लोहियांचा वैचारिक वारसा पुन्हा रुजवण्याची सुरुवात त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करण्यापासून करायला हवी.
राम मनोहर लोहिया यांची २३ मार्च रोजी ११५ वी जयंती साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहियांचा उल्लेख ‘दूरदृष्टीचे नेते, निर्भीड स्वातंत्र्यसैनिक, आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते’ या शब्दांमध्ये केला. नेहमीप्रमाणे लोहियावादी विचारांवर उभारलेल्या समाजवादी पक्षाचा आणि राष्ट्रीय जनता दलाचा अपवाद वगळता लोहियांच्या वैचारिक वारशाची फार कुणी आठवण काढली नाही. लोहियांचा राजकीय वारसा त्यांच्या अनियमित राजकारणाच्या विखुरलेल्या आठवणींमध्ये झाकोळला गेला आहे. लोहियांचा समाजवादी विचार आणि त्यानुसार त्यांनी सुचवलेले राजकीय आणि धोरणात्मक उपाय हे काही मोजक्या लोहियावादी समूहापुरते मर्यादित राहिले. ही केवळ इंडिया आघाडीसाठी शोकांतिकेची बाब नाही तर एकूणात भारतासाठीच ही दुःखद बाब आहे.
मोदींनी आणि भाजपच्या नेत्यांनी लोहियांची आठवण काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भाजपच्या नेत्यांनी लोहियांच्या अनेक भूमिका, विधानं, घोषणा या आपल्या फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने मांडल्या आहेत. लोहियांच्या मूळ भूमिकेच्या पूर्णपणे विसंगत अशी त्यांची मांडणी केली आहे. भाजपचे नेते लोहियांनी नेहरूंवर केलेल्या टीकेचा आनंद घेतात आणि त्या आधारे भाजपचा अजेंडा पुढे रेटतात. वस्तुतः अनेक मुद्द्यांबाबत लोहियांचे नेहरूंसोबत एकमत झाले असते. ‘इंग्रजीवर बंदी’ ही त्यांची घोषणा हिंदीच्या वर्चस्वासाठी वापरली गेली आहे तर मागास जातींना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचा वापर ओबीसींच्या सत्ता वर्चस्वाची पाठराखण करण्यासाठी केला गेला आहे.
लोहियांचा वैचारिक वारसा पुन्हा रुजवण्याची सुरुवात त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर करण्यापासून करायला हवी. काँग्रेसविरोध हे काही राजकीय तत्त्वज्ञान नव्हते, तर प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात केलेली ती एक तात्कालिक रणनीती होती. लोहियांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसपासून केली. समाजवादी काँग्रेस सोडून जाऊ लागले तेव्हा लोहियांनीच त्यांना विरोध केला होता. त्यांनी १९६० च्या दशकात जेव्हा काँग्रेसचे वर्चस्व होते, अशा काळात काँग्रेसविरोधाचा नारा दिला.
लोहिया आज असते तर त्यांनी भाजपविरोधाचा नारा दिला असता आणि विरोधी पक्षांच्या ऐक्याची हाक दिली असती, यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.
त्याचप्रमाणे लोहिया काही इंग्रजीच्या विरोधात नव्हते. ते स्वतः खूप आनंदाने इंग्रजीत बोलायचे आणि त्यांना इंग्रजी आवडतही असे. त्यांचा विरोध होता तो इंग्रजीच्या वर्चस्ववादाला, तिच्या धुरीणत्वाला. इंग्रजी परकीय भाषा आहे म्हणून ते विरोध करत नव्हते तर ही भाषा सरंजामीचे आणि वर्गीय विषमतेचे प्रतीक आहे, असे त्यांचे मत होते. लोहिया हिंदीला सर्वश्रेष्ठ भाषा मानत नव्हते. उलट सर्वच भारतीय भाषांचे ते आग्रही प्रचारक होते. त्यामुळेच सर्वच भाषांमधील लेखक त्यांच्यामुळे प्रभावित झाले, यात नवल नाही. हिंदीमध्ये लिहिणारे फणीश्वरनाथ रेणू, रघुवीर सहाय, सर्वेश्वर दयाल सक्सेना, विजयदेव नारायण साही, आसामी भाषेत बीरेंद्र कुमार भट्टाचार्य, कन्नड भाषेत लिहिणारे यु. आर. अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, पी लंकेश आणि सिद्दलिंगा अशा अनेक लेखकांवर लोहियांचा प्रभाव होता. आज लोहिया असते तर ते हिंदीच्या वर्चस्वाच्या विरोधात बोलले असते आणि सर्व भारतीय भाषांच्या ऐक्याची आग्रही मांडणी त्यांनी केली असती.
लोहियांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हिंदीपट्ट्यातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ओबीसींना प्रवेश करण्यासाठी योग्य पक्ष ठरला, हे खरे आहे; पण त्यांचे सामाजिक न्यायाचे धोरण केवळ ओबीसींपुरते मर्यादित नव्हते. सकारात्मक भेदभावावर आधारित सर्वसमावेशक धोरणाचा त्यांनी आग्रह धरला. ओबीसी, दलित, आदिवासी, स्त्रिया या सर्व वंचित समूहांना न्याय मिळावा याकरता त्यांनी दिलेली ‘पिछडा पावे सौ में साठ’ ही घोषणा आज सोयीस्कररित्या विसरली जाते. लिंगभावाच्या आधारे होणारा अन्याय हा त्यांनी मांडलेल्या सहा अन्यायांपैकी एक आहे. या अन्यायाला उत्तर म्हणून त्यांनी ‘सप्तक्रांती’ सांगितली. सर्व जात वर्गातील स्त्रियांची अवस्था ही शूद्रांसारखी असून त्यांना प्राधान्याने संधी दिली पाहिजे, असे लोहियांचे मत होते. श्रेणीबद्ध विषम व्यवस्थेला प्राधान्यक्रमावर आधारित व्यवस्थेतून उत्तर दिले पाहिजे, असे म्हणणा−या लोहियांनी ओबीसींमधील आत्यंतिक मागास जातींना आणि अनुसूचित जातीतील महादलितांना आज पाठिंबा दिला असता. लोहियांची सामाजिक न्यायाची दृष्टी जात, वर्ग आणि लिंग या तिन्हींचा एकत्रित विचार करुन तयार झालेली आहे. या तिन्ही घटकांच्या आधारेच भारतीय समाजव्यवस्थेतील उतरंडीच्या तळाशी असणारे लोक आजचे भाजपचे वर्चस्व मोडीत काढू शकतात.
भारतीय सभ्यतेच्या वारशावर आणि राष्ट्रवादी दृष्टीवर आधारलेल्या सांस्कृतिक संसाधनाचा अभाव हे सध्याच्या धर्मनिरपेक्ष राजकारणासमोरील एक मूलभूत आव्हान आहे. अशाप्रकारच्या मूलगामी समाजवादी राजकारणासाठी लोहियांची सांस्कृतिक दृष्टी आज उपयोगी पडू शकते. राजकीय कृतींसाठी लोहियांनी लक्षवेधी प्रतीकात्मक भाषा वापरली आहे. लोहियांच्या मते, गरीब आणि आज्ञाधारक सती–सावित्रीपेक्षा द्रौपदी ही महाभारतातील शहाणी, खेळकर, निर्भीड आणि स्वतंत्र बुद्धीची नायिका ही भारतीय स्त्रीत्वासाठी आदर्शवत आहे. भगवान राम हा त्यांच्यासाठी उत्तर दक्षिणेला जोडणारा तर भगवान कृष्ण हा पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल होता. आज एक व्यापक पर्यावरणीय जाणीव निर्माण झाली आहे. ही जाणीव निर्माण होण्याच्या कितीतरी आधी लोहियांनी वेगवेगळ्या नद्यांच्या संवर्धनाविषयी सर्जक पद्धतीने लक्ष वेधले होते. त्यांच्या मते गंगा आणि शरयू या नद्या कर्तव्याचे प्रतीक आहेत तर यमुना आणि तिच्या वितरिका विविध रसांचे प्रतीक आहेत. खाजगी संपत्तीचे समाजवादी पद्धतीने वितरण व्हावे, हे सांगताना इशोपनिषदातील नचिकेताचे आख्यान सांगत ते ‘कांचनमुक्ती’ विषयी भाष्य करतात. स्वाभाविकच लोहियांच्या मांडणीमुळे अनेक कलाकार प्रभावित झाले. अगदी एम.एफ.हुसैन यांची रामायणातील आणि महाभारतातील अनेक चित्रं ही लोहियांच्या मांडणीच्या प्रभावातून जन्माला आली.
