प्रभाकर बागले
आज (१० फेब्रुवारी) प्रा. नरहर कुरुंदकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या लिखाणातील मूलभूत विचार आपल्याला पुन्हा पुन्हा त्यांच्यापर्यंत घेऊन जातात..
प्रा. नरहर कुरुंदकर यांचे १० फेब्रुवारी १९८२ रोजी निधन झाले. त्यानंतर जो सुशिक्षित समाज आहे त्यानं नरहर कुरुंदकरांना पाहिलेलंच नाही हे वास्तव आहे. पण कुरुंदकरांनी ज्या विचारावर मूलगामी चिंतन मांडलं तो विचार आजच्या अनेक विचारवंतांचं कळत-न-कळत पोषण करतो आहे. ते त्यांच्या परीनं आप-आपल्या क्षेत्रात त्या विचाराचा विस्तार करताना दिसतात. मीही त्यापैकीच एक आहे. माझं भाग्य असं की, मला त्यांची भाषणं ऐकायला मिळाली. काही पुस्तकं वाचायला मिळाली. त्यापैकी ‘वाटा : माझ्या-तुझ्या’, शिवरात्र, धार आणि काठ, जागर, व्यासांचे शिल्प, गोदातटीचे कैलास लेणे आदी पुस्तकं आणि त्यांनी ज्या अंकात लेखन केले आहे त्या जुन्या अंकांकडे पुन:पुन्हा मी जातो. त्यांनी इतक्या विषयांवर मूलगामी चिंतन केलं आहे की ते पाहूनच मन थक्क होऊन जातं. आणि वाटतं की ते आज असते तर त्यांनी डिजिटल-आभासी जगाला कवेत घेऊन त्याची सुसंगत मांडणीची शक्यता सुचवली असती.
कारण त्यांच्या संज्ञेत कुठं तरी कार्यकारणभाव वा वैचारिकता आणि सर्जकता याचं एक विलक्षण रसायन झालेलं दिसतं. या रसायनात अशा क्षमता असाव्यात की ज्या भूतकाळाच्या आणि वर्तमानकाळाच्या विवेकी आकलनाला गती देणाऱ्या ठरतात. आणि या दोन्ही गोष्टींचा स्पष्ट उल्लेख त्यांच्या ‘मी आस्तिक का नाही ?’ या लेखात आहे. हा लेख मला फार मौलिक वाटला. तो या अर्थाने की प्रा. कुरुंदकर गुरुजी लहान असताना नात्यातली कांही माणसं त्यांच्या घरी यायची. ते त्यांना गोष्टी सांगत. आणि नंतर त्यांना विचारले की, या गोष्टींचा सारांश काय ? गुरुजी त्यांना उत्तरं द्यायचे. या त्यांच्या उत्तरातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीची दिशा रेखीव होत असल्याची जाणीव वाचकाला होत असे. म्हणून ही बीजभूत उत्तरे इथं नमूद करावीशी वाटतात.
गुरुजी जेमतेम नऊ वर्षांचे होते. त्यावेळी उस्मानिया विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख काकासाहेब जोशी एकदा वसमत या गुरुजींच्या गावी आले. जोशी फार गोष्टी वेल्हाळ. त्यांनी समुद्र मंथनाची गोष्ट सांगितली. “देवाने मंदारला केले रवी, वासुकीला केले दावे, शेपटीकडून झाले देव, तोंडाकडून झाले राक्षस. मग त्यांनी समुद्र ढवळून काढला. त्यातून १४ रत्ने बाहेर आली. देव अमृत प्याले.”
जोशींनी त्याला प्रश्न विचारला, या गोष्टीचं तात्पर्य काय ? गुरुजी म्हणाले, जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते.”
जोशी म्हणाले, ‘तू नरकात जाशील. आपण देवाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे.’
मग एकदा यज्ञेश्वर कस्तुरे शास्त्री असंच बोलले, ‘अरे, आपण मेल्यावर नरकात जाऊ, याची भीती नाही तुला वाटत ? ’
‘नाही बुवा. आम्ही तिथं मोठा प्लाॅट घेतला आहे. घर बांधायचं काम सुरू आहे. ते संपलं की आम्ही तिथं राहायला जाऊ. पण अधून-मधून तुम्हालाही तिथं यावं लागंल बरं.”
“आम्हाला कशाला बरं ?”
‘‘अहो तुमच्या पाठशाळेला ग्रँट मिळण्यासाठी फाॅर्म घेऊन दर आठ-पंधरा दिवसांनंतर चक्कर करावीच लागेल ना.”
ही त्यांची उत्तरे चमकदार आणि विनोदी वाटतात. पण थोडं बारकाईनं पाहिल्यास त्यांनी कहाणीमधली विसंगती टिपलेली दिसते. ईश्वराच्या नावे अस्तित्वात असलेल्या धर्माला नाकारणारं त्यांचं मन दिसतं. स्वर्ग-नरक या संकल्पना आस्तिक्य भावातून निर्माण झाल्याचं सूचन त्या कहाणीत दिसतं. आणि एखादी गोष्ट मिळविण्यासाठी सामान्य माणसाला किती खेटे घालावे लागतात यातून समाजातील यंत्रणेची बेफिकरीही दिसते.
लौकिक जगातल्या व्यवहाराकडे चिकित्सकपणे पाहण्याचं सूचन त्यात दिसतं. कुरुंदकर गुरुजींना लौकिक जग, त्यातले प्रश्न, समाज संस्थेतले प्रश्न, राजकीय-सांस्कृतिक संस्था, या सर्वांमध्ये राहणारा माणूस त्यांच्या विचाराच्या केंद्रस्थानी होता. पण त्याच बरोबर त्या माणसाला साहित्य, संगीत, आदी कलांमधला सहभागही अभिप्रेत होता. याचा अर्थ त्यांना आस्तिक्यापेक्षा मानवी अस्तित्व महत्त्वाचं वाटत होतं. नुसतं वाटत होतं असं नाही तर त्याला चौफेर भिडण्यासाठी लागणारी खुमखुमी त्यांच्यामध्ये होती. ही खुमखुमी ज्ञानगर्भ हाेती. महाभारत कसं उत्क्रांत होत गेलं, त्यात देवतांच्या कथा, आणि कहाण्याच-कहाण्या त्यांच्या लक्षात आल्या. त्यांनी महाभारताचे भाष्यकारही वाचलेले होते. वेदांपासून दलित साहित्यापर्यंत, रससूत्रापासून ते संगीतापर्यंतचे वाचन-समीक्षण आणि या सर्व विषयावर सतत काही नवं देणं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा त्यावर उठवणं हे कसं मूर्त केलं असावं असा प्रश्न पडतो. अर्थात याचं उत्तर वर उल्लेखलेल्या वैचारिकता आणि सर्जकता यांच्या अद्वैतात असावं, असं वाटतं.
लौकिक जीवनातील सर्व घटनांकडे गुरुजी अतिशय आदरपूर्वक पाहताना दिसतात. काही घटनांचा ते वेध घेताना दिसतात. इतिहास हाही त्यांच्या निस्सीम प्रेमाचा विषय आहे. आणि प्रेमाचा विषय हाच ज्ञानाचा विषय होत असतो. त्यामुळं गुरुजींचं संवेदनच ज्ञानगर्भ झालेलं जाणवतं. याच्याच जोडीला त्यांनी वि. का. राजवाडे, सरदेसाई, मुजुमदार आदींच्या लेखनाचं चिकित्सक वाचन केलेलं आहे. पाश्चात्य इतिहासकार हेरोडाेटस, रँक, टेन आणि अगदी अलिकडचा कॅसिरर या इतिहासकारांचही वाचन असणार हे निश्चित. कारण त्यांच्या वाचनाचा आणि त्याच्या आकलनाचा झपाटा फार मोठा होता. त्यामुळं त्यांना ऐतिहासिक सत्याचा वेध घेणं सोपं जात असावं. आणि मुख्य म्हणजे आपण कशाचा वेध घेत आहोत आणि कसा घेत आहोत, याविषयीचं त्यांचं भान फार तल्लख होतं.
एका गोष्टीचा उल्लेख या संदर्भात करावासा वाटतो. हेरोडोटस हा इतिहासाचा आद्यजनक समजला जातो. त्याच्याही काळात, आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे एक वर्ग ‘वंचित’ होता. तो त्यांची दखल आणि त्यांना त्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळालं पाहिजे असं मानणारा होता.
गुरुजींचा उल्लेख हेरोडोटस याच्या बरोबर करण्याचं कारण असं की, गुरुजींना वेद जसे महत्त्वाचे वाटत होते तसंच दलित साहित्याविषयीही त्यांच्या मनात खोलवर आस्था होती. हेरोडोटस आणि गुरुजी या दोघांच्या विचारातील साम्य (इन्ट्यूट्यू रिलेशनशिप) या दोन प्रज्ञांचं मानुषतेच्या स्तरावरचं नि:शब्द नातं सूचित करणारे आहे.
इतिहासाकडे पाहण्याचा त्यांचा एक स्वतंत्र एक असा दृष्टिकोन आहे. तो थोडा समजून घेतला पाहिजे. त्यांच्या मते जो भूतकाळ वर्तमानात येतो तो परंपरेला, पूर्वग्रहांना, प्रथांना घेऊन येत असतो. तो वर्तमानातील व्यक्तिमानसात प्रतिमेच्या रुपात, समाज मानसात प्रतीक रुपात, तर इतिहासात मिथकाच्या रुपात वावरत असतो. ही तिन्ही रुपं जनमानसाचा अंगभूत भाग झालेली आहेत. त्यामुळं शरीरानं जरी आपण वर्तमानात असलो तरी वर्तमान वास्तवाला आपण पाहात नसतो. कारण आपली नजर वास्तवाच्या प्रतिमेनं, प्रतिकानं, मिथकानं संस्कारित झालेली असते. म्हणजे आपण आपल्याच वर्तमानकाळात फक्त भूतकाळ जगत असतो.
ही परिस्थिती गुरुजींना खूप अस्वस्थ करणारी वाटत होती. पण त्यांची ऐतिहासिक संज्ञा त्यांना गप्प बसू देत नव्हती. कारण तीत त्यांच्या कल्पकतेच्या प्रेरणाही आहेत आणि निर्दाेष वास्तवाचा वेध घेणाऱ्या प्रेरणाही आहेत. म्हणून असं म्हटलं जात असावं की, ज्या समाजात सर्जक प्रेरणांची विविधता असते आणि हव्यासी प्रेरणा कमी प्रमाणात असतात ताेच समाज पुढे जाऊ शकताे. असे मूलभूत विचार आपल्याला गुरुजींच्या लेखनात दिसतात. त्यांचे स्मरण करणं हे आपलं आद्यकर्तव्य व्हावं. या निमित्ताने जिज्ञासूंनी व्यासांचे शिल्प चा ग्रंथामधील “राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण आणि प्रा. कोसंबी आणि भगवतगीता” हे दोन लेख आवर्जून वाचावेत.
(लेखक – ज्येष्ठ समीक्षक, ‘अनुष्ठुभ्’चे माजी संपादक, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी सदस्य)
bagaleprabhakar80@gmail.com