ॲड. संदीप ताम्हनकर

आपल्या जगण्याचा अर्थ लावण्याच्या, त्याला एखाद्या सिद्धांतात बसवण्याच्या माणसाच्या खटाटोपातून वेगवेगळे धर्म जन्माला आले. सुरुवातीच्या काळातील समाजासाठी त्यांची गरज वेगळी असली तरी आज तशी परिस्थिती नाही. पण तरीही आज धर्म ही बाब पूर्वी कधी नसेल इतकी तीव्र होऊन बसली आहे..

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!

मी म्हणजे कोण? जीवमात्रातील स्वत्त्व नक्की आलं कुठून? ते काय आहे? मानवी जीवनाचा उद्देश काय? आणि मृत्यूनंतर काय होतं? जीव येतो कोठून आणि जातो कुठे यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी माणसाने हजारो वर्षे विविध प्रकारचे विचार केले, कल्पना केल्या, शोध केला. हेच विचार जेव्हा जेव्हा कोणीतरी एकत्रितरीत्या मांडले आणि ते बहुसंख्य लोकांना मान्य झाले तेव्हा त्याचे धर्म झाले. जगाचा अफाट पसारा पाहून हे काम कोणत्या तरी अलौकिक शक्तीने केलेले असावे अशी सामान्य माणसाची समजूत होणेही साहजिक आहेच. माणसाला त्याच्या अस्तित्वाबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न विविध धर्मानी केलेला आहे.

कोणत्याही धर्माचे तत्त्वज्ञान किंवा विचार ढोबळमानाने तीन प्रकारांत विभागता येईल. अधिभौतिक (मटेरियल) जीवनाचे नीतिनियम. पारलौकिक जीवनविषयक कल्पना. आणि यांचे पालन किंवा उल्लंघन केल्यास त्याचे होणारे परिणाम असे कोणत्याही धर्माच्या शिकवणीचे घटक असतात. हे सर्व प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितलेले आहे असेही सगळेच धर्म ठामपणे सांगतात. तरीही या लेखाचा हा विषय नाही. माणसाला आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या सुखदु:खाची कारणमीमांसा आणि त्यावरचे उपाय याबाबतीत सर्वच धर्माचे प्रयत्न तोकडे, काल्पनिक आणि अनेकदा हास्यास्पद आहेत असेही आपल्याला आढळून येईल. सर्वच धर्मानी सर्वशक्तिमान जगन्नियंत्या अशा देवाची कल्पना केलेली आहे.

धर्म ही कल्पना एवढी लोकप्रिय होण्याचे कारण काय? माझ्या मते धर्मानी एक महत्त्वाची गोष्ट मांडली आहे ती म्हणजे मृत्यूनंतरच्या अस्तित्वाचे आश्वासन. माणसाच्या मृत्यूनंतरही, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या स्वत्त्वाच्या अस्तित्वाचे आश्वासन आणि खात्री. धर्म ही संकल्पना एवढी लोकप्रिय होण्याच्या पाठीमागे हे एक अतिशय महत्त्वाचे कारण आहे.

धर्मामधील पाप-पुण्य हे सामाजिक वर्तणुकीचे नियम असून त्याची मृत्यूनंतरच्या अस्तित्वाच्या आश्वासनाशी सांगड प्रत्येक धर्माने घातलेली आहेच. पाप-पुण्य हा एका अर्थाने मृत्यूनंतरही अस्तित्व टिकवून ठेवण्याचा विमा आहे. कदाचित अशी लालूच दाखवून माणसांना या जन्मात नीतीने वागण्यासाठी भाग पाडायची ही एक क्लृप्ती असावी असेही म्हणता येईल.

हेही वाचा >>>शाळा देणगीदाराच्या नावे करणे कितपत योग्य आहे?

महत्त्वाचा मुद्दा असा की कोणत्याही जीवित व्यक्तीला आपल्या मृत्यूनंतर आपल्याबाबतीत सगळं संपलं, आयुष्य संपल्यावर अस्तित्वाला पूर्णविराम आला हे मान्य करणं भावनिकदृष्टय़ा फारच अवघड वाटतं. माणसाच्या स्वत्त्वाची, मीपणाची जी एक कल्पना जिवंत माणसाच्या मनात असते त्यामुळे स्वत:च्या मृत्यूनंतर काहीही नाही हे स्वीकारणं फारच क्लेशकारक वाटतं. भौतिक आयुष्यातही माणसाला सुखांत असलेल्या कथा आणि घटना आवडतात. दु:ख म्हणजे अंताकडे सुरू झालेला प्रवास असं मानलं जातं. दु:ख टाळण्याकडे माणसाचा आपसूक कल असतो आणि जर कोणी सुख वाढवणारे आणि दु:ख कमी करणारे तत्त्वज्ञान मांडत असेल किंवा तसा दावा करत असेल तर त्याचे अनुयायी बनणे हा उपायही सोपा असतो. मानवी जीवनाचा जैविक उद्देश अस्तित्व आणि वंशसातत्य हा आहे. त्यानुसार माणसामध्ये सगळय़ा प्रेरणा असतात. त्यामुळे मृत्यूनंतर पूर्णविराम हे मान्य करणे माणसाला जमत नाही, जे साहजिक आहे.

