पद्माकर कांबळे

पत्रकार रवीश कुमार, यांच्या राजीनाम्याने, काही प्रश्न जरूर उपस्थित केले आहेत. आणि तसे होणे साहजिकच आहे. हा एक असा चेहरा आहे, जो गायपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी भाषक दूरचित्रवाणी प्रेक्षकांबरोबरच, हिंदी समजणाऱ्या इतर भाषकांनाही माहीत आहे. राजीनामा देताना रवीश कुमार यांनी प्रेक्षकांशी जो संवाद साधला, त्यात त्यांनी आजच्या पत्रकारितेवरही भाष्य केले आहे! त्यांचे मनोगत ऐकताना आठवण झाली, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुण्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’त केलेल्या भाषणाची! या भाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतातील सनसनाटी पीत पत्रकारितेचे वर्णन केले आहे! हे वर्णन अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनरने ‘प्रोफेट्स, प्रीस्ट्स अँड किंग्ज’ (१९१७, पृ. ८८-९७) या पुस्तकात लॉर्ड नॉर्थक्लिफ या इंग्लंडमधील वृत्तपत्रसृष्टीच्या बादशहाचे जे व्यक्तिचित्र रेखाटले आहे त्यावर आधारलेले होते.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Chief Minister Ladki Bahin Yojana received great response from Pimpri Chinchwad city
पिंपरीत सर्वाधिक लाडक्या बहिणीचे अर्ज बाद
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

नॉर्थक्लिफने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विलायतेतील वृत्तपत्रांचे रूप पालटले आणि त्यामुळे पिवळी पत्रकारिता फोफावली. गार्डिनरने केलेले वर्णन हिंदुस्थानातील पत्रसृष्टीलाही लागू पडत असल्यामुळे आपण गार्डिनरशी सहमत असल्याचे सांगून डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘वृत्तपत्र चालवणे हा हिंदुस्थानात एके काळी व्यवसाय होता. आज तो एक व्यापार झाला आहे. साबण तयार करण्याच्या धंद्यामागे जसे कोणतेही नैतिक प्रयोजन नसते, तसेच वृत्तपत्र चालविण्यामागेही नैतिक प्रयोजन नसते. आपण जनतेचे जबाबदार सेवक आहोत, असे वृत्तपत्रसृष्टीतील कोणालाही वाटत नाही. कोणताही हेतू मनात न बाळगता वा रंग न मिसळता बातमी देणे, ज्यामुळे समाजाचे भले होईल अशा सार्वत्रिक धोरणांचा पुरस्कार करणे, चुकीच्या मार्गाने जाणारे कितीही उच्च अधिकारीपदे भूषवीत असोत, त्यांची भीती न बाळगता कानउघाडणी करून त्यांना ताळ्यावर आणणे हे हिंदुस्थानातील वृत्तपत्रांना आपले आद्यकर्तव्य वाटतच नाही. कोणा तरी विभूतीची पूजा करणे, हे त्यांचे मुख्य कर्तव्य झाले आहे. बातमीची जागा आता सनसनाटीने घेतली आहे.

विवेकावर आधारलेले मत मांडण्याऐवजी आंधळ्या विकाराचे प्रदर्शन केले जाते. जबाबदार लोकांच्या मतांना आवाहन करण्याऐवजी बेजबाबदार माणसांच्या भावना भडकवल्या जातात. नॉर्थक्लिफची पत्रकारिता म्हणजे हुजऱ्यांनी हुजऱ्यांसाठी लिहिलेला मजकूर असे लॉर्ड साल्सबरी म्हणत असे. हिंदुस्तानातली पत्रकारिता ही ढोल पिटणाऱ्यांची पत्रकारिता आहे.’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर- रायटिंग्ज अँड स्पीचेस, खंड १, १९७९, पृ. २२७)

रवीश कुमार यांनीही डॉ. आंबेडकर वाचलेत आहेत! डॉ. आंबेडकरांनी, न्या. रानडे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यात केलेल्या भाषणात समकालीन पत्रकारितेवर कोरडे ओढले. त्याचाच प्रतिध्वनी राजीनाम्यानंतर पत्रकार रवीश कुमार यांच्या बोलण्यात उमटत होता!

