प्रजासत्ताक दिनाला आपण नक्की कशाचा उत्सव साजरा करतो? हे समजायला मला ५० वर्षे लागली. याबद्दल मी पंतप्रधानांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. अर्थातच ‘मोदी है तो मुमकिन है!’
लहान असताना १५ ऑगस्टला आपण कशाचा उत्सव करतो, हे मला कळायचं. ‘ब्रिटिश साम्राज्यापासून मिळालेली मुक्ती’ ही गोष्ट काही समजायला अवघड नव्हती. प्रजासत्ताक दिन आमच्यासाठी फक्त धमाल करण्यासाठीचा उत्सव होता. आमच्या गावातल्या प्रजासत्ताक दिनाच्या सरकारी कार्यक्रमात पहीलवान दाताने गाडी ओढायचा. सर्वत्र उत्सवी वातावरण असायचे; पण या दिवसाचे महत्त्व काही आम्हाला समजलेले नव्हते. या दिवसाचा आणि संविधानाचा काहीतरी संबंध आहे, एवढेच आम्हाला सांगितलेले.
मी इयत्ता नववीत असताना फतेह चंद गोयल मला नागरिकशास्त्र शिकवायचे. गोयल सर म्हणजे संविधानाचा चालता बोलता ज्ञानकोशच. त्यांच्यामुळेच मला राज्यशास्त्राविषयी गोडी वाटू लागली. त्यांनी आम्हाला २६ नोव्हेंबर ( तेव्हा हा ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जात नसे.) आणि २६ जानेवारी या दोन दिवसांमधला फरक समजावून सांगितला. वंशपरंपरेतून आलेल्या राजाच्या आदेशानुसार जो देश चालत नाही, तिथे गणराज्य असते, लोकांचे राज्य असते, असे त्यांनी आम्हाला समजावून सांगितले होते. इंग्लंडने अजूनही राजेशाहीची जुनी संस्थात्मक रचना स्वीकारलेली आहे. भारताने मात्र गणराज्यीय व्यवस्था स्वीकारली. क्रिकेटच्या सर्व कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडकडून हरलेले असताना आपण गणराज्य आहोत, याचं मला भारी वाटलेलं; पण तोपर्यंत इतर अनेक देशांनी ‘गणराज्य’ शासन स्वीकारलं होतं. आपल्या गणराज्य असण्यामध्ये विशेष काय आहे, असा प्रश्न मी सरांना विचारला तेव्हा ते म्हणाले, ‘‘मोठा होशील, तेव्हा कळेल.’’
मी मोठा झालो तरीही मला समजलं नाही. हरिशंकर परसाई यांचा ‘ठिठुरता हुआ गणतंत्र’ हा उपहासिक निबंध वाचल्यावर तुमच्या मनातून ‘२६ जानेवारी’ हा दिवस जाऊच शकत नाही. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात टाळ्यांचा आवाज कुठून येतोय, असा प्रश्न त्यांना पडला. बहुतेक ज्यांचे हात झाकण्यासाठी स्वेटर नाहीत, असे जमिनीवर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत, हे सांगून परसाई लिहितात: गारठलेल्या हातांच्या टाळ्यांच्या टेकूवर गणतंत्र दिवस उभा आहे ! या ओळींचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. अजूनही हे आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येतो.
नरेंद्र मोदींचा उदय झाल्यानंतर गेल्या दशकभरात मला प्रजासत्ताक दिनाचा अर्थ नव्याने कळू लागला आहे. आपल्या संस्था संपुष्टात येऊ लागल्या, आपण स्वातंत्र्य गमावू लागलो, आपले आवाज क्षीण झाले, आपलं शहाणपण हरवलं तेव्हा या अध:पतनासाठी मी शब्द शोधू लागलो ! आपण आपलं संविधान, आपली लोकशाही हरवत चाललो आहोत, असं सांगण्यात आलं. हे अर्थातच खरं आहे; पण आणीबाणीच्या काळात हरवलेल्या सांविधानिक लोकशाहीहून खूप काही मौल्यवान आपण गमावतो आहोत. जगण्याचं प्रयोजन, आपलं सामूहिक अस्तित्व आणि आपलं भारतीयत्व आपण गमावतो आहोत. या भीषण अध:पतनाचे नामकरण कसं करायचं ?
देशाचा मानबिंदू गळून पडला आणि या गणराज्याचा डोलारा कोसळू लागला. राजेशाहीचा अभाव म्हणजे प्रजासत्ताक व्यवस्था नव्हे. प्रजासत्ताक म्हणजे सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व प्रकारच्या सत्तेचा बेताल वापर थांबवणं. गणराज्यवादी असणं म्हणजे श्रेष्ठत्वाचा आत्यंतिक उन्माद नव्हे! गणराज्यवादाचा अर्थ व्यापक आहे. उदारमतवादी लोकशाहीला पर्याय म्हणून उदयाला आलेल्या राजकीय आणि वैचारिक परंपरेशी त्याचे नाते आहे. राजकीय स्वातंत्र्य, लोकांचे सार्वभौमत्व, समान नागरिकत्व आणि नागरी मूल्ये या सर्व वैशिष्ट्यांमधून ही परंपरा आकाराला आली आहे. गणराज्यवादामध्ये ‘स्वराज’ हे स्वातंत्र्य आंदोलनाचा आत्मा असलेले मूल्य आहे. सर्व आयामांनी स्वराज असा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यामध्ये बाबासाहेबांची राजकीय शोधयात्रा आहे आणि ‘गण’ या शब्दामधून प्राचीन गणराज्यांसोबत असलेली नाळ आहे. खरं सांगायचं तर, मूलगामी गणराज्यवाद हेच तर संविधानाचे मूलभूत तत्त्वज्ञान आहे. हे समजलं तेव्हा माझे नागरिकशास्त्राचे शिक्षक आपण गणराज्य आहोत, हे एवढं अभिमानाने का सांगत होते, हे मला कळालं.