सर्वच धर्मानी सुख आणि दु:खाकडे निर्विकारपणे पाहावं अशी शिकवण दिलेली असली तरी तसं प्रत्यक्षात आणणं कोणाही मर्त्य माणसाला शक्य होत नाही. त्यामुळे जी व्यक्ती निर्विकार मनाने सुख आणि विशेषकरून अपरिमित दु:ख भोगते किंवा त्याला सामोरी जाते त्यांच्याबद्दल सामान्य माणसे अचंबित होऊन त्यांना अलौकिक (सुपर ह्यूमन) मानू लागतात आणि त्यांच्या शिकवणीचे, विचारांचे पाठीराखे होतात. याबरोबरच मानवाला करणे शक्य नाही असे काही चमत्कारही धर्मसंस्थापकांनी केल्याची ठाम समजूत असते. बहुतेक सर्वच धर्मात आपल्याला अशीच उदाहरणे सापडतील.

जगाच्या लोकसंख्येपैकी ३० टक्के लोक ख्रिश्चन धर्माचे आहेत. येशू ख्रिस्ताने मानवजातीच्या कल्याणाकरिता स्वीकारलेल्या अपरिमित वेदना आणि नंतर दिलेले बलिदान यामुळे ते भारावून गेलेले असतात, त्याबद्दल कृतज्ञ असतात, त्याच्या शिकवणीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. येशूने केलेल्या चमत्कारांचीही त्याला जोड असते. अंतिम फैसल्याच्या दिवशी सदेह पुनरुत्थापन आणि त्यानंतर चांगल्या माणसांना कायमस्वरूपी स्वर्गसुख मिळेल असे प्रत्यक्ष प्रभूने त्याच्या सर्वात प्रिय शिष्याच्या तोंडून सांगितले असल्यामुळे आणि त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातही तसे झालेले असल्याचा पुरावा समोर असल्याच्या घटनेवर श्रद्धा असल्यामुळे अशी शिकवण देणाऱ्या धर्माचे अनुयायी होणे हा एक आकर्षक पर्याय ठरतो. मुसलमान धर्मात पुनरुत्थान नसले तरी कायमस्वरूपी स्वर्ग (किंवा नरक का होईना पण अस्तित्व आहे) अशीच संकल्पना आहे. महम्मद पैगंबर यांनी आयुष्यात केलेला संघर्ष, भक्ती आणि त्यामुळे केलेल्या कथीत स्वर्गारोहणामुळे प्रभावित होऊन जगातील एकचतुर्थाश लोकसंख्या मुसलमान धर्माची अनुयायी असते. बुद्धाने मानवी जीवनातील दु:खाचे कारण शोधण्यासाठी ती दु:ख स्वत: अनुभवायचा केलेला प्रयास लोकांना प्रभावित करतो. बुद्धाने अनुयायांना पुनर्जन किंवा निर्वाण याची हमी दिलेली आहेच. माणसामध्ये धर्मकल्पना रुजण्यामध्ये बालसंगोपनाचा, संस्कारांचा मोठा भाग आहे.

हिंदू धर्म काही बाबतीत थोडा वेगळा आहे. हिंदू धर्माचा कोणी एकच एक संस्थापक नाही. हा धर्म अनेक आदिम विचारधारा, वेद, उपनिषदे, पुराणे, महाकाव्ये, गीता यांच्या माध्यमातून लौकिक आणि पारलौकिक तत्त्वज्ञान मांडतो. तसेच दु:ख सहन करणं ही हिंदू धर्मातील संकल्पना नाही. हिंदू धर्म दु:खाचं उदात्तीकरण करत नाही तर कर्मफळ सिद्धांतानुसार दु:ख ही वैयक्तिक भोगाची अपरिहार्य गोष्ट मानतो. म्हणजेच प्रत्येकजण आपआपल्या सुखासाठी स्वत:च जबाबदार असल्यामुळे दु:ख निवारणासाठी एकत्रित सामाजिक प्रयत्न करणं हाही हिंदू तत्त्वज्ञानाचा भाग नाही. प्रत्यक्ष आयुष्यात जास्त वैयक्तिक सुख कसं मिळेल यासाठीची जीवनशैली हिंदू धर्म सांगतो. पाप-पुण्याच्या फेऱ्यांमध्ये अडकून मिळणाऱ्या अनेक जन्मांपैकी कोणत्या तरी जन्मात पूर्णब्रह्मचे सम्यक ज्ञान झालं की कायमस्वरूपी मोक्ष मिळेल, स्वर्गसुख मिळेल याचं आश्वासन हिंदू धर्मातही आहेच. यासाठी भक्ती, कर्म, ज्ञान आणि राज असे मार्ग (योग) सांगितलेले आहेत.

