नितीन गडकरी

मी महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाममंत्री असतानाची घटना. मुंबईतील माझ्या १८ वर्षांच्या काळात रतन टाटा यांच्याशी माझी नियमित भेट होत असे. ते माझ्या घरी येत. मीही त्यांच्या घरी जात असे. एकदा मलबार हिल्स भागातील माझ्या निवासस्थानी यायला रतनजी निघाले. पण, रस्ता विसरले. मी त्यांची वाट बघत होतो. मग त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, ‘‘नितीन, मी तुमच्या घराचा रस्ता विसरलोय..’’ मी म्हणालो- ‘‘हरकत नाही. ड्रायव्हरला फोन द्या, मी त्याला समजावून सांगतो.’’ त्यावरचे त्यांचे उत्तर धक्कादायक होते. ‘‘ड्रायव्हर नाहीये सोबत. मी स्वत: चालवतोय गाडी..’’ असे रतनजी म्हणाले तेव्हा मला फार आश्चर्य वाटले. एवढा मोठा अब्जाधीश-उद्योगपती, पण ड्रायव्हर नाही, सुरक्षा व्यवस्था नाही!.. पण, जसजसा रतनजींशी संबंध वाढला, तसतसे हे माझ्या लक्षात आले की, ते असेच आहेत. रतनजी एक उत्तम ‘ह्युमन बीईंग’ होते. ते साधे, सरळ, निगर्वी आणि शालीन होते. आमचा स्नेह तब्बल तीन दशकांचा. रतनजी माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, पण आमची मैत्री जुळली होती. ते मुंबईत भेटत, दिल्लीत घरी येत आणि नागपूरलाही यायचे. मी त्यांच्यासोबत प्रवासही केला आहे.

विदर्भाची सांस्कृतिक मुद्रा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Indian origin Kamala Harris Rishi Sunak President Election
कौतुक कमला हॅरिसचं आणि..
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

मला आठवतो एक प्रसंग. संभाजीनगरला डॉ. हेडगेवार हॉस्पिटलची उभारणी झाली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक मुकुंदराव पणशीकर मला म्हणाले की, नितीन या हॉस्पिटलचं उद्घाटन रतनजींच्याच हस्ते व्हायला हवं आणि त्यांना आणण्याची जबाबदारी तुझी! मग मी आणि हॉस्पिटलचे एक संचालक असे दोघे जण टाटा सन्सच्या कार्यालयात गेलो. रतनजींना भेटलो. त्यांना विनंती केली तर ते हसले आणि म्हणाले- ‘‘नितीन मी स्वत:च्या फॅक्टरीचंही उद्घाटन कधी केलं नाही..’’ मी त्यांना पुन्हा विनंती केली आणि म्हणालो- ‘‘मला तुमच्या कामाच्या पद्धतीची कल्पना आहे पण तुम्ही माझे मित्र आहात ना?.. मग तुम्हाला यावंच लागेल.’’ कोणतीच खळखळ न करता त्यांनी आमचे आमंत्रण स्वीकारले आणि स्वत:च्या खासगी स्पेशल फ्लाइटने ते संभाजीनगरला आले. मी सोबत होतो. त्या प्रवासात त्यांनी सहज मला विचारले की, हे संघाचे हॉस्पिटल आहे तर फक्त हिंदूंनाच सेवा मिळणार आहेत का?.. मी त्यांना सांगितले की, तसे काहीही नाही. संघ असा भेदभाव करीत नाही. या हॉस्पिटलच्या सेवा सर्व जाती-धर्माच्या लोकांना मिळतील. त्यांचे समाधान झाले. ते म्हणाले की, सेवाकार्ये अशीच असायला हवीत. हीच खरी ईश्वरसेवा आहे, देशसेवा आहे. त्यांचा स्वभाव अतिशय वेगळा होता. स्वत:ची बॅग स्वत: उचलणार, ड्रायव्हरशेजारच्या यजमानाच्या जागेवर बसणार नाहीत, हा त्यांचा शिरस्ता होता.

हेही वाचा >>>कौतुक कमला हॅरिसचं आणि..

मी महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबईतील सी लिंक प्रकल्प, उड्डाणपूल इत्यादी अनेक कामे झाली. त्याबद्दल ते जाहीरपणे बोलत, माझी प्रशंसा करीत. व्यक्तिगत भेट झाल्यावर आवर्जून शाबासकी देत. रतनजी आणि तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी मला कौतुकाची पत्रे लिहिली होती. ती माझ्यासाठी मर्मबंधातली ठेव आहे. त्या काळात अशा विकास कामांसाठी आम्ही एमएसआरडीसीतर्फे बाँड इश्यू केले होते. १९९६ मध्ये आम्हाला ५०० कोटी हवे होते, मिळाले ११५० कोटी. नंतर आणखी ६०० कोटी रुपयांसाठी मार्केटमध्ये गेलो तर १२०० कोटी रुपये मिळाले. आमचे बाँड्स ओव्हरसब्सक्राइब झाले. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एवढा पैसा बाजारातून उभा करता येतो, यावर विश्वास बसणे कठीण होते. रतनजी एका भेटीत मला म्हणाले, ‘‘यू आर मोअर प्रोफेशनल दॅन मी. आय डिडन्ट एक्सपेक्ट धिस मच रिस्पॉन्स टू इन्फ्रा प्रोजेक्ट्स..’’ मी त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.

