नुकतेच दहीहंडी, गणपती उत्सव ढोलताशे, डीजेचा दणदणाट करत वाजत गाजत साजरे झाले. आता नवरात्र, दिवाळी, होळी असे एका मागून एक अनेक सण-उत्सव सुरू होतील. शिवाय लग्न, मुंज, सत्यनारायणाच्या महापूजा, आयपीएल ते आंतरराष्ट्रीय कोणताही सामना जिंकणे, निवडणूक जिंकलेल्या उमेदवाराच्या मिरवणुका, अशी वर्षभर मिळणारी निमित्ते ढोलताशे आणि डीजेना उठाव देतात ते वेगळेच. या सर्व सण आणि कार्यक्रमांमध्ये आपण नेहमीप्रमाणे जनतेच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची न चिंता न करता मोठ्या प्रमाणात ढोलताशे, डीजे, लेझर या कानठळ्या बसवणाऱ्या आणि दृष्टीदोष निर्माण करणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करत असतोच. त्यामुळे…

१) लेझरचा प्रकाश डोळ्यात गेला आणि अंधारी आली. प्रकाशझोतामुळे नेत्रदोष निर्माण होऊन कायमचा आंधळेपणा आला.

२) मूर्ती विसर्जनामुळे तळी, नद्या, समुद्र यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले.

३) दहीहंडीत अमुक इतके गोविंदा जखमी झाले वा मृत्युमुखी पडले.

४) डीजेच्या दणदणाटामुळे कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे येणाऱ्यांची संख्या वाढली. तर काही लोकांना कायमचा बहिरेपणा आला. काही नैराश्यग्रस्त झाले, हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.

५) नवरात्रात कॉन्डोमची विक्री वाढली आणि त्याचसोबत नंतर काही महिन्यांनी गर्भपातांची संख्याही वाढली, असा डॉक्टरांचा निष्कर्ष आला.

६) विसर्जनाच्या मिरवणुकी चेंगराचेंगरी होऊन काही भक्त दगावले, तर काही नदीच्या वा समुद्राच्या प्रवाहात वाहून गेले.

हे ही वाचा… आपल्या संरक्षणदलांची सद्य:स्थिती काय आहे?

या बातम्या नित्याचाच होतात. त्या कितीही क्लेशकारक असल्या तरीही अंधभक्तांचा उन्माद आणि उन्मत्तपणा कमी होण्याचे लक्षण दिसत नाही. कारण त्यांच्या मनावर धर्मांधतेचे आणि परधर्म द्वेषाचे गारुड स्वार झाले आहे! रस्ते अडवून ट्रॅफिक जाम करत चित्रपटातील थिल्लर गाण्यांवर आचकट विचकट नाचत मिरवणुका काढणे म्हणजे देवभक्ती प्रदर्शित करणे असेच त्यांना वाटते. त्यामुळे त्यांना कितीही समजावून सांगितले तरी सध्या ते त्यांच्या आकलनापलीकडचे आहे. कारण…

आम्ही धार्मिक उत्सवापायी आंधळे, बहिरे, लुळेपांगळे झालो म्हणून काय बिघडले? देवाधर्माच्या रक्षणासाठी प्राण हाती घेऊन लढणारे आम्ही शूरवीर सरदार आहोत! भलेही लेझरमुळे आमची दृष्टी जाईल, त्याची आम्हाला तमा नाही. कारण मुळातच आम्ही आंधळे आहोत. त्यामुळे डोळ्यात रक्त साकळले काय आणि रेटिनाला इजा झाली काय आम्हाला काहीही फरक पडत नाही. अहाहा! काय तो डोळ्यांचे धृतराष्ट्र करणारा लेझर शो!! एवढा नेत्रदीपक आहे की, तो लोकांना दाखवणे आमचे कर्तव्यच नाही का? त्याशिवाय लोकांमध्ये धर्माभिमान जागृत होणार कसा? म्हणून आम्ही आंधळे झाल्यावरही आम्हा तरुणांचे सळसळते रक्त धर्मरक्षणासाठी कायम उसळत राहणार, ही काळ्या दगडावरची रेख आहे! कारण ‘आम्ही देवधर्मासाठी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती!’