आता यूट्यूबवरील ‘रवीश कुमार ऑफिशल’ चॅनलच्या माध्यमातून रवीश कुमार आपल्या भेटतीलच! पण कुणा पत्रकाराच्या राजीनाम्याची घटना चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे, रवीश कुमार यांनी राष्ट्रीय पातळीवरील मुख्य प्रवाहातील पत्रकारितेत कार्यरत असताना जे विषय हाताळले, त्या विषयांना आजपर्यंत राष्ट्रीय पातळीवर मुख्य प्रवाहातील पत्रकारितेने डावलले होते!

नवी दिल्लीतील संसद भवनातील मार्गावर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी न चुकता हजारोंच्या संख्येने बहुजन रांगा लावतात. तिथे यानिमित्ताने पुस्तकविक्री, तसेच डॉ. आंबेडकर आणि समाजप्रबोधन परंपरेतील इतर समाजसुधारक यांच्या प्रतिमा-प्रतीकांची विक्री होते.

हे वातावरण ‘कव्हर’ करण्यासाठी काही वर्षांपूर्वी रवीश कुमार हे स्वतः कॅमेरासहित तिथे पोहोचले. संसद भवन मार्गावरील त्या वातावरणाची ‘प्राइम टाइम’मध्ये दखल घेतली. त्या वेळी रवीश यांच्या पत्रकारितेचे वेगळेपण ठसठशीतपणे समोर आले. दलित, आदिवासी, वंचित, बहुजन यांना तो ‘आपला माणूस’ वाटायला लागले.

‘गुलामगिरी’ आणि ‘गुलाबी वर्तमानपत्रे’

हाथरस असो वा शाहीन बाग… मुख्य प्रवाहातील पत्रकारितेने इथल्या, दलित, आदिवासी, बहुजन, वंचित घटकांना डावलण्याची परंपरा आजची नाही. डॉ. आंबेडकरांनी ज्या महात्मा जोतिबा फुले यांना गुरुस्थानी मानले, त्यांनीही याबाबत आपल्या लेखणीतून तत्कालीन छापील वर्तमानपत्रांवर टोकदार भाष्य केले आहे. ‘शेतकऱ्याचा असूड’मध्ये, ‘वर्तमानपत्रांच्या गुलाबी लिहिण्यावर बिलकूल भरंवसा न ठेवितां…’ असे म्हणत, महात्मा जोतिबा फुले शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीकडे लक्ष वेधतात! कारण ही ‘गुलाबी वर्तमानपत्रे’ खरी माहिती सरकारपर्यंत पोहोचवत नाहीत! ‘गुलामगिरी’ ग्रंथात म. फुले लिहितात, ‘एकंदर सर्व मऱ्हाठी वर्तमानपत्रांचे कर्ते भट असल्यामुळें त्यांच्यानें आपल्या जातीच्या लोकांच्याविरुद्ध लिहिण्यास हात उचलवत नाहीं. आपलें दयाळू सरकारही त्या सर्व मतलबी वर्तमानपत्रांच्या म्हणण्यास खरें मानून त्या लिहिण्यांत एकदंर सर्व शूद्रांचें व अतिशूद्रांचें मत आले आहे म्हणोन समजते. असे समजण्यामध्यें आमच्या भोळ्या सरकारची मोठी चूक आहे. त्यांस इतकें ठाऊक नाहीं कीं, एकदंर सर्व भट वर्तमानपत्रकर्त्यांची आणि शूद्र व अति शूद्रांची जन्मातून एकदासुद्धा गाठ पडत नाहीं. त्यातून बहुतेक अतिशूद्रांस तर वर्तमानपत्र म्हणजे काय, हे काहीच समजत नाही. तर मग अशा अनओळखी अतिशूद्रांची मते ह्या सोंवळ्या वर्तमानपत्रांस कोठून व कशी कळतात?’ (महात्मा फुले समग्र वाङ्मय, संपादक: धनंजय कीर, डॉ. स. ग. मालशे आणि य. दि. फडके, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, (शुद्धलेखन मूळ प्रतीप्रमाणे) समकालीन पत्रकारितेच्या या ‘सोवळेपणावर’ महात्मा फुले यांनी कठोर शब्दांत प्रहार केले आहेत.