एखादा माणूस डाऊन टू अर्थ किंवा फार साधा आहे, असे आपण म्हणत असतो. पण तसे असणे म्हणजे काय, हे मी अनुभवले आहे आणि त्या आयुष्यभराच्या अनुभवाचे नाव आहे- रतनजी टाटा! एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला मी त्यांना हेलिकॉप्टरने वाशीला नेले होते. ते स्वत: हेलिकॉप्टर चालवीत, विमान उडवीत. त्यात सहजता होती. कोणताही आविर्भाव नव्हता. जे काही करायचे ते निरपेक्ष, नि:स्पृह आणि नि:स्वार्थी भावनेने हा त्यांचा स्वभाव होता. एकदा त्यांच्या कुलाब्यातल्या घरी गेलो, तेव्हा दोन-तीन सेवक आणि काही श्वान यापलीकडे फारसे काही दिसले नाही. हा माणूस एवढय़ा मोठय़ा औद्योगिक: साम्राज्याचा शहेनशाह आहे, हे त्यांच्या वर्तनातून किंवा बोलण्यातून कधीही जाणवले नाही. भारतीय संस्कृतीत उपभोगशून्य स्वामी ही जी कल्पना आहे, ती कल्पना रतनजी जगले असे मला वाटते.

उद्योग हा पैसा कमावण्यासाठीच असतो. पण, उद्योगाद्वारे समाजातून कमावलेला नफा हा त्या समाजालाच कोणत्या तरी माध्यमातून परत करण्याची रीत टाटा परिवाराने जोपासली आणि रतनजींनी ती पुढे नेली. टाटा समूहातील कंपन्यांच्या माध्यमातून रतनजींनी अर्थकारणाला बळकटी दिली. लाखो हातांना रोजगार दिला. एका दीपस्तंभासारखे जीवन हा द्रष्टा उद्योगपती जगला आणि त्यामुळेच एकीकडे उद्योग जगताचा फार मोठा व्याप सांभाळताना आपला, आपल्या उद्योगांचा उपयोग समाजासाठी होत राहावा, याचीही त्यांनी काळजी घेतली. दातृत्वात ते सदैव आघाडीवर असत. व्यवसायात प्रोफेशनल इथिक्सचा बोलबाला असतो. त्या प्रोफेशनल इथिक्सच्याही पलीकडे जाणारे हे सेवेचे, सामाजिक दायित्वाचे रतनजींनी जोपासलेले मूल्य मला फार महत्त्वाचे वाटते.

हेही वाचा >>>हमीभावाचा अर्थ व अनर्थ

समाजकारण, राजकारण आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांत मानवी संबंध हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. रतनजी हे मानवी संबंध कसे जोपासावेत याचा आदर्श होते. देश, समाज आणि देशवासीयांबद्दल त्यांना आत्यंतिक प्रेम होते. जनतेबद्दल कळवळा होता. वारशाने मिळालेल्या साधनसंपत्तीचा आणखी विकास करून रतनजींनी टाटांचा ब्रँड आणखी मोठा केला. हॉटेल ते स्टील, आयटी ते सव्‍‌र्हिस सेक्टर ते एव्हिएशन अशा विविध क्षेत्रांत त्यांच्या काळात टाटा ग्रुप मोठा झाला. रतनजी अतिशय शिस्तशीर होते. नीतिप्रिय होते. व्यवसाय करताना व्यावसायिक मूल्ये  पाळण्याचा कटाक्ष रतनजींनी आयुष्यभर जोपासला. कधीही त्यांनी कुठल्या संधीचा गैरफायदा घेतला नाही. कुणाचेही शोषण केले नाही. कुणाच्या नावाचा-पदाचा गैरवापर केला नाही. त्यांच्या व्यावसायिक निर्णयांतही नैतिकतेचे प्रतििबब दिसायचे. नव्या पिढीतील उद्योग जगताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून हे शिकले पाहिजे.