दुसरी गोष्ट, ज्यांना साहसी खेळांतील थरार कल्पनेतसुद्धा करवत नाही त्यांना दहीहंडीतील थरावर थर रचण्यातील थरार कळणे कठीण! साहस म्हटले की, धोका आलाच. पण तरुणाई अशा धोक्यांना सामोरे जाण्यास केव्हाही सज्ज असते. कारण म्हटलेच आहे की, ‘हिम्मते मर्दा तो मदद ए खुदा।’ मग आम्हाला कसली चिंता? साक्षात देव आमचा पाठीराखा आहे. मग त्या देवाची भक्ती करण्यासाठी आम्ही भलेही दहीहंडीच्या थरावरून खाली पडून लुळेपांगळे झालो, आयुष्यभर आईवडिलांसाठी भार झालो, तरी काही हरकत नाही. शेवटी ज्यांनी आम्हाला जन्म दिला आहे त्यांनीच आमचा भार वाहणे त्यांचे कर्तव्यच नाही का? लोक भलेही म्हणतील की, वंशाचा दिवा आई-वडिलांच्या म्हातारपणाची काठी असतो. पण आम्ही म्हणतो, आम्ही आमचे प्राण देवाधर्मासाठी देण्यास अक्षरशः एका पायावर तयार असल्यामुळे त्यांनीच आमची काठी व्हावे, हेच जास्त योग्य नाही का?

हे ही वाचा… अग्रलेख: दक्षिणेचा ‘वाम’पंथ!

तिसरी गोष्ट म्हणजे संगीताचे माधुर्य कळत नाही अशा अरसिकांना ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून दणदणाटी आवाजाने देवभक्तीपर गाण्यावर थिरकण्यातली मजा काय कळणार? नाचाने शरीरातील सगळे स्नायू ढिले होतात. अंगाला शिथिलता देणारा हा व्यायाम प्रकार ध्वनी प्रदूषणाच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या लक्षात येणे कठीण! त्यांच्या ‘अजान’चा बारा महिने आम्ही त्रास सहन करतो; मग आमच्या ढोलताशांचा काही दिवस त्रास सहन केला तर बिघडले कुठे? आणि त्या दणदणाटी आवाजामुळे आमच्यातील काही बहिरे झाले म्हणून काय बिघडले? तसेही नेत्यांच्या आज्ञा बहिरेपणाने डोके गहाण ठेवून पाळणे हे तर आमचे कर्तव्यच आहे. त्यासाठी हा बहिरेपणा आम्हाला मदतच करतो. भारतात तरुण सर्वांत जास्त आहेत. आम्ही तरुण बहिरे आणि आंधळे झालो तर आमच्या राजकारण्यांचा फायदाच नाही का? त्यांच्या भावी पिढ्यांच्या भल्यासाठी आम्ही धर्मरक्षक त्याग करणार नाही तर नेत्यांची मुले करणार? शेवटी आम्हाला काही धर्माभिमान आहे की नाही?

असे उपहासात्मक लिखाण वाचल्यावर काही भक्त चवताळून म्हणतील की, तुम्हाला नेहमी फक्त आपलेच दोष दिसतात काय? कधीतरी ‘त्यांच्या’वर टीका करून दाखवा की. तुम्हाला फक्त आपलाच हिंदूधर्म दिसतो काय?’ तेव्हा त्यांना एवढेच विचारावेसे वाटते की, ‘माझ्या हिंदू धर्मात धर्मभोळेपणा, अंधश्रद्धा पसरवणारे आपलेच धर्ममार्तंड, पंडे, पुजारी आहेत की मुस्लीम धर्मातील मुल्ला-मौलवी वा ख्रिशन धर्मातील फादर-पादरी?’ लोकांचे शोषण त्यांच्याच धर्मातीलच ढोंगी बाबा-बुवा-महाराज करतात.

दुसरे असे की, आपण हिंदू धर्मात जन्म घेतला आणि लहानपणापासून त्याच धर्मातील अंधश्रद्धा आणि शोषण पाहत आलो आहोत, तर मुस्लीम धर्मातील लोकांवर आणि ख्रिश्चनांवर आपण आधी बोलावे की आपल्याच धर्मातील शोषणकर्त्या धर्ममार्तंडावर? त्यांच्या अंधश्रद्धांवर टीका करण्यासाठी त्यांच्या धर्मातील रॅशनॅलिस्ट लोक आहेतच की. ते त्यांच्या कुवातीनुसार याला वाचा फोडत असतातच. त्यांना जसा त्यांचा समाज सुधारावा असे वाटते तसेच आम्हालाही आपला समाज सुधारावा असे वाटते; यात गैर काय? म्हणून आम्ही आपल्याच धर्मातील अंधश्रद्धांवर जास्त बोलतो.

आता समजा एखादा मुस्लिम आपल्या धर्मातील अंधश्रद्धेवर, शोषणावर बोलला आणि एखादा हिंदू मुस्लीम अंधश्रद्धेवर बोलला तर दोन्हीकडच्यांना चालेल का? दंगली होतील ना! मुस्लिमांनी वा इतर धर्मियांनी हिंदूधर्मावर टीका केली तर त्यांना मोठ्या तोंडाने भक्त गुरकवतात की, ‘आम्ही आमचे पाहून घेऊ. आमच्या धर्मात नाक खुपसायची गरज नाही.’ म्हणजे त्यांनी केलेली टीका जर आवडत नसेल तर आपल्याला इस्लाम वा इतर धर्मांवर टीका करण्याचा काय अधिकार आहे? थोडक्यात काय तर, माझ्या घरातील कचरा मी दूर करणार की माझा शेजारचा येऊन करणार? माझे घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींचीच असणार ना? हे शेजारच्या अब्दुल चाचाच्या घरी कचरा आहे, तर आपल्या घरातील कचरा कशाला स्वच्छ करता, पडून राहू द्या तसाच, आधी त्यांचा कचरा साफ होऊदे, असे म्हणण्यासारखे आहे.