फुले यांच्या साहित्यिक गुणवत्तेची फारशी दखल कुणी घेतली नाही. मराठी निबंधलेखनातील त्यांचे स्थान कुणाला नीट पाहता आले नाही आणि त्यांचे लेखनगुणही कुणी फारसे जाणून घेतले नाहीत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने इतिहासाचे खंड प्रसिद्ध केले. परंतु सुरुवातीला, त्यातही महात्मा फुले यांच्या निबंधलेखनाचा उल्लेख नव्हता. ही उणीव नव्याने प्रकाशित झालेल्या आवृत्तीतून दूर करण्यात आली आहे.

‘पत्रकार आंबेडकर’

महाराष्ट्रातील बिनीच्या पत्रकारांच्या तोडीची पत्रकारिता असूनही डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेची दखल मराठी पत्रकारितेच्या इतिहासकारांनी मागील शतकाच्या अखेरपर्यंत घेतली नव्हती! याबाबतीत लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आपल्या ‘पत्रकार आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिलेली माहिती उद्बोधक ठरावी. ‘एवढे कोरीव वृत्तपत्रीय प्रपंच करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकार आंबेडकर म्हणून कोणी मानाचा मुजरा केला नाही! मराठी वृत्तपत्रसृष्टी टिळक- आगरकर ते खाडिलकर- कोल्हटकर येथेच कुठे तरी थांबत होती. लोकजागृतीचे कार्य करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम आहे, असे मानणाऱ्या आणि प्रत्यक्ष वृत्तपत्रसृष्टीचा प्रपंच करणाऱ्या बाबासाहेबांचा पत्रकार म्हणून निर्देश न करणे, त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे मूल्यमापन न करणे ह्या बाबी अनवधानाने होत होत्या, असे म्हणणे अत्युक्तीचे ठरेल. काहींनी निर्देश करावा पण तो अत्यंत जुजबी किंवा चुकीचा तरी असा सारा प्रकार. मराठी वृत्तपत्रसृष्टीने जिथे बाबासाहेबांच्या पत्रकारितेकडे दुर्लक्ष केले तेथे एम. चलपती राव, जे. नटराजन, विश्वनाथ अय्यर, आर.सी.एस. सरकार, पी.जी. राव, पी. डी. पारीख या भारतीय वृत्तपत्रसृष्टी संबंधाने ग्रंथलेखन करणाऱ्या लेखकांना दूषण देण्यात अर्थ नाही. डॉ. आंबेडकरांच्या चरित्रकारांनी मात्र बाबासाहेबांच्या वृत्तपत्र लेखनाची दखल घेतली ती ऐतिहासिक दृष्टीने.’

डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्रीय कर्तृत्वाचे यथायोग्य मूल्यमापन होण्यासाठी, २१ वे शतक उजडावे लागले. आजही मुख्य प्रवाहातील पत्रकारिता/ माध्यमे दलित, आदिवासी, वंचित घटकांना न्याय देण्यात का कमी पडतात? हे जाणीवपूर्वक घडते का? का मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये त्यांना संधी डावलली जाते? भारतातील मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये नेतृत्वस्थानी ९० टक्के समाजातील अभिजन (सवर्ण) वर्ग असून, एकाही माध्यम संस्थेचा प्रमुख हा दलित किंवा आदिवासी नसल्याचे, ‘ऑक्सफॅम इंडिया’ आणि ‘न्यूजलाँड्री’ने तयार केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे! दक्षिण आशियातील सगळ्यात मोठा मीडिया फोरम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दि मीडिया रम्बल’च्या व्यासपीठावरून हा अहवाल दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला.