असे म्हणतात की, सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञान अशा सर्व गोष्टी एकत्र मिळाल्यावर माणसांना अहंकार, उन्माद आणि दर्प येतो. रतनजींकडे सर्व काही होते. त्यांचा अधिकारही मोठा होता. यश-कीर्ती त्यांच्या पाठीशी होती. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कुठलाही अहंकार वा दर्प नव्हता. व्यवसायानिमित्त भेटणाऱ्यांना तर सोडाच, स्वत:च्या कर्मचाऱ्यांनादेखील त्यांनी लळा लावला होता. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ते एकेरी नावाने हाक मारीत आणि त्यांना प्रेम, आदराने वागवीत. हे लोक आपले नोकर नाहीत तर सवंगडी आहेत, या भावनेसह त्यांचे काम चालत असे. टाटा उद्योग समूहाची पहिली मिल म्हणजे नागपूरची एम्प्रेस मिल. मी आमदार असतानाच्या घटना आठवतात. त्या काळात ती मिल डबघाईला आली होती. मी टाटा ग्रुपला आग्रह करीत होतो की, तुम्ही ती मिल चालवा. मी त्यांना नागपूरला आणलं होतं. पाचेक हजार कामगार होते. ही मिल तोटय़ात आहे. सुमारे १५०० कामगार कमी करता आले तर आपण विचार करू शकतो, अशी भूमिका टाटाप्रबंधनाने घेतली होती. युनियनने वेगळी भूमिका घेतली. अखेर मिल बंद झाली. सरकारने ती मिल ताब्यात घेतली होती. त्यानंतर कामगारांची देणी देण्याचा प्रश्न उद्भवला. मी टाटा सन्समध्ये गेलो आणि त्यांना सांगितले की, सगळे कामगार गरीब आहेत. त्यांनी आयुष्यभर तुमच्या युनिटमध्ये नोकरी केली. सरकार त्यांचे पैसे देत नाही. तुम्ही तरी द्या. टाटा सन्सने पैसे दिले. त्यानंतर मी पुढाकार घेतला आणि टिळक पत्रकार भवनात ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद यांच्या उपस्थितीत रीतसर कार्यक्रम आयोजित करून चारशे-साडेचारशे कामगारांना त्यांचे देणे दिले. कायदेशीर जबाबदारीचा किस न पाडता कामगारांची देणी देण्यासाठी सकारात्मक भूमिका टाटा समूहाने घेतली. त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.

टाटा समूहाचे असंख्य उद्योग, हॉटेल्स तसेच अन्य व्यवसायांहून अधिक मोठे काम कोणते असेल तर ते मुंबईचे टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल. या हॉस्पिटलच्या माध्यमातून हा समूह गेल्या अनेक दशकांपासून गोर-गरिबांची नि:स्वार्थ सेवा करीत आहे. देशभरातून येणाऱ्या लोकांना तेथे दिलासा मिळतो. आपल्या कुटुंबाची किंवा उद्योग समूहाची परंपरा पुढे चालविणेच नव्हे तर पुढे नेण्याला रतनजींनी प्राधान्य दिले. सामाजिक संवेदनशीलता, समाजाप्रति जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव याचे जिवंत उदाहरण रतनजी होते. या समूहाचे वैशिष्टय़ असे की, टाटा समूहातील बराच मोठा भाग टाटा ट्रस्टच्या मालकीचा ठेवला गेला, जेणेकरून समाजऋण फेडण्याचे कार्य निरंतर सुरू राहावे यासाठी फार मोठी दृष्टी आणि दातृत्व लागते. स्वत:च्या पलीकडे न पाहणाऱ्यांच्या या जगात आपल्या कंपन्यांचा नफा समाजासाठी वापरला जावा, याचे भान ठेवणे किती उद्योगपतींना जमले असेल किवा जमेल, हा प्रश्न मला नेहमी पडत असतो. टाटा समूहाने शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय सेवा, स्टार्टअप्स अशा विविध प्रकारच्या कामांसाठी सातत्याने मदत केली. अशी उदाहरणे उद्योग विश्वात विरळा आहेत. रतनजी हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वासाठी आदर्श होते. त्यातही उद्योजकांसाठी तर त्यांचा आदर्श सदैव लक्षात ठेवावा, असा आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कर्तृत्व आणि आत्मीयता यांचा अनोखा संगम होता. त्यातून सर्वाना प्रेरणा मिळायची. त्यामुळे त्या व्यक्तिमत्त्वातून मानवतेचा सुगंध यायचा. तो सुगंध आपण सर्वानी कायमचा गमावला आहे. मी एका ज्येष्ठ मित्राला व मार्गदर्शकाला मुकलो आहे. पण, त्यांच्या स्मृतींचा दरवळ माझ्या आणि माझ्यासारख्या सर्वाच्या हृदयात कायम राहणार आहे. रतनजी अविस्मरणीय आहेत. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

Story img Loader