नागेश चौधरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात १९२५ साली झालेल्या स्थापनेपासूनच आहे हे वरवर दिसणारे वास्तव आहे. परंतु संघाच्या वैचारिक भूमिकांची किंवा संघविचाराची पार्श्वभूमी वा प्रेरणा ही वेदकाळापासूनची आहे आणि हे त्याच्या सैद्धांतिक, वैचारिक भूमिकेतून, प्रत्यक्ष व्यवहारातून दिसते. तसे पाहिले तर पूर्वी काँग्रेसमध्ये आज शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडली तशी उभी फूट संघात वा भाजपमध्ये आजवर कधीच पडलेली नाही.

कम्युनिस्ट पक्षातही फूट पडली. सीपीआय, सीपीएम, ते नक्षलवादी हे सर्व कम्युनिस्ट गट मार्क्स, लेनिन, माओ यांना मानणारे आहेत; पण त्यांच्यात नुसती फूट पडत नाही, तर तिचे हिंसक पडसादही उमटताना दिसतात. समाजवादी पक्ष तर अनेकपरींचे आहेतच. दलित संघटनात आणि राजकीय पक्षांमध्येही अनेकदा फूट पडली आहे. डॉ. आंबेडकर यांना आदर्श मानणारेच अनेक गटांत विभाजित झाले आहेत. आपलाच गट खरा पक्ष असे ते मानताना दिसतात. त्यांच्यात एकमेकांस सहकार्य करणारी भूमिका नसून स्पर्धा आणि असूया आहे.

हे ही वाचा… आरोपी मेल्याचे दु:ख नाही, पण…

याचे कारण या सर्वच राजकीय पक्षांचे ध्येय आहे ‘आहे त्याच व्यवस्थेत’ सत्ताधारी होण्याचे. किंवा सत्ताधारी पक्षाकडून काहीतरी पदरात पाडून घेण्याचे आहे. परंतु संघाचे तसे नाही आणि भाजप हा पक्ष संघाचे अपत्य असल्याने संघाचे ते ध्येय राजकीय सत्तेतून साध्य करणे हे भाजपचे काम आहे. ‘राष्ट्र-उभारणी’ हे संघाचे एक महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. त्याला आज ते हिंदुराष्ट्र म्हणतात. आरएसएस या ध्येयाला राज्याच्या, अर्थात सरकारच्या वर मानते. ‘नेशन अबाव स्टेट’ हा गोळवलकरांच्या ‘वुई- अवर नेशनहूड डिफाइन्ड’ या पुस्तकाचा वैचारिक धागा आहे. राष्ट्र आणि राज्य ही विभागणी पुढे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रासाठी आणि भाजप राज्यासाठी’ अशाही प्रकारे सांगता येते. अर्थात, संघ भाजपच्या वर आहे. म्हणजे मनुस्मृतीनुसार जसा राजाच्या वर ब्राह्मण असतो तशीच उतरंड इथे मानली जाते.

संघ भाजपचे लोक नेहमी आपल्या भाषणात, बोलण्यात राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र हे शब्द आलटून पालटून वापरतात. ‘राष्ट्र निर्माण करना है’ असे तर अगदी भागवत, मोदींपासून गडकरी, फडणवीस वा परिवारातील सर्व संघटनापर्यंत प्रत्येकजण उच्चारताना दिसते. म्हणजे अभाविप, विहिंप, आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतात. पण हिंदूधर्म हा चातुर्वर्ण्य मानणारा निश्चित आहे. ब्रह्माच्या शरीरापैकी ब्राम्हण तोंडातून, क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांड्यातून आणि शूद्र पायातून निर्माण झाले, या प्रकारच्या श्रद्धा हिंदू जीवनपद्धतीसाठी पायाभूत ठरतात, ही रचना आणि ती सांगणारे ग्रंथदेखील अर्थातच विशिष्ट वर्गाची निर्मिती आहेत. परंतु ही वर्ण-जात रचना स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत या सर्वात मांडलेली दिसते.

