोकशाही स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी नाही. अन्य देशांच्या कुबड्या अपण टेकू म्हणून वापरत आहोत. ही हरलेली लोकशाही आहे, लाचारांची लोकशाही आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारतातील लोकशाहीचे चित्रण १५ ऑगस्ट १९५३ ला एका लेखातून केले-
स्वराज्याला सुराज्यात परिवर्तित करण्यासाठी, लोकशाहीला सफल व यशस्वी करण्यासाठी खेड्यापाड्यांतील जनतेला तिच्या हक्कांची व कर्तव्यांची जाणीव लोकभाषेतून करून देण्याचे कार्य प्रत्येक जाणत्या व्यक्तीने आज केले पाहिजे, तरच राष्ट्राचे भवितव्य उज्जवल होणार आहे.”
हेही वाचा : लेख : राज्यांच्या कर्जमर्यादेला केंद्राचा चाप?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या जाणत्या लोकांकडून स्वराज्याला सुराज्यात परिवर्तित करण्याची अपेक्षा केली आहे, ते जाणते, विद्वान, पत्रकार, साहित्यिक हेसुद्धा जात, धर्म, पंथ, पक्ष या पलीकडे पोहोचले नाहीत. या देशातील महापुरुषांना आम्ही जाती-धर्मांत वाटून घेतले. थोरा-मोठ्यांच्या जीवनचरित्रावर शिंतोडे उडवले जातात, तेव्हा सर्व समाज एकजूट होऊन या विकृतीकरणाविरुद्ध बोलत नाही. टीका करणारा माझ्या जातीचा, धर्माचा म्हणून त्या विकृतीचे समर्थन केले जाते. या महापुरुषांचे नाव राजकारणासाठी वापरले जाते. आज लोकशाहीत याच प्रवृत्ती समाजात फोफावल्या आहेत. आता काळ बदललेला आहे. अक्कू यादवसारख्या गुंडांना नागपूरात जनशक्तीने ठेचून काढले. आता या देशातील सर्वसामान्य जनता प्रत्येक क्षेत्रातील अक्कू यादवांना शोधून ठेचतील, अशी वेळ आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका पोवाड्यात म्हणतात –
आता तरी येऊ द्या अक्कल, होतील बेहाल,
पुसेना कुणि मग जातीला ।
धनाला आणि घराण्याला ।।
जमाना सत्याचा आला रे, जी ऽ ऽ ॥
जरि असाल मानाने मोठे, कराल काम खोटे,
ओढतील लोक गल्लीवरती ।
हातापायासी घट्ट धरती ॥
टाकतील नाकि तोंडी माती रे, जी ॥१॥
ज्यांना आम्ही जनप्रतिनिधी म्हणतो, ते लोकशाहीमध्ये जनतेचे सेवक असतात, मुनीमजी असतात. तेच मुनीमजी मालकासारखे वागत आहेत. प्रत्येक नागरी सोयीसाठी, स्वहक्कासाठी या नेता-पुढाऱ्यांच्या दारात सर्वसामान्य माणसाला उभे राहावे लागते. कारण या देशातील जनतेला आपले हक्कच समजले नाहीत. पण, तरुण पिढीला हे आता समजू लागले आहेत. ते अक्कू यादवचा मुडदा पाडून स्वतःचा न्याय स्वतः मिळवून घेऊ शकतात, हे दिसत आहे.
हेही वाचा : साहेब म्हणतात, मी रामराज्य आणल्याचं काही गांभीर्य आहे की नाही?