हेही वाचा >>> नारी शक्तीला वंदन करा, पण मोकळीकही द्या!

यासारख्या सगळय़ा धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या संकल्पनांचा पक्का पगडा पृथ्वीतलावरील सर्व माणसावर असतो. धर्माचं अस्तित्व शब्दप्रामाण्यावर अवलंबून असतं. शंका घेणं किंवा प्रश्न उपस्थित करणं याला पाखंड मानलं जातं आणि पाखंडी व्यक्तीला दंड देणं हे धर्माचं आणि पुण्यकर्म मानलं जातं. जगात रोगराईने मेलेल्या माणसांपेक्षा जास्त माणसे धर्माच्या नावाने झालेल्या युद्धांमध्ये मारली गेलेली आहेत. प्रत्यक्षात पाहिल्यास जिज्ञासा, कुतूहल, शंका घेऊन तपासून पाहणं, प्रयोग करणं, प्रश्न विचारून त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं यामुळेच अखिल मानवजातीची वाढ आणि प्रगती होऊ शकली आहे.

आज जगात फारच थोडे लोक संपूर्णपणे अधिभौतिक (मटेरियल) विचार मानतात. देव नाही, निर्माता नाही, जग कसं निर्माण झालं याचे ज्ञात विज्ञानाच्या आधारे दिलेलं स्पष्टीकरण, पाप-पुण्य या कल्पना जरी उचित असल्या तरी त्या आधारे मृत्यूनंतर कोणताही फरक पडत नाही, कोणीही अंतिम फैसला करत नाही, मृत्यूनंतर त्या माणसासाठी सगळं संपुष्टात येतं, पुनरागमन नाही, जन्मजन्मांतरीचा फेरा नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, प्रत्यक्ष प्रमाण आणि त्या आधारे काढलेलं अनुमान यावरच विश्वास अशी विवेकवादी किंवा नास्तिक विचारांच्या माणसाची विचारपूर्वक स्वीकारलेली वैचारिक भूमिका असते. यामुळे विवेकी माणसाचं या पृथ्वीवरील अस्तित्व सुखात जातं. विवेकवादामध्ये मृत्यूनंतर काय याबाबतीत कोणतंही काल्पनिक आकर्षक आश्वासन असूच शकत नाही. कारण तसा कोणताही व्यक्तिनिरपेक्ष पुरावाच माणसासमोर नाही. त्यामुळे नास्तिकमताला जास्त अनुयायी मिळू शकत नाहीत.

धार्मिक माणूस म्हणजे वाईट आणि नास्तिक म्हणजे चांगला असा किंवा याच्या विरुद्ध असा कोणताही निष्कर्ष काढण्याची आवश्यकता नाही, उद्देशही नाही. पण प्रत्यक्षात बहुमताचा आदर या तत्वाने स्वीकारलेल्या लोकशाहीमध्ये धर्मकल्पनांच्या आधारे राजकारण करून माणसाची विवेकबुद्धी ताब्यात घेतली जाते आणि त्याला भावनेच्या प्रभावात आणून राजकीय सत्ता मिळवली जाते. धार्मिक माणूस जास्त करून दैववादी असतो आणि प्रयत्नवादी नसतो. ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. त्यामुळे दु:ख, दैन्य, दारिद्रय़, सुख, संपत्ती हे दैवगत न्यायानेच ज्या त्या व्यक्तीच्या वाटय़ाला आलेलं आहे असा युक्तिवाद त्याला मान्य असतो. आणि अशी दैवी योजनाच असेल तर ती प्रयत्नाने बदलण्याचं दु:साहस करणं हे पाप मानलेलं असल्यामुळे धार्मिक माणूस असं करणं कटाक्षाने टाळतो. एका अर्थाने दैववाद हा स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीचं तत्वज्ञान पुरवतो.