हे कळल्यानंतर मी पुन्हा बऱ्याच काळानंतर पाश्चात्त्य राजकीय सिद्धांताच्या जगताकडे वळलो. गणराज्यवाद पुन्हा उदयाला आला आहे, असं माझ्या लक्षात आलं. क्वेंटिन स्किनर आणि जेजीए पॉकॉक यांच्या मूलभूत संशोधनातून पुढे आले की मॅकियाव्हेलीसारखे विचारवंत हे राजेशाहीचे समर्थक नव्हते तर ते नागरी गणराज्यवादाच्या परंपरेतील विचारवंत होते. या मांडणीवर आधारित फिलिप पेटिट यांनी ‘रिपब्लिकॅनिझम: अ थिअरी ऑफ फ्रीडम अॅन्ड गव्हर्मेंट’ या पुस्तकात स्वातंत्र्याची ‘वर्चस्वविहीन’ अशी पुनर्व्याख्या केली. यातून पुढे आले की ‘नव?गणराज्यवाद’ ही काही अकादमिक फॅशन नाही; तर समताधिष्ठित जगभरातल्या सत्तेविरोधातल्या लढ्याचा मार्ग प्रशस्त करणारी ही परंपरा आहे. ‘रॅडिकल रिपब्लिकॅनिझम’ ( संपादन: ब्रुनो लिपोल्ड, कर्मा नाबुल्सी आणि स्टुअर्ट व्हाइट) या पुस्तकात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील हे नाते अधिक चांगल्या प्रकारे उलगडून दाखवले आहे.
या सगळ्याचा आपल्या राजकीय परंपरेशी कसा संबंध आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी विसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाचे लोकशाहीवादी विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे वळलो. लोकशाहीच्या संदर्भातील लेखनातून (‘डॉ. आंबेडकर अॅन्ड डेमॉक्रसी: अॅन अन्थॉलॉजी’ या ख्रिास्तोफ जेफरलॉ आणि नरेंद्र कुमार यांनी संपादित केलेल्या पुस्तकात लोकशाहीवरील लेखन नेमके संकलित केले आहे.) गणराज्यवादाकडून मूलगामी गणराज्यवादाकडे त्यांनी मोर्चा वळवला, हे लक्षात येते. यातूनच त्यांची लोकशाहीची व्याख्या जन्माला आली आहे. लोकशाहीची व्याख्या करताना त्यांनी म्हटले आहे: कोणत्याही रक्तपाताशिवाय लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा शासनाचा प्रकार म्हणजे लोकशाही. त्यांच्यासाठी लोकशाही म्हणजे केवळ राजकीय व्यवस्था नव्हती. खऱ्याखुऱ्या लोकशाहीमधील सामाजिक व्यवस्थेत कोणतीही उतरंड असता कामा नये. अशी नैतिक व्यवस्था निर्माण होण्यासाठी नागरी मूल्यांची आणि स्वातंत्र्य, समता या मूल्यांनी मशागत झालेल्या मनाची आवश्यकता आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे बंधुता किंवा मैत्री या मूल्याच्या अधिष्ठानावर ही मशागत व्हायला हवी. या तत्त्वज्ञानाबाबत संभ्रम होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे तत्त्वज्ञान मी फ्रेंच राज्यक्रांतीकडून उसनवारीने घेतलेले नाही. या तत्त्वज्ञानाची शिकवण मला गौतम बुद्ध या माझ्या गुरूकडून मिळालेली आहे. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही सिद्धांत मूलगामी गणराज्यवादाच्या जवळ जातो. त्यामुळेच त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ होतं, यात काही आश्चर्य नाही.
प्रजासत्ताक दिन हे केवळ कंटाळवाणे सरकारी कर्मकांड होऊ नये. गणराज्यवादाच्या चैतन्याचा नव्याने शोध घ्यावा. व्यंगात्मक टीका करणाऱ्या हरिशंकर परसाईंनी सुचवले होते दरवर्षीच्या गणराज्य सोहळ्याच्या देखाव्यात सत्य परिस्थिती मांडलेली असावी: दुष्काळ निवारण घोटाळा, भ्रष्टाचाराची प्रकरणे, दंगली आणि अत्याचार. त्यामुळे या वर्षी उत्तर प्रदेशने बुलडोझरचे प्रदर्शन करावे, महाराष्ट्राने भव्य वॉशिंग मशीन दाखवावे. हरियाणाने मॉब लिंचिंगचे दृश्य दाखवावे तर दिल्लीने उमर खालिदसह यूएपीएच्या अंतर्गत खटल्याविना तुरुंगातल्या कार्यकर्त्यांचे पोस्टर्स उभे करावेत. अखेरीस एक भव्य टीव्ही स्क्रीन उभा करावा. त्यावर न्यायदेवता दाखवावी, डोळ्यांवर पट्टी असलेली किंवा डोळेच नसलेली! हा गणराज्य दिन ‘गण’ अर्थात ‘लोक’ या कल्पनेचाच पक्षाघात असल्याची झलक असलेला दिवस आहे. गणराज्याच्या पडझडीचा हा दिवस आहे.
गणराज्य म्हणजे दहा वर्षांत आपण जे जे गमावले ते ते सारे असेल तर हे गणराज्य वाचवण्यासाठी, त्यावर पुन्हा आपला दावा प्रस्थापित करण्यासाठी २६ जानेवारीला रणशिंग फुंकावे लागेल. या २६ जानेवारीचा हा खरा शंखनाद असेल.
लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि
‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत. yyopinion@gmail.com
(अनुवाद: श्रीरंजन आवटे)