द्या जातपात सोडूनी, म्हणा गर्जुनी,
झालो आम्ही मानव जातीचे। देशसेवेच्या पंक्तीचे ॥
शिपाई – लोक रक्षणाचे रे, जी ऽऽ ।।
बघु नका कोणाला कमती ॥
नागरिक व्हा उत्तम रीती रे, जी ॥५॥
नेता-पुढारी, सर्वसामान्य जनतेने आदर्श नागरिक होऊन राष्ट्रसेवा करावी, असे मत महाराजांनी मांडले आहे. या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी. प्रत्येक नागरिकाची आहे. पण, आज जे विपरीत घडत आहे, याविषयी राष्ट्रसंत एका लेखात लिहितात-
…परंतु शेकडो वर्षे गुलामगिरीत घालवल्यामुळे जनता आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकारांना पार विसरून गेली आहे. राष्ट्रीय बुद्धी दूरदृष्टीस पारखी झाली आहे. त्यामुळे तात्कालिक व क्षुल्लक अशा व्यक्तिगत स्वार्थाला बळी पडून ती आपल्या हाताने आत्मनाशच करून घेत आहे. तिला आपल्या अधिकारावर आरूढ करून देणे, हेच सुराज्याचे बीज आहे. त्याशिवाय लोकशाही स्वराज्याचे वैभव जनतेला अनुभवताच येणार नाही.
हेही वाचा : ‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
राष्ट्रसंतांनासुद्धा तळमळ होती की, या देशातील सर्वसामान्यांनासुद्धा लोकशाहीचा हक्क कळला पाहिजे. त्यांनी दुःखाने व्यथित होऊन या देशातील मतदाराला जागे
करण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या पोवाड्यातून केला-
व्हा सावधान लोकहो ! उभारूनि बाहो,
देशाचे भवितव्य ठरणार | पुढारी दारोदारी फिरणार ||
तुम्ही मतदान कुणा करणार? हो ऽ ऽ जी ॥
कवणाच्या धाकदडपणे अथवा लोभाने,
पैशाने भाळून का जाणार ?
जातिचा म्हणून बळी पडणार?
सांगा तर काय काय करणार?
आज भुलूनि का उद्या रडणार ? हो जी ॥
राष्ट्रसंतांनी हा पोवाडा १९५० दरम्यान लिहिला. तेव्हाच्या लोकशाहीचे चित्रण त्यांनी त्यात मांडले. आजसुद्धा आमच्या लोकशाहीचे हेच चित्रण आहे. त्यात कुठलाच बदल नाही. मतदान करताना अनेक लोक पैशांना भाळून मतदान करतात, गुंडांच्या धाकानेही मतदान होते, आमच्या जातीचा आहे; तो गुंड असला तरी आम्हाला चालतो, ज्याच्या चारित्र्याचा समाजाला, धोका होणे, अशांनासुद्धा आम्ही निवडून देत असतो. या देशातल्या पुढाऱ्यांना लोकांची लाचारी लक्षात आली आहे. जसे, इंग्रजांन या देशात जाती, धर्मांना आपसात लढवून राज्य केले, तेच आजही घडताना दिसते.
लोकात पक्ष निर्मुनी भेद पाडुनी,
गावा-गावात भोग शिरणार,
शेतकरी – मजुरची मरणार ।।
पुढारी आशीर्वाद देणार ।
तुम्ही नाहि का हे ओळखणार ?
गावात राहणारे आम्ही साऱ्यांचा व्यवहार एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. पण, या सहकार्याच्या भावनेला आज ग्रहण लागले आहे. घराघरांत पक्ष पडलेले आहेत. हे सारे भेदभाव पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने घडत असतात. ते राजकारण करतात.
हेही वाचा : लेख : आमच्या उत्तराधिकाऱ्यांपुढचा काळ अधिक कठीण!
आज या पक्षात, उद्या त्या पक्षात यांचे जाणे सुरू असते. निवडणुकीच्या वेळेस सर्वच राजकीयपक्ष आपला जाहीरनामा काढतात; पण तो जाहीरनामा फक्त कागदोपत्री असतो. अशा लबाड पुढाऱ्यांना, लबाड राजकीय पक्षांना आपण ओळखणार नाही का, असा प्रश्नच राष्ट्रसंतांनी मतदारांना केला आहे.