ते अमुक करतात म्हणून आपणही तसेच करणार? ‘ते’ अनुकरणीय कधीपासून झाले? इतरांच्या चुका दाखवून आपल्या चुकांचे समर्थन करणे यालाच दांभिक दुटप्पीपणा म्हणतात. मग इतर धर्मियांनी कसेही वर्तन केले तरी ते मान्य करावे का? अजिबात नाही! एक पुरोगामी म्हणून इस्लाम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मातील असंख्य अनिष्ठ रुढींना ठाम विरोध केलाच पाहिजे. प्रा. नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई, अनिल अवचट, श्याम मानव तसेच नरेंद्र दाभोलकर यासारख्या समाजवादी पुरोगाम्यांनी तो अनेकदा केलेलाच आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेक आंदोलनेही मुस्लीम बाबाबुवांच्या विरोधात केली आहेत आणि जादूटोणा कायद्याच्या आधारे सर्व धर्मांतील बाबाबुवांना अटकही करण्यास भाग पाडले आहे. त्याच प्रमाणे जावेद अख्तर अनेकदा जाहीररित्या आपण नास्तिक आहोत आणि इस्लामी प्रथा वाईट आहेत, हे सांगतात. म्हणून काही ढोंगी लोकांमुळे पुरोगामित्व बदनाम केले जाऊ शकत नाही, की हिंदू धर्माच्या उन्नतीचा प्रयत्न थांबवता येणार नाही!

हे ही वाचा… अन्वयार्थ: पुराची चिंता की वादाचा धूर?

तेव्हा ‘आम्हाला काय सांगता, इतर धर्मियांना सांगा ना!’ असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि तो फॉरवर्ड करणाऱ्यानी एकदा स्वतःच्या निष्ठा आणि हेतू तपासले पाहिजेत. हिंदूंचा विकास व्हावा, हिंदूधर्मीयांची प्रगती व्हावी असे ज्यांना वाटत नाही, त्यांनी खुशाल असल्या अस्मिता जोपासण्यात धन्यता मानावी. उत्कर्षासाठी पुरोगामित्व हे अटळ आहे! शेवटी ‘परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे.’ हे आमची गीता सांगतेच, नाही का?

म्हणून दुसऱ्या धर्मातील व्यक्तीने बदलावे मग आम्ही बदलू, यासारखा दुसरा अविवेकी आग्रह नाही. असे जेव्हा एखाद्या व्यक्ती वा समूहाच्या बाबतीत आपल्याला वाटते, तेव्हा थोडा गृहपाठ करून बघावा. त्या व्यक्ती वा समूहाच्या नेमक्या कुठल्या वागण्यात बदल घडावा असे आपल्याला वाटते त्याची एक यादी करावी, ती यादी तपासून बघावी. हे लक्षात येईल की इतके सगळे बदल त्या व्यक्ती वा समूहाने आपल्याला बरे वाटावे म्हणून करायचे आहेत! त्या व्यक्तीला दोष देणे सोपे आहे. कारण त्या अपेक्षा शेवटी आपल्या आहेत. पण ती व्यक्ती वा समूहही तशाच अपेक्षा बाळगत असेल तर? त्या व्यक्ती वा समूहाने बदलावे म्हणून आपण जी यादी तयार केली तशीच यादी आपण आपल्या व्यक्ती वा समूहासाठी का करू नये? तेव्हा एकमेकांना दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या धर्मातील दोष नाहीसे करणेच योग्य नाही का?

पण कोणताही बदल स्वीकारण्यासाठी अंगी धाडस लागते आणि विचार करण्याची प्रवृत्तीही… जोपर्यंत आपण ती जोपासत नाही तोपर्यंत आपले जीणे हे मेंढरूवृत्तीच्या प्रवाहपतितासारखे गलितगात्र होते. आपल्याला बिनडोक मेंढरू होणे आवडेल की विचारी, विवेकी माणूस, हे आपणच ठरवायचे आहे. ही प्रक्रिया कठीण असली तरी ती आपल्याच हिताची असते. म्हणूनच तुकोबारायांनी म्हणून ठेवलं आहे…

‘तुका म्हणे, होय मनाशी संवाद,

आपुलाचि वाद आपणांसी!’