‘सेक्युलरिझम ही आपली संकल्पना नव्हेच- ती पाश्चात्त्य संकल्पना आहे,’ अशी विधाने संघविचाराशी बांधिलकी सांगणाऱ्या व्यक्ती जरी घटनात्मक पदावर असल्या तरीसुद्धा त्यांच्याकडून होत असतात. परंतु माणसामाणसांत भेद करून काही माणसांची कायम अप्रतिष्ठा करणे, ही संकल्पना मात्र मनुस्मृतीत आढळते. तीही अर्थातच, हिटलरचा नाझीवाद किंवा मुसोलिनीचा फासिवाद (फॅसिझम) यांच्या कितीतरी वर्षे आधीपासूनच! डॉ. आंबेडकरांनी सुद्धा असे म्हटले आहे, की हिटलरपेक्षाही यांची नीती, योजना लांब पल्ल्याची आहे आणि म्हणून ती हिटलरएवढी हिंसक नाही.

हे ही वाचा… अग्रलेख: बुल्स इन चायना शॉप्स!

एखाद्या समूहाला वर्चस्वाची जाणीव देऊन मग आपले राजकारण हिटलरला करावे लागले, त्याच्या पाडावानंतर त्याचे वर्चस्ववादी राजकारणही संपले. पण आपल्याकडे तसेच नाही. ज्या समूहाची वर्चस्वजाणीव सदैव जागृत आहे, तोच समूह ‘आम्ही इतरांनाही संधी देतो’ असे म्हणत स्वत:चे वर्चस्व टिकवू पाहातो आहे. हिटलरशाहीपेक्षा संघाचे राजकीय विचार निश्चितपणे निराळे आहेत. ‘कोई भी व्यक्ति चाहे कितना ही महान क्यो न हो, राष्ट्र के लिए आदर्श नहीं बन सकता।’ असे मा. स. गोळवलकरांनी म्हटले आहे (‘विचार नवनीत’ पृ. ३३२, लोकहित प्रकाशन, लखनऊ, १९७९). पण मग संघाच्या मते राज्याचा आदर्श कोण? भारतीय राज्यघटनेचे आदर्श म्हणून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांकडे बोट दाखवता येते. पण संघाच्या राजकारणाने ‘प्रभु श्रीराम’ हा आदर्श उभारण्याचा प्रयत्न गेल्या तीन दशकांत सातत्याने केल्याचे दिसते. रामायण हे जगभरच्या महाकाव्यांपैकी एक महान काव्य मानले जाते. वाल्मिकी रामायणात रामाला ‘ब्राह्मण प्रति पूजक:’ म्हटले आहे आणि अशी मांडणी रामायणामध्ये अगदी बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत दिसून येते. त्यात अनेक ठिकाणी रामाला चातुर्वर्ण्यरक्षक म्हटले आहे. एकूणच वाल्मिकी रामायण हे मनुस्मृतीची आवृत्ती वाटावे एवढे साम्य त्यात दिसून येते.

चातुर्वर्ण्याच्या तथाकथित ‘सिद्धान्ता’वर आधारलेली जाति-आधारित हिंदू समाजरचना मुळापासून हलवण्याचा प्रयत्न संघाने कधीही केलेला नाही. संघ-भाजप हे वर्ण-जात व्यवस्था जैसे थे ठेवूनच ‘समरसता’ आणू पाहातात. जोवर संघाच्या राष्ट्र-निर्माणाच्या दीर्घकालीन आणि व्यापक प्रकल्पाला प्रश्न विचारले जात नाहीत, जोवर ‘कोणत्या जातीचे हिंदुराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे?’ यासारखे वाद संघात उद्भवत नाहीत आणि जोवर संघाच्या राष्ट्र- निर्माणाच्या राजकारणाला पर्यायी राष्ट्र ध्येय, भूमिका वा नीती घेऊन राजकारण होणार नाही तोवर कधीही संघ फुटणार नाही. भाजपही फुटणार नाही.

(समाप्त)