तुम्ही हक्कदार येथचे, लोक कोणचे
भले आणि गुंड तुम्हा कळणार
समजुनी कराल ना व्यवहार ?
भूल – थापात, नाहि फसणार ।
असा मनी धराल कां निर्धार ?
या लोकशाहीचे खरे हक्कदार तुम्ही आहात. तुमचा हक्क बजावताना तुम्हाला सज्जन आणि गुंडांचा फरक माहीत असतो. गुंडाच्या भूलथापांना फसू नका. आपल्या सद्विवेकबुद्धीने विचार करून मतदान करण्याचा निर्धार करा. पक्ष पाहून मतदान करू
नका, तर व्यक्ती पाहून मतदान करा.
नाही पक्ष माझियापुढे, खडे रोकडे,
बोल ते तुम्हापुढे धरणार,
फजिती नाही पुढे होणार |
असे सत्शील लोक चुनणार ।
तरिच रामराज्य तुम्ही करणार ! हो ऽ ऽ जी ।
घ्या पुसा स्वतः हृदयासी कोण गावासी
चालविल न्याय तोल धरूनी ?
आजवरी केले काय त्यांनी ?
भल्यासचि द्या मत उचलोनी,
दान द्या सत्पात्रा बघुनी हो ऽऽ जी !
लोकशाहीत न्यायाचं राज्य येण्यासाठी सत्प्रवृत्तीच्या माणसाला निवडून द्या. हे मत हे दान आहे आणि तुमचे दान हे सत्पात्री हवे.
बहू मोलाचे हे मतदान, सोडुनी भान,
देऊ नका दारू पिणाऱ्यासी ।
लाचखाऊ चोर बाजाऱ्याशी ।
अन्यायी गुंड दंडेल्यासी ।
कराल देशाची सत्यानाशी हो ऽ ऽ जी ॥
धुंदीत जाऊनि कुणी, मते देऊनी,
पश्चातापास पात्र होणार ।
करू नका तसा कुणी व्यवहार ।
असो मग प्रजा किंवा सरकार ।
कानी घ्या तुकड्याची पुकार ! हो ऽ ऽ जी ॥
तुमचे मत बहुमोलाचे आहे. लाच खाणारे भ्रष्टाचारी उमेदवारांना निवडून देऊ नका. पण, आज सत्प्रवृत्तीचा माणूस निवडणुकाच्या बाजारात उभाच होऊ शकत नाही, याचे कारण आम्ही आहोत. मतदारांनी जर आपले कर्तव्य योग्यरीतीने पार पाडले तर मवाली, गुंड राजकारणात येतीलच कशाला? राष्ट्रसंत एका लेखात लिहितात-
हेही वाचा : राम नाईक : नव्वदीतला लोकसेवक
“आपल्या सर्वांची सामुदायिक इच्छा शक्ती म्हणजेच सरकार आपण जशी इच्छा करू, तशीच सत्ता साकार होणार! राष्ट्रीय सत्तेला घर की मुर्गी समजून जे लोक तिचा गैरफायदा घेत असतील; तर त्यांच्याऐवजी नीतिमान, त्यागी, मानवधर्मी, उज्ज्वल,चारित्र्यवान व निर्भीड अशा जनसेवकांना पुढे आणून राष्ट्राचे बरे करणे जनतेच्या हाती आहे. विघातक टीका न करता, जनतेला याची पूर्ण जाणीव करून देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे, तरच सुराज्याचा झेंडा गरिबांच्या झोपडीवर लागेल!
मतदारा, उठ, जागा हो; जात, धर्म, पंथ, पक्ष यांना दूर सारून सद्विवेकबुद्धीने मतदान कर. आपला हक्क बजाव, त्यातच तुझे आणि देशाचे कल्याण आहे.
लेखक राष्ट्रसंत तुकडोजींच्या विचारांचे अभ्यासक आहेत.