या उलट विज्ञानवादी व्यक्ती प्रयत्नपूर्वक असे नवीन शोध लावण्याच्या प्रयत्नात असते की ज्यामुळे सर्व माणसांचे अधिभौतिक आयुष्य सुखी, समाधानी, निरोगी, कमी कष्टाचं होईल. स्वतंत्र विचार करण्याची मुभा, सर्व मनुष्यप्राणी समान असल्याचा ठाम विश्वास, बंधुभाव यासाठी असा माणूस प्रयत्न करतो. प्रत्यक्षात मानवी जीवनात सुखाची हमी ही प्रयत्नवादी, पाखंडी, विज्ञानवादी व्यक्तीच्या कामामुळेच मिळते. मानसिक पातळीवरही पाप, पुण्य, चांगले, वाईट, खेद, खंत, आनंद आणि दु:ख याचे परिपूर्ण विवेचन मानवी मनाच्या अभ्यासातून विज्ञानाने शोधून काढलेलं आहेच. आपण कायद्याचे राज्य ही संकल्पना स्वीकारल्यानंतर समाजाचे धारण करणारे नियम हे कायद्याच्या माध्यमातून अमलात आलेले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी शासन आणि पोलीस यंत्रणा आहेत. थोडे अपवाद सोडल्यास अनेक कट्टर धार्मिक देशांनीही शरियतसारख्या धार्मिक संहिता बाजूला ठेवून आधुनिक विचारांवर आधारित दंड संहिता अमलात आणल्या आहेत. सार्वजनिक जीवनात धर्मधिष्ठित व्यवस्था असून उपयोगी नाही, तिथे वैज्ञानिक विवेकवादी विचारांच्या आधारेच राज्यव्यवस्था चालवली गेली पाहिजे हे आपल्याला पटलेलं आहे.

बहुसंख्य लोक भौतिक आयुष्यात विज्ञान तंत्रज्ञानाने लावलेले शोध वापरतात आणि आपले आयुष्य सुखकर करून घेतात पण पारलौकिक आयुष्याचा मुद्दा आला की परत आपल्या मृत्यूनंतरच्या अस्तित्वाची हमी देणाऱ्या काल्पनिक धार्मिक संकल्पनांकडे जातात. नास्तिक आणि विज्ञानाधिष्ठित मताच्या प्रचारासाठी हे एक मोठंच आव्हान आहे की ‘मृत्यूनंतर काय’? काहीही नाही हे उत्तर सोडून इतर काही आश्वासन असेल तर सांगा. आपण कितीही सैद्धांतिक पातळीवर म्हटलं की शासन आणि धर्म यामध्ये अकराव्या शतकातील मॅग्नाकार्टापासून एक रेषा आखण्यात आलेली आहे. तरीही प्रत्यक्षात अनेकदा धर्म ही रेषा ओलांडून राजसत्तेवर चाल करून जातो आणि प्रसंगी राजसत्ताच ताब्यात घेतो हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे. सहिष्णू, निरपेक्ष राजसत्ता मिळण्याबाबतही अनेकदा अपेक्षाभंग झालेला आहेच. यावर उत्तरं आणि उपाययोजना शोधाव्याच लागतील. असे उपाय कदाचित राजकीय, संविधानिक, वैज्ञानिक, सामाजिक, ऐतिहासिक वा सगळय़ाच्या मिश्रणातून मिळू शकतील.

यासाठी काय करावं लागेल याची यादी मोठी आहे. मानवाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर धर्माचं आणि विज्ञानाचं योगदान, त्याची तुलना, सुशासनासाठी तार्किक उपाययोजनांची गरज, शब्दप्रामाण्याचा त्याग, वर्धिष्णू आणि प्रगतिशील असा परिवर्तनक्षम धर्म सांगणारे नवे आधुनिक प्रेषित, कायद्याच्या राज्याबद्दल जनजागृती, धर्म आणि विज्ञानाच्या सहयोगातून मानवजातीने मिळवलेले यश, समान संधी देणारी भेद न बाळगणारी शासन व्यवस्था, पारलौकिक आकांशांना पर्याय म्हणजे मानवजातीचे पिढीजात जैविक वंश सातत्य हे जनतेला समजावून सांगणं, तथाकथित उच्चनीच, जातीपातीसारख्या ‘दैवी’ व्यवस्था मुद्दाम प्रयत्नपूर्वक संपवणं, आर्थिक संपन्नता, शिक्षण, वैज्ञानिक विचारांचा प्रसार या प्रत्येक मुद्दय़ावर समविचारी लोकांच्या सहयोगाने मूलभूत काम केले तर भारतीय जनता नक्कीच आदर्श पुरोगामी समाजव्यवस्थेकडे जाईल.

लेखक कायदा, समाजकारण आणि राजकीय विषयांचे अभ्यासक आहेत.

advsandeeptamhankar@yahoo.co.in