त्यासाठी ‘न्यूजरूम’मधील १२१ पदांचा अभ्यास करण्यात आला. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय घटकांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा अधिक नाही. दुसरीकडे भारताची ७० टक्के लोकसंख्या या घटकाने व्यापली आहे. ‘ऑक्सफॅम इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहर या संदर्भात निरीक्षण नोंदवतात, ‘मागील तीन वर्षांतील आमच्या या दुसऱ्या अहवालातून भारतातील न्यूजरूममध्ये वंचित घटकांना पुरेसे स्थान मिळाल्याचे दिसून येत नाही. माध्यमसंस्थांनी राज्यघटनेतील समतेच्या तत्त्वांचा अंगीकार करावा, केवळ वार्तांकनामध्येच नाही तर नियुक्तांमध्येही ते दिसायला हवे!’

मग होते काय? रवीश कुमार यांच्यासारख्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये असलेल्या पत्रकाराने दलित, आदिवासी यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले की, ते वंचितांना आपले वाटू लागतात! मुंबई महानगरातील मुख्य प्रवाहातील मराठी, इंग्रजी भाषक वृत्तपत्रसृष्टीचा (२४ तास चालणाऱ्या उपग्रह वृत्तवाहिन्यांचा काळ नसताना) २५ वर्षांपूर्वी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, मुंबई येथे अभिवादन करण्यास येणाऱ्या आंबेडकरी जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असायचा, हे वेगळे सांगायला नको! पुस्तकविक्रीपेक्षा कोणत्या गोष्टी अधिक ठळकपणे समोर आणल्या जायच्या? वाचकांच्या पत्रव्यवहारात कोणत्या प्रतिक्रियांना प्राधान्य दिले जायचे?

आज दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय वर्गातील सुशिक्षित, पत्रकारितेची आवड असलेल्या आणि महत्त्व लक्षात आलेल्या नव्या पिढीने पत्रकारितेचे रीतसर प्रशिक्षण घेऊन, गेल्या दोन दशकांपासून अधिक जोरकसपणे पत्रकारिता सुरू केली आहे. त्यात मुख्य प्रवाहातील माध्यमांसारखा व्यावसायिक सफाईदारपणा (आर्थिक अडचणींमुळे) नसला तरी त्यांची दखल घ्यावी असे त्यांचे काम आहे.

‘दलित दस्तक’, ‘दलित व्हाॅइस’, ‘सम्राट’, ‘लोकनायक’ ही त्यातील काही प्रमुख नावे. कोविड १९ आणि त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेली टाळेबंदी यामुळे अनेक माध्यम संस्था, दैनिके बंद पडलेली असताना, समाजाच्या आर्थिक पाठबळावर हे सर्व टिकून आहेत आहे. ‘आवाज इंडिया’सारखे चॅनल आपला जम बसवू पाहत आहेत. ज्यांची दखल रवीश कुमार यांनीसुद्धा घेतली होती.

राजीनामा दिल्यानंतर, रवीश कुमार साधत असलेल्या संवादाच्या अखेरीस सावध करताना म्हणतात, ‘मुख्य प्रवाहात पत्रकारिता करू इच्छिणाऱ्या नव्या वर्गातील पिढीला आता कदाचित पत्रकारितेच्या नावाखाली दलाली करावी लागेल. भारतीय माध्यमांचा अवकाश इतका बदलून गेला आहे, जे आता पत्रकार आहेत, पत्रकारिता करत आहेत त्यांना अधिक संघर्ष करावा लागेल. कारण, ‘एक डरा हुआ पत्रकार, एक मरा हुआ नागरिक पैदा करता है…’!’

महात्मा गांधी म्हणत, ‘सेवा हाच पत्रकारितेचा हेतू असला पाहिजे. लोकमन जाणणे आणि या समाजमनाला निश्चित आणि निर्भय वाचा देणे, हेच पत्रकारितेचे खरे कार्य असते. सत्य जाणणे हा लोकांचा हक्क असतो. काय घडत आहे, याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांना मिळाली पाहिजे. पत्रकारितेत सत्ता दडलेली असते. तिचा दुरुपयोग हा गुन्हाच असतो…!’

सुसंघटित नेतृत्वाचे वैचारिक अधिष्ठान नसतानाच्या आजच्या काळात, रवीश कुमार यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांतून बाजूला होताना, नुसता अस्मितावाद वाढवायचा की प्रबोधन परंपरेचा वैचारिक वारसा जपायचा, हा प्रश्न उभा केला आहे.

padmakarkgs@gmail.com

Story img Loader