लोहियांनी हिंदू जमातवादाची चिकित्सा करताना वसिष्ठ आणि वाल्मिकी यांच्या आधार घेतला. वसिष्ठ हे उच्च जातीय हिंदूंच्या कोत्या मनाचे प्रतीक आहे कारण त्यांना कनिष्ठ जातीयांविषयी राग आहे, संशय आहे आणि त्यांचे शोषण करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात आहे. एकांतात असलेले मानवी मन या भावनेने व्यापलेले असते. वाल्मिकी मात्र हिंदू धर्मातील उदार आणि खुल्या मनाचे प्रतीक आहे कारण ते धर्मांतर्गत सुधारणांसाठी तयार आहेत, ते न्यायाची मागणी करतात आणि बाह्य प्रभावांचा स्वीकार करतात. हिंदू विरुद्ध मुस्लीम असा झगडा आहे, असे दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र तो हिंदू धर्मातल्या या दोन प्रवाहांमधला संघर्ष आहे. हिंदू धर्मातील उदार प्रवाह जोरकसपणे पुढे येतो तेव्हाच भारत प्रगतीपथावर जाऊ शकतो. अलीकडच्या काळातील हिंदू धर्मातील संकुचित आणि कर्मठ प्रवाहाचा उदय भारताचा एक देश म्हणून आणि एक संस्कृती म्हणून अधःपतन करणारा आहे.
कोणत्याही राजकीय विचारवंताचे संदर्भमूल्य हे समकालीन जगातील उपयोगिता मूल्यापुरते मर्यादित नसते. वर उल्लेखलेल्या अनेक बाबींच्या पलीकडे भारताच्या स्वतःच्या अशा आधुनिकतेच्या धारणेला लोहियांनी तात्त्विक अधिष्ठान दिले. मार्क्सवाद, पाश्चात्य समाजवाद यासारख्या युरोपकेंद्री सिद्धांतनांची त्यांनी काटेकोर चिकित्सा केली. हे करताना त्यांनी भाबड्या देशीवादाचे किंवा भारतीय इतिहासाचे अनाठायी गौरवीकरण केले नाही. नव्या मूलगामी समाजरचनेचा त्यांनी आराखडा मांडला. लोहियांनी सामाजिक आणि आर्थिक समतेचा आग्रह धरतानाच निर्वसाहतीकरणाचे राजकारण आणि संस्कृती यासाठीची पार्श्वभूमी तयार केली. तुम्हाला लोहियांचे विचार पटणार नाहीत किंवा त्यांची मांडणी आजच्या काळाच्या कसोटीवर अपुरी वाटेल किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता वाटेल; पण लोहियांचा विचार हा विचारधारेचा एक महत्वाचा स्त्रोत आहे, हे नाकारता येणार नाही. आजच्या गणराज्यात हा विचार जिवंत ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.
अनुवादः श्रीरंजन आवटे
राष्ट्रीय संयोजक, भारत जोडो अभियान
yyadav@gmail.com
© The Indian Express (